रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (16:06 IST)

कार्तिक माहात्म्य - अध्याय ३३

सूत म्हणालेः-- ऋषिहो ! षडानन असें शंकराचें भाषण ऐकून पुन्हा शालिग्रामाच्या पूजेचें माहात्म्य शंकरास विचारुं लागला, ती कथा ऐका ॥१॥
कार्तिकेय म्हणालाः-- हे योगिश्रेष्ठ ! देवा, मी सर्व धर्म आपले मुखांतून ऐकले; हे प्रभो ! आतां शालिग्रामाच्या पूजेचें माहात्म्य विस्तारानें मला सांगा ॥२॥
शंकर म्हणाले - हें तूं फार चांगलें विचारलेंस; हे प्रियपुत्रा ! तें तुला सांगतों. श्रवण कर ॥३॥
हे महासेना ! शालग्रामशिलेमध्ये हें सर्व स्थावरजंगमासह त्रैलोक्य सर्वदा भरुन असतें ॥४॥
शालग्रामाचें दर्शन, त्याला नमस्कार, अभिषेक, त्याची पूजा ज्यानें केली त्याला कोटी यज्ञांचें व कोटी गाई दिल्याचें पुण्य प्राप्त होतें ॥५॥
ज्यानें विष्णुरुपी शालग्रामाचें तीर्थ प्राशन केलें, त्यानें आपला भयंकर गर्भ वास नाहींसा केला ॥६॥
जो भक्तिभावाखेरीज फलाची इच्छा धरुनही शालग्रामाची पूजा करील, तोही विष्णुरुप होऊन मुक्त होईल ॥७॥
शालग्राम व शिवाचें लिंग यांचें स्मरण, कीर्तन, ध्यान, पूजा व नमस्कार करणाराचें कोटिहत्यांचें पाप नाहीसें होतें ॥८॥
सिंहाला पाहून जसे मृग अरण्यांत पळत सुटतात, तसें शालग्रामाचें दर्शन घडतांच सर्व पापें दूर जातात ॥९॥
मनुष्यानें शालग्रामाला भक्तीनें किंवा भक्तीवांचूनही पूजासमयीं नमस्कार केला असतां त्याला मुक्ति प्राप्त होते ॥१०॥
जो नित्य शालग्रामाची पूजा करितो, त्याला यमाचें व जन्ममरणांचें भय नाहीं ॥११॥
जो मनुष्य, या कलीमध्यें मोठ्या भक्तीनें गंध, पाद्य, अर्घ्य, नैवेद्य, धूप, दीप, उटी, गायन, वाