मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. आगामी चित्रपट
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (14:35 IST)

नव्या वर्षात बायोपिक्सवरच भर

नव्या वर्षाची सुरूवात धडाक्यात होत आहे. पहिल्याच महिन्यात दमदार बायोपिक्स प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विकी कौशलचा 'उरी' बराच चर्चेत आहे. 2016 मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईक्सचा थरार यात पाहायला मिळेल. भारतीय लष्कराच्या या मोहिमेने पाकिस्तानला चकवा दिला. ही मोहीम 'उरी'च्या माध्यमातून रुपेरी पडावर अवतरणार आहे. 
माजीपंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवर आधारित 'द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'चीही हवा आहे. अनुपम खेर यांनी यात डॉ. सिंग यांची भूमिका केली असून चित्रपटाबाबत कुतूहल निर्माण झालं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जीवनगाथा पडावर मांडणार्‍या 'ठाकरे'चा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होत आहे. अभिजित पानसे दिग्दर्शित या चित्रपटात नवाजुद्दिनसिद्दिकी बाळासाहेबांच्या भूमिकेत दिसेल. 
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातलं सोनेरी पान म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. तिच्या आयुष्यावर आधारित 'मनिकर्णिका'ही नव्या वर्षात पाहायला मिळेल. या भव्य-दिव्य चित्रपटात कंगना राणावत झाशीच्या राणीच्या भूमिकेत दिसेल. तिकडे अभिनेता हृतिक रोशनही 'सुपर 30' घेऊन येत आहे. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात हृतिक गणितज्ज्ञ आनंदकुमार यांची व्यक्तिरेखा साकारतोय. आनंदकुमार यांचा 'सुपर 30' पॅटर्न खूप गाजला. हा त्यावर आधारित चित्रपट आहे. शिक्षण तसंच प्रशासकीय सेवेतल्या परीक्षांमध्ये होणार्‍या घोटाळ्यांवर प्रकाश टाकणारा 'चीट इंडिया'ही लक्षवेधी ठरू शकेल. इम्रान हाश्मी यात प्रमुख भूमिकेत आहे. 
सोनम कपूर आणि अनिल कपूर ही बाप-लेकीची जोडी 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'मधून रसिकांसमोर येते आहे तर चंबळ खोर्‍यातल्या डाकूंचं आयुष्य 'सोनचिडिया'मध्ये पाहायला मिळेल. मनोज वाजपेयी, सुशांतसिंह राजपूत आणि भूमी पेडणेकर यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. साराग्रहीच्या लढाईवर आधारित 'केसरी'मध्ये अक्षयकुमार-परिणिती चोप्रा प्रमुख भूमिकेत आहेत. इस्रोच्या मंगळयान मोहिमेवर आधारित 'मिशन मंगळ'मध्येअक्षयकुमार, तापसी पन्नू आणि विद्या बालन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यासोबतच झोया अख्तरचा 'गल्ली बॉय', अर्जुन कपूर-परिणिती चोप्राचा  'संदीप और पिंकी फरार', अमिताभ बच्चन-तापसी पन्नूचा 'बदला', सलमान खानचा 'भारत' आणि 'किक 2' शाहिद कपूरचा 'कबीर सिंह', 'स्टुडंट ऑफ द ईयर 2', गोविंदाचा 'रंगिला राजा', 'टोटल धमाल', 'लुक्का छुपी', 'मेंटल है क्या', माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, वरूण धवनचा 'कलंक', जॉन अब्राहमचा 'बाटला हाउस', रणबीर कपूरचा 'समशेरा', धमाल मनोरंजन करणारा 'हाउसफुल 4' या चित्रपटांकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. 2019 मध्येही भरपूर बायोपिक्स तसंच विशिष्ट घटनांवर आधारित चित्रपट पाहायला मिळतील.
 
ऊर्मिला राजोपाध्ये