बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:51 IST)

कार्तिक माहात्म्य - अध्याय ४

नारद म्हणतात - ह्याप्रमाणें भाषण करुन भगवंतांनी मत्स्यरुप धारण केलें व विंध्याचलावर वास करणार्‍या कश्यप ऋषींच्या अंजुलीत प्रवेश केला ॥१॥
त्या ऋषीनें कृपेनें त्या मत्स्याला आपल्या कमंडलूंत ठेविलें. परंतु कमंडलूंत तो मावेना म्हणून कूपामध्यें ठेविलें ॥२॥
त्या ठिकाणीही मावत नाहीं असें पाहून सरोवरांत ठेविलें. त्या ठिकाणीही तो मावेना म्हणून त्याला समुद्रांत सोडून दिलें. तेथेंही तो मत्स्य अतिशय वाढला ॥३॥
नंतर मत्स्यरुप धारण करणार्‍या भगवंतांनीं शंखासुराचा वध केला व त्या शंखासुराला हातांत घेऊन बदरीवनामध्यें गमन केलें ॥४॥
त्या ठिकाणीं सर्व ऋषींना बोलावून विष्णु म्हणाले, उदकामध्यें पसरलेले वेद तुम्हीं शोधा ॥५॥
व तुम्ही सागरांतून जोंपर्यंत वेद आणतां तोंपर्यंत मीं सर्व देवगणांसह प्रयागीं रहातों ॥६॥
नारद म्हणतात - नंतर सर्व ऋषींनीं आपल्या तपोबलानें यज्ञ बीजांसहित ते सर्व वेद उदकांतून बाहेर काढिले ॥७॥
तेव्हांपासून ज्या ज्या ऋषीला जे जे मंत्र मिळाले तो तो त्या त्या मंत्रांचा ऋषि झाला ॥८॥
नंतर सर्व ऋषि मिळून प्रयागीं आले व आणलेले सर्व वेद ब्रह्मदेवासहवर्तमान असलेल्या विष्णूला देते झाले ॥९॥
संपूर्ण वेद मिळालेले पाहून मोठ्या हर्षानें ब्रह्मदेवानें देव ऋषिगणासहवर्तमान अश्वमेध नांवाचा यज्ञ केला ॥१०॥
यज्ञ झाल्यावर देव, गंधर्व, यक्ष, पन्नग, गुह्यक इत्यादिकांनीं भगवंताला साष्टांग नमस्कार करुन प्रार्थना केली कीं ॥११॥
हे जगन्नाथा विष्णो, आमची विज्ञापना ऐका. आम्हीं सांप्रतकाळीं अत्यंत आनंदित झालों आहों ॥१२॥
तरी ह्या ठिकाणीं नष्ट झालेले वेद ब्रह्मदेवाला पुन्हां मिळाले व हे रमापते, तुझ्या कृपेनें आम्हांला यज्ञभाग मिळाले ॥१३॥
म्हणून हें स्थान सर्व पृथ्वीमध्यें श्रेष्ठ, पुण्यवर्धक व तुझ्या कृपेनें भुक्ति व मुक्ति देणारें असें असावें असा आम्हांला वर दे ॥१४॥
त्याचप्रमाणें हा कालही ( कार्तिक मास ) अत्यंत पुण्यकारक, ब्रह्मघ्नादिकांची शुद्धि करणारा व दिलेलें दान अक्षय फल करणारा असावा असा आम्हांला वर दे ॥१५॥
विष्णु म्हणतातः - हे देव हो, हें माझें कार्तिकमासव्रत व तुम्हीं मागितलेले वर हे तुम्हीं म्हणतां त्याप्रमाणें असोत आणि हे ब्रह्मक्षेत्र अतिविख्यात होईल ॥१६॥
सूर्यवंशामध्यें उत्पन्न होणारा भगीरथ राजा ह्या ठिकाणीं गंगा आणील व त्या गंगेचा सूर्यकन्या जी कालिंदी यमुना तिच्याशीं संगम होईल ॥१७॥
आणि ब्रह्मादिक देव माझ्यासहवर्तमान येथें वास करोत व हें स्थळ तीर्थराज नांवाने प्रसिद्ध होईल ॥१८॥
या ठिकाणीं केलेली, दान, तप, व्रत, होम, जप व पूजा वगैरे कर्मे अनंत फल देणारीं होऊन माझें सान्निध्य करणारीं होवोत ॥१९॥
ब्रह्महत्यादिक पापें सप्तजन्मार्जित असलीं तरी सुद्धां या तीर्थाच्या दर्शनानें एका क्षणांत लयाला जावोत ॥२०॥
या ठिकाणीं देहत्याग करणारे लोक माझ्यासन्निध येऊन माझ्या शरिरांत प्रविष्ट होतील व ते पुनः जन्म घेणार नाहींत ॥२१॥
या ठिकाणीं माझ्या समोर पित्याच्या उद्देशानें जे श्राद्ध करतील त्यांचे सर्व पितृगण मत्स्वरुप पावतील ॥२२॥
तसेंच हा काल कार्तिकमास मकरथ सूर्य असतांना स्नान करणार्‍याचें पाप नाश करणारा पुण्यकारक असा असो ॥२३॥
रवि मकरस्थ असतां माघमासी प्रातः स्नान करणार्‍यांच्या दर्शनानेंच, सूर्याच्या तेजानें जसा अंधकार नाहींसा होतो त्याप्रमाणें लोकांची पातकें नष्ट होतात ॥२४॥
रवि मकरस्थ असतांना माघमासीं स्नान करणार्‍यांना मी सलोकत्व, समीपत्व व सारुप्य देतों ॥२५॥
हे ऋषिहो माझें वाक्य श्रवण करा. मी बदरीवनामध्यें सर्वकाल वास करीन ॥२६॥
अन्यक्षेत्रांत दहा वर्षे तपश्चर्या करुन जें फल प्राप्त होतें तें फल बदरिकाश्रमीं एक दिवस तपश्चर्या केल्यानें मिळतें ॥२७॥
जे नर श्रेष्ठ ह्या स्थानाचें दर्शन करितात ते जीवनमुक्त होत. त्यांचेठायीं पाप वसत नाहीं ॥२८॥
नारद म्हणतात - ह्याप्रमाणें देवाधिदेव विष्णु देवांशीं भाषण करुन ब्रह्मदेवासह अंतर्धान पावते झाले व सर्व इंद्रादि देवही त्या ठिकाणी अंशरुपानें राहून आपआपल्या लोकीं गमन करिते झाले ॥२९॥
जो नरश्रेष्ठ ही कथा श्रवण करील किंवा शुद्धांतः करणानें श्रवण करवील त्याला तीर्थराज प्रयागाला व बदरीवनाला जाऊन जें पुण्य प्राप्त होतें तें प्राप्त होईल ॥३०॥
इति चतुर्थोध्यायः ॥४॥