बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By

महाराष्ट्रातील प्रमुख संत

देवांनी सुद्धा भारतभूमीवरच जन्म घेतला. ही देवभूमीच आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात.  संत हे चालते फिरते देवच मानले जातात. आपल्या देशात संतांना गुरू मानण्याची परंपरा आहे. गुरूचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीतच आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ आणि समर्थ रामदास हे मराठी संत महाराष्ट्राचे प्रणेते आणि महाराष्ट्रधर्माचे संत होते. त्यांच्यामुळे आध्यात्मिक समता घडली. माणूस उभा राहिला तरच देश उभारेल, हे जाणून संतांनी जागृतीचे काम केले. तर जाणून घेऊया अशाच काही संतांबद्दल.

संत ज्ञानेश्वर
आळंदीः ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ

संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे. याला देवाची आळंदी असेही म्हणतात. (चोराची आळंदी या नावाचेही एक गाव आहे.) पुण्यापासून आळंदी अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे.

वारकरी भक्तांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली जिवंत समाधी घेतली. त्यानंतर १५४० मध्ये भव्य समाधी मंदिर बांधण्यात आले.

त्यांच्याशिवाय येथे विठ्ठल रखुमाई, राम, कृष्ण, मुक्ताई यांची मंदिरेही येथे आहेत. आषाढी व कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. आषाढात येथून ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरला जाते. आळंदी ते पंढरपूर हे अंतर दीडशे किलोमीटर आहे. पण भक्तीरसात चिंब भिजलेले वारकरी पावसापाण्याची तमा न बाळगता पायी हे अंतर पार पाडतात.

ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या तपसामर्थ्याचा प्रभाव दाखविण्यासाठी वाघावरून आलेल्या चांगदेवाचे गर्वहरण करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवून दाखविल्याची आख्यायिका आहे. ती भिंत येथे आहे.
ज्ञानेश्वरांची आरती
 आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा
सेविती साधुसंत मनू वेधला माझा ॥ १ ॥

लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी,
अवतार पांडुरंग, नाम ठेवीले ज्ञनी ॥ २ ॥

कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी,
नारद तुम्बरहू, साम गायन करी ॥ ३ ॥

प्रकट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले,
रामा जनार्दनी, पायी टकची ठेले ॥ ३ ॥

जाण्याचा मार्ग :  पुणे स्टेशन तसेच स्वारगेटहून आळंदीला जाण्यासाठी एसटी तसेच पीएमटीच्या बस उपलब्ध आहेत.

पुढे पहा संत नामदेव

संत नामदेव
 भागवत धर्माची पताका संपूर्ण देशात फडकविणार्‍या संत नामदेवांच्या कर्मभूमीत अर्थात घुमानमध्ये यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साजरे होत आहे. या निमित्ताने पंजाबने नामदेवांवर महाराष्ट्रापेक्षा काकणभर अधिक केलेले प्रेम पाहावास मिळणार असल्यामुळे साहित्य संमेलनापेक्षा हा आनंद साहित्यांना भारावून टाकेल. साहित्य संमेलन दरवर्षी भरतात पण श्रध्दा व भक्ती पाहावायची असेल तर यंदा घुमानची वारी निश्चितच वेगळी ठरणार आहे.

