बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (16:06 IST)

कार्तिक माहात्म्य - अध्याय ३२

शंकर म्हणालेः-- हे वैष्णवोत्तमा स्कंदा ! तुझ्यासारखा विष्णुभक्त या लोकांत कोणी नाहीं. आतां तुला माघस्नानाचें माहात्म्य सांगतों ऐक ॥१॥
चक्रतीर्थी हरीचें दर्शन व मथुरेमध्यें केशवाचें दर्शन घेतल्यानें जेवढें पुण्य प्राप्त होतें तेवढेंच पुण्य माघस्नान केल्यानें प्राप्त होतें ॥२॥
इंद्रियें जिंकून शांत मनानें व सदाचरणानें जो माघमहिन्यांत प्रातः स्नान करितो, तो पुन्हा मृत्युसंसारांत पडणार नाहीं ॥३॥
कृष्ण म्हणालेः-- शूकरक्षेत्राचें माहात्म्य तुला सांगतों श्रवण कर. ज्याचे ज्ञानानें माझी प्राप्ति सर्वदा होते ॥४॥
सूत म्हणालेः-- कृष्णांनीं याप्रमाणें बोलून सत्यभामेला सांगितलें, तें तुम्हाला सांगतों; सर्व ऋषिहो ! ऐका ॥५॥
श्रीकृष्ण म्हणालेः-- शूकरक्षेत्र पांच योजनें विस्तीर्ण असून त्यांत माझें मंदिर आहे. हे देवि ! त्या क्षेत्रांत राहणारा गर्दभ असला तरी मुक्त होऊन चतुर्भुज होतो ॥६॥
तीन हजार हात लांब व तीनशें तीन हात रुंद्र असें शूकरक्षेत्राचें परिमाण आहे ॥७॥
साठ हजार वर्षे दुसरे ठिकाणीं तप केल्यानें मिळणारें फळ, शूकर क्षेत्रांत अर्ध प्रहर तप केल्यानें मिळतें ॥८॥
सूर्यग्रहणाचे वेळीं कुरुक्षेतामध्ये तुलापुरुषदान केल्यानें जें फळ मिळतें, त्याचे दसपट काशींत मिळतें व शंभरपट कृष्णावेणीतीरीं मिळतें ॥९॥
हजारपट फल गंगा व समुद्र यांचे संगमीं मिळतें. व शूकर क्षेत्रांत माझे मंदिरांत अनंतपट फल मिळतें ॥१०॥
इतरठिकाणीं लक्षदान दिलें असतां जें पुण्य, तें शूकरक्षेत्रीं एकदां दान दिल्यानें मिळतें ॥११॥
शूकरक्षेत्रांत, तसेंच कृष्णवेणीतीर्थांत व गंगासागरसंगमांत, मनुष्यानें एक वेळ स्नान केलें तरी ब्रह्महत्येचें पातक नाहीसें होतें ॥१२॥
षडानना ! अलर्कानें शूकरक्षेत्रांचें माहात्म्य ऐकलें, म्हणून त्याला सर्व पृथ्वीचें राज्य मिळाले; करितां हे षडानना ! तूं मार्गशीर्ष शुद्ध द्वादशीला तेथें जा ॥१३॥
इति श्रीकार्तिकमाहात्म्ये द्वात्रिंशोऽध्यायः ॥३२॥