"जमीन का विकली?" मुलांनी ६५ वर्षीय वडिलांना रस्त्यावर पाडून मारहाण केली
काठ्यांनी निर्दयपणे मारले; घटनेचा व्हिडिओ व्हायरल
जमीन विकल्याच्या रागातून दोन मुलांनी आपल्या वृद्ध पालकांना रस्त्यावरच काठ्यांनी मारहाण केली. वाटसरूंनी या वृद्ध जोडप्याची सुटका केली. ही घटना सोमवारी घडली आणि तिचा व्हिडिओ बुधवारी समोर आला. पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, इंदापूर येथील ६५ वर्षीय शेतकरी तुकाराम राऊत यांनी ३० ऑगस्टच्या संध्याकाळी तक्रार दाखल केली.
तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, "मी माझ्या आजारी पत्नीसोबत फिरायला गेलो असताना आमची दोन्ही मुले कारमधून तिथे आली. आई अंजना हिच्या नावावर असलेल्या जमिनीच्या विक्रीवरून त्यांनी आम्हाला जाब विचारला आणि त्यानंतर मारहाण केली."
वाटसरूंनी जोडप्याची सुटका केली; वडिलांना दुखापत
या हल्ल्यात तुकाराम राऊत यांच्या पाठीवर, चेहऱ्यावर, मांड्यांवर आणि खांद्यांवर दुखापत झाली, तर त्यांच्या पत्नीच्या हाताला आणि कमरेला दुखापत झाली. स्थानिक नागरिक आणि वाटसरूंनी त्या जोडप्याची सुटका केली आणि उपचारासाठी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.
जमिनीचा व्यवहार रद्द न केल्यास जीवे मारण्याची धमकी दोन्ही मुलांनी दिली होती, असे तुकाराम यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
दोन्ही मुले आपल्या कुटुंबासह इंदापूरमधील माळवाडी भागात राहतात. त्यांच्याविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात 'भारतीय न्याय संहिता' (BNS) च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
