रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:56 IST)

कार्तिक माहात्म्य - अध्याय १२

नारद म्हणतात - राजा, जलंधरानें मोठ्या भक्तीनें माझी पूजा केली व हंसून मला म्हणाला ॥१॥
हे ब्रह्मन् आपण कोठून आलांत ? विशेष काय काय पाहिलें ? येथें कोणत्या कार्याकरितां आलां, त्याची मला आज्ञा करा ॥२॥
नारद म्हणतात - हे दैत्येंद्रा, मी सहज कैलासाला गेलों असतां तेथें पार्वतीसह शंकर बसलेले पाहिले ॥३॥
तेथें दहा हजार योजनें कल्पवृक्षांचें वन आहे. शेंकडों कामधेनू आहेत व चिंतामणीचा सर्वत्र चकचकाट आहे ॥४॥
तें पाहून मला मोठें आश्चर्य वाटलें, व अशी संपत्ति त्रैलोक्यांत सुद्धां असेल कीं नाहीं असे वाटलें ॥५॥
तेव्हां तुझ्या ऐश्वर्याची मला आठवण झाली व तें पहावें म्हणून तुजकडे आलों ॥६॥
ही तुझी समृद्धि पाहिली पण ती स्त्रीरत्नाखेरीज आहे. तेव्हां मी विचार केला कीं, या त्रैलोक्यांत शंकरासारखा संपत्तिवान् दुसरा कोणी नाहीं ॥७॥
तुझ्याजवळ अप्सरा - नागकन्या वगैरे पुष्कळ आहेत, तरी त्या पार्वतीच्या रुपाची बरोबरी खात्रीनें करणार नाहींत ॥८॥
जिच्या लावण्यसमुद्रांत ब्रह्मदेव निमग्न होऊन धैर्यच्युत झाला अशा त्या पार्वतीची बरोबरी कोण करणार आहे ? ॥९॥
मदनाचा नाश करणारा विरक्त असा शंकर असून तिच्या रुपाला भुलून तिच्या लावण्यरुपसमुद्रांत मासोळीप्रमाणें फिरत होता ॥१०॥
पार्वतीचें रुप पाहून तशी स्त्री उत्पन्न करावी म्हणून ब्रह्मदेवानें पुनः पुनः स्त्रिया उत्पन्न केल्या. त्या अप्सरा झाल्या परंतु तशी एकही स्त्री झाली नाहीं ॥११॥
अशा स्त्रीचा जो उपभोग घेणारा त्याचीच संपत्ति श्रेष्ठ आहे. तूं सर्व रत्नांच्या धनी आहेस, तरी तसें तुझें ऐश्वर्य नाहीं ॥१२॥
याप्रमाणें बोलून त्याचा निरोप घेऊन मी गेल्यानंतर पार्वतीच्या रुपाचें वर्णन त्यानें ऐकल्यामुळें तो कामज्वरानें पीडित झाला ॥१३॥
नंतर विष्णूच्या मायेनें मोहित झाल्यामुळें त्यानें आपला दूत राहू याजला शंकराकडे पाठविलें ॥१४॥
तो शुक्लपक्षींच्या चंद्राप्रमाणें तेजस्वी अशा कैलासाला गेला, तेव्हां त्याच्या काळ्या शरीरामुळें तो कैलास कृष्णपक्षींच्या चंद्राप्रमाणें भासूं लागला ॥१५॥
नंदीनें शंकराला तो आल्याची खबर दिल्यावर तो आंत प्रवेश करिता झाला. शंकरांनीं त्यास भ्रूलतेनें बोलण्याची खूण करतांच तो बोलूं लागला ॥१६॥
राहू म्हणतो - देव नाग ज्याची सेवा करितात, जो त्रैलोक्याचा व सर्व रत्नांचा स्वामी जलंधर त्याची तुम्हांला आज्ञा आहे; ती वृषध्वज शंकरा ऐका ॥१७॥
तूं स्मशानांत राहणारा, अंगावर हाडकें बाळगणारा, दिगंबर ( नग्न ) असणारा, अशा तुला अशी सुंदर स्त्रीरत्न पार्वती कशी शोभेल ? ॥१८॥
मी सर्व रत्नांचा मालक आहें आणि पार्वती स्त्रियांत रत्न आहे; तेव्हां ती मलाच योग्य आहे, तुला भिक्षा मागून खाणाराला ती योग्य नाहीं ॥१९॥
नारद म्हणतातः-- याप्रमाणें राहू बोलत आहे इतक्यांत शंकराच्या भुवयांमधून विजेसारखा शब्द करणारा भयंकर पुरुष निघाला ॥२०॥
त्याचें तोंड सिंहासारखें, जीभ बाहेर आलेली व लळलळ करणारी, अग्नीच्या ज्वाळेप्रमाणें ज्याचे डोळे, मोठा उंच, केस उभे, शरीर कृश, भयंकर जसा दुसरा नारसिंहच ॥२१॥
असा तो पुरुष राहूला खाण्याकरितां धावला. तें पाहून राहू घाबरुन भयानें अति वेगानें बाहेर पळाला; तरी त्याला त्यानें धरिलें ॥२२॥
हे राजा, तो राहू मोठ्यानें ओरडून शंकराला म्हणाला - देवा, मी शरण आलों; माझें रक्षण कर ॥२३॥
मला ब्राह्मणाला खाण्यास हा आला आहे; त्या ब्राह्मण राहूचें हें भाषण ऐकून शंकर म्हणाले ॥२४॥
तो राहूला धरुन खाणार इतक्यांत शंकरांनीं त्याचें निवारण केलें व म्हणाले - हा दूत दुसर्‍याचा चाकर आहे म्हणून हा वध करण्यास योग्य नाहीं ॥२५॥
याला सोड. असें ऐकतांच त्यानें राहूला आकाशांत फेकले. नंतर तो पुरुष शंकराची विनंति करुं लागला ॥२६॥
पुरुष म्हणालाः-- मला फार भूक लागली आहे. मी भुकेनें व्याकुळ झालों आहें; मी काय खाऊं त्याची आज्ञा करा ॥२७॥
शंकर म्हणालेः-- तूं आपल्या हातापायांचें मांस खा. नारद म्हणतात - शंकरांनीं अशी आज्ञा करितांच तो आपल्यालाच खाऊं लागला ॥२८॥
हात पाय वगैरे सर्व मांस खाल्लें. फक्त मस्तक शेष राहिलें. तें पाहून शंकर प्रसन्न झाले ॥२९॥
असें घोर कर्म करणारा पुरुष पाहून विस्मय वाटून बोलले. शंकर म्हणतात - तूं कीर्तिमुख या नावांचा होऊन नेहमीं माझे दारांत रहा ॥३०॥
तुझी प्रथम पूजा जे करणार नाहींत ते मला प्रिय होणार नाहींत. नारद म्हणतातः-- तेव्हांपासून देवाच्या दारांत कीर्तिमुख राहिला ॥३१॥
जे अगोदर त्याची पूजा करणार नाहींत त्यांची पूजा निष्फळ होईल. त्यानें फेकलेला राहू त्याचे हातून सुटला तो बर्बर देशांत पडला ॥३२॥
म्हणून राहू बर्बरदेशांत झालेला असें त्याचें नांव प्रसिद्ध झालें. नंतर राहूनें आपला पुन्हां जन्मच झाला असें मानलें व जलंधराजवळ येऊन सर्व हकीकत सांगितली ॥३३॥
इति श्रीप. का. मा. द्वादशोऽध्यायः ॥१२॥