बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:49 IST)

कार्तिक माहात्म्य - अध्याय २

श्रीकृष्ण म्हणतात - त्यानंतर गुणवतीला हे दोघे राक्षसानें मारल्याचें वर्तमान समजलें तेव्हं बाप व पति ह्यांजबद्दल तिला फार दुःख झालें. ती दीनस्वरानें रडूं लागली ॥१॥
गुणवती म्हणाली, अहो पति, अहो बाबा, तुम्हीं मला टाकून कोठें गेला ? तुमच्यावांचून म्यां अनाथ मुलीनें काय करावें ॥२॥
मला घरांत बसणारीला आतां अन्नवस्त्र देऊन प्रेमानें माझें पालन कोण करील ॥३॥
माझें भाग्य, सुख, आशा व जीवित हीं सर्व नष्ट झालीं तरी मी आतां कोणाला शरण जाऊं कीं, जो माझें दुःख निवारण करील ॥४॥
मी कोठें जाऊं, कोठें उभी राहूं व काय करुं ब्रह्मदेवानें निष्ठुरपणानें माझा नाश केला, आतां म्यां गरिबानें कसें जगावें ? ॥५॥
कृष्ण म्हणतात - याप्रमाणें तिनें दुःखित झालेल्या हरिणीप्रमाणें पुष्कळ शोक केला व वार्‍यानें केळ पडावी तशी ती भूमीवर पडली ॥६॥
पुष्कळ वेळानें पुन्हां उठून तिनें फार शोक केला, याप्रमाणें ती शोकसागरांत बुडून गेली ॥७॥
तिनें घरांतील सर्व जिनसा विकून यथाशक्ति त्या दोघांचें पारलौकिक क्रिया कर्म केलें. ॥८॥
त्या नगरांतच ती जिवंत असून मेल्याप्रमाणे राहूं लागली. इंद्रियें जिंकून खरें व शुद्ध आचरण ठेवून शांतपणानें विष्णूची भक्ति करुं लागली ॥९॥
एकादशीव्रत व कार्तिकमास व्रत हीं दोन व्रतें मरणकालपर्यंत तिनें केलीं ॥१०॥
हे सत्य भामे, हीं दोन व्रतें मला फार प्रिय आहेत. भोग, मुक्ति, पुण्य, पुत्र व संपत्ति देणारीं हीं व्रतें आहेत ॥११॥
कार्तिकमासीं तूळराशीस सूर्य असतां जे प्रातः स्नान करितात ते महापातकी असले तरी मुक्त होतात ॥१२॥
प्रातःस्नान, जागरण, दिवे लावणें व तुलसीची बाग राखणें हीं कृत्यें कार्तिकमासीं जे करितात ते विष्णुमूर्तीच समजावे ॥१३॥
विष्णुदेवालयांत सडा सावरण करुन स्वस्तिकें घालणारे व विष्णूची पूजा करणारे मनुष्य जीवन्मुक्तच आहेत ॥१४॥
याप्रमाणें तीनच दिवस जरी कार्तिक महिन्यांत हें व्रत केलें तरी ते देवांना सुद्धां वंद्य होतात, भग जन्मभर करणारे तर किती पुण्यवान् म्हणून सांगूं ! ॥१५॥
याप्रमाणें ती गुणवती दस्वर्पीं उत्तम रीतीनें व्रत करीत होती. विष्णूचे पूजेमध्यें तिचें भक्तियुक्त अंतः करण नेहमीं निमग्न झालें होतें ॥१६॥
हे प्रिये, एकदां ती ज्वरानें पीडित होऊन कृश झाली असतांही हळूहळू गंगेच्या स्नानास गेली ॥१७॥
गंगेच्या जलांत शिरली तों थंडीमुळें कांपूं लागून विह्वळ झाली असतां आकाशांतून खाली येणारे विमान तिनें पाहिलें ॥१८॥
तें विमान शंखचक्र, गदापद्म, धारण करणार्‍या विष्णुरुपी दूतांनीं युक्त होते व त्या विमानाचा ध्वज गरुडांकित होता ॥१९॥
त्या विष्णुदूतांनीं तिला विमानांत चढविलें व तिजवर चवर्‍या वारीत अप्सरागणांनीं सेव्यमान अशा तिजला वैकुंठास नेलें ॥२०॥
कार्तिकव्रताच्या पुण्यानें त्या विमानांत अग्नीच्या ज्वाळेप्रमाणें तेजस्वी दिसणारी ती गुणवती मत्सान्निध्य पावली ॥२१॥
नंतर जेव्हां ब्रह्मादिकदेवांच्या प्रार्थनेमुळें मी पृथ्वीवर आलों तेव्हां माझे सर्व गणही माझ्याबरोबर आले ॥२२॥
हे सत्यभामे, सारे यादव हे माझेच गण आहेत. देवशर्मा नामक तो तुझा पिता हा सत्राजित झाला ॥२३॥
तो चंद्र नामक शिष्य अक्रूर झाला; ती शुभकारक गुणवती तूं आहेस. त्या कार्तिकव्रताच्या पुण्यानें तूं मला आवडती झालीस ॥२४॥
हे प्रिये, विष्णूचे देवळांत तूं पूर्वी तुळसीची बाग केलीस त्या पुण्यानें तुझ्या अंगणांत कल्पवृक्ष आहे ॥२५॥
कार्तिकमासी तूं दीपदान दिलेंस त्या पुण्यानें तुझ्या घरांत मंगलदायक लक्ष्मी स्थिर राहिली आहे ॥२६॥
तूं आपण केलेलें व्रतादिक सर्व पतिस्वरुपी विष्णूला अर्पण केलेंस म्हणून तूं माझी स्त्री झालीस ॥२७॥
तूं पूर्वी मरणकालपर्यंत कार्तिकव्रत केलेंस त्या पुण्यानें तुझा व माझा कधींही वियोग होणार नाहीं ॥२८॥
याप्रमाणें कार्तिकमासीं जे व्रत करतात ते माझे सन्निध येऊन मला तूं जशी प्रिय आहेस तसे तेहि मला संतोषजनक होतात ॥२९॥
मनुष्य हे जरी यज्ञ, दान, तप, व्रत इत्यादिक करितात तथापि त्यांना कार्तिकव्रताच्या पुण्याचा सोळावा हिस्सा देखील फल मिळत नाहीं ॥३०॥
याप्रमाणें कृष्णाच्या मुखांतून पूर्वजन्माची पुण्यकथा ऐकून आनंदित झालेली सत्यभामा त्रिभुवनांला आदिकारण अशा श्रेष्ठ कृष्णाला नमस्कार करुन म्हणाली ॥३१॥
॥ इति श्रीपद्म० कार्ति० द्वितीयोऽध्यायः ॥२॥