महाराष्ट्र ही संतांची भूमी व संतांचे श्रध्दास्थान पंढरीचा विठोबा. ज्यावेळी जातीभेद, उच्चनीच, गरीब-श्रीमंत यांची मोठी भिंत समाजात उभी होती त्यावेळी विविध जातीत जन्माला आलेल्या संतांनी ही विषमतेची भिंत पाडण्याचे मोठे काम केले. यामध्ये संत नामदेवांनी महाराष्ट्र पुरते कार्य न करता भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी हिमालय ते कन्याकुमारी प्रवास केला. यावेळी त्यांना पंजाबच्या सरहद्दीमधून परकीय राजांची अतिक्रमणे होत असल्याची जाणीव झाली. ही अतिक्रमणे थोपविण्यासाठी, माणूस धर्म व भेदभाव घालविणे ही शिकवण देण्यासाठी संत नामदेवांनी तब्बल 12 वर्षे पंजाबच्या घुमानला मुक्काम ठोकला. या 12 वर्षात त्यांनी एवढे सामाजिक व धार्मिक कार्य केले की, आजदेखील पंजाबच्या हृदयात संत नामदेवांना स्थान आहे. यामुळेच शिखांच्या ग्रंथसाहिबामध्ये नामदेवांचे 61 अभंग आहेत. घुमान हे अमृतसरपासून 35 कि.मी. अंतरावरील गुरदासपूर जिल्ह्यातील छोटेसे गाव आहे. येथे संत नामदेवांच्या विविध कथा सांगणारे चार भव्य   गुरूद्वारा आहेत. यापैकी एक बाबा नामदेवजी का समाधी मंदिर आहे. येथे संगमरवरी समाधी असून एक पलंग ठेवण्यात आला आहे. नामदेवरा अजूनही येथे विश्रंती घेत आहेत, अशी येथील भाविकांची श्रध्दा असल्यामुळे आत कोणास बोलू दिले जात नाही. तसेच एका सोनच्या पत्रावर नामदेवांची मूर्ती कोरण्यात आली आहे. दुसरा तपिया नामिया गुरद्वारा असून येथे महाराज तपश्चर्येला बसत होते. येथे नामदेवांची पाच फुटाची संगमरवरी मूर्ती आहे. येथील गुरूद्वारातील तलावात स्नान केल्यावर त्वचारोग जातात असा अनुभव भक्त सांगतात. संत नामदेव तपश्चर्या केल्यावर एका खडकावर बसत. तेथे चरण नामिया गुरूद्वारा आहे. तर खुंडी साहब नामिया गुरूद्वारा संत नामदेवांनी केलेल्या चमत्काराची साक्ष आहे.

संत नामदेवांनी या परिसरात अनेक चमत्कार केले. त्यांची कीर्ती ऐकून एक भक्त आला व महाराजांना काहीतरी चमत्कार करा म्हणून मागे लागला. शेवटी नामदेवांनी त्याच हातातील वाळलेल्या काठीला हात लावला आणि त्याला तत्काळ पालवी फुटली. हाच तो खुंडी गुरूद्वारा. यासह घुमान येथेच नामिया कोठी आहे. येथील शेतकरी आपल्या आर्थिक शक्तीप्रमाणे अन्नदानासाठी येथे धान्य देतात. दुसरे विशेष म्हणजे या परिसरात लग्न झालेले जोडपे प्रथम दर्शनासाठी या कोठीवर आणले जाते. या चारही गुरूद्वारांमध्ये बाराही महिने अन्नदान सुरू असते. वसंत पंचमी येथे घुमानला मोठी यात्रा भरते.

आपल्या राज्यातील हा मोठा संत पंजाबच्या मनावर राज्य करतो. यामुळेच अमृतसर, चंदीगड, जालंदर येथे त्यांच्या नावाने भवन, चौक उभारले आहेत. यावरून पंजाबने संत नामदेवांवर महाराष्ट्रापेक्षा अधिक प्रेम केल्याची खात्री पटते. यामुळे साहित्य संमेलनास येणारा प्रत्येक  व्यक्ती आमच्यासाठी पूजनीय असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. हा वेगळा अनुभव यंदा साहित्यिकांच्या गाठीशी राहणार आहे.

संत एकनाथ
 स्वतयाचे कुळी दिपको दिव्य झाला॥
हरिभक्ती लागोनि तारी समस्ता।
नमस्कार माझा सद्गुरू एकनाथा॥

