संबंधित माहिती
- कच्च्या केळ्याचे कटलेट; या वटपौर्णिमेला नक्की ट्राय करा हा पौष्टिक फराळी बेत
- वटपौर्णिमा विशेष: यंदाच्या उपवासाला नक्की करून पाहा 'या' ३ सोप्या आणि टेस्टी रेसिपीज!
- Vat Purnima 2026 यंदा वटपौर्णिमा कधी आहे? तारीख, मुहूर्त, प्रार्थना आणि पूजा विधी जाणून घ्या
- जावईबापू खुश होतील! अधिक मास पौर्णिमेसाठी खास पारंपरिक थाळीचा बेत! पाहा पदार्थांची यादी
- Akshaya Tritiya 2026 : अक्षय तृतीया विशेष नैवेद्यात बनवा या पारंपरिक पाककृती
ॲसिडिटीची भीती नाही! वटपौर्णिमेच्या उपवासासाठी बनवा हलका-फुलका आणि पौष्टिक फराळ
भगर आणि रताळ्याचा डोसाहा उपवासासाठी एक अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि कुरकुरीत पदार्थ आहे. नेहमीची भगर खाऊन कंटाळा आला असेल, तर हा डोसा एक उत्तम आणि आधुनिक पर्याय आहे. रताळ्यामुळे या डोशाला छान मऊपणा आणि हलकी गोडसर चव येते, तर भगरमुळे तो छान कुरकुरीत होतो. हा डोसा कसा बनवायचा याची सोपी रेसिपी आज आपण पाहणार आहोत.
भगर आणि रताळ्याचा डोसा रेसिपी
साहित्य-
भगर (वरई/समो राईस): १ कप
रताळे: १ मध्यम आकाराचे (उकडलेले)
साबुदाणा: २ ते ३ मोठे चमचे (डोसा कुरकुरीत होण्यासाठी)
हिरवी मिरची: २ ते ३ (किंवा आवडीनुसार)
जिरे: १ छोटा चमचा
शेंदेलोण (उपवासाचे मीठ): चवीनुसार
पाणी: आवश्यकतेनुसार
तूप किंवा तेल: डोसा शेकण्यासाठी
कृती-
१. भगर आणि साबुदाणा भिजवणे: सर्वप्रथम भगर आणि साबुदाणा स्वच्छ धुवून घ्या आणि कमीत कमी २ ते ३ तास पाण्यात भिजत ठेवा.
२. पीठ तयार करणे :भिजलेली भगर आणि साबुदाण्यातील जास्तीचे पाणी काढून घ्या. मिक्सरच्या भांड्यात भिजलेली भगर, साबुदाणा, उकडलेल्या रताळ्याचे तुकडे, हिरवी मिरची आणि जिरे घाला. थोडे पाणी घालून हे मिश्रण मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्या. तयार पीठ एका भांड्यात काढून घ्या. त्याची कन्सिस्टन्सी (घट्टपणा) नेहमीच्या डोशाच्या पिठासारखी किंवा घावनासारखी थोडी पातळ असावी. त्यात चवीनुसार शेंदेलोण (मीठ) घाला आणि चांगले मिक्स करा.
३. डोसा बनवणे: गॅसवर डोशाचा तवा चांगला गरम करून घ्या. तव्याला थोडे तूप किंवा तेल लावून घ्या.
तवा छान गरम झाल्यावर गॅस मध्यम आचेवर करा आणि पळीने डोशाचे पीठ तव्यावर मधोमध टाकून गोल फिरवून पातळ डोसा पसरवा. (किंवा तुम्ही हे पीठ तव्यावर कडेने सोडून जाळीदार डोसाही बनवू शकता).
डोशाच्या कडेने आणि वरून थोडे तूप सोडा.
४. शेकणे: डोसा मध्यम ते मंद आचेवर खालच्या बाजूने छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शेकू द्या.
खालची बाजू कुरकुरीत झाल्यावर डोसा हळूच पालटा आणि दुसऱ्या बाजूनेही १ मिनिट शेकून घ्या.
तुमचा गरमागरम, क्रिस्पी भगर आणि रताळ्याचा डोसा तयार आहे! हा डोसा तुम्ही उपवासाच्या ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या खमंग आमटीसोबत सर्व्ह करू शकता. वटपौर्णिमेच्या उपवासासाठी हा एक हलका आणि बेस्ट बेत आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
