मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:59 IST)

कार्तिक माहात्म्य - अध्याय २१

नारद म्हणालेः-- याप्रमाणें त्या विष्णुदूतांचे भाषाण ऐकून धर्मदत्ताला कौतुक वाटलें व त्यांना साष्टांग नमस्कार करुन भाषण करिता झाला ॥१॥
धर्मदत्त म्हणालाः-- भक्तांचें संकट नाश करणारा विष्णु याची यज्ञ, दान, व्रत, तीर्थ तप यांहींकरुन लोक यथाविधि आराधना करितात ॥२॥
यांमध्यें विष्णुप्रिय व विष्णुसान्निध्य करणारें असें कोणतें व्रत कीं, जें केलें असतां यज्ञदानादि सर्व केल्याचें फळ मिळतें ॥३॥
गण म्हणतातः-- हे ब्राह्मणा ! तूं चांगलें विचारलेंस. तुला पूर्वी घडलेली एक पुण्यकारक कथा सांगतों. चित्त देऊन श्रवण कर ॥४॥
पूर्वी कांतिपुर नगरामध्यें चोल नांवाचा चक्रवर्ति राजा राज्य करीत होता. त्याच्याच कीर्तिमुळे त्या देशाला चोलदेश हें नांव प्राप्त झालें ॥५॥
तो चोलराजा राज्य करीत असतां त्याच्या राज्यांत कोणीहि दरिद्री, रोगी, दुःखी, पापकर्मी असे नव्हते ॥६॥
त्या राजानें बहुत यज्ञ केल्यामुळें ताम्रपणीं नदीच्या दोन्ही तीराला यज्ञसंबंधीं सोन्याचे केलेले यूप शोभत होते. त्यामुळें नदीतीर कुबेराच्या चैत्ररथ बागेप्रमाणें भासत होतें ॥७॥
हे ब्राह्मणा ! तो राजा एकदां अनंत शयन क्षेत्राला गेला. जेथें जगत्स्वामी भगवंतानें योगनिद्रेमध्यें शयन केलें आहे ॥८॥
तेथें राजानें दिव्य रत्नें, मोतीं, सुंदर सोन्याची फुलें, यांनी श्रीविष्णूची यथाविधि पूजा केली ॥९॥
देवाला सांष्टांग नमस्कार करुन तेथें बसला. इतक्यांत तेथें देवाजवळ एक ब्राह्मण आलेला त्यानें पाहिला ॥१०॥
तो विष्णुदास ब्राह्मण त्या राजाचे नगरचाच होता. ज्यानें देवाचे पूजेकरितां हातांत उदक व तुलसी धारण केली होती ॥११॥
त्या ब्राह्मणानें तेथें येऊन विष्णुसूक्तानें देवदेवाला स्नान घालून तुळशीच्या मंजिरींनीं पूजा केली ॥१२॥
त्याच्या तुळशीच्या पूजेनें पूर्वी आपण केलेली रत्नपूजा झांकून गेली असें राजानें पाहिलें; तेव्हां राजाला राग येऊन बोलला ॥१३॥
चोलराजा म्हणतो - हे विष्णुदासा ! माणकें सुवर्ण इत्यादिकांनी मी मोठी सुंदर पूजा केली होती. ती तूं तुलसीनीं अशी कां झांकून टाकिलीस ? ॥१४॥
तूं विष्णुभक्ति जाणत नाहींस; ज्या अर्थी तूं अशी अतिसुंदर सुशोभित पूजा झांकून टाकतोस यावरुन तूं नीच आहेस असें मला वाटतें ॥१५॥
असें राजाचें भाषण ऐकून ब्राह्मण संतापला व राजाच्या मोठेपणाचा मान न राखतां बोलूं लागला ॥१६॥
विष्णुदास म्हणतोः-- राजा ! तुला भक्ति ठाऊक नाहीं. तूं राजलक्ष्मीनें गर्विष्ठ झाला आहेस. तूं पूर्वी कोणतें विष्णुव्रत केलेंस तें सांग बरें ॥१७॥
गण म्हणतातः-- असें ब्राह्मणाचें वाक्य ऐकून राजा हंसला व गर्वानें विष्णुदासाला म्हणाला ॥१८॥
राजा म्हणतोः-- ब्राह्मणा ! तूं असें जरी बोललास तरी तुला विष्णुभक्तीचा नुसता गर्व आहे. दरिद्री जो तूं त्या तुला विष्णूची भक्ति कितीशी असणार ? ॥१९॥
तूं विष्णूला तुष्ट करणारें असें यज्ञदानादि केलें नाहींस किंवा हे ब्राह्मणा ! कधीं कोठें देवालयही बांधलें नाहींस ॥२०॥
असा तूं असूनही तुला भक्तीचा मोठा गर्व मात्र आहे. हे सर्व ब्राह्मणहो ! माझें भाषण ऐका ॥२१॥
हा वाद विष्णूच्या साक्षात्कारानेंच संपेल; तेव्हां तुम्ही आम्हां दोघांमध्यें कोण भक्त आहे तें जाणाल ॥२२॥
गण म्हणालेः-- राजा याप्रमाणें बोलून आपल्या राजवाड्यांत गेला व त्यानें मुद्गलऋषीस आचार्यत्व देऊन विष्णुसत्र आरंभिले ॥२३॥
त्या सत्रांत ऋषींचा मोठा समुदाय जमला होता; राजानें त्यांना अन्नदान बहुत केलें व दक्षिणाही बहुत दिली; जसें पूर्वी ब्रह्मदेवानें गयाक्षेत्री विष्णुसत्र केलें त्याप्रमाणें त्या राजानें चालविलें ॥२४॥
इकडे विष्णुदासही त्या देवालयांतच राहिला व तो विष्णूला प्रिय असे नियम चालवीत होता ॥२५॥
माघ व कार्तिक महिन्याचें व्रत, तुलसीवनाचें रक्षण, एकादशीला '' ॐ नमो भगवते वासुदेवाय '' या द्वादशाक्षरी मंत्राचा जप, नित्य षोडशोपचारांनीं व गायन नृत्य इत्यादि मंगलांनीं विष्णूची पूजा अशीं व्रतें तो ब्राह्मण करिता झाला ॥२६॥२७॥
नित्य चालतां बसतां निजतां, विष्णूचें स्मरण करीत होता. सर्व प्राणिमात्रांचे अंतर्यामीं विष्णु आहे असें समजून त्यांकडे यथायोग्य समदृष्टीनं पहात होता ॥२८॥
माघ व कार्तिक मासाचे विशेष नियम सर्व करुन विष्णुप्रीतीकरीतां त्यांचें त्यानें उद्यापन केलें ॥२९॥
याप्रमाणें चोलराजा व विष्णुदास ब्राह्मण हे विष्णूची आराधना करणारे असे मोठे व्रतस्थ राहून सर्व इंद्रियांचीं कर्मे केवळ भगवंतावर निष्ठा ठेवून करीत असतां बहुत काळ गेला ॥३०॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये एकविंशोऽध्यायः ॥२१॥