बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 24 मे 2014 (15:26 IST)

मोदींच्या शपथविधी सोहळ्यातील निमंत्रितांची यादी तयार

मोदींच्या शपथविधीला सलमान, अमिताभ आणि रजनीकांत यांना निमंत्रण
देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळय़ासाठी एकीकडे राष्ट्रपती भवनातर्फे जोरदार तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे भाजपामध्येही पाहुण्यांच्या निमंत्रणाची लगबग सुरू असून निमंत्रितांची यादी जवळपास पूर्ण झाली आहे. या सोहळय़ासाठी खास मोदींच्या आग्रहावरून लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, रजनीकांत या कला क्षेत्रातील दिग्गजांसह क्रिकेटचा देव भारतर▪सचिन तेंडुलकरलाही आमंत्रित करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 
 
भाजपाच्या आमंत्रितांच्या यादीत सुमारे ३ हजार पाहुण्यांचा समावेश आहे. 'सार्क' राष्ट्रांचे प्रमुख अथवा त्यांचे प्रतिनिधी प्रथमच भारताच्या पंतप्रधानांच्या शपथविधीला येत आहेत. शेजारील राष्ट्रांसोबतच देशातीलही काही प्रमुख पाहुण्यांना मोदींनी आमंत्रित केले असून यामध्ये विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांचा समावेश आहे. गुजरातचे ब्रॅण्ड अँम्बेसिडर असलेले बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनाही या शपथ सोहळय़ासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या दोन्ही कलाकारांनी मोदींचे कधी उघडपणे सर्मथन केले नसले तरी मोदींसोबत त्यांचे घनिष्ट संबंध आहेत. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर, अभिनेता सलमान खान आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनाही मोदींनी निमंत्रण पाठवले आहे. लतादीदी मोदींच्या प्रशंसक असून सलमान आणि त्याचे वडील सलीम खान हेदेखील मोदींच्या कार्यक्रमात हिरिरीने सहभागी झाले आहेत. सार्क देशांमधील अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि श्रीलंकेने शपथ सोहळय़ाचे आमंत्रण स्वीकारले आहे. 
 
राष्ट्रपती भवनाच्या विशाल प्रांगणामध्ये २६ तारखेला संध्याकाळी ६ वाजता नरेंद्र मोदी देशाचे १५ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. या सोहळय़ाला दिमाखदार बनविण्यासाठी राष्ट्रपती भवनाचे अधिकारी-कर्मचारी दिवसरात्र मेहनत करत असून राष्ट्रपतींच्या सचिव अमिता पॉल जातीने सर्व तयारीवर लक्ष ठेवून आहेत. कार्यक्रमस्थळी रेड कार्पेटसह ऐतिहासिक निळा गालिचाही अंथरला जाणार आहे. पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था अर्धचंद्राकार आहे. विशेष पाहुण्यांसाठी राष्ट्रपती भवनात तर इतरांसाठी प्रांगणात चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येने येणार्‍या पाहुण्यांची राहण्याची सोय करण्यासाठी सरकारी निवासस्थाने आणि हॉटेल्सही बुक करण्यात आली आहेत.