बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By वेबदुनिया|

शुभ संकल्पाचा सण : गुढी पाडवा

गुढी पाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक यशस्कर, मंगल मुहूर्त आहे. ब्रह्मपुराणानुसार महाप्रलयानंतर भगवान ब्रह्माजींनी या दिवशी जगाची निर्मिती केली. या दिवसापासून पृथ्वीवरच्या खर्‍या जीवनचक्राला सुरुवात झाली, अशी आख्यायिका आहे.

कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे, घर, बंगला खरेदी करणे, नवीन व्यवसायात गुंचवणूक करणे, जमीन, प्लॉट खरेदी इतकेच काय, पण वाहन खरेदी, सोने खरेदी करण्यासाठी हा दिवस उत्तम व आदर्श मानला जातो.

ज्या वास्तुत ब्रह्मतत्त्व बाधित झाले असेल, दूषित झाले आहे त्या वास्तूमध्ये गुढी पाडव्याला दारात गुढी उभारल्यामुळे ब्रह्मतत्त्व दोष काही प्रमाणत कमी होतो. पंचमहातत्त्वांपैकी आकाश या ब्रह्मतत्त्वाचे देवस्थान चिदम्बरम येथे आहे.

शास्त्रोक्त गुढी कशी उभारावी :
गुढी पाडव्याला घरची अंर्तबाह्य स्वच्छता करावी. घर रंगवून घेतल्यास उत्तम. पाण्याच समुद्री मीठ टाकून फारणी पुसून घ्यावी. आंब्याच्या डहाळ्यांचे व फुलांचे तोरण मुख्य दारावर लावावे. दाराच्या समोर सुबक व आकाराने मोठी शुभ चिन्हांनीयुक्त रांगोळी काढावी. दाराच्या उजव्या बाजूस छोटा लाकडी पाट मांडावा आणि पाटाभोवती सुबक रांगोळी काढावी. आपल्या घराच्या उंचीपेक्षा जास्त उंचीचा एक लाकडी बांबू घ्यावा. बांबू उंच घेतल्यामुळे सर्वांच्या नजरेला आपली गुढी पडेल. तो बांबू पाटावर ठेवावा. केशरी किंवा किरमिजी तांबड्‍या रंगाचे एक एंची वस्त्र बांबूच्या वरच्या टोकाला बांधावे. त्याच्यावर एक चांदीचा किंवा ताब्याचा गडू पालथा घालावा. गुढीला पाना-फुलांचा हार घालावा. एक कडूलिंबाची डहाळी बांधावी. साखरेची अलंकाराची छाप असलेली माळ बांधावी. घरातील सर्वांनी नवीन वस्त्र परिधान करावे.

गुढीच्या पूजनाने म्हणजे सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाच्या पूजनाने दिवसाची सुरुवात करावी. पूजा करताना ब्रह्मध्वज नमस्तेतु सर्वाभीष्टफलप्रद । प्राप्तेस्मिन् संवत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू । असा ध्वजमंत्र म्हणावा. आरोग्य, संपत्ती, संततीसह भरभराट व्हावी, अशी प्रार्थना करावी. प्रसाद म्हणून गूळ व कडूलिंबाची पाने एकत्रित करून सर्वांना वाटावीत. आयुर्वेदानुसार गूळ व कडूलिंबाची पाने पोटाचे आरोग्य व्यवस्थित ठेवतात. रक्त शुद्ध करून पोटाची रोग प्रतिकारकशक्ती वाढवितात. अध्यात्माच्या दृष्टीने गूळ हे आनंदाचे तर कडूलिंब हे दु:खाचे प्रतीक आहे. गूळ व कडूलिंबाचा एकत्रित प्रसाद हा आयुष्य म्हणजे चांगले व वाईट, आनंद व दु:ख, यश व अपयश यांचे मिश्रण असल्याचे प्रतीक आहे. गूळ हा कृतयुग व त्रेतायुगाचे प्रतीक आहे. जे शुद्धता, भरभराट व शांततेचे द्योतक आहे. कडूलिंब हे द्वापारयुग कलीयुगाचे प्रतीक आहे. जे अशुद्धाता, अनागोंदी व दुखाचे द्योतक आहे. सूर्यास्तावेळी पुरणपोळीचा किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून गुढी उतरावी. तो प्रसाद सर्वांना वाटावा. 

या दिवसाला युद्धाचा आणि जय पराजयाचा वास आहे. रामाने रावणाचा बिमोड करून अयोध्येत प्रवेश केला तो हा दिवस. अयोध्यावासीयांनी विजयोत्सवाच्या दिसवाचे प्रतीक म्हणून गुढी उभारून रामराज्याचे स्वागत केले. रामराज्य म्हणजे उज्ज्वल भरभराटीचा, सत्याचा काळ. शालिवाहन राजाने आपला शक निर्माण केला तो याच दिवसापासून. महाराष्ट्रात व दक्षिण भारतात त्याच्या नावानं सुरू होणार्‍या शकाच्या वर्षांरंभाच्या दिवशी अभिमानाची गोष्ट म्हणून गुढ्या उभारल्या जातात. आज रोजी खरनाम संवत्सर प्रारंभ होत आहे. सुष्ट शक्तीचा दुष्ट शक्तीवर विजय होतो हा विश्वास लोक गुढी उभारून व्यक्त करतात.