मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:55 IST)

कार्तिक माहात्म्य - अध्याय १०

नारद म्हणतातः-- राजा, पूर्वी देवांनीं जिंकल्यामुळें जे दैत्य पाताळांत राहात होते ते पृथ्वीवर येऊन जलंधराच्या आश्रयानें निर्भय रहाते झाले ॥१॥
एके वेळी त्या जलंधरानें राहूचें शिर तुटलेलें पाहून त्याचें कारण त्यानें शुक्राला विचारिलें ॥२॥
तेव्हां शुक्राचार्यानीं देवांनीं समुद्रमंथन केलें व रत्नें हरण केलीं व दैत्यांचा पराभव केला ही गोष्ट सांगितली ॥३॥
आपला पिता जो समुद्र त्याचें देवांनीं मंथन केलेलें ऐकून रागानें त्याचे डोळे लाल झाले व घस्मर नांवाचा दूत इंद्राकडे पाठविला ॥४॥
तो खर्वमौली घस्मर स्वर्गलोकीं जाऊन इंद्रसभेंत शिरुन इंद्राशीं चमत्कारिक भाषणें बोलला ॥५॥
घस्मर म्हणालाः -- समुद्राचा मुलगा जलंधर हा सर्व दैत्यांचा राजा आहे; त्यानें मला दूत पाठविलें आहे. त्याचा निरोप श्रवण कर ॥६॥
तूं मंदरपर्वताच्या योगानें माझा पिता समुद्र याचें मंथन कां केलेंस ? समुद्रांतील नेलेलीं सर्व रत्नें लवकर आम्हांला दे ॥७॥
याप्रमाणें त्या दूताचें भाषण ऐकून इंद्रास चमत्कार वाटला व त्या भयंकर घस्मराला भय उत्पन्न करणार्‍या शब्दानें भाषण करिता झाला ॥८॥
इंद्र म्हणालाः-- हे दूता, मी पूर्वी समुद्रमंथन केलें त्याचें कारण ऐक. पर्वत माझ्या भयानें समुद्रांत दडले. त्यांना त्यानें पोटांत आश्रय दिला ॥९॥
शिवाय माझे पुष्कळ रिपू जे दैत्य त्यांचें त्यानें रक्षण केलें म्हणून त्यापासून मंथन करुन जें मिळालें तें मीं घेतलें ॥१०॥
पूर्वीं सागराचा पुत्र शंखासुर देवांचा द्वेष करीत होता, त्यालाही माझे धाकटे बंधू विष्णूनें मारिलें ॥११॥
तर जा व हीं समुद्र मंथनाचीं कारणें आहेत असें त्या जलंधराला सांग. नारद म्हणाले - इंद्रानें याप्रमाणें परत पाठविलेला दूत पृथ्वीवर आला ॥१२॥
त्यानें इंद्रानें सांगितलेलें सर्व वर्तमान दैत्यास सांगितलें. तें ऐकून जलंधर संतप्त झाला. रागानें त्याचे ओठ थरथर कांपूं लागले ॥१३॥
तो देवांना जिंकण्याच्या उद्योगास लागला व त्याकरितां चोहोंकडील व पातालांतील कोटयवधि दैत्य तेथें मिळाले ॥१४॥
नंतर तो दैत्येंद्र जलंधर शुंभनिशुंभादि सेनापतींच्या कितीएक कोटी घेऊन स्वर्गास जाऊन नंदनवनांत राहिला. तेव्हां देवही अमरावतीहून युद्धास सज्ज होऊन आले ॥१५॥१६॥
पुढें दैत्याचें मोठें सैन्य अमरावतीला वेष्टून राहिलें आहे असे पाहतांच देव दैत्यांचें युद्ध सुरु झालें ॥१७॥
मुसळ, परिघ, बाणा, गदा, शक्ति, परशु इत्यादि शस्त्रांनी ते एकमेकांवर धांवत जाऊन मारुं लागले ॥१८॥
दोन्ही सैन्यें क्षीण होऊन रक्ताच्या ओघानें भरलीं; हत्ती, घोडे, रथ व पायदळ यांनीं कित्येक पाडले, दुसर्‍यांनीं त्यांना पाडिले ॥१९॥
त्यावेळेस रणभूमि संध्याकाळच्या मेघाप्रमाणें लाल झाली. त्या युद्धांत जे दैत्य पडत त्यांना शुक्र अमृतसंजीवनी विद्येच्या मंत्राचें पाणी शिंपून उठवीत होता व देव पडतील त्यांना गुरु द्रोणागिरीहून दिव्य औषधी वारंवार आणून उठवीत होता. युद्धांत पडलेले देव पुनः उठलेले पाहून जलंधर रागानें शुक्रास म्हणाला - मीं मारलेले देव पुन्हां कसे उठतात ? ॥२०॥२१॥२२॥२३॥
तुझी संजीविनी विद्या दुसर्‍याला माहीत नाहीं, असे प्रसिद्ध आहे. शुक्र म्हणतात - हे दैत्या, द्रोणागिरीहून गुरु दिव्य औषधि आणून देवांस पुन्हां जिवंत करितो; याकरितां तूं लौकर द्रोणागिरी हरण कर. नारद म्हणतात - राजा, याप्रमाणें सांगताच लागलीच त्या दैत्यानें द्रोणगिरी नेऊन समुद्रांत टाकून दिला व पुन्हा युद्धास आला. नंतर देव पडलेले पाहून गुरु द्रोणाद्रीकडे गेला ॥२४॥२५॥२६॥ तों तेथें द्रोणाद्रि गुरुला दिसला नाहीं; तो दैत्यांनीं नेला असें जाणून गुरु भयभीत झाला ॥२७॥
व दुरुन धापा टाकीत येऊन म्हणाला, देवहो ! पळा, हा बलवान आहे; याला जिंकण्यास तुम्ही असमर्थ आहांत ॥२८॥
हा शंकराचा अंश आहे, पूर्वीची इंद्राची हकीकत आठवा. तें गुरुचें भाषण ऐकून देव भयानें घाबरले ॥२९॥
दैत्यांनी नाश केल्यामुळे देव दाही दिशांनी पळूं लागले. दैत्यांनी देव पळवून लावले असें पाहतांच ॥३०॥
शंख नगारे वाजवून जयघोष करीत तो जलंधर दैत्यांसह अमरावती नगरींत शिरला. दैत्य नगरांत शिरतांच इंद्रादिक सर्व देव दैत्यांच्या त्रासामुळें मेरु पर्वताच्या गुहेंत जाऊन राहिले. याप्रमाणें देवांस जिंकून जलंधर तेथें स्वर्गाचें राज्य करुं लागला ॥३१॥३२॥
नंतर इंद्रादि देवांच्या सर्व अधिकारांवर शुंभ आदिकरुन मोठमोठे दैत्य त्यानें नेमिले व आपण पुन्हां सुवर्णगिरी पर्वताचे गुहेला देवांचा शोध करीत गेला ॥३३॥
इति दशमोऽध्यायः ॥१०॥