रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Updated : सोमवार, 2 सप्टेंबर 2024 (12:44 IST)

गणेशोत्सव : आरती म्हणजे काय? आरत्यांबद्दल या गोष्टी माहितीयेत?

aarti
गणपतीचे दिवस आले की तुमच्या व्हॉट्सअपवरती शुभेच्छांचे मेसेज किंवा इतर माहिती, फोटो धपधप पडू लागते.कधीकधी त्यात विनोदही पाठवले जातात. गणपती आले आता तरी 'दीपकजोशी नमोस्तुते' म्हणू नका किंवा व 'फळीवर वंदना म्हणू नका' असे जोक्स पाठवले जातात.
 
एकेकाळी आरत्यांबरोबर वेगवेगळ्या मंडळांचे लोक पदं म्हणत असतं त्याला मेळ्यांची पदं असं म्हणत असत. मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्यावर लोक वेगवेगळ्या मेळ्यांमध्ये ही पदं म्हणत असत. या पदामध्ये इंग्रजविरोध लपलेला असे. उघड विरोध शक्य नसल्यामुळे अशा प्रकारे पदांच्या माध्यमातून हा विरोध लोकांपर्यंत पोहोचवला जाई.
 
गणपतीची मूर्ती, आरास, मोदक हा जसा चर्चेचा आणि ते सगळं आनंदाने पार पाडण्याचा विषय हे तसा एकत्र येऊन आरत्या म्हणणं हा सुद्धा एक सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
 
तुमच्यापैकी अनेक लोकांना लहानपणापासून या आरत्या म्हटल्याचं आणि त्या म्हणताना केलेली गंमत आठवत असेल. त्यात होत असलेल्या बदलांना स्वीकारून पुढे जाताना मूळ आरत्यांबदद्ल माहिती असणे आवश्यक आहे.
 
आरती या संकल्पनेबद्दल मराठी विश्वकोशाने माहिती दिली आहे.
 
गोविंदशास्त्री केळकर यांनी दिलेल्या माहितीचा उल्लेख मराठी विश्वकोशात आहे. ही नोंद सांगते, ताम्हणात निरांजन वा कापूर लावून त्याने देवादिकांना ओवाळणे म्हणजे आरती. याला संस्कृतात आरात्रिक, आर्तिक्य, आरार्तिक्य अथवा महानीरांजना असे म्हणतात. या वेळी वाद्ये वाजवावयाची असतात. देवादिकांच्या स्तुतिपर विशिष्ट प्रकारचे जे गीत या वेळी म्हणतात, त्यालाही आरती असे म्हणतात.
 
पूजेतील 'दीप' या उपचाराहून 'आरती' हा उपचार भिन्न आहे. नैवेद्यसमपर्णानंतर आरती करावयाची असते. आरतीचे पात्र देवाच्या पायापुढे चार वेळा, नाभीपुढे दोन वेळा, मुखापुढे एक वेळा व सर्व शरीरापुढे सात वेळा ओवाळावयाचे असते. निरांजनात वाती अनेक असाव्यात. कर्मांची अविकलता व पापनाश हे आरतीचे फल होय."
 
आरती म्हणजे काय?
याचाच अर्थ आरती म्हणजे फक्त ईशस्तुतीसाठी म्हटलं जाणारं गीत म्हणजे आरती नव्हे. त्याआधी पूजा, ओवाळणे, नैवेद्य या सगळ्यांचा त्यामध्ये समावेश होतो.
 
 
सध्या महाराष्ट्रात आणि जगभरात पसरलेल्या मराठी कुटुंबांमध्ये ज्या आरत्या म्हटल्या जातात त्यातील बहुतेक आरत्यांचं लेखन समर्थ रामदासांनी केलं आहे. सुखकर्ता दुःखहर्ता ही गणपतीची आरती म्हणायला सोपी आहेच त्याहून सर्वांच्या आवडीची आहे.
 
