रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:53 IST)

कार्तिक माहात्म्य - अध्याय ७

नारद म्हणतात-- हे महाराजा, कार्तिकव्रत करणारांचे जे नियम सांगितले ते तुला थोडक्यांत सांगतों श्रवण कर ॥१॥
सर्व आमिषें, मांस, मध, कांजी, मोहर्‍या, भांग इत्यादि मादक पदार्थकार्तिकव्रत करणारांनीं सेवन करुं नयेत ॥२॥
परान्न घेऊं नये, दुसर्‍याचा द्रोह करुं नये, तीर्थयात्रेशिवाय इतरत्र जाऊं नये ॥३॥
देव, वेद, ब्राह्मण, गुरु, गाय, व्रती, स्त्रिया, राजे, मोठे लोक यांची निंदा कार्तिकव्रत करणारांनीं करुं नये ॥४॥
द्विदल डाळी, तिळ तेल, विकत घेतलेलें शिजलेलें अन्न, ज्याची उत्पत्ती वाईट तें, ज्याचें नांव वाईट तें अन्न, हीं कार्तिकांत वर्ज्य करावीं ॥५॥
प्राण्याचे नखकेस इत्यादि अंग, चुना, फळांत इडलिंबू, धान्यांत मसुरा व शिळें अन्न हीं आमिष म्हणजे मांसतुल्य आहेत ॥६॥
शेळी, गाय, म्हैस यांशिवाय इतरांचें दूध आमिष आहे व ब्राह्मणांनीं विकलेलें तूप, तेल, मीठ इत्यादि सर्व रस, जमिनीपासून झालेलें मीठ, तांब्याचे भांड्यांतील पंचगव्य व डबक्यांतील पाणी व आपणाकरितांच केलेलें अन्न हीं सर्व आमिषें आहेत; तीं वर्ज्य करावींत ॥७॥८॥
ब्रह्मचर्य, जमिनीवर शय्या, पत्रावळीवर जेवणें व चवथ्या प्रहरीं अन्नभक्षण याप्रमाणे व्रत करावें ॥९॥
नरकचतुर्दशीला अंगास तेल लावून स्त्रान करावें. कार्तिकांत अन्य दिवशीं अंगास तेल लावूं नये ॥१०॥
कांदा, वांगें, मोडाचें धान्य, छत्रीचें झाड, तांबडा कांदा, नालिका, मुळा हीं कार्तिकांत वर्ज्य करावीं ॥११॥
दुध्या भोपळा, वांगें, कोहळा, रिंगणी, डोरलीं, भोंकर, कवठ हीं विष्णुव्रत करणारांनें सोडावीं ॥१२॥
व्रत करणारानें विटाळशी, अतिशूद्र, यवन, जातींतून बाहेर टाकलेला, अव्रती, ब्राह्मणद्वेष्टा व वेद न मानणारा यांशीं भाषण करुं नये ॥१३॥
यांनीं पाहिलेलें अन्न, कावळ्यानें पाहिलेलें व सोईराघरचें अन्न, दोनदां शिजवलेलें मोदक वगैरे व करपलेलें अन्न व्रत करणारानें खाऊं नये ॥१४॥
अंगास तेल लावणें, गादीवर निजणें, बहुतांचें अन्न, काशाचे भांड्यांत भोजन, हीं कार्तिकांत वर्ज्य केलीं असतां व्रत पूर्ण होतें ॥१५॥
इतर व्रत करणारांनीं सर्व व्रतांत हीं वर्ज्य करावीं; विष्णूच्या प्रीतीकरितां कृछ्रादिक यथाशक्ति प्रायश्चित्तें करावीं ॥१६॥
प्रतिपदेपासून क्रमानें कोहळा, डोरलें, मीठ, तीळ, आंबट, बेलफळ, कलिंगड, आंवळा, नारळ, भोंपळा, पडवळ, वाल, मसुरा, चवळी, या भाज्या व स्त्रीगमन सोडावें ॥१७॥१८॥
रविवारी नेहमी आंवळा सोडावा ॥१९॥
याशिवाय दुसरें कांहीं सोडलें तर तो पदार्थ ब्राह्मणास दान देऊन नंतर भक्षावा ॥२०॥
याप्रमाणें माघ महिन्यांतही नियम करावे व प्रबोधसमयीं सांगितल्याप्रमाणें हरिजागर करावा ॥२१॥
यथाविधी कार्तिकव्रत करणार्‍या मनुष्यास पाहून यमदूत, जसे हत्ती सिंहाला भिऊन पळतात तसे पळतात ॥२२॥
यज्ञ करणारापेक्षां कार्तिकव्रत करणारा श्रेष्ठ आहे; यज्ञापासून स्वर्ग मिळतो व कार्तिकव्रत करणारा वैकुंठास जातो ॥२३॥
भोग व मुक्ति देणारी व्रतें व पृथ्वीवरील सर्व क्षेत्रें कार्तिकव्रत करणाराचे शरीरांत रहातात ॥२४॥
दुःस्वप्न किंवा मन, वाचा, शरीर यांजकडून झालेलें कोणतेही पाप हीं कार्तिकव्रत करणाराचे दर्शनानें तत्काल नाहींशीं होतात ॥२५॥
जसे सेवक राजाचें रक्षण करितात तसें कार्तिकव्रत करणाराचें रक्षण इंद्रादिक देव विष्णूचे आज्ञेनें प्रेरित होत्साते करितात ॥२६॥
विष्णुव्रत करणारा जेथें जातो व जेथें त्याचें पूजन होतें तेथें भूत, ग्रह, पिशाच्च रहाणारच नाहींत ॥२७॥
यथोक्त कार्तिकव्रत करणाराचें पुण्य वर्णन करण्यास चार मुखांचा ब्रह्मदेवही समर्थ होत नाहीं ॥२८॥
विष्णूचें हें कार्तिकव्रत सर्व पापें नाहीसें करणारें; सुपुत्र, नातू, धन व धान्य यांची वृद्धि करणारें असें आहे हें नियमयुक्त कार्तिकव्रत करणाराला तीर्थे हिंडत जाण्याचें व तीर्थसेवा करण्याचें कारण नाहीं ॥२९॥
इति श्रीपद्मपु० उ० कार्तिकमाहात्म्ये सप्तमोऽध्यायः ॥७॥