बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:59 IST)

कार्तिक माहात्म्य - अध्याय २४

पृथु म्हणतात - नारदा ! कृष्णा व वेण्या यांच्या तीरीं, शिव व विष्णु यांच्या वाण्याच्या देहांतून पिशाचीण कलहेला काढून टाकिली असें आपण पूर्वी सांगितलें ॥१॥
तर हे धर्मज्ञा ! हा प्रभाव त्या नद्यांचा, कीं त्या क्षेत्राचें सामर्थ्य हे आपण मला सांगा. कारण मला त्या सामर्थ्यांचा मोठा चमत्कार वाटला ॥२॥
नारद म्हणतातः-- ही कृष्णानदी प्रत्यक्ष विष्णूचें स्वरुप व वेण्या शिवस्वरुप अशा आहेत, त्या कृष्णावेणीच्या संगमाचा महिमा वर्णन करण्यास चतुर्मुख ब्रह्मदेवही समर्थ नाहीं ॥३॥
तथापि कृष्णा - वेणींची उत्पत्ति तुला सांगतों ऐक. पूर्वी चाक्षुप मनूच्या मन्वंतरामध्यें, रम्य अशा सह्याद्रि पर्वताच्या शिखरावर यज्ञ करावा असा विचार करुन ब्रह्मदेवानें त्या यज्ञाकरितां सर्व देवांस बोलाविलें. त्यांच्यासह त्यानें यज्ञाची तयारी केली ॥४॥५॥
विष्णु शंकर यांसह आपण त्या पर्वताच्या शिखरावर आला. तेथें भृगु आदिकरुन सर्व ऋषीनी उत्तम, ब्राह्म मुहूर्तावर ब्रह्मदेवाला यज्ञदीक्षा देण्याकरितां तेथें आदरानें सभा भरविली; तेव्हां ऋषि ब्रह्मदेवाची थोरली स्त्री सावित्री हिला बोलाविते झाले ॥६॥७॥
तिला येण्यास उशीर लागला, तेव्हां भृगु विष्णूला विचारते झाले - भृगु म्हणतात - हे विष्णो ! सावित्रीला आपण बोलाविलें तरी ती लौकर कां येत नाहीं ॥८॥
मुहुर्त संपण्याची वेळ आली; दीक्षाविधि कसा संपूर्ण होणार ? विष्णु म्हणाले - सावित्री लौकर येत नाहीं, तर गायत्री येथें आहे; तिजकडून कार्य पूर्ण करावें. पुण्यकार्यांत ब्रह्मदेवाची ही पत्नी नाहीं काय ॥९॥
नारद म्हणतात - या विष्णूच्या म्हणण्याला शंकरांनींही अनुमोदन दिलें ॥१०॥
हें भाषण ऐकून, भृगुनें ब्रह्मदेवाच्या उजव्या बाजूला गायत्रीला बसवून पुण्याहवाचनादि यज्ञाचा दीक्षाविधि केला ॥११॥
हे राजा ! तें ब्रह्मदेवाचें दीक्षाविधीचें काम ऋषि चालवीत आहेत इतक्यांत त्या यज्ञस्थळाला सावित्री आली ॥१२॥
हे राजा ! तेव्हां ब्रह्मदेवासह गायत्रीला दीक्षाविधि झाला असें पाहून, सवतीमत्सर मनांत येऊन रागानें सावित्री बोलती झाली ॥१३॥
सावित्री म्हणते - जेथें पूजेला योग्य नाहींत त्यांची पूजा होते, पूज्य आहेत त्यांचा अपमान होतो तेथें दुष्काळ, मरण व भय हीं तीन उत्पन्न होतात ॥१४॥
माझ्या स्थानावर या माझ्याहून धाकटीला तुम्हीं बसविले, म्हणून तुम्ही जड देहाचे असे नदी रुप व्हाल ॥१५॥
ही गायत्री ब्रह्मदेवाच्या उजव्या बाजूला माझ्या आसनावर बसली म्हणून लोकांना न दिसणारी अशी गुप्तरुपी नदी होऊन राहील ॥१६॥
