तेथे कर माझे जुळती
एकदा सकाळी सकाळी माझा दीर म्हणाला आपण शेगांवला जायचे का ? मग काय लागलो उत्साहात तयारीला
गाडी ठरवण्यापासून पूर्ण तयारीनिशी आम्ही पूर्ण कुटुंबीय नागपूरहून एक तासात निघालोही मन तर कधीच शेगांवात पोहोचले होते....
जाताना अमरावतीच्या देवीची ओटी भरली तिथल्या प्रसन्न वातवरणात देवीचे मुखवटे मंद स्मित करीत भरभरून आशीर्वाद देत होते.
आता मात्र महराजांच्या भेटीची ओढ लागली होती.
थोड्याच वेळात शेगांव नगरीत पोहोचलो. सुटीमुळे खूप गर्दी असेल असे वाटत असतानाच अपेक्षेपेक्षा कमी गर्दी होती किंबहूना तिथल्या उत्कृष्ट व्यवस्थेमुळे जाणवले नाही. अर्ध्या तासात याची देही याची डोळा मन भरून दर्शन झाले. सासू सासर्यांना तर थेट दर्शनाला जाऊ दिले. प्रसन्न गाभारा, फुलांची शेज, महराजांची वत्सल मूर्ती बघून मन सद्गदित झाले. खूप दिवसांची ईच्छा पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले. तोच अनुभव समाधी स्थान आणि पोथीचा अध्याय वाचताना आला.
तेथील स्वच्छता, प्रसाद वाटपाचे व्यवस्थापन, सेवेकर्यांची निस्वार्थ सेवा, आनंद विहार येथे निर्माण केलेला निसर्गरम्य परिसर म्हणजे बेस्ट मॅनेजमेंटचे उदाहरण आहे. मन पुन्हा पुन्हा त्या योगिराण्याच्या दर्शनाची कास धरते. आणि परतीची वाट धरताना कारंजाच्या नृसिंह सरस्वतीच्या दर्शनाने मन पुलकित होते आणि आम्ही नागपूरची वाट धरतो ते परत केव्हा दर्शन होईल ही हुरहूर मनात घेवूनच.
अनंतकोटी ब्रम्हांडनायक
श्री गजानन महराजांना शिरसावंद्य साष्टांग नमस्कार
विनीत : स्नेहल खंडागळे