संत एकनाथ षष्ठीस नाथषष्ठी म्हणतात. शके १५२१ ला फाल्गुन षष्ठीस नाथांनी समाधी घेतली. नाथांच्या आयुष्यात या षष्ठीला फार महत्त्व आहे. जनार्दन स्वामींचा जन्म, जनार्दन स्वामींना दत्ताचे दर्शन, नाथांना जनार्दन स्वामींचा अनुग्रह, जनार्दन स्वामींची समाधी आणि नाथांची समाधी या सगळ्या गोष्टी एका तिथीला झाल्या. नाथांनी संसार करून परमार्थ केला. नाथांचे एकनाथी भागवत ही भागवताच्या ११व्या स्कंदावरील टीका प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वरीची मूळ प्रत मिळवून ती शुद्ध करण्याचे काम एकनाथांनी केले. स्पृश्य-अस्पृश्य भेद नाथांनी कधीही मानला नाही. सर्व प्राणीमात्र एक आहेत असे नेहमी मानले. काशीहून रामेश्वराला न्यायच्या कावडीतले पाणी तहानलेल्या गाढवाला पाजले. नाथषष्ठीनिमित्त पैठणला भागवत भक्तांचा प्रचंड मेळावा जमतो. 'भानुदास एकनाथ' अशा भजन कीर्तनाने आणि नामघोषांच्या गदारोळाने पैठणचा आसमंत दुमदुमून जातो.
आपली महाराष्ट्र भूमी एवढी भाग्यवान आहे की तिच्या संतपरंपरेत कधी खंडच पडला नाही. तेराव्या शतकात ज्ञानदेवांनी भागवत धर्माच्या इमारतीचा पाया रचला आणि या मंदिरातील स्तंभाचे काम नाथांनी केले. म्हणून तर कवी आनंदाने सांगतात ''जनाईनी एकनाथ। स्तंभ दिला भागवत''
पंधराव्या शतकात जन्मलेले नाथ हे चमत्कारच होत. पाचशे वर्षांपूर्वी नाथांनी जे कार्य केले ते आज करण्याचे धारिष्ट आपल्याकडे नाही. लहानपणीच मातृपितृ छत्र हरवलेले नाथ, आजोबा चक्रपाणी यांच्याकडे मोठे होत होते. कर्नाटकातल्या पांडूरंगाची मूर्ती पंढरीला आणणार्‍या संत भानुदासांचे ते पणतू होते. या बाळाला बालवयातच खर्‍या ज्ञानाची ओढ लागली होती. त्यासाठीच घराचा त्याग करून पैठणहून देवगडला जनार्दन स्वामींजवळ आले. त्यांची ज्ञानावरची जाज्वल्य निष्ठा जाणून जनार्दनस्वामींनी त्याला आपला शिष्य मानले व नाथगुरुंची सेवा करून ज्ञान प्राप्त करीत राहिले. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव या बरोबरच नाथांनी योगविद्येचाही अभ्यास केला. देवगडच्या वायव्येस असलेल्या शूलभंजन पर्वतावर त्यांनी सहा वर्षे तपश्चर्या केली. एवढा ज्ञानप्राप्तीवर नाथ परमार्थ साधना करू शकले असते. परंतु, संतजनामध्ये नाथांचे स्थान आगळेवेगळे आहे. त्यांनी प्रत्यक्ष कृतीने समाजाला दाखवून दिले की प्रपंच व परमार्थ या गोष्टी काही परस्परविरोधी नाहीत. प्रपंचाकडे पाठ फिरवून परमार्थाची वाट धरणे ही गोष्ट चूक आहे. त्याचप्रमाणे परमार्थबुद्धीने प्रपंच करावा हे नाथांना समाजाला सांगायचे होते, पण केवळ उपदेशक नव्हते तर ते एक कर्ते सुधारक होते. 'आधी केले मग सांगितले' या वाक्यानुसार जे पटेल, भावेल ते त्यांनी स्वतः प्रथम आचरले. मग यासाठी वाटेल तो ताप सहन करावा लागला तरी तो सहन करण्याची नाथांची तयारी होती.
नाथांना मातृभाषेविषयी विलक्षण प्रेम होते. गिर्वाण भाषेपेक्षा ती तसूभरही कमी नाही असे ते मानत. अमृताते पैजा जिंकण्याचे सामर्थ्य ज्ञानदेवांनी मांडले हे त्यांना जाणवत होते. म्हणून आपल्या भोवतालच्या सार्‍या अज्ञानी जनांना सूज्ञ करण्यासाठी नाथांनी भागवत मराठीत आणले.
गीर्वाण भाषा देवे केली। आणि मराठी काय चोरे आणली?

