गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:56 IST)

कार्तिक माहात्म्य - अध्याय १३

नारद म्हणतातः-- राजा जलंधरानें ती हकीकत ऐकिली तेव्हां त्याला मोठा राग आला व कोट्यावधि दैत्य बरोबर घेऊन कैलासास निघाला ॥१॥
जातांना शुक्राचार्य पुढें होते. वाटेंत मार्गदर्शक राहू होता. वेगानें जाऊं लागल्यामुळें तो मार्गांत अडखळून पडला व त्याचा मुकुट डोक्यावरुन खालीं पडला ॥२॥
दैत्यांच्या सैन्यांनीं भरलेलीं शेंकडों विमानें आकाशांत चाललीं; तेव्हां पावसाळ्यांत ढगांनीं व्यापलेल्या आकाशाप्रमाणें नभ शोभत होतें ॥३॥
जलंधराचा असा उद्योग पाहून, इंद्रप्रमुख देव गुप्तरुपानें जाऊन शंकराची प्रार्थना करुं लागले ॥४॥
देव म्हणतातः-- हे प्रभो, शंकरा, आमचें दुःख आपण कसें जाणत नाहीं ? आमच्या रक्षणाकरितां जलंधराचा नाश करा ॥५॥
नारद म्हणतातः-- याप्रमाणें देवांचें भाषण ऐकून वृषभध्वज शंकर हांसले आणि महाविष्णूला बोलावून भाषण केलें ॥६॥
शंकर म्हणतातः-- हे विष्णो ! तुम्ही युद्धांत जलंधराला कां मारिलें नाहीं ? आणि आपलें वैकुंठ सोडून त्याचेच घरीं येऊन कां राहिला ? ॥७॥
विष्णु म्हणालेः-- तो तुमच्या अंशापासून उत्पन्न झालेला व लक्ष्मीचा भाऊ म्हणून मी त्याला युद्धांत मारलें नाहीं, तुम्हीच याला जिंका ॥८॥
शंकर म्हणतातः -- हे विष्णो ! हा मोठा तेजस्वी बलवान् आहे; आतां या शस्त्रांनी व अस्त्रांनीं माझ्यानें त्याला मारवणार नाहीं म्हणून सर्व देवांनी व तुम्ही आपआपला अंश शस्त्राकरितां मला द्यावा ॥९॥
नारद म्हणतातः-- राजा, नंतर विष्णुप्रमुख सर्व देवांनीं आपआपले तेजांश दिले, ते एकत्र झालेले पाहून शंकरांनीं आपला मोठा तेजांश त्यांत घातला ॥१०॥
त्या तेजाचें एक मोठें सुदर्शन नांवाचे चक्र, ज्वाळेच्य लोळांनीं भयंकर असें शंकरांनीं केले ॥११॥
नंतर शेषतेजानें इंद्रानें वज्र केलें. इतक्यांत कैलास पर्वताच्या पायथ्यापाशीं जलंधर दृष्टीस पडला ॥१२॥
कोट्यावधि हत्ती, घोडे, रथ, पायदळ, अशा सैन्यानें युक्त जलंधराला पाहून सर्व देव आले होते तसे गुप्तपणानें निघून गेले ॥१३॥
शंकराच्या आज्ञेनें नंदी, गणपति, कार्तिकस्वामी आदिकरुन व सर्व गण युद्धाला तयार झाले ॥१४॥
व युद्धांत अजिंक्य असे शंकराचे गण कैलास पर्वतावरुन खालीं उतरले व कैलासाच्या तळाशीं त्यांचे युद्ध सुरु झालें ॥१५॥
शिवाचे गण व दैत्य शस्त्रास्त्रांच्या योगानें व्याप्त झाले व नगारे, मृदंग, शंख यांचा शब्द ऐकून सर्वास वीरश्री आली ॥१६॥
हत्ती, घोडे, रथ, यांच्या शब्दांनीं पृथ्वी नादित होऊन कांपूं लागली. शक्ति, तोमर, बाणांचा समुदाय, मुसल, प्रास, पट्टिश वगैरे शस्त्रांनी आकाश भरुन गेलें. तें उल्कांनीं व्यापल्यासारखें शोभूं लागलें व पृथ्वीवर प्रमथादि गणांनी दैत्य व दैत्यांनी मारुन पाडलेले गण व हत्ती, घोडे, पायदळ रथ या योगानें, वज्रानें झालेले पर्वताचे तुकडे पृथ्वीवर पडले आहेत की काय असें भासले ॥१७॥१८॥१९॥
वसा, मांस, रक्त यांचा चिखल झाल्यामुळें उंच सखल वगैरे कांहींच समजेनासें झालें ! शिवगणांनीं मारलेले दैत्य शुक्र जिवंत करीत होता ॥२०॥
अमृतसंजीवनी विद्येनें दैत्य पुन्हां पुन्हां उठतात हें पाहून गण व्याकुळ होऊन भ्याले ॥२१॥
शंकराला ते शुक्राचें सर्व कृत्य सांगते झाले. तेव्हां शंकराच्या मुखापासून अतिभयंकर अशी एक कृत्या निघाली. जिचे पाय ताडवृक्षाप्रमाणें, तोंड दरीप्रमाणें व डोंगराप्रमाणें स्तन अशी होती. ती युद्धभूमीवर बसून दैत्यांना खाऊं लागली ॥२२॥२३॥
तिनें शुक्राला धरुन आपले योनींत ठेविलें व आकाशांत अंतर्धान पावली. शुक्राला धरिलेलें पाहून शिवगणांला हर्ष झाला व त्यांनीं दैत्यांच्या सैन्याचा नाश केला. तेव्हां दैत्यांच्या सैन्याची भयानें पळापळ झाली ॥२४॥२५॥
वायूच्या वेगानें जसा गवताचा ढीग विसकटून जातो तसें दैत्यांचें सैन्य गणांच्या भयानें भग्न झालें. असें पाहून दुसरे निशुंभादि दैत्य आले ॥२६॥
निशुंभ, शुंभ हे सेनापती व मोठा पराक्रमी कालनेमि असे तिघे गणांचे सेनेचें निवारण करुं लागले ॥२७॥
त्यांनीं पावसाळ्यांतील मेघांप्रमाणें बाणांचा वर्षाव केला; त्यांच्या बाणांनीं टोळांच्या समुदायाप्रमाणें सर्व दिशा व आकाश व्यापिलें; तेव्हां गणसेना थरथर कांपूं लागली व शेंकडों बाण लागून त्यांचे शरिरांतून रक्ताचे प्रवाह वाहूं लागले ॥२८॥२९॥
गण वसंत ऋतूंतील पळसाचे वृक्षाप्रमाणें रक्तानें लाल झाले होते. त्या योगानें पडलेले व दुसर्‍यांना पाडणारे सर्व गण छिन्नभिन्न झाले. तेव्हां कांहीं समजेनासें झालें होतें ॥३०॥
ते सर्व गण युद्धभूमि सोडून माघारे फिरले ॥३१॥
आपलें सैन्य नाश पावलें असें पाहून पराक्रमी शैल गणपति व कार्तिकस्वामी त्वरेनें पुढें आले व त्यांनीं त्या दैत्यांचें मोठ्या शौर्यानें निवारण केलें ॥३२॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये त्रयोदशोध्यायः ॥१३॥