शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (16:07 IST)

कार्तिक माहात्म्य - अध्याय ३६

कार्तिकेय प्रश्न करितातः -- हे भगवन् व्रतांमध्यें उत्तम व्रत जें कर्तिकांत मासोपवास करणें, याचा विधि व त्याचें यथोचित्त फल काय तें सांगा ॥१॥
मनुष्यांनी त्याचा विधि कसा करावा आरंभ कसा करावा, समाप्ति कशी करावी ॥२॥
त्याची मुदत किती दिवस वगैरे सर्व व्रत विस्तारानें मला सांगा ॥३॥
शंकर म्हणतातः-- हे भक्त श्रेष्ठा स्कंदा, तूं फार चांगलें विचारलेंस. तूं भक्तिमान् आहेस. तुला सांगतो श्रवण कर ॥४॥
ज्या प्रमाणें सर्व देवांत विष्णु श्रेष्ठ व ग्रहांमध्यें रवि, पर्वतांमध्यें जसा मेरु श्रेष्ठ, पक्ष्यांमध्यें जसा गरुड श्रेष्ठ ॥५॥
तीर्थांमध्येम जशी गंगा श्रेष्ठ, प्रजेमध्यें व्यापारी श्रेष्ठ, तसें सर्व व्रतांमध्यें मासोपवास व्रत श्रेष्ठ आहे. ॥६॥
सर्व व्रतें, सर्व तीर्थे केल्याचें व सर्व दानें दिल्यापासून जें पुन्य मिळतें तें सर्व, मास उपोषण कर्त्याला प्राप्त होतें ॥७॥
एक मासोपवासानें जें पुण्य मिळतें, तितकें पुष्कळ दक्षिणायुक्त अग्निष्टोमादि यज्ञापासूनही मिळत नाहीं ॥८॥
ज्यानें मासउपोषण केलें, त्यानें सर्व जप, होम, दानें, तपें व श्राद्धें केल्याप्रमाणें आहे ॥९॥
प्रथम विष्णु प्राप्तीच्या उद्देशानें संकल्प करावा. विष्णूचें पूजन करावें व गुरुची आज्ञा घेऊन मासोपवासाला आरंभ करावा ॥१०॥
द्वादशी आदिकरुन जीं विष्णूचीं व्रतें आहेत, ती अगोदर करावीं ॥११॥
तसेंच अतिकृच्छ्र, पाराक वगैरे प्रायश्चित्ते आपल्या शक्तीनुरुप प्रथम करावीं, नंतर मासोपवासव्रताला आरंभ करावा ॥१२॥
वानप्रस्थ, संन्यासी, विधवा स्त्री, यांनीं गुरु व ब्राह्मण यांची आज्ञा घेऊन मास उपोषण करावें ॥१३॥
आश्विन शुद्ध एकदशीला उपोषण करुन हें व्रत घ्यावें. तें तीस दिवसपर्यंत करावें ॥१४॥
सर्व कार्तिक महिना विष्णूची पूजा करुन उपोषण करावें, म्हणजे तो मोक्ष फलभागी होतो ॥१५॥
विष्णु मंदिरांत जाऊन त्रिकाळ भक्तींनें, इंदीवर, पद्म, कमळ इत्यादि कमळें, मालती व सुगंधीफुलांनी, केशर, वाळा, कापूर, चंदन मिश्रित गंधानें व धूप, दीप, नैवेद्य यांनीं पूजा करावी ॥१६॥१७॥
पुरुष स्त्रिया व विधवा, यांनीं मनानें, वाचेनें शरीरानें इंद्रियें जिंकून, भक्तिपूर्वक, गरुडध्वजाची पूजा करुन त्याच्या नामांनीं कीर्तन, गायन करावें. खोटें न बोलतां, विष्णूची रात्रंदिवस स्तुति करावी ॥१८॥१९॥
सर्व प्राणिमात्रांवर दया करणारा, हिंसा न करणारा, शांतवृत्ति असा राहून निजतांना किंवा आसनावर बसूनही भगवंताचे गुणानुवाद वर्णन करीत असावें ॥२०॥
अन्नाचा स्वाद, अगर घास घेणें, स्मरण करणें, पहाणें, वर्णन वगैरे सर्व वज्य करावें ॥२१॥