असा त्यांचा रोकडा सवाल होता. नाथांना सारी माणसे सारखीच वाटत. त्यांना माणसामाणसातील भेद मान्य नव्हता. रडणारे हरिजनाचे बालक पाहिल्यावर ते बालक आहे एवढीच भावना त्यांच्या जवळ उरली होती. त्यांनी त्या बालकाला उचलून घेतले. गणू महाराच्या घरी ते भोजनास गेले. प्रत्यक्ष श्राद्धादिवशी गावातील महारांना स्वतः घरात नेऊन नाथांनी त्यांना जेवू घातले. भुकेल्यांची आर्तता त्यांनी जाणली. नाथांची भूतदया केवळ मानवापुरती सीमित नव्हती ती प्राणीमात्रावरही ओसंडत होती. तहानलेल्या गाढवालाही पाणी पाजून नाथांनी शांत केले. आजच्या शतकात आपण जे करू शकत नाही ते नाथांनी पाचशे वर्षांपूर्वी केले मग नाथ थोर सुधारक नाहीत का?
नाथांनी भागवत भारूडे, वाघ्या, जोगवा, जोशी जागल्या ही नाथांची मराठी रचना, काव्यासाठी त्यात आजही एकमेव आहे. वाङ्मय क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केलेले हे मराठीतले पहिले संपादक आहेत. ज्ञानेश्वरी हा नाथांचा आवडता ग्रंथ. १५व्या शतकापर्यंत हा ग्रंथ आपले पाठ घुसवून नुसता बुजबुजून गेला होता. नाथांनी जुन्या प्रती शोधून काढल्या व भाष्यशास्त्राच्या साह्याने ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली असे अपाठ घुसविण्याचे वामकृत्य करणार्‍यांना नाथ बजावतात
''ज्ञानेश्वरीसाठी। जो करील मर्‍हाठी। तेणे अमृताचे ताटी। जाण नरोटी ठेवीले॥'' नाथांची गुरुभक्ती इतकी होती की, गुरू सेवेच्या गौरवाच्या असंख्य ओव्या नाथांच्या साहित्यातून पावलोपावली दिसतात. नाथ म्हणतात-
सैराट धावता पाय। श्री जनार्दन निजमाय। पदोपदी कडीये घेत जाय। रीते पाऊल पाहे पडो नेदी॥
सर्वदा तिष्ठे सर्वांगे। मीची निर्भय सदा आचार्य संगे। जनार्दन जननी अंगसंग। भयतेची निर्भय होऊ लागे॥

या वरून नाथांच्या अंतर्यामी गुरुप्रेमाच्या गूढ अनुभूतीचे तरंग निर्माण होऊन त्यांचे सारे भावविश्व व्यापून टाकल्याचे दिसते. परमेश्वराने आपल्याला दिलेल्या मनुष्य देहाचे सार्थक झाले असे नाथांना वाटू लागले. जगण्यासाठी मिळालेला प्रत्येक क्षण त्यांनी लोकोद्धारासाठी कामी आणला होता. जवळपास प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अनेक प्रकारच्या प्रसंगांना तोंड देत भागवत धर्माची पताका महाराष्ट्रात फडकावित ठेवली. सनातनांच्या पैठण बालेकिल्यात त्यांनी समाज व्यवस्थेशी आजीवन संघर्ष केला. प्रचंड साहित्यनिर्मिती केली.
लोकांना शहाणे करण्याचा प्रयत्न केला. परमेश्वराने बहाल केलेल्या मनुष्यजीवनाप्रती ते कृतज्ञ होते. आता त्यांना महानिर्वाणाचे वेध लागले होते. ब्रह्मसभेने दिलेल्या देहान्त प्रायःश्चिताने ते व्यथित होते. वैकुंठाच्या प्रवासाची ते तयार करू लागले. त्याचे सुतोवाच त्यांनी कधी प्रत्यक्ष तर अप्रत्यक्षपणे केले. त्यांच्या निकटच्या मंडळींना त्यांच्या निर्वाणाची जाणीव झाली. हा शांतीब्रह्म आपल्या निर्णयापासून यत्किंचितही ढळणार नाही. या संकल्पनेने सर्वांनाच धक्का बसला. आपल्या गुरूचा म्हणजे जनार्दन स्वामींच्या पुण्यतिथीचा दिवस त्यांनी प्रस्थानासाठी मुक्रर केला. जलसमाधीचा निर्णय जाहीरपणे सर्वांना कळला. समस्त सज्जन मंडळी शोकाकूल झाली. सर्व सामान्यांना अन्नपाणी गोड लागेना. ही घटना साधीसुधी नव्हती. नाथांचा विरह पचविणे ही गोष्ट सर्वांसाठी अवघड गोष्ट होती. अखेर फाल्गुन वद्य षष्ठीस देहत्याग करण्याचे नाथांनी ठरविले.
अखेर फाल्गुन वद्य ॥६॥ शके १५२१ हा दिवस उजाडला. सर्वत्र गडबड सुरू झाली होती. नाथांनी आपल्या गुरूचा पुण्यतिथीचा दिवस म्हणून मोठा उत्सव साजरा केला. सकाळी पूजा वगैरे आटोपून सर्वांनी भोजन घेतले. दुपारी नाथांनी दिंडीसह गोदावरीच्या कृष्णकमल तिर्थाच्या वाळवंटाकडे प्रयाण केले. तेथे नाथांचे अखेरचे कीर्तन झाले. पुंडलिक वरदाचा गजर झाला. असंख्य लोक भक्तमंडळी कृष्णकमल तीर्थावर जमा झाले होते. लोकांच्या डोळ्यात अश्रूधारा वाहात होत्या. आकाशाला भगवा रंग चढला. अभीर, बुक्याची उधळण, चंदन उटीचा सुगंध सुटलेला, टाळ मृदंगाचा गजर होत होता. नाथ स्थितप्रज्ञ होते. त्यांच्या चेहर्‍यावर स्मित विलसत होते. कीर्तनात सर्वजण इतके रंगून गेले होते. भक्त मंडळी देहभान विसरलेली असताना नाथ गंगेच्या उदरात दिसेनासे झाले. गळ्यातील हार आणि विणा पाण्यावर तरंगता नाथ-नाथ म्हणत जमलेल्या मंडळींना अश्रू अनावर झाले. एक महापर्व संपले होते. सहासष्ट वर्षांचे आयुष्य शांतपणे, संयमाने वसमाधानाने पूर्ण करून नाथांनी आपले अवतारकार्य संपविले.
''शरण शरण एकनाथा।
पायी माथा ठेवीला।
नका पाहू गुण दोष।
झालो दास पायांचा॥''

