रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:49 IST)

कार्तिक माहात्म्य - अध्याय ३

सत्यभामा म्हणते - कलास्वरुपी जो तूं त्या कालाचे सर्व मासादि अवयव तुझेच अंश आहेत, मग सर्व महिन्यांमध्यें कार्तिक मासच कां श्रेष्ठ आहे ॥१॥
तिथींमध्ये एकादशी व मासांमध्यें कार्तिकमास तुम्हांला प्रिय असण्याचें कारण मला सांगा ॥२॥
श्रीकृष्ण म्हणतात - तूंख फार उत्तम विचारलेंस; तुला याविषयीं पृथूचा व नारदाचा संवाद सांगतों. चित्त देऊन ऐक ॥३॥
पूर्वी पृथुराजानें नारदास हेंच विचारिलें; व सर्वज्ञ नारदांनीं कार्तिक श्रेष्ठ असण्याचें कारण सांगितलें ॥४॥
नारद म्हणतात - पूर्वी त्रैलोक्य जिंकण्यास समर्थ असा महापराक्रमी सागराचा पुत्र शंखनांवाचा राक्षस होता ॥५॥
त्यानें देवांस जिंकून स्वर्गातून घालवून दिले व इंद्रादिकांचे सर्व अधिकार हरण केले ॥६॥
नंतर ते सर्व देव त्याच्या भयानें मेरुपर्वताच्या गुहेंत गेले व पुष्कळ वर्षेपर्यंत स्त्रिया व बांधवांसह तेथें दडून राहिले ॥७॥
ते देव गुहेंत असतां तो दैत्य विचार करुं लागला ॥८॥
देवांचा पराभव करुन त्यांचे अधिकार मीं जरी हरण केले तरी ते बलवान् दिसतात तेव्हां काय करावें ॥९॥
हं, मी समजलों; देव वेदमंत्रांनीं बलिष्ठ झाले आहेत. तेव्हां वेदमंत्र हरण करावे म्हणजे ते सहज बलहीन होतील ॥१०॥
असा विचार करुन विष्णूला झोंप लागली आहे असें पाहून त्यानें त्वरेनें सत्यलोकाहून ब्रह्मदेवाचे वेद हरण केले ॥११॥
त्यानें नेलेले ते वेद त्याच्या भीतीनें यज्ञमंत्रबीजासह पाण्यांत शिरले ॥१२॥
त्याच्या शोधाकरितां शंखासुर समुद्रांत फिरुं लागला; परंतु एके ठिकाणीं गुप्त असलेले ते वेदमंत्र त्यास दिसले नाहींत ॥१३॥
नंतर ब्रह्मदेव देवांसह पूजादिक साहित्य घेऊन वैकुंठात विष्णूला शरण गेला ॥१४॥
तेथें विष्णूला जागृत करण्याकरितां वाद्यें वाजविलीं; गायन केलें; सुगंधिक धूप व दीप पुनः पुनः लाविले ॥१५॥
नंतर देवांचे भक्तीनें संतुष्ट झालेले भगवान् जागृत झाले व हजारों सूर्याप्रमाणें तेजस्वी अशा भगवंतांचे त्या सर्वानीं दर्शन घेतलें ॥१६॥
षोडशोपचारांनी भगवंताची पूजा करुन सर्वांनीं साष्टांग नमस्कार घातले. नंतर देवांना विष्णु बोलले ॥१७॥
विष्णु म्हणाले - हे देवहो, तुमच्या गीतवाद्यादि मंगलांनीं मी संतुष्ट झालों, तुमची इच्छा असेल तें सर्व तुम्हांस देईन ॥१८॥
कार्तिक शुद्ध एकादशीला सूर्योदय होईल तोंपर्यंत कार्तिकमासीं नित्य पहांटे प्रहर रात्र राहिली असतां मंगलवाद्यगीत मजपुढें तुम्हीं केलें, करितां त्याप्रमाणें जे करितील ते मला प्रिय होतील आणि माझेजवळ येतील ॥१९॥२०॥
तुम्ही यथाक्रमानें पाद्य, अर्घ्य, आचमनीय व उदक मला अर्पण केलें. त्याचा गुण अद्भुत आहे. तें तुमच्या सुखास कारण झालें ॥२१॥
शंखासुरानें हरण केलेले वेद उदकांत आहेत. हे देवहो, मी त्या सागरपुत्र शंखासुरास मारुन ते वेद आणतों ॥२२॥
आजपासून प्रत्येक वर्षी कार्तिकमासीं मंत्रबीजासहित वेद उदकामध्यें विश्रांति घेतील ॥२३॥
आजपासून कार्तिकांत मीही जलामध्यें राहीन व तुम्हीही सर्व ऋषींसह माझ्याबरोबर वास करा ॥२४॥
या कार्तिकमासीं जे मनुष्य प्रातः स्नान करितील त्या सर्वांना अवभृथ स्नान केल्याचें फळ मिळेल ॥२५॥
हे इंद्रा, जे मनुष्य नित्य उत्तम कार्तिकव्रत करितील त्यांना अंतकालानंतर तूं वैकुंठाला आणून पोहोंचीव ॥२६॥
तसेंच विघ्नांपासून त्यांचें उत्तम संरक्षण कर. हे वरुणा, तूं त्यांना पुत्रपौत्रादि संतति दे ॥२७॥
कुबेरा, तूं माझे आज्ञेनें त्यांची ऐश्वर्य संपत्ति वाढीव; कारण तो मनुष्य माझें रुप धारण करणारा जीवन्मुक्त आहे ॥२८॥
ज्यानें जन्मापासून मरणकालपर्यंत यथाविधि हें उत्तम व्रत केलें तो तुमच्याही बरोबरीचा आहे ॥२९॥
आज एकादशीला तुम्हीं मला जागृत केलें म्हणून ही तिथि मला फार मान्य व प्रिय आहे ॥३०॥
दानें, तीर्थे, व्रतें व यज्ञ ह्यांनीं स्वर्ग प्राप्त होतो; माझें सान्निध्य मिळत नाहीं. परंतु हे देवहो, ह्या दोन व्रतांनीं माझें सान्निध्य मनुष्याला प्राप्त होतें ॥३१॥
॥ इति तृतीयोऽध्यायः ॥३॥