गणपतीची आरती- बहुतेक ठिकाणी सुखकर्ता दुःखहर्ता ही गणपतीची आरती सुरुवातीला म्हटली जाते. काही ठिकाणी 'शेंदूर लाल चढायो' ही आरती म्हटली जाते. सुखकर्ता दुःखहर्ता या आरतीत रामदासांनी आपलं नावही लिहून ठेवलेलं आहे. 'दास रामाचा वाट पाहे सदना..' अशी ओळ त्यांनी योजलेली आहे.
 
बहुतेक घरांमध्ये गणपतीबरोबर देवीची, शंकराची आरतीही म्हटली जाते.
 
देवीच्या आरतीमध्य़े भक्त देवीकडे मदतीच्या अपेक्षेने पाहात असून तिला आपल्या चांगल्या वागण्याचे आश्वासनही देतात असं पत्रकार आणि कीर्तनकार ज्योत्स्ना गाडगीळ यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले.
 
त्या म्हणाल्या, "कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देवीकडे आहे. तिच्याकडे आम्ही व्याकुळतेने पाहात आहोत. माझ्या आसपास असलेल्या तुझ्या सर्व स्त्री अंशाचा मी आदर करेन असंही यात भक्त देवीला सांगतात.
 
शंकरदेवाच्या आरतीबद्दल गाडगीळ सांगतात, 'लवथवती विक्राळा, ब्रह्मांडी माळा, विषेकंठकाळ त्रिनेत्री माळा' अशा शब्दांमधून समर्थ रामदासांनी शंकरदेवांचं वर्णन केलं आहे. रामदासांनी सर्वच आरत्यांमधून शब्दांमध्ये प्राण फुंकलेले दिसतात. मराठी भाषेवरचं त्यांचं प्रेम या शब्दयोजनेतून दिसून येतं. सर्व आरत्यांमधील अशा प्रकारच्या वर्णनामुळे देव साक्षात डोळ्यांसमोर उभे राहातात."
 
आरत्यांचे बदलते स्वरूप
संस्कृत भाषा आणि संस्कृती याचे अभ्यासक हेमंत राजोपाध्ये यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क साधला. आरत्यांचे बदलते स्वरुप आणि त्यांचा परिणाम याबद्दल त्यांनी माहिती दिली.
 
ते म्हणाले, "अथर्ववेदात आर्रारतिक्य नावाचा एक विधी आहे. त्यात अग्नीच्या सहाय्याने देवाच्या प्रतिमेची पूजा करण्याबद्दल सांगितलं आहे. अग्नीतल्या प्रकाशाला आपल्याकडे महत्त्व आहे. तेज देणारा, वनामध्ये सोबत करणारा, असं अग्नीचं महत्त्व आहे. त्यामुळे अग्नीचं उदात्तीकरण झालं. त्याला पावक असं म्हटलं आहे. जे आपण अग्नीत भाजतो ती गोष्ट निर्जंतूक होते.
 
अग्नी हा पावक आहे आणि तो थेट देवाशी संपर्क करून देणारा आहे. त्यामुळे त्या प्रकाशात देवतेचं दर्शन होणं पवित्र मानलं गेलं आहे. या प्रकियेविषयी रा.चि.ढेरे यांनीही वर्णन केलं आहे. आधुनिक काळात पूजेचा अधिकार सर्व वर्गांना नव्हता. त्यामुळे वैदिक पूजेत सगळ्यांना सहभागी करून सामूहिक आरतीची संकल्पना समोर आली. त्याचे राजकीय परिणामही आपण पाहिलेच आहेत."
 
त्यामुळे एकूणच समूहातील सर्व लोकांचं एकत्रीकरण करण्यासाठी, सर्वांचा सहभाग नोंदवण्यासाठी सामूहिक आरतीची संकल्पना उदयाला आली.
 



Published By- Priya Dixit