धावत्या लोकलमध्ये डोळ्यात बोटे घालून नराधमाला ढकलले! प्रसंगावधान अन् अफाट धैर्यामुळे मोठा अनर्थ टळला
धावत्या लोकलमध्ये तरुणीचा नराधमावर धाडसी हल्ला; डोळ्यात बोटे घालून स्वतःचा बचाव
डहाणूवरून सकाळी सुटणाऱ्या डहाणू-बोरिवली मेमू रेल्वेमध्ये एका २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र तरुणीने वेळेवर दाखवलेले धैर्य आणि प्रतिकार यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे.
नेमकी काय घडली घटना?
पहाटे ५:१७ वाजता डहाणू स्थानकातून सुटलेल्या मेमू लोकलच्या महिला डब्यात ही पीडित तरुणी एकटीच प्रवास करत होती. डब्यात इतर कोणीही नसल्याचा फायदा घेत साधारण २७ ते २८ वर्षे वयाचा एक संशयित तरुण महिलांच्या डब्यात शिरला. सुरुवातीला गाडी कुठे पोहोचली आहे, अशी विचारणा करून त्याने तरुणीचे लक्ष विचलित केले. त्यानंतर तरुणी एकटीच असल्याचे पाहून त्याने अचानक तिचा गळा दाबून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
तरुणीचा धाडसी प्रतिकार
अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरून न जाता तरुणीने अत्यंत हिमतीने प्रतिकार केला. तिने स्वतःचा बचाव करण्यासाठी थेट त्या नराधमाच्या डोळ्यांत बोटे घातली आणि मोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून शेजारच्या डब्यातील आणि परिसरातील प्रवासी मदतीसाठी धावून आले. प्रवाशांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र वाणगाव रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या झटापटीत आरोपी गाडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला.
सुरक्षा यंत्रणांच्या प्रतिसादावर प्रश्नचिन्ह
घटनेनंतर तरुणीने तातडीने '११२' या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथून त्वरित कोणतीही मदत मिळाली नाही. तसेच रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) देखील योग्य प्रतिसाद दिला नाही, असा आरोप केला जात आहे.
ऐन पहाटेच्या वेळी घडलेल्या या प्रसंगामुळे पश्चिम रेल्वेवरील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. संकटसमयी तरुणीने दाखवलेल्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत असले, तरी रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
