रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (16:05 IST)

कार्तिक माहात्म्य - अध्याय २९

ऋषि म्हणालेः-- हे सूता ! पिंपळाचा वृक्ष इतर दिवशीं शिवण्यास अयोग्य व शनिवारीं शिवण्यास योग्य कसा झाला हें सांगा ॥१॥
सूत म्हणालेः-- समुद्रमंथनापासून जीं रत्नें देवांनीं मिळविलीं, त्यांपैकीं लक्ष्मी व कौस्तुभ त्यांनीं विष्णूला दिलीं ॥२॥
जेव्हां विष्णु लक्ष्मीला आपल्या स्त्रीत्वानें वरुं लागले, तेव्हां लक्ष्मी त्या चक्रपाणी विष्णूची प्रार्थना करुं लागली ॥३॥
लक्ष्मी म्हणालीः-- थोरलीचा विवाह झाल्याशिवाय धाकटीचें लग्न कसें करितां ? याकरितां माझी थोरली बहीण अलक्ष्मी ॥४॥
हिचें लग्न करुन मग मला वरा. असाच परंपरेचा धर्म आहे. सूत म्हणालेः-- असें लक्ष्मीचें भाषण ऐकिलें तेव्हां श्रीविष्णूंनीं महान् तपस्वी उद्दालक ऋषि याला ती आक्काबाई दिली व त्यानें विष्णूचे आज्ञेनें वरली ॥५॥६॥
ती अलक्ष्मी मोठें तोड, दांत पांढरे, रजोगुण शरीर, लाल व विस्तृत डोळे, अंग व डोकीचे केंस रुक्ष, अशी होती ॥७॥
तो धर्मज्ञ ऋषि विष्णूच्या आज्ञेनें अशा त्या अलक्ष्मीचा स्वीकार करुन, वेदघोषानें युक्त अशा आपल्या आश्रमाला तिला घेऊन गेला ॥८॥
होमाच्या धुरानें सुगंधित झालेला व वेदांच्या घोषानें गर्जलेला असा तो आश्रम पाहून तिला दुःख झालें व ती पतीला म्हणाली ॥९॥
ज्येष्ठा म्हणालीः-- हा वेदध्वनियुक्त आश्रम मला राहण्याला योग्य नाहीं, हे ब्राह्मणा ! मला दुसरे ठिकाणीं ने. मी येथें येणार नाहीं ॥१०॥
उद्दालक म्हणालाः-- तूं येथें कां येत नाहींस ? येथें तुला अमान्य काय आहे ? तुला राहण्याला योग्य जागा तरी कोणती तें मला सांग ॥११॥
ज्येष्ठा म्हणालीः-- जेथें वेदघोष होत असेल, अतिथीची पूजा होत असेल, यज्ञदानादिक कर्मे होत असतील, तेथें मी कधीं राहणार नाहीं ॥१२॥
जेथें नवराबायको एकमेकांत प्रीति करीत असतील व पितर व देव यांची जेथें पूजा होत असेल तेथें मी राहणार नाहीं ॥१३॥
जेथें व्यापारी नीतीनें वागणारे, कुशळ, धर्मानें चालणारे, गोड बोलणारे, गुरुची पूजा करणारे असे लोक जेथें आहेत तेथें मी कधींही राहाणार नाहीं ॥१४॥
जेथें प्रत्येक रात्रीं नवरा, बायकोचें भांडण असेल व अतिथि निराक्ष होऊन उपाशीं जेथून जात असेल, तेथें राहण्याची मला आवड आहे. ॥१५॥
वृद्ध व सज्जन यांचा व ब्राह्मणांचा जेथें अपमान होतो व जेथें कठोर भाषण  बोलतात, तेथें मी नित्य राहतें ॥१६॥
द्यूत खेळणारे, दुसर्‍याचें द्रव्य हरण करणारे, परस्त्रीशीं रममाण होणारे असे लोक जेथें आहेत तेथें मी प्रेमानें राहतें ॥१७॥
जेथें गाईचा वध व मद्यप्राशन रात्रंदिवस चालतें व ब्रह्महत्यादिक पापें घडतात, त्या जागेची मला फार आवड आहे ॥१८॥
सूत म्हणालेः-- हें त्या ज्येष्ठेचें भाषण ऐकून उद्दालक खिन्नमुख झाला व विष्णूची आज्ञा मानून पुन्हा कांहीं बोलला नाहीं ॥१९॥
तो ज्येष्ठेला मान्य असें स्थल पाहण्याकरितां जेथें जेथें गेला, तेथें तेथें त्याची पूजा होत होती, तें पाहून ती ज्येष्ठा म्हणाली - अशा स्थलीं मी येत नाही. तेव्हां तो उद्दालकही तिजबरोबर फिरतां फिरतां थकून गेला ॥२०॥
नंतर उद्दालक त्या अलक्ष्मीला म्हणाला - उद्दालक म्हणतो - हे अलक्ष्मी ! मी तुला राहण्याला जागा पाहून येतों तोंपर्यंत या पिंपळाच्या बुंधाशी स्वस्थ बैस. सूत म्हणतातः-- उद्दालक याप्रमाणें तिला तेथें बसवून निघून गेला ॥२१॥२२॥
तिनें तेथें बसून बहुतकालपर्यत त्या उद्दालकाची वाट पाहिली, परंतु तो तिला भेटला नाहीं. तेव्हां नवरा टाकून गेला म्हणून दुःखित होत्साती ती अलक्ष्मी करुणस्वरानें रडूं लागली ॥२३॥
तिचें तें रडणें वैकुंठांत लक्ष्मीनें ऐकिलें, तेव्हां तिला दुःख होऊन ती विष्णूची प्रार्थना करुं लागली ॥२४॥
लक्ष्मी म्हणालीः-- हे स्वामिन् माझी थोरली बहीण नवर्‍यानें टाकल्यामुळें दुःखित आहे. तुमची माझ्यावर प्रीति असेल तर तुम्ही तिचें शांतवन करण्यास चलावें ॥२५॥
सूत म्हणालेः-- नंतर कृपानिधि विष्णु लक्ष्मीसह तेथें आले व तिचें शांतवन करुन तिला म्हणाले ॥२६॥
विष्णु म्हणतातः-- हे अलक्ष्मी ! तूं पिंपळाच्या बुंधाशीं कायम स्वस्थ बसून रहा. पिंपळ हा माझा अंशसंभव आहे, म्हणून मीही पिंपळाजवळ वास केला आहे ॥२७॥
जे गृहस्थाश्रमी दरवर्षी तुझी ज्येष्ठेची पूजा करितील त्यांचे घरीं ही तुझी धाकटी बहिण लक्ष्मी स्थिर वास करो ॥२८॥
सर्व स्त्रियांनीं नानाप्रकारचे बली, फुलें, धूप, इत्यादिकांनीं तुझी पूजा करावी. म्हणजे त्यांना लक्ष्मी प्रसन्न होईल ॥२९॥
ही कथा जो ऐकेल किंवा दुसर्‍याला ऐकवील, त्याचीं सर्व पापें नाहींशीं होऊन त्याला विष्णूचे सान्निध्य प्राप्त होईल ॥३०॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये एकोनत्रिंशोऽध्यायः ॥२९॥