शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (16:00 IST)

कार्तिक माहात्म्य - अध्याय २६

श्रीकृष्ण म्हणतातः-- पूर्वी अवंती नगरामध्यें कोणी धनेश्वर नांवाचा ब्राह्मण होता. तो ब्राह्मणाचे कर्मापासून भ्रष्ट, दुष्टबुद्धी, पापकर्मे करणारा, मीठ, गूळ वगैरे रस, लोकरीचीं वस्त्रें, कातडी यांचा व्यापार करणारा, वरवर खरें पण खोटें बोलून वागणारा, चोरी, वेश्यागमन, दारु पिणें, जुगार खेळणें अशीं कर्मे करुन मनाला समाधान मानणारा असा होता ॥१॥२॥
व्यापार करण्याकरितां देशोदेश फिरत असतां, एकदां तो माहिष्मती नगरीला आला ॥३॥
महिष्मत राजानें तें नगर केलें म्हणून त्याला माहिष्मती असें नांव पडलें; पापनाशिनी नर्मदा नदीच्या तीराला ती नगरी आहे ॥४॥
तेथें कार्तिकव्रत करणारे नाना देशचे लोक पुष्कळ आलेले पाहून विक्री करण्याकरितां तो धनेश्वर तेथें एक महिनाभर राहिला ॥५॥
तो विक्रीकरितां माल घेऊन नर्मदेच्या तीरीं यात्रेकरी लोकांत फिरत असतां, स्नान, जप, देवपूजा करीत आहेत असे ब्राह्मण पाहता झाला ॥६॥
कोणी पुराण वाचीत आहेत, कोणी तें ऐकण्यांत निमग्न आहेत, कोणी विष्णुप्रीत्यर्थ नृत्य, गायन, वाद्यें वाजविणें वगैरे कामें करीत आहेत ॥७॥
कोनी मुद्रा गोपीचंदन लावून अंगावर तुळशीच्या माळा धारण केल्या आहेत असें जिकडे तिकडे पाहून धनेश्वराला मोठी मौज वाटली ॥८॥
याप्रमाणें नित्य हिंडत असतां, त्या वैष्णव लोकांचें दर्शन, भेट, भाषण, विष्णूंचे नामश्रवण यांचा त्याला लाभ होत होता ॥९॥
असा एक महिना तेथें असतां त्यानें ते विष्णुभक्त कार्तिकव्रताचें उद्यापन करीत आहेत व हरिजागर करीत आहेत असें पाहिलें ॥१०॥
पौर्णिमेच्या दिवशीं व्रत करणारे लोक ब्राह्मण व गाई यांची पूजा करुन ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा देत आहेत ॥११॥
सूर्यास्तसमयीं त्रिपुरारि शंकराप्रीत्यर्थ दीपोत्सव करीत आहेत असें पाहिलें ॥१२॥
त्या कार्तिकमहिन्यांतील पौर्णिमातिथीला शंकरांनीं त्रिपुराला जाळिलें, म्हणून त्या दिवशीं भक्त मोठा दीपोस्तव करितात ॥१३॥
जो मजमध्यें व शंकरामध्यें भेद समजतो त्याची सर्व पुण्यकर्मे निष्फळ होतात ॥१४॥
याप्रमाणें सर्व पुण्यकर्मे चाललीं आहेत, असें पाहत पाहत तो धनेश्वर व्यापाराकरितां फिरत होता. इतक्यांत एक कृष्णसर्प त्याला चावला; तेव्हां तो विव्हळ होऊन पडला ॥१५॥
तो असा पडलेला पाहून दयाळु लोक त्याच्या भोंवतीं जमले व त्यांनीं तो सावध होण्याकरितां तुलसीमिश्रित पाणी त्याचे मुखावर शिंपडलें व तोंडांत घातलें. तोंच त्यानें प्राण सोडले ॥१६॥
त्यानें प्राण सोडतांच यमदूत त्याला रागानें बांधून चावकानें मारीत मारीत यमपुरी संयमिनीला नेते झाले ॥१७॥
चित्रगुप्त त्याला पाहतांच त्याची निर्भर्त्सना करुन, त्यानें बाळपणापासून केलेलीं सर्व पातकें यमाला सांगूं लागला ॥१८॥
