शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By वेबदुनिया|

गणाना त्वां गणपती

गणपती सर्व दु:खे दूर करणारा, कृपाशील, सुंदर आहे. बुद्धीचा दाता आहे. गणपती हा महर्षी व्यासांचा लेखनिक होता. व्यासांनी सांगितलेले महाभारत गणेशाने लिहून घेतले. दुसरा कोणीही हा ग्रंथ लिहण्यास समर्थ नव्हता.
 
गणपतीला मंगल प्रतीक मानले जाते. कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाला वंदन केले जाते. तुलसीदासाने लिहलेल्या एका पदातून त्याचे संपूर्ण व्यक्तीमत्व आणि महत्त्व दर्शविले आहे.

''गाइए गणपती जगवंदन।
शंकर सुवन भवानी नंदन।।
सिद्धी सदन, गज-बदन व‍िनायक।
कृपा-सिंधु, सुंदर, सर्व लायक।।
मोदक प्रिय, मृदु मंगलदाता।।
विघ्न वारिधी बुद्धी विधाता।।
मांगत तुलसीदास कर जोरे।।
बसहि रामसिय मानस मोरे।।
या पदात गणेशाला गणपती म्हटले आहे कारण तो गणांचा पती आहे. सर्व ब्रह्मांडात तो वंदनीय आहे. सर्व प्रकारच्या उत्सव व शुभ प्रसंगी गणपतीची स्तुती सर्वप्रथम केली जाते. असे मानले जाते की सर्वप्रथम गणपतीला वंदन केल्याने कार्य कोणत्याही विघ्ना‍शिवाय संपन्न होते.

सर्वप्रथम गणपतीची आराधना करण्याचा अधिकार कसा मिळाला याची एक कथा आहे. सर्व प्रथम कोण पूजनीय आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्व देवांमध्ये एक स्पर्धा झाली. 'सर्वप्रथम जो कोणी ब्रह्मांडाला तीन प्रदक्षिणा मारून येईल तो प्रथम पूजनीय आहे' अशी अट स्पर्धेत होती. सर्व देवता आपआपले वाहन घेऊन ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघून गेले. गणपतीचे वाहन उंदीर होते. उंदीर खूप दुर्बल प्राणी. उंदरावर बसून गणपतीची प्रदक्षिणा सर्वांआधी पूर्ण झाली नसती. पण तो चतुर होता. त्याने तिथेच 'राम' नाव लिहिले आणि उंदरावर बसून त्या नावाला तीन प्रदक्षिणा मारल्या व पंचाकडे जाऊन बसला. पंचानी विचारले तू ब्रह्मांडाची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी का गेला नाही? तेव्हा गणपती म्हटला की 'राम' नावात तीन लोक येतात. ते म्हणजे सर्व ब्रह्मांड, सर्व तीर्थ, सर्व देव आणि पुण्य यांचे वास्तव्य असते. मी राम नावाला तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या याचा अर्थ मी ब्रह्मांडाच्या प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्याच्या या युक्तीबद्दल त्याचे कौतुक करण्यात आले आणि त्यालाच सर्वमान्यपणे 'सर्वप्रथम पूजनीय' मानण्यात आले.
 
गणपतीच्या जन्माची कथा पण रोचक आहे. एकदा पार्वतीने आंघोळ करण्यापूर्वी आपल्या मळापासून पुतळा तयार करून प्रवेशद्वारावर द्वारपाल म्हणून तैनात केले. याच दरम्यान शंकर तेथे आले पण त्या पुतळ्याने (द्वारपाल) त्यांना आत येऊ दिले नाही. याचा राग येऊन त्यांनी त्याचे शिर उडवले. आंघोळ झाल्यावर पार्वती बाहेर आली आणि पुतळा तुटलेला पाहून अत्यंत दु:खी झाली. कारण आपल्या अंगापासून तयार केलेल्या पुतळ्याला ती मुलाप्रमाणे मानत होते. तिचे दु:ख पाहून ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी शिवाला सांगितले की सर्वात पहिले जो जीव दिसेल त्याचे शिर कापून या बालकाच्या धडावर लावून द्या. शिवाला सर्वांत प्रथम एक हत्ती दिसला त्यांनी त्याचे शिर आणून बालकाच्या धडावर लावले. बालक जिवंत झाला आणि त्याच आधारे गणपतीला गजानन म्हणू लागले. गणपतीला सर्व सिद्धी देणारा मानले जाते. त्याला सिद्धी आणि ऋद्धी या नावाच्या दोन पत्नी आहेत.