नारद म्हणतात - याप्रमाणें खरेचा शाप ऐकून, संतापानेंच जिचे ओंठ थरथर कांपताहेत अशी गायत्री उठली व देवांनी निवारण केलें असतांही तिनें सावित्रीला शाप दिला ॥१७॥
गायत्री म्हणते - ब्रह्मदेव जसा तुझा पति तसा माझाही पति आहे. असें असतां तूं मला व्यर्थ शाप दिलास. तर मजप्रमाणें तूंही नदी हो ॥१८॥
नारद म्हणाले - राजा ! तेव्हां मोठा हाहाःकार झाला. शंकर विष्णु आदिकरुन सर्व देव सावित्रीला नमस्कार करुन तिची विनंति करु लागले ॥१९॥
देव म्हणाले - हे देवि ! ब्रह्मादिक सर्व देवांना तूं शाप दिलास कीं, आम्ही आतां सर्व जड अशा नद्या होऊं ॥२०॥
परंतु आम्ही जड नद्या झालों तर त्या योगानें आमचे व्यवहार बंद राहून हें त्रैलोक्य खरोखर नाश पावेल. तूं फार अविचारानें दिलेल्या या शापाचें निवारण कर ॥२१॥
सावित्री म्हणाली - हे देवहो ! तुम्ही यज्ञाचे आरंभी गणपतिपूजन केलें नाहीं, म्हणुन माझ्या क्रोधापासून विघ्न उत्पन्न झालें असे वाटतें ॥२२॥
आतां माझें भाषण कधींही खोटें होऊं शकणार नाहीं, म्हणून हे देवहो ! तुम्ही आतां अंशरुपानें नद्या व्हा ॥२३॥
व आम्ही दोघी सवती पश्चिमेकडे वाहणार्‍या अशा अंशरुपानेंच नद्या होऊं ॥२४॥
नारद म्हणाले - हे राजा ! असें तिचें भाषण ऐकून त्या कालीं ब्रह्मा विष्णु व शंकर हे आपआपल्या अंशानें नद्या झाले ॥२५॥
त्या नद्यांत विष्णु कृष्णा नदी, शंकर वेण्या नदी व ब्रह्मदेव ककुद्मती ' कोयना ' नदी, याप्रमाणे पृथक् पृथक् अंशानें नदीरुप झाले ॥२६॥
सर्व देवही आपआपल्या अंशानें सह्याद्रि शिखरापासून निरनिराळ्या लहान लहान नद्या झाले ॥२७॥
देवांचे अंश ते पूर्वेकडे वाहणार्‍या नद्या व त्यांच्या स्त्रियांचे अंश त्या पश्चिमेकडे वाहणार्‍या नद्या असे शेंकडों उदकप्रवाह झाले ॥२८॥
गायत्री व सावित्री या जोडीनें पश्चिमेकडे एकप्रवाहानें वाहणार्‍या नद्या झाल्या व त्या एकत्र असल्याकारणानें सावित्री हें एकच नांव पावल्या ॥२९॥
ब्रह्मदेवानें यज्ञाचे वेळीं तेथें विष्णु व शंकर यांची स्थापना केली; ते तेथें महाबळेश्वर व अतिबळेश्वर या नांवाने प्रसिद्ध झाले ॥३०॥
ज्यामध्यें सर्व ब्रह्मादिदेव आपापल्या अंशांनी राहतात त्यांतील कृष्णा व वेण्या या दोन नद्यांचे माहात्म्य वर्णन करण्यास मी समर्थ नाहीं ॥३१॥
हें पाप हरण करणारें कृष्णावेणीचें माहात्म्य, जो भक्तीनें श्रवण करील किंवा दुसर्‍याला श्रवण करवील त्या मनुष्याला त्यांचें दर्शन स्नान व यात्रा केल्याचें संपूर्ण पुण्यफळ प्राप्त होईल ॥३२॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये चतुर्विशोऽध्यायः ॥२४॥