शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : गुरूवार, 15 डिसेंबर 2022 (08:09 IST)

मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत पूजा माहिती

margshirsh guruvar mahalakshmi
मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो. या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे, अशी प्रार्थना केली जाते. या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. याचे नियम आणि पूजा पद्धत जाणून घेयू या-
 
मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी घरातील पूजेची जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर पाट किंवा चौरंग मांडावा. 
सभोवती रांगोळी काढावी व मध्यभागी थोडे तांदुळ किंवा गहू वर्तुळाकार पसरून त्यावर हळद-कुंकू वाहावे.
एका तांब्याचा कळशाला स्वच्छ करुन त्याच्या बाहेरच्या बाजूंना हळदी-कुंकवाची बोटे ओढावी. 
कळशात पाणी भरून 1 नाणं, 1 सुपारी व थोड्या दुर्वा घालाव्या.
तोंडावर पाच तऱ्हेच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा आंब्याच्या झाडांची पाने रचून त्यावर नारळ (शेंडी वर करून) ठेवावा. 
तांब्या चौरंग-पाटावर पसरलेल्या तांदळाच्या किंवा गव्हाच्या वर्तुळावर मधोमध ठेवावं.
श्री महालक्ष्मी देवीचं चित्र किंवा मूर्ती किंवा स्फटिक श्रीयंत्र असल्यास त्याची स्थापना करावी. 
त्यासमोर विडा, खारीक, बदाम व इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवून जवळ गणेश रूपी सुपारी मांडावी.
त्याजवळ 1 नाणं ठेवावं. हे नाणं उद्यापनापर्यंत पूजनास घ्यावयाचं व उद्यापनानंतर तिजोरीत किंवा कपाटात सांभाळून ठेवायचं असतं.
पूजेची संपूर्ण मांडणी केल्यानंतर स्वत: आचमन करून श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करावी.
नैवेद्यासाठी केळे तसेच इतर फळे ठेवावी. एका वाटीत दूध नक्की ठेवावं. 
श्री महालक्ष्मी व्रताची कथा भक्तिभावाने वाचावी किंवा श्रवण करावी.
नैवेद्य दाखवल्यावर श्रीमहालक्ष्मी देवीसमोर हात जोडून बसावे व 'श्री महालक्ष्मी नमनाष्टक' म्हणावे. 
आपल्या मनातील इच्छा देवीला प्रार्थना करताना सांगावी.
मग आरती करावी.
संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवीची पंचोपचार पूजा करून गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.
गायीसाठी वेगळ्याने नैवेद्य काढून सर्व कुटुंबियांसह आनंदाने प्रसादासह भोजन करावे. 
दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर तांब्यातील डहाळे घरात निरनिराळ्या पाच ठिकाणी ठेवून तांब्यातील पाणी नदी, विहीरी, तलाव किंवा तुळशी वृंदावनात ओतावे.
नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळदकुंकू वाहून श्रीमहालक्ष्मी देवीचे स्मरण करून नमस्कार करावा.