गतविजेत्या जर्मनीचे आव्हान संपुष्टात
दक्षिण कोरियाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या जर्मनीला 2-0 असा परभवाचा धक्का दिला. या विजयाने कोरियाच्या हाती काही लागले नाही. परंतु पराभवाने जर्मनीचे स्पर्धेतील आव्हान साखळीतच संपुष्टात आले. विश्र्वचषक इतिहासात प्रथच जर्मनीवर ही नामुष्की ओढावली आहे.
विश्र्वचषक स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठीच्या महत्त्वाच्या लढतीत जर्मनीचा संघ प्रचंड दबावाखाली खेळला. स्वीडनविरुद्धच्या विजयी संघातील 5 खेळाडूंना बसवण्याचा निर्णय सर्वांना अचंबित करणारा होता. पण त्याचा फार फरक त्यांच्या खेळावर झाला नाही. दक्षिण कोरियाने गतविजेत्यांना जखडून ठेवले. आक्रमक सुरुवात करताना कोरियन खेळाडूंनी सुरुवातीपासूनच गोल करण्याचे प्रयत्न केले. पण त्यांना यश मिळाले नाही. जर्मनीला पहिल्या सत्रात सामना गोलशून्य राखता आला. यंदाच्या विश्र्वचषक स्पर्धेत जर्मनीला एकदाही पहिल्या सत्रात आघाडी मिळवता आलेली नाही. याआधी 1986 च्या स्पर्धेत त्यांना हे अपयश आले होते. पहिल्या 45 मिनिटांत कोरियाचा खेळ वरचढ ठरला.
मध्यंतरानंतर जर्मनीने थॉमस म्युलर आणि मारियो गोमेझला पाचारण करताना कोरियावर दडपण वाढवण्याची रणनीती आखली, परंतु त्यांच्याही वाट्याला अपयश आले. 47 व्या मिनिटाला गोरेत्झकाचा हेडरवरील प्रयत्न कोरियाचा गोलरक्षक जो ह्योनवूने सुरेखरीत्या अडवला. त्यामुळे जर्मनीच्या खेळाडूंवरील दडपण अधिक वाढले. गोल करण्याच्या सोप्या संधीही त्यांना हेरता आल्या नाहीत. याउलट कोरियन खेळाडूंनी आत्विश्र्वासाने खेळ केला. 80 व्या मिनिटापर्यंत जर्मनीने गोल करण्याचे 15 प्रयत्न केले.
त्यातील चारच प्रयत्न लक्ष्यावर होते आणि कोरियाच्या गोलरक्षकाने ते प्रयत्न योग्यरितीने रोखले. अखेरच्या दहा मिनिटांत गोलप्रयत्नांचा सपाटा अधिक वेगाने वाढला, परंतु पुन्हा एकदा ह्योनवूची बचावभिंत ओलांडण्यात ते अपयशी ठरले.
भरपाईवेळेत कोरियाच्या किम यंगवूनच्या गोलने जर्मनीच्या आपेक्षांना सुरुंग लावला. मैदानावरील पंचाने हा गोल ऑफसाइड ठरवला. मात्र व्हिडिओ असिस्टंटपंचानी तो गोल वैध ठरवला. त्यात भर टाकत सन ह्युगीने आणखी एक गोल करून जर्मनीवर ऐतिहासिक विजय मिळवला.