मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. फिफा विश्वचषक
Written By
Last Modified: सोमवार, 12 डिसेंबर 2022 (20:38 IST)

यासिन बोनो: मोरोक्कोची 'भिंत', जी पार करून गोल करणं स्पेन, पोर्तुगाललाही जमलं नाही...

कतारमध्ये सुरू असलेल्या FIFA विश्वचषक 2022 मध्ये मोरक्को संघानं स्वतःसाठी एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. पोर्तुगालचा पराभव करत मोरोक्कोचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. मोरोक्कोच्या या यशात सर्वाधिक चर्चा आहे ती मोरोक्कोचा गोलकीपर यासिन बोनो याची. त्याला चाहते 'बोनो' या नावानं हाक मारतात.
मोरक्कोच्या संघानं उपांत्य फेरी गाठली असल्यानं चाहत्यांमध्ये बोनोबद्दलची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. त्याला एखाद्या हिरोप्रमाणे मान मिळत आहे.
 
मोरोक्कोने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत पाच सामने खेळले असून हा संघ अजिंक्य ठरला आहे.
 
विश्वचषकात मोरोक्कोचा पहिला सामना क्रोएशियाविरुद्ध होता. यामध्ये कोणत्याही संघाला गोल करता आला नाही आणि सामना बरोबरीत सुटला.
यानंतर मोरोक्कोने बेल्जियमचा 2-0, कॅनडाचा 2-1 आणि पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनचा 3-0 असा पराभव केला.
 
मोरोक्कोने उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालचा 1-0 असा पराभव केला.
 
कॅनडाविरुद्धच्या सामन्यात मोरोक्कोने आपल्याविरुद्धच गोल केला होता. तो बाजूला ठेवला तर मोरोक्कोने आतापर्यंत विश्वचषकात एकही गोल स्वत: विरोधात केलेला नाही.
 
यामुळेच मोरोक्कोच्या यशाचं श्रेय गोलकीपर बोनोला दिलं जात आहे.
 
पोर्तुगालविरुद्धच्या विजयानंतर 31 वर्षीय गोलकीपर बोनो म्हणाला, "आम्ही इथं मानसिकता बदलण्यासाठी आणि न्यूनगंडातून मुक्त होण्यासाठी इथं आलो आहोत. मोरोक्को जगातील कोणत्याही संघाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे, अगदी उपांत्य फेरीनंतरही. "
 
बोनोची कामगिरी
  स्पेनविरुद्धच्या सामन्यात बोनोने पेनल्टी शूटआऊटमध्ये एकही गोल होऊ दिला नाही. तत्पूर्वी 130 मिनिटांच्या सामन्यात त्याने स्पेनकडून येणाऱ्या चेंडूचा गोलपोस्टला स्पर्शही होऊ दिला नाही. या सामन्यानंतर स्पेनचा संघ विश्वचषकातून बाहेर पडला आणि मोरोक्कोच्या फुटबॉल इतिहासात या सामन्याची नोंद झाली.
 
बोनो म्हणाला, "आम्ही ही मानसिकता बदलली आहे आणि आमच्यानंतर येणार्‍या खेळाडूंच्या पिढीला हे कळेल की मोरोक्कन खेळाडू चमत्कार करू शकतात."
 
बोनोने आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाचा भाग स्पेनमध्ये घालवला असून तो 'सेव्हिले'चा गोलरक्षक राहिला आहे.
 
बोनोला 2022 मध्ये फ्रान्सच्या प्रतिष्ठित याशिन ट्रॉफीनं गौरवण्यात आलं होतं. हा पुरस्कार जगातील सर्वोत्तम गोलरक्षकाला दिला जातो. हा पुरस्कार मिळाल्यानंतर बोनो जगातील नववा सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून समजला जाऊ लागला.
बोनोला स्पेनच्या प्रतिष्ठित ‘झामोरा’ ट्रॉफीनेही गौरवण्यात आलं. स्पेनमध्ये हा पुरस्कार एका वर्षात सर्वात कमी गोल होऊ देणाऱ्या गोलरक्षकाला दिला जातो.
 
2021-22 हंगामासाठी बोनोला हा पुरस्कार देण्यात आला.
 
ऑगस्ट 2020 मध्ये सेव्हिलेकडून खेळताना बोनोनं उत्कृष्ट गोलकीपिंग केलं होतं. त्याच्या संघाने मॅन्चेस्टर युनायटेड विरुद्ध 2-1 असा सामना जिंकला. यासह सेव्हिलेनं सहावे युरोपियन लीग जेतेपद पटकावलं होतंय.
 
बोनोचा प्रवास
यासिन बोनोचा जन्म मोरोक्कोपासून दूर असलेल्या कॅनडातील मॉन्ट्रियल इथं झाला. वयाच्या सातव्या वर्षी तो मोरोक्कोला परतला. त्याला लहानपणापासूनच फुटबॉलची आवड होती. पण त्याचे वडील या खेळाच्या विरोधात होते.
 
बोनोनं वायदाद कासाब्लांकाकडून खेळण्यास सुरुवात केली आणि व्यावसायिक फुटबॉलपटू बनण्यावर लक्ष केंद्रित केलं.
 
अर्जेंटिना संघाचा चाहता
स्पॅनिश फुटबॉल क्लब अॅटलेटिको डी माद्रिदने त्याच्यसोबत करार केल्यानंतर त्यानं मोरोक्कोला सोडलं. पण अनुभव फारसा चांगला न आल्यामुळे त्यानं तो क्लब सोडला. त्यानंतर तो दोन हंगाम (2014-16) झामोरासोबत राहिला आणि त्यानंतर 2016-2019 पर्यंत गिरोना फुटबॉल क्लबचा भाग होता. यानंतर तो सेव्हिलेला पोहोचला.
 
बोनोचा स्पेनशी संबंध असला तरी तो अर्जेंटिनाच्या संघाचा मोठा चाहता आहे हे सर्वांनाच ठाऊक होतं.
 
काही वर्षांपूर्वी बोनो म्हणाला होता, "माझ्या वडिलांनी मला दिलेला पहिला टी-शर्ट अर्जेंटिनाचा होता."
 
बोनोच्या बोलण्यात अर्जेंटिनाची बोली कायम असते.
 
याचं कारण सांगताना एकदा तो म्हणाला होता की, "मी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा मोरक्कोचा सर्वाधिक आहे. मी स्पेनमध्ये आलो तेव्हा माझ्यासोबत अर्जेंटिनाचे खेळाडू खेळत होते आणि माझ्या जिभेवर त्यांच्या बोलीचा प्रभाव होता."
अर्जेंटिनाचा एरियल ओर्टेगा हा बोनोचा आवडता खेळाडू आहे. त्याला 'एल बुरिटो ओर्टेगा' असंही म्हणतात. एकदा बोनोने सांगितले की, तो त्याच्या कुत्र्याला प्रेमानं एरियल म्हणून हाक मारतो.
 
फुटबॉल विश्वचषकात आता जगाच्या नजरा मोरोक्कोवर लागल्या आहेत. उपांत्य फेरीत मोरोक्कोचा सामना फ्रान्सशी होणार आहे.
 
दुसरा उपांत्य सामना क्रोएशिया आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे. आता बोनोसमोर अर्जेंटिनाचा संघ राहण्याची शक्यता आहे का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 
Published By- Priya Dixit