अंगाला मस्तकाला तेल लावणें, विडा खाणें, गंधाची उटी लावणें, हें सर्व व इतर सर्व निषिद्ध, व्रत करणारानें वर्ज्य करावें ॥२२॥
व्रतस्थानें कोणा विकर्म्याला शिवूं नये. व्रत मोडेल म्हणून कोणाबरोबर कोठें जाऊं नये. देवालयांत राहून गृहस्थानें व्रत आचरण करावें ॥२३॥
यथाविधि पुरुष, सुवासिनी, विधवा, साध्वी स्त्रिया, यांनीं महिनाभर उपोषण करुन भगवान् वासुदेवाची पूजा करावी ॥२४॥
इंद्रियें जिंकून मन स्वाधीन ठेवून कमी अगर अधिक न करितां तीस दिवस उपोषण करावें ॥२५॥
नंतर द्वादशीला विष्णूची पूजा करावी. गंध, माळा, धूप, दीप, विलेपन, वस्त्र, अलंकार, वाद्यें, यांनीं देवाला संतुष्ट करावें. चंदनयुक्त पाण्यानें स्नान घालावें. चंदनानें आंगाला लेप करावा. सुवासिक पुष्पें वाहवी. ब्राह्मणांना वस्त्रें देऊन भोजन घालावे ॥२६॥२७॥२८॥
त्यांना दक्षिणा देऊन नमस्कार करुन त्यांची प्रार्थना करावी. याप्रमाणें ब्राह्मणांची पूजा करुन पाठवणी करावी ॥२९॥
ज्या प्रमाणें द्रव्य असेल त्याप्रमाणें भक्तिपूर्वक उपोषण करुन विष्णुपूजा करुन ब्राह्मणभोजन घालावें, म्हणजे तो विष्णुलोकीं आनंदांत राहतो. याप्रमाणें एक मास उपवास झाल्यानंतर उद्यापनाकरितां एकादशीला उपोषण करुन तेरा ब्राह्मण ऋत्विज करुन त्यांच्यावर हवन यज्ञ सोपवावा ॥३०॥३१॥३२॥
असा वैष्णव यज्ञ पूर्ण केल्यावर गुरुची आज्ञा घेऊन हरीची पूजा करावी. गुरुची पूजा करुन नमस्कार करावा. शुद्ध कुळांतले चांगल्या आचरणाचे भक्तीनें विष्णुपूजन करणारे असे ब्राह्मण बोलवून नमस्कार करुन त्यांना भोजन घालावें ॥३३॥३४॥
अशा तेरा ब्राह्मणांना व इतरांना भोजन घातल्यावर त्यांना विडे, दोन दोन वस्त्रें, यज्ञोपवीतें, दक्षिणा, योगपट्ट सूत्रें देऊन त्या द्विजश्रेष्ठांना नमस्कार करावे ॥३५॥३६॥
नंतर एक शय्या तयार करावी. तीवर अभ्रा, उश्या, गिरद्या वगैरे घालून उत्तम सुशोभित करावी. शक्तीप्रमाणें सुवर्णाची आत्ममुर्ति करुन त्या शय्येवर ठेवून मालादिक घालून पूजन करावें ॥३७॥३८॥
आसन, पादुका, छत्र, दोन वस्त्रें, जोडा व उत्तम पुष्पें हें सर्व त्या शय्येवर ठेवावें ॥३९॥
याप्रमाणें शय्या तयार करुन दान करावी. त्या मंडपांत असलेल्या सर्व ब्राह्मणांस नमस्कार करुन प्रार्थना करावी; आपले कृपेनें विष्णूचें स्थान जो वैकुंठ तेथें मी गमन करीन, असें म्हणावें, म्हणजे तो वैकुंठाला जातो ॥४०॥४१॥
मंत्र, कर्म, भक्ति यांवांचून जें जें कांहीं घडलें असेल तें सर्व हे द्विजोत्तमहो ! आपल्या वचनानें संपूर्ण व्हावें, अशी ब्राह्मणांची प्रार्थना करावी. हे स्कंदा ! याप्रमाणें कार्तिकमासउपोषणाचा विधि सांगितला आहे तो मी तुला सांगितला ॥४२॥
इति श्रीकार्तिकमाहात्म्ये षटत्रिंशोऽध्यायः ॥३६॥