पुढे पहा संत  जनाबाई

संत जनाबाई
जीवन
जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात.
बालपण
गोदावरीच्या तीरावरील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. आई व वडील पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त होते. ते उभयतां नियमितपणे पंढरीची वारी करीत असत. तिच्या वडिलंनी जनाबाईंला नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत.
आयुष्य
संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.

‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. ‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु।’ असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हटले आहे. गौर्‍या-शेण्या वेचतांना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत.

संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्चंद्राख्यान नामक आख्यानरचनापण त्यांच्या नावावर आहे. संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी महाकवी मुक्तेश्र्वरांना (संत एकनाथांचे नातू) स्फूर्ति मिळाली होती.

संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत. ‘वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात,’ असे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे हे जनाबाईच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात. तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपान, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत सेना महाराज आदि सत्पुरुषांच्या जीवनाचा, सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत.

संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी, आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या. (इ.स. १३५०)

संत गोरोबा कुंभार
संत गोरोबा कुंभारांचा जन्म (इ.स.१२६७)साली झाला,असे संत साहित्याचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांचे मत आहे.संत गोरोबा कुंभारांची समाधी उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरढोकी गावात आहे.गोरोबा पेशाने कुंभार होते.संतश्रेष्ठ नामदेव व ज्ञानेश्वरांचे ते समकालीन होते,संत गोराबा हे ज्ञानेश्वर, निवृतीनाथ,मुक्ताबाई,सोपान आदि संत मंडळींमध्ये वयाने सर्वांहून वडील होते.

त्यामुळे सर्व जण त्यांना गोरोबाकाका म्हणत असत.संत गोरोबांनी ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून निवृत्तीनाथ,सोपानदेव, मुक्ताबाई,संत नामदेव,चोखामेळा,विसोबा खेचर आदि संताची,‘कोणाचे मडके(डोके)किती पक्के’अशी प्रत्येकाच्या डोक्यावर मारून परीक्षा घेतली.तेव्हा संत नामदेवांना या गोष्टीचा राग आला होता,त्यावेळी ज्ञानेश्वरांनी त्यांना गुरूपदेश घ्यावयास सांगितले.तेव्हा संत नामदेवांनी विठोबा खेचरांना आपले गुरू केले.

