सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. हनुमान जयंती
Written By
Last Modified: सोमवार, 19 एप्रिल 2021 (08:55 IST)

म्हणून आजही कथाकीर्तनात हनुमंतरायासाठी पाट ठेवला जातो

आजही गावाकडे किंवा शहरातही कथाकीर्तन, भजन सोहळा सुरू असेल, तर तिथे एक रिकामा पाट ठेवलेला असतो. तो पाट कोणासाठी असतो माहित आहे का मित्रांनो? तो पाट असतो, चिरंजीवी हनुमंतासाठी! तसे का? तर यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते...
 
चौदा वर्षांचा खडतर वनवास संपवून, रावणाशी युद्ध करून, सर्व वानरसेनेला घेऊन प्रभू श्रीरामचंद्र सीतामाईसह अयोध्येला परतले, तेव्हा अयोध्यावासियांनी त्यांचे वाजत गाजत उस्फूर्त स्वागत केले. आपल्यासाठी रावणासारख्या बलाढ्य शत्रूशी लढा दिला, म्हणून सीतामाईला समस्त वानरसेनेला भेटवस्तू द्यावीशी वाटली. रामचंद्रांनीही सहमती दिली.
 
सीतामाईने यथाशक्ती प्रत्येकाला आवडेल अशी भेटवस्तू देण्यास सुरुवात केली. सीतामाईचा आशीर्वाद समजून सगळी वानरसेना श्रद्धेने रांगेत उभी होती. परंतु त्यात हनुमंत दिसले नाहीत. सीता माईने त्याची चौकशी केली असता, तो कुठल्याशा बागेत फळे खात बसल्याचे कळले. सीता माईला वाटले, त्याचा मान पहिला असताना आपण त्याला भेटवस्तू आधी दिली नाही, याचा राग आला असेल. म्हणून सीतामाई स्वत: हनुमंताचा शोध घेत बागेत पोहोचल्या. सोबत प्रभु श्रीरामचंद्र होतेच. 
 
हनुमंताचा अधिकार मोठा, म्हणून भेटवस्तूही मोठी द्यावी, अशा विचाराने सीतामाईने आपल्या माहेरहून मिळालेला नवरत्नांचा हार हनुमंताला भेट दिला. हनुमंताने त्याचा स्वीकारही केला. हाराकडे कुतुहलाने पाहिले. सीतामाईला वाटले हनुमंताला हार आवडला.
 
पण काही क्षणांतच हनुमंताने हारातली रत्न दाताखाली तोडून पहायला सुरुवात केली. आपल्या डोळ्यादेखत आपल्या भेटवस्तूचा केलेला अपमान सीतामाईला सहन झाला नाही. तिने हनुमंताला जाब विचारला. 
 
हनुमंत म्हणाला, 'माई, ज्या वस्तूत राम नाही, त्याचा मला उपयोग नाही.'
एवढेच नाही, तर हनुमंताने आपली छाती फाडून आपल्या हृदयातही राम आहे, हे सीतामाईला दाखवून दिले. 
 
हनुमंताची भक्ती पाहून प्रभु श्रीरामचंद्रही सद्गदित झाले. हनुमंताला म्हणाले, 'तुझ्या ऋणातून उतराई होणे मला शक्य नाही, मी तुला काय भेट देणार?'
 
यावर हनुमंत म्हणाला, 'रामराया, द्यायचाच असेल तर एकच आशीर्वाद द्या, जिथे जिथे तुमचे भजन कीर्तन सुरू असेल, त्याचे श्रवण करण्याची मला संधी द्या.'  चिरंजीवी हनुमंताला श्रीरामचंद्र तथास्तु म्हणाले!
 
तेव्हापासून अशी श्रद्धा आहे, की जिथे जिथे रामनाम सुरू असते,रामनामाचा गजर होतो तिथे हनुमंतराय आपोआप येतात. त्यांना बसण्यासाठी आसन म्हणून एक पाट मांडून ठेवला जातो. केवढी ही स्वामी निष्ठा. केवढी ही थोर भक्ती..!!
 
-सोशल मीडिया