बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:57 IST)

कार्तिक माहात्म्य - अध्याय १४

नारद म्हणतात - ते दैत्य, नंदी, गणपति, षडानन, यांस पाहून मोठ्या अमर्षानें द्वंद्वयुद्ध करण्याकरितां धांवत आले ॥१॥
नंदीबरोबर कालनेमी, गणपतीबरोबर शुंभ व षडाननाबरोबर निशुंभ असे सज्ज होऊन युद्धास धांवले ॥२॥
निशुंभानें कार्तिकस्वामीच्या मोराला उरांत पांच बाण मारले. त्या योगानें तो मूर्च्छित पडला ॥३॥
कार्तिकस्वामीनें क्रोधानें आपले हातांत शक्ति घेतली. इतक्यांत ती निशुंभानें वेग करुन आपल्या शक्तीनें पाडली ॥४॥
नंदीनें अनेक बाण कालनेमीला मारिले. सात बाणांनीं त्याचे घोडे, ध्वज, सारथी व जूं पाडिलें ॥५॥
कालनेमीनें रागानें नंदीचें धनुष्य तोडलें; तें नंदीनें टाकून त्याचे उरावर शूल मारिला ॥६॥
त्या शूलानें त्याचें हदय फुटलें व घोडे मेले, सारथि मेला असा झाला. तेव्हां त्यानें पर्वताचें शिखर उचलून नंदीश्वरावर टाकिलें ॥७॥
इकडे रथांत बसणारा शुंभ व उंदरावर बसणारा गणपति यांनीं एकमेकांस बाणांनीं वेधून टाकिलें ॥८॥
तेव्हां गणपतीनें पत्री बाणानें शुंभाचें हदय वेधून तीन बाणांनीं त्याचा सारथी पृथ्वीवर पाडला ॥९॥
तेव्हां शुंभ अति क्रोधाविष्ट होऊन गणपतीवर बाणांची वृष्टि करुं लागला व तीन बाणांनीं त्यानें उंदरास वेधून मेघासारखी गर्जना केली ॥१०॥
त्या बाणांनीं अंग मित्र होऊन अति वेदना झाल्यामुळें उंदीर चळला, तेव्हां गणपती खालीं पडला; त्यामुळे पदाती झाला ॥११॥
हे राजा ! मग गणपतीनें शुंभाच्या हदयावर परशु मारुन त्याला पाडिलें व पुनः उंदरावर बसता झाला. ॥१२॥
कालनेमी व निशुंभ या दोघांनीं रागानें एकदम गणपतीवर बाणवर्षाव केला. मस्तहत्तीला चाबुकांनीं मारितात तसें गणपतीला झालें ॥१३॥
गणपतीला असें पीडिलेलें पाहून बली वीरभद्र कोटिगणांसहवर्तमान वेगानें धांवत आला ॥१४॥
त्याचेबरोबर कूष्मांड, भैरव, वेताळ, योगिनींचा समुदाय, पिशाचें वगैरेंचा समुदाय व गणही आले ॥१५॥
तेव्हां त्यांच्या किलकिलाटानें, सिंहनादानें व नगारे मृदंग वगैरेंच्या नादानें पृथ्वी कांपूं लागली ॥१६॥
भूतें धांवून दैत्यांस खाऊं लागली. वर खालीं उड्या मारुं लागली, रणांगणांत नाचूं लागली ॥१७॥
नंदी व कार्तिकस्वामी यांना धीर आला व ते बाणांनी त्वरेनें दैत्यांना मारुं लागले ॥१८॥
दैत्यांची सेना, पुष्कळ छिन्नभिन्न व हत झाली. भूतांनीं खाल्ली व पुष्कळशी मरुन पडली व त्यामुळें घाबरुन खिन्न व म्लानमुख झाली ॥१९॥
तेव्हां आपली उध्वस्त झालेली अशी सेना पाहून जलंधर रथांत बसून मोठ्या वेगानें गणांवर चालून आला ॥२०॥
दोन्ही सैन्यांत हत्ती, रथ, घोडे यांचा घडघडाट, शंख, नगारे यांचा ध्वनि झाला व मोठा सिंहनाद झाला ॥२१॥
जलंधराच्या बाणांनीं पृथ्वी व आकाशाचें मध्य धुक्याप्रमाणें व्यापून गेलें ॥२२॥
जलंधरानें गणपतीला पांच बाणांनीं, शैल कार्तिकस्वामी यांस नऊ बाणांनी व वीरभद्राला वीस बाणांनी वेधून मेघाप्रमाणें गर्जना केली ॥२३॥
कार्तिकस्वामीनें शक्ति टाकून जलंधराला वेध केला. त्यानें शक्तीचे आघातानें थोडा व्याकुल होऊन युद्ध केलें ॥२४॥
नंतर जलंधरानें रागानें संतप्त होऊन कार्तिकस्वामीला गदा मारली. तेव्हां कार्तिकस्वामी खालीं पृथ्वीवर पडला ॥२५॥
त्याचप्रमाणें नंदीलाही वेगानें पृथ्वीवर पाडिलें, तेव्हां गणपतीनें रागावून परशूनें त्याची गदा तोडिली ॥२६॥
वीरभद्रानें तीन बाणांनीं त्या दैत्याच्या छातीवर वेध केला व सात बाणांनीं त्याचे घोडे, ध्वज, धनुष्य, छत्र हीं तोडिलीं ॥२७॥
तेव्हां त्या दैत्यानें संतापून शक्ति उगारुन त्या भयंकर शक्तीनें प्रहार करुन गणपतीला पाडिलें व दुसर्‍या रथावर आपण चढला ॥२८॥
नंतर वीरभद्रावर संतापून चालून आला. ते सूर्याप्रमाणें तेजस्वी जलंधर व वीरभद्र दोघे परस्पर लढूं लागले ॥२९॥
वीरभद्रानें पुन्हा त्याचे घोडे व धनुष्य तोडून पाडिलें तेव्हां तो दैत्य परिघ नांवाचें शस्त्र घेऊन वीरभद्रावर उडी मारुन धांवला ॥३०॥
नारद म्हणतात - राजा, जलंधरानें वेगानें जाऊन वीरभद्राच्या मस्तकावर परिघ मारला, तेव्हां त्याचें मस्तक फुटून तो जमिनीवर रक्त ओकत पडला ॥३१॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये चतुर्दशोऽध्यायः ॥१४॥