रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:57 IST)

कार्तिक माहात्म्य - अध्याय १५

नारद म्हणतात - राजा, वीरभद्र पडला असें पाहतांच सर्व रुद्रगण भयानें रणांगण सोडून ओरडत शंकराकडे धांवत गेले ॥१॥
त्यांची आरडाओरड ऐकून चंद्रशेखर शंकर हंसतच नंदीवर बसून रणभूमीवर आले ॥२॥
शंकर आले असें पाहून रुद्रगण सिंहनाद करुन पुनः युद्धास निघाले व त्यांनीं बाणांची वृष्टि करुन पुष्कळ दैत्य मारिले ॥३॥
तेव्हां दैत्य भयंकर शंकररुप पाहून घाबरुन पळूं लागले. जसें कार्तिकव्रत करणाराला पाहून मीतीनें पापें पळतात तसे ॥४॥
दैत्य रणांतून पळूं लागले असें पाहून जलंधर संतापानें शंकरावर हजारों बाण सोडीत धावून आला ॥५॥
शुंभ, निशुंभ, श्वमुखी, बलाहक, खङ्गरोमा, प्रचंड, घस्मर आदिकरुन दैत्य शंकरावर चालून आले ॥६॥
बाणवृष्टीच्या अंधकारानें आपले गण व सैन्य व्यापलें आहे असें पाहून शंकरानीं आपल्या बाणांनीं तें बाणांचें जाळें तोडून आकाश व्यापून टाकिलें ॥७॥
दैत्यांनाही प्रचंड बाण सोडून त्यांच्या वावटळीनेंच घाबरवून त्या बाणजालांनीं त्यांना पृथ्वीवर पाडिलें ॥८॥
नंतर क्रुद्ध होऊन खङ्गरोम्याचें मस्तक परशूनें तोडलें व खट्वांगानें बलाहकाचें शिर दुभंग केलें ॥९॥
पाशानें घस्मर दैत्याला बांधून जमिनीवर पाडिले. तसेंच नंदीनें, किती एक दैत्य मारिले व बाणानें किती एक पाडिले ॥१०॥
तेव्हां दैत्य जसे सिंहानें पीडित हत्ती पळतात तसे ते उभे राहूं शकले नाहींत. तेव्हां जलंधर अतिशय संतापून विजेच्या कडकडाटाप्रमाणें आवाज करुन शंकरास युद्धास हाक मारुन म्हणाला. जलंधर म्हणतो - हे शंकरा, तूं माझ्याशीं युद्ध कर. या गरीबांना मारल्यानें काय फल होणार ? ॥११॥१२॥ हे जटाधरा, तुझें काय सामर्थ्य असेल तें मला दाखीव. याप्रमाणें बोलून सत्तर बाणांनीं शंकरावर प्रहार केला ॥१३॥
शंकरांनीं हसून आपल्या तीक्ष्ण बाणांनीं ते सर्व बाण तोडले व सात बाणांनीं त्याचे घोडे, ध्वज, छत्र, धनुष्य तोडिलीं ॥१४॥
ज्याचें धनुष्य तुटलें आहे व जो विरथ झाला आहे असा तो जलंधर हातांतील गदा उगारुन वेगानें शंकरावर धावला. इतक्यांत शंकरांनीं बाणांनीं त्याची गदा तोडून दोन तुकडे केले ॥१५॥
तरी तो मूठ वळवून बुक्कीनें मारण्याकरितां शंकराकडे आला. तेव्हां शंकरांनीं वाणौघानें त्याला एक कोस मागें हटविलें ॥१६॥
तेव्हां आपणापेक्षां शंकर अधिक बलवान् आहे, असें पाहून जलंधरानें शंकरास मोह पाडणारी अशी अद्भुत गंधर्वमाया उत्पन्न केली ॥१७॥
तेव्हा गंधर्व गाऊं लागले, अप्सरा नाचूं लागल्या, दुसरे ताल, वेणु, मृदंग इत्यादि वाद्यें वाजवूं लागले ॥१८॥
तेव्हां तो मोठा चमत्कार पाहून शंकर त्या नादानें मोहित झाले, हातांतील शस्त्रें गळलीं तरी तीं त्यांना समजलीं नाहींत ॥१९॥
शंकरांचे चित्त असें एकाग्र झालें आहे असें पाहून, जलंधर कामातुर होऊन जेथें पार्वती बसली होती तेथें त्वरेनें गेला ॥२०॥
बलवान् शुंभ व निशुंभ यांना युद्धाचे जागीं ठेवून आपण, दहा हात, पांच मुखें, तीन नेत्र, जटा असें शंकराचें रुप धारण करुन मोठ्या वृषभावर बसून गेला, तेव्हां हा शंकरच आला असें पार्वतीला वाटलें ॥२१॥२२॥
व सख्यांमधून उठून त्याच्या समोर पुढें आली. ती सुंदर पार्वती दृग्गोचर होत आहे ॥२३॥
इतक्यांतच त्याचें वीर्य गळून पडलें व अंग जड स्तब्ध झालें; तेव्हां हा दैत्य आहे हें पार्वतीला समजलें व ती भ्याली ॥२४॥
ती त्वरेनें उत्तर मानस सरोवरांत जाऊन दडली; क्षणांत विजेप्रमाणें ती दिसेनाशी झाली, तेव्हां तो दैत्य जेथें शंकर होते तेथें युद्धास आला. इकडे पार्वतीनें भीतीनें मनांत विष्णूचें स्मरण केलें ॥२५॥२६॥
स्मरण करते इतक्यांत विष्णु जवळ बसले आहेत असें तिनें पाहिलें. पार्वती म्हणतेः-- हे विष्णो ! दुष्ट जलंधरानें अद्भुत चमत्कार केला. त्या दुष्टाचें चरित्र आपण जाणत आहां विष्णु म्हणतातः-- पार्वती, त्यानें जो मार्ग दाखवून दिला त्याचेंच मी आचरण करणार आहें ॥२७॥२८॥
तो स्त्रीचे पाविव्रत्यानें सुरक्षित आहे तोंपर्यंत कशानेंही मरणार नाहीं नारद म्हणतातः-- विष्णु याप्रमाणें बोलून जलंधराच्या नगरास गेले ॥२९॥
नंतर शंकर गंधर्वाच्या नादांत समरांगणांत होते ती गंधर्वमाया नाहींशी होतांच ते सावध झाले ॥३०॥
शंकराच्या मनाला मोठा चमत्कार वाटला व रागानें पुन्हां जलंधराशीं युद्धास निघाले. दैत्यानें पुनः शंकर आलेले पाहून त्यांच्यावर बाणांचा वर्षाव केला ॥३१॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये पंचदशोऽध्यायः ॥१५॥