बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:58 IST)

कार्तिक माहात्म्य - अध्याय १७

नारद म्हणतातः-- राजा ! इकडे जलंधरानें शंकर अद्भुत पराक्रमी असें पाहून त्यांना मोह पाडण्याकरितां मायेची पार्वती निर्माण केली ॥१॥
त्या पार्वतीला रथावर बांधिलें आहे, ती रडत आहे व तिला निशुंभ वगैरे दैत्य मारीत आहेत असें शंकरांनीं पाहिलें ॥२॥
अशा प्रकारची पार्वती पाहून शंकरांस वाईट वाटलें आणि क्षणभर आपले सामर्थ्य विसरुन खालीं मान घातली ॥३॥
नंतर जलंधरानें शंकराचें मस्तक, छाती व पोट यांवर तीन बाण मारिले; ते पिसापर्यंत आंत शिरले ॥४॥
ही माया आहे असें विष्णूंनीं सुचविले. तेव्हां शंकरांनीं आपलें ज्वालामालांनीं अति भयंकर असे उग्र रुप प्रगट केलें ॥५॥
तें शंकराचें भयंकर रुप पाहून दैत्य भ्याले. शंकरापुढें उभे राहीनात. दशदिशांनीं पळूं लागले ॥६॥
तेव्हां शंकरांनीं शुंभनिशूंभाला शाप दिला कीं, तुम्हीं माझे युद्धांत पळालां, तर पुढें पार्वतीचे हातून मराल ॥७॥
पुनः जलंधरानें शंकरावर बाणांचा वर्षाव करुन बाणांचे अंधारानें आकाश व पृथ्वी व्यापून टाकिली ॥८॥
शंकर वेगानें तो बाणांचा समुदाय तोडीत आहेत इतक्यांत जलंधरानें जलदीनें वृषभास परिघानें मारिलें ॥९॥
त्या मारानें वृषभ रणांतून परत फिरला. शंकरांनीं ओढून परत फिरविलें तरी तो रणभूमीवर उभा राहीना ॥१०॥
तेव्हां उग्ररुपी शंकर फार रागावले आणि त्यांनीं सूर्यासारखें तेजस्वी सुदर्शन चक्र वेगानें जलंधरावर फेकलें ॥११॥
तें तेजानें पृथ्वी व आकाश व्यापणारें चक्र जलंधराचें शिर हरण करुन जमिनीवर पडलें ॥१२॥
शरीर रथांतून खालीं पडलें, तेव्हां पृथ्वी दणाणली. त्याच्या देहांतून तेज निघालें तें शंकराच्या शरीरांत लय पावलें ॥१३॥
वृंदेच्या देहांतून तेज निघालें, तें पार्वतीच्या शरीरांत लय पावलें; तेव्हां ब्रह्मदेवादिक सर्व देवांचे नेत्र आनंदानें प्रफुल्लित झाले ॥१४॥
अशा देवांनीं शंकराला नमस्कार केला व विष्णूच्या चरित्राची प्रशंसा केली. देव म्हणतातः-- महादेवा तुह्मीं शत्रूच्या भयापासूंन देवांचें रक्षण केलें ॥१५॥
परंतु दुसरी एक भीति उत्पन्न झाली आहे. वृंदेच्या लावण्याला भुलून विष्णु मोहित होऊन राहिले आहेत त्याला काय करावें ॥१६॥
शंकर म्हणतातः-- देवहो ! तुम्हीं विष्णूचा मोह नाहींसा होण्याकरीतां मोहिनी मायेला शरण जा; ती दयाळू आहे, तुमचें कार्य करील ॥१७॥
नारद म्हणतातः-- राजा, याप्रमाणें बोलून भूतगणांसह शंकर अंतर्धान पावले. देवांनीं भक्त वत्सल जी मूल प्रकृति माया तिची स्तुति केली ॥१८॥
देव म्हणतात, उत्पत्ति, स्थिति व नाश याला कारण जे सत्व, रज, तम हे गुण जिच्यापासून झाले व जिच्या इच्छेनें हें सर्व जग उत्पत्ति व लयाला पावतें अशा त्या मूलप्रकृतीला आमचा नमस्कार असो ॥१९॥
जी तेवीस प्रकारच्या भेदांनीं बोधिली जाते व जी सर्व जग व्यापून राहते, जिचीं रुपें व कर्मे आम्हां अज्ञ देवांना व ब्रह्मा विष्णु शंकर या तिघांनाही समजत नाहीत त्या मूलप्रकृतीला आम्ही नमस्कार करितों ॥२०॥
जिची नित्य भक्ति केली असतां, त्या पुरुषाला दारिद्र्याचे भय, मोह व पराभव, हीं प्राप्त होत नाहींत अशी भक्तवत्सल मूल प्रकृति, तिला नमस्कार करितों ॥२१॥
नारद म्हणतातः-- हें स्तोत्र जे त्रिकाल पठण करितील, त्यांना दरिद्र, मोह व दुःख हीं स्पर्श करणार नाहींत ॥२२॥
याप्रमाणें देवांनीं स्तुति केली तेव्हां त्यांना गगनांत आपल्या ज्वालांनीं सर्व दिशा व्यापल्या आहेत असें तेजोमंडळ दिसलें ॥२३॥
व त्या तेजाच्या मध्यांतून त्यांनीं आकाशवाणी ऐकिली, शक्ति म्हणतोः-- देवहो ! तीन गुणांनी मीच तीन प्रकारची होऊन रहातें ॥२४॥
सत्व, रज, तम तीन गुणांनीं गौरी, लक्ष्मी व सरस्वती या नांवांनी मीच आहे. तर देवहो ! त्यांजकडे जा म्हणजे त्या तुमचे कार्य करितील ॥२५॥
नारद म्हणालेः-- हें भाषण देवांनीं ऐकल्यावर तें तेज गुप्त झालें व देवांना आनंद होऊन चमत्कार वाटला ॥२६॥
त्या शक्तीच्या वाक्यानें प्रेरित झालेले देव, गौरी, लक्ष्मी व सरस्वती यांजकडे जाऊन त्यांना भक्तिपूर्वक नमस्कार करिते झाले ॥२७॥
तेव्हां त्या देवी, प्रणत देवांना पाहून कृपाळूपणानें तिघींनीं देवांना पृथक् पृथक् बीजें देऊन भाषण केलें ॥२८॥
देवी म्हणतातः-- हे बीजें जेथें विष्णु बसले आहेत तेथें पेरा; म्हणजे तुमचें कार्य सिद्धीस पावेल ॥२९॥
नारद म्हणालेः-- तेव्हां सर्व देवांना मोठा आनंद झाला. तीं बीजें घेऊन जेथें विष्णु वृंदेकरितां जमिनीवर उदास होऊन बसले होते तेथें तीं पेरुन टाकलीं ॥३०॥
नारद म्हणतातः-- राजा ! याप्रमाणें सत्य वाक्याचें माहात्म्य सांगितले. ही कथा जो पठण करील किंवा ऐकेल, तो स्वर्गलोकास जाईल ॥३१॥
जिला पुत्र नाहीं अशी स्त्री किंवा पुरुष यांनी एकचित्तानें ही श्रवण केली तर त्यांचीं संकटें दूर होतील; विघ्नें येणार नाहींत ॥३२॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये सप्तदशोऽध्यायः ॥१७॥