बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By
Last Modified: बुधवार, 20 मार्च 2024 (08:03 IST)

Gudi padwa 2024 गुढीपाडवा 2024 किती तारखेला आहे? मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

gudipadwa
Gudi Padwa 2024 गुढीपाडवा हा नवीन वर्षातील पहिला सण. गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. 
 
या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच चैत्र नवरात्र आरंभ होते.
 
गुढीपाडवा 2024 शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी 8 एप्रिल 2024 ला सकाळी 11.51 मिनिटापासून ते दुसऱ्या दिवशी 9 एप्रिल 2024 ला रात्री 8.31 मिनिटापर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवारी 9 एप्रिल 2024 ला साजरा करण्यात येणार आहे.
 
या प्रकारे उभारावी गुढी 
गुढीची उंच काठी बांबू पासून तयार केली जाते. काठीला स्वच्छ धुऊन त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात. काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा, पितळ, किंवा चांदीचे गडू, तांब्या किंवा फुलपात्र बसविले जाते. ज्या भागाला गुढी उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ करून धुऊन पुसून घ्यावी. त्यावर रांगोळी काढून पाट ठेवून गुढीची काठी ठेवली जाते. तयार केली गुढी दारात, उंच गच्चीवर, गॅलरीत लावतात. गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करतात.
 
गुढीपाडवा पूजा विधी 
गुढी उभारल्यावर गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करतात. निरंजन लावून उदबत्ती ओवाळतात. दूध साखर पेढ्यांचा नैवेद्य दाखवतात. दुपारी गुढीला गोडधोडाचे नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळीस परत हळद-कुंकू, फुले, अक्षता, वाहून गुढी उतरविली जाते.