शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By वेबदुनिया|

गुरू पूजन म्हणजेच देव पूजन

आषाढातील पौर्णिमेला व्यास पूजन करतात. या दिवशी ऋषी मुनींचे पूजन करण्याची प्रथा आहे. प्रत्येक ऋषीने मानवी संस्कृती स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु, व्यासांनी या साऱ्याचे एकत्रीकरण करून महाभारत नावाचा ज्ञानकोष निर्माण केला. हा ग्रंथ पाचवा वेद मानला जातो. 

संस्कृतीसंदर्भातील विचार व्यासांनी या ग्रंथातून अतिशय साध्या, सोप्या, सरळ भाषेत मांडले. मुनिनामप्यहम व्यास असे सांगून भगवान श्रीकृष्णानेही त्यांची स्तुती केली आहे. मानवी संस्कृतीच्या संदर्भात मूलगामी विचार मांडणाऱ्या, त्यावर भाष्य करणाऱ्या आणि त्याचा प्रसार करणाऱ्यांना व्यास म्हणावे, असे पायंडाही व्यासांनी पाडला.

म्हणूनच ज्या पीठावरून (स्थानावरून) विचारांची निर्मिती होऊन त्याचा प्रसार होतो त्याला व्यासपीठ असे म्हणतात. व्यास या शब्दाचे महत्त्व पाहा किती मोठे आहे, ते. त्यामुळे या व्यासपीठावर बसणाऱ्याचे स्थान किती महत्त्वाचे असेल ते लक्षात येते.

व्यासांना हिंदू धर्माचे पिता असे म्हणता येते. त्यांनी वैदिक आणि लौकीक ज्ञान अमर्यादरित्या ग्रहण केले होते. त्यामुळे व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् असे म्हटले जाते. याचा अर्थ व्यासांनी जगातील सर्व विषय हाताळले आहेत, असा आहे.

महर्षी व्यास जीवनाचे खरे भाष्यकार आहेत. कारण त्यांनी जीवन खूप समग्रपणे समजावून घेतले. जीवन म्हणजे केवळ प्रकाश किंवा अंधार नाही. छाया प्रकाशाचा खेळ आहे. सुख-दुःखाचा समन्वय आहे. व्यास म्हणतात, आमचे जीवन काळ्या आणि पांढऱ्या धाग्यांनी विणलेले वस्त्र आहे. त्यामुळे सदगुण आणि दुर्गुण जीवनात बरोबर पहायला मिळतात.

प्रतिभेच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास शेक्सपियर आणि कवी कालिदास हेही व्यासांपुढे फिके पडतात. शेक्सपियरने त्याच्या नाटकात अत्युच्च स्थान प्राप्त केलेल्या व्यक्तिमत्त्वाचे अधःपतन दाखविले आहे. नियतीचे श्रेष्ठत्व त्याने मान्य केले आहे. मानव नियतीच्या हातातील खेळणे आहे, अशी त्याची धारणा आहे. माणूस नियतीला बदलू शकतो वा नियंत्रणात आणू शकतो, हे त्याला मान्य नाही. त्यामुळे शेक्सपियरने त्याच्या साहित्यात जीवनाची काळी बाजूच रंगवली.

कवी कलिदास आपल्या सर्व पात्रांना निर्दोषत्वाचे आवरण चढवितात. त्यामुळे जीवनाविषयी भरभरून लिहिणाऱ्या कालिदासाने जीवनाची धवल बाजूच तेवढी रंगवली.

पण व्यासांनी मात्र या दो्ही बाजूंचा विचार करून साहित्य निर्मिती केली आहे. महाभारतात ते सारे पहायला मिळते. भीम, अर्जुन वा युधिष्टीर यांचे दोषही त्यांनी दाखवले. त्याचवेळी खलपात्रे असणाऱ्या दुर्योधन आणि कर्णाचे गुणही दाखविले. जीवनाकडे सम्यक दृष्टीने पाहणारा व्यासांसारखा भाष्यकार म्हणूनच निराळा ठऱतो.

व्यासांच्या या महतीमुळे त्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यासपीठावर बसणाऱ्या व्यक्तीने अनेक पथ्ये पाळली पाहिजेत. व्यासांना मान्य नसतील, असा एकही विचार व्यासपीठावरून प्रसृत व्हायला नको. व्यासपीठावर कुणाचीही स्तुती वा निंदा करता येत नाही.

या पीठावर बसणारा व्यक्ती सरस्वतीचा उपासक हवा. त्याची वाणी सरळ, स्पष्ट, चिंतनगर्भ आणि समाजाला उन्नतीच्या पथावर वाटचाल करण्यास मार्गदर्शक अशी हवी.

व्यासांच्या या महतीमुळे त्यांना गुरू मानण्यात येते. म्हणूनच पारंपरिक व्यासपौर्णिमा गुरू पौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते. निर्जिव वस्तूला वर फेकण्यासाठी सजीवाचा गरज असते. त्याच प्रकारे पशुतुल्य मानवाला देवत्वाकडे वाटचाल करायची असेल, तर सद्गुरूची आवश्यक्ता असते.

मानवाला देव होण्यासाठी आपल्या पशूवृत्तींवर लगाम घालायला हवा. या नियंत्रणाची प्रेरणा त्याला गुरूकडून मिळते. गुरू म्हणजे जो लघू नाही तो. म्हणजेच लघुला गुरू बनवितो तो गुरू. जीवनाला मनाच्या आधीन करतो तो लघु आणि मनावर नियंत्रण मिळवतो तो गुरू.

गुरू चिंतनशील असायला हवा. जीवनाच्या निसटत्या प्रवाहात स्थिर रहातो तो गुरू. कनक (सोने), कांता (स्त्री) आणि कीर्ति यांच्या झंझावातातही तो स्वतःचे अस्तित्व राखतो तो गुरू. त्याच्या या गुणांमुळेच तो मार्गदर्शक असतो.

आता गुरू पूजा म्हणजे गुरूवाद झाला आहे. त्यामुळे माणूस अंधश्रद्धा आणि अज्ञानाच्या अंधःकारात अडकतो आहे. त्यामुळे गुरू पुजन म्हणजे देव पूजन हे आपण समजून घेतले पाहिजे.