चित्रगुप्त म्हणालाः-- हे यमा, यानें उपजल्यापासून कांहीं देखील पुण्य केलें नाहीं. यानें इतकी पापें केलीं आहेत कीं, तीं सांगण्याला एक वर्षही पुरणार नाहीं ॥१९॥
हा दुष्ट केवळ पापाची मूर्ति दिसत आहे, म्हणून कल्पांतापर्यंत यानें नरकांत तळमळत पडावें ॥२०॥
श्रीकृष्ण म्हणालेः-- याप्रमाणें चित्रगुप्ताचें भाषण ऐकून यम संतापला व आपले प्रलयकाळचें अग्नीप्रमाणें उग्ररुप प्रगट करुन दूताला म्हणाला ॥२१॥
यम म्हणतोः-- अरे, प्रेतपतींनो ! तुम्ही आपल्या मुद्गलांनी या दुष्ट पाप्याला मारीत मारीत कुंभीपाक नरकामध्यें टाकून द्या ॥२२॥
श्रीकृष्ण म्हणालेः-- त्या प्रेतपतींनीं मुद्गलानें त्याचें मस्तक फोडलें व ज्यामध्यें तेल कडकड कढत आहे अशा कुंभीपाकांत त्याला टाकिलें ॥२३॥
त्यास टाकतांच तो कुंभीपाक, जसा पूर्वी प्रल्हादाचे रक्षणाकरितां अग्नि थंड झाला तसा थंड झाला ॥२४॥
तो मोठा चमत्कार पाहून प्रेतपतींना विस्मय वाटला व त्यामुळें ते धांवत जाऊन यमाला सर्व हकीकत सांगूं लागले ॥२५॥
तें ऐकून यमानें प्रत्यक्ष जाऊन पाहिलें. तेव्हां त्याला चमत्कार वाटून, अहो ! हें काय आश्चर्य असें, बोलून त्या धनेश्वराला बोलावून विचारुं लागला ॥२६॥
इतक्यांत तेथें नारद आले, यमानें त्यांना पाहतांच त्यांची पूजा करुन त्यांना हें वर्तमान सांगितलें, तेव्हां त्या धनेश्वराला पाहून नारद म्हणाले ॥२७॥
नारद म्हणतातः-- हे अरुणनंदना, यमा हा नरक भोगण्याला योग्य नाहीं. कारण, याचे हातून शेवटीं नरकभोग चुकविण्याजोगें पुण्य घडलें आहे ॥२८॥
जो कोणी मनुष्य पुण्यकर्म करणारांचें दर्शन, स्पर्शन व त्यांशीं भाषण करील त्याला त्यांचे पुण्याचा सहावा भाग निश्चयानें मिळतो ॥२९॥
या धनेश्वरानें कार्तिकव्रत करणारांचें सख्य करुन एक महिना सहवास केला म्हणून त्यांचे पुण्याचा भाग याला मिळाला ॥३०॥
व त्यांची सेवा केली तिचें सर्व पुण्य याला मिळालें. म्हणून कार्तिकव्रतापासून किती पुण्य प्राप्त होतें त्याची गणती नाहीं ॥३१॥
कार्तिकव्रत करणारांचीं पातकें कितीही मोठीं असलीं तरी भक्तवत्सल विष्णु तीं सर्व नाहीशीं करितो ॥३२॥
म्हणून याचीं सर्व पापें गेलीं आहेत. वैष्णवांनीं याजवर अनुग्रह केला आहे; करितां हा नरक भोगण्यास योग्य नाहीं. याला सद्गतीच मिळाली पाहिजे ॥३४॥
आर्द्र व शुष्क पातकांनीं जसा नरक भोगावा लागतो, तसा पुण्यकर्मांनीं स्वर्ग प्राप्त होतो ॥३५॥
याजकरितां याचे हातून नकळत सहज पुण्य घडलें आहे, म्हणून हा हे सर्व पापामुळें भोगावे लागणारे नरक पाहून नंतर यक्षाचे योनींत राहील ॥३६॥
श्रीकृष्ण म्हणालेः-- याप्रमाणें बोलून नारद केल्यानंतर नारदाच्या भाषणानें त्या धनेश्वराचें पुण्यकर्म ज्याला समजलें आहे असा तो यम आपले दूतांकडून त्या धनेश्वराला नरकदर्शन करवून आणविता झाला ॥३७॥
इति श्रीकर्तिकमाहात्म्ये षङ्विंशतितमोध्यायः ॥२६॥