संत गोरोबा सतत श्री विठ्ठलाचे स्मरण करत,भक्तिरसात ते देहभान विसरून हरवून जात.त्यांची पत्नी गोरोबांना त्यांच्या लहानग्या बाळाकडे लक्ष ठेवयास सांगून पाणी आणवयास गेली असता,श्री विठ्ठलाचे स्मरण करता करता त्यांना,लहानग्या बाळास मडकी घडविण्यासाठी लागणारी चिखलात गाडले गेल्याचे समजले नाही.त्यांची पत्नी पाणी घेऊन येईपर्यत लहानगे बाळ गतप्राण झाले होते.तिच्या हंबरड्याने गोरोबांना जाग आली व ते पश्चाताप करु लागले.नंतर विठ्ठलाच्या कृपेने त्यांचे मुल जिवंत झाले.(अशी अख्यायिका सांगितली जाते.)

संत गोरोबांची उपलब्ध असलेली काव्यरचना थोडी आहे.त्यांचे सुमारे २० अभंग सकलसंत गाथेत समाविष्ट केले आहेत.त्यांची उपलब्ध असलेली काव्यरचना अत्यंत गोड अशी आहे.

संत गोरोबांचे अभंग म्हणजे रसाळ वाणीचा झरा,सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत त्यांचे अभंग आहेत.निर्गुणाचा संग धरल्यावर काय अवस्था होते हे त्यांनी पुढील अभंगात सांगितले आहे.

निर्गुणाचा संग धरिला जो आवडी ।
तेणें केलें देशोधडी आपणियाशी ॥१॥

अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें ।
एकलें सांडिलें निरंजनीं, मायबापा ॥२॥

एकत्व पाहतां अवघें लटिकें ।
जें पाहें तितुकें रूप तुझें, मायबापा ॥३॥

म्हणे गोरा कुंभार सखया पांडुरंगा
तुम्हा आम्हा ठावा कैसे काय, मायबापा ॥४॥

निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे

निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे ।
तंव झालों प्रसंगी गुणातीत ॥१॥

मज रूप नाहीं नांव सांगू काई ।
झाला बाई काई बोलूं नये ॥२॥

बोलतां आपली जिव्हा पैं खादली ।
खेचरी लागली पाहतां पाहतां ॥३॥

म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी ।
सुखासुखीं मिठी पडली कैसी ॥४॥

---संत गोरा कुंभार-
पुढे पहा संत तुकाराम

संत तुकाराम 

 संत तुकाराम महाराजांचा जन्म पुण्यानजीक असलेल्या देहु या गावात झाला. वडील बोल्होबा व आई कनकाई यांच्या पोटी जन्मलेल्या तुकाराम महाराज यांचे आडनाव अंबिले होते. त्यांच्या घराण्यातील मूळ पुरुष विश्वंभरबुवा हे महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांचा मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवडी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

तुकोबारायांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात अनेक दु:खे सहन करावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली. घरी अठरा विश्वे दारिद्र्य आले.

अभंगरचनेचे महात्म्य
कवित्वाचा स्वप्नदृष्टांत झाल्यानंतर त्यांनी अभंग रचण्यास प्रारंभ केला. पूर्वीपासून ध्यान, चिंतन यांमध्ये आयुष्य घालविल्याने अशाच उन्मनीअवस्थेत त्यांनी आपल्या रसाळ वाणीत अनेक अभंगरचना केल्या. अभंग हे तुकाराम महाराजांचे वैशिष्ट्य होते, जसे श्लोक वामनाचे, ओवी ज्ञानेश्वरांची, तसे अभंग करावा तुकारामांनीच. त्यांचे अभंग भक्ती, ज्ञान, वैराग्य व नीती या विषयांना धरून आहेत.
पहा  व्हिडिओ


समर्थ रामदास स्वामी

ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, संत जनाबाई, मुक्ताबाई, सोपानदेव यासारख्या अनेक संतांचे जन्मस्थळ आणि कर्मस्थळ असणारा महाराष्ट्र संतांची भूमी म्हणूनच ओळखला जातो. या संतांनी भक्ती मार्गाद्वारे समाजात जनजागृती निर्माण केली. संत रामदास स्वामी हेही त्यातलेच.

रामदास स्वामी यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील जांब नावाच्या गावी झाला. ते बालपणात चांगलेच खोडकर होते. गावातील लोक दररोज त्यांच्याविषयीच्या तक्रारी त्यांच्या आईजवळ घेऊन येत असत. रोजच्या तक्रारींनी त्रासलेल्या त्यांच्या आईने (राणुबाई) नारायणला (बालपणातील नाव) समजावले की, ''तू दिवसभर फक्त दुसर्‍यांच्या खोड्या काढीत असतोच त्यापेक्षा काही काम करीत जा. गंगाधर (मोठा भाऊ) बघ कुटुंबाची किती काळजी घेतो.'' या गोष्टीने नारायणच्या मनात घर केले.

दोन-तीन दिवसांनंतर हाच बालक खोडकरपणा सोडून एका खोलीत ध्यानमग्न बसला. दिवसभर नारायण न दिसल्यामुळे आईने मोठ्या मुलाकडे विचारपूस केली असता त्यानेही तो कुठेच दिसला नाही असे सांगितले. दोघांनीही त्याला शोधावयास सरूवात केली. पण तो कुठेच दिसला नाही. सायंकाळी अचानक आपल्या खोलीत ध्यानस्थ बसलेल्या नारायणाकडे आईचे लक्ष गेले. आईने त्याला काय करीत आहेस? अशी विचारणा केली. तेव्हा नारायणने उत्तर दिले, ''मी पूर्ण विश्वाची काळजी करीत आहे.'' (दास डोंगरी राहतो चिंता विश्वाची वाहतो)

या घटनेनंतर नारायणची दिनचर्या पूर्णपणे बदलली. त्यांनी समाजातील तरुण वर्गाला आरोग्य आणि सुदृढ शरीराद्वारेच राष्ट्राची उन्नती शक्य आहे हे समजाविले. व्यायाम करून सुदृढ राहण्याचा सल्ला दिला. शक्तीचा उपासक असलेल्या मारूतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. संपूर्ण भारतात त्यांनी पद-भ्रमण केले. देशात चेतना निर्माण होण्याच्या दृष्ट्रीने त्यांनी जागो-जागी मारूतीची मंदिरे स्थापिली. जागोजागी मठ बांधले.

बालपणात त्यांना साक्षात प्रभू रामाचे दर्शन झाले होते. त्यामुळे ते स्वतः:ला रामदास म्हणवून घेत असत. त्यावेळी महाराष्ट्रात शिवाजी राजांचा उदय होत होता. शिवाजी महाराज रामदास स्वामींच्या कार्याने अत्यंत प्रभावित झाले होते. रामदासांची भेट झाली तेव्हा शिवाजी महाराजांनी आपले राज्यच रामदास स्वामींच्या स्वाधीन करण्याचा मनोदय व्यक्त केला. .

त्यावेळी समर्थांनी महाराजांना सांगितले, ''हे राज्य तुमचेही नाही आणि माझेही नाही, हे राज्य परमेश्वराचे आहे.'' शिवाजी महाराज वेळोवेळी त्यांच्याशी सल्ला-मसलत करीत असत.

समर्थांनी बरेच ग्रंथ लिहिले होते. त्यात 'दासबोध' प्रमुख आहे. 'मनाचे श्लोक' द्वारे त्यांनी मनालाही संस्कारित करण्याचा राजमार्ग दाखविला.

आपल्या जीवनाचा अंतिम काळ त्यांनी सातार्‍याजवळील परळी किल्ल्यावर व्यतीत केला. हा किल्लाच पुढे सज्जनगड नावाने प्रसिद्ध झाला. तेथेच त्यांची समाधी आहे. येथे दासनवमीला दोन ते तीन लाख भाविक दर्शनासाठी येतात. दरवर्षी समर्थांचे भक्त भारताच्या विविध प्रांतातून दोन आठवड्याचा दौरा काढतात आणि त्यावेळी मिळालेल्या भिक्षेतून सज्जनगडची व्यवस्था चालते.
पुढील पानावर पहा महाराष्ट्रातील इतर संतांचे नावं

संत अमृतराय महाराज
Sant Amrutrai Maharaj

संत कान्होपात्रा
Sant Kanhopatra

संत केशवदास
Sant Keshavdas

संत चोखामेळा
Sant Chokha Mela

संत जनार्दन महाराज
Sant Janardan Maharaj

संत नरहरी सोनार
Sant Narhari Sonar

संत निवृत्तीनाथ
Sant Nivruttinath

संत भानुदास
Sant Bhanudas

संत मीराबाई
Sant Mirabai

संत मुक्ताई
Sant Muktai

संत सावता माळी
Sant Savata Mali

संत सोयराबाई
Sant Soyarabai

संत सोहिरोबानाथ
Sant Sohirobanath