शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मराठी निबंध
Written By
Last Modified: सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (10:30 IST)

Major Dhyan Chand Essay Marathi :हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद मराठी निबंध

मेजर ध्यानचंद सिंग हे भारतीय हॉकीचे नावाजलेले खेळाडू होते. त्यांना जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हाॅकीचे खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यांना हाॅकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध्ये आॅलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांना हॉकीच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून आजही ओळखलं जातं.त्यांनी भारताच्या क्रीडा क्षेत्रात खूप मोठं योगदान दिल आहे. भारताची क्रीडा संस्कृती वाढावी ,त्याला प्रोत्साहन मिळावे, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाची जागरूकता निर्माण व्हावी या साठी आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो. 
 
 मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद उत्तरप्रदेश येथे एका राजपूत कुटुंबात झाला.हे हॉकी पटू रुपसिंग यांचे थोरले बंधू होते.त्यांचे वडील सोमेश्वर सिंग ब्रिटिश इंडियन आर्मी मध्ये आर्मीसाठी हॉकी खेळायचे. वडील आर्मीत असल्यामुळे त्यांची वारंवार बदली व्हायची, त्यामुळे त्यांना इयत्ता  सहावी नंतर शिक्षण सोडावे लागले. नंतर हे कुटुंब उत्तरप्रदेशातील झाशी येथे स्थायिक झाले.  

मेजर ध्यानचंद यांना बालपणी हॉकी खेळण्यात रस नव्हता.वयाच्या 16 व्या वर्षी दिल्लीतील पहिल्या ब्राह्मण रेजिमेंटमध्ये सामान्य सैनिक म्हणून भरती झाले. त्यानंतर त्यांनी हॉकी खेळायला सुरुवात केली. 
 
हॉकीमध्ये यशाची शिखरे गाठताना त्यांना सुभेदार, लेफ्टनंट आणि कॅप्टन ही पदे अगदी सहज मिळाली. पुढे ध्यानचंद यांची क्षमता पाहून त्यांची मेजर पदावर नियुक्ती करण्यात आली.
 
ध्यानचंद यांनी 1928 मध्ये अॅमस्टरडॅम, 1932 ला लॉस एंजेलिस आणि 1936 च्या बर्लिन ऑलंपिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय हॉकी संघाचं नेतृत्व केलं होतं.
 
मेजर ध्यानचंद यांचा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाचा तो सुवर्णकाळ होता. मेजर ध्यानचंद यांचा खेळ आवडल्यानं जर्मनीचा हुकूमशहा हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात मोठं पद देऊ केलं आणि जर्मनीसाठी हॉकी खेळण्यास सांगितलं.
 
ध्यानचंद त्यावेळी भारतीय लष्करात लान्स नायक या कनिष्ठ पदावर कार्यरत होते. पण जर्मन सैन्यातल्या मोठ्या पदाची ऑफर ध्यानचंद यांनी स्पष्टपणे नाकारली.
"मी भारताचं मीठ खाल्लं आहे. त्यामुळे भारतासाठीच कायमचा खेळत राहीन," असं ध्यानचंद नम्रपणे हिटलरला म्हणाले.
 
मेजर ध्यानचंद जेव्हा हॉकी स्टिक घेऊन मैदानात उतरायचे तेव्हा चेंडू त्यांच्या हॉकी स्टिकला चिकटायचा. अनेकवेळा ध्यानचंद इतके विलक्षण गोल करायचे की, तिथे बसलेल्या सर्व खेळाडूंना आणि लोकांना त्याने फसवले की काय अशी शंका येत असे.
 
ध्यानचंद यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, जेव्हा ते मैदानात उतरायचे तेव्हा विरोधी संघातील खेळाडूंचे हृदयाचे ठोके वेगाने वाढायचे.मेजर ध्यानचंद यांनी भारतासाठी तीन सुवर्णपदके जिंकली आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेतही त्यांनी भारताचा तिरंगा जगभर फडकवला होता. 1928 मध्ये अॅमस्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने पहिल्यांदा हॉकी खेळात भाग घेतला तेव्हा मेजर ध्यानचंद यांनी तेथे 11 सामने खेळले आणि यश मिळवले.
 
मेजर ध्यानचंद यांनी ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, हॉलंड, लॉस एंजेलिस, बर्लिन आणि जपान अशा अनेक मोठ्या देशांमध्ये भारताचा ध्वज उभारला. भारतीय असल्याने त्यांनी गुलामगिरीच्या काळातही भारतीयांना नवी ओळख आणि दिशा दिली होती.
 
जेव्हा ध्यानचंद यांनी ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताला अनेक पुरस्कार दिले होते, तो क्षण सर्व भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. मेजर ध्यानचंद्र यांनी 3 डिसेंबर 1989 रोजी वयाच्या 76 व्या वर्षी नवी दिल्लीत निधन झाले.
 
त्यांच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. 1956 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते . त्यांच्या सन्मानार्थ दिल्लीतील नॅशनल स्टेडियमचे 2002 मध्ये ध्यानचंद नॅशनल स्टेडियम असे नामकरण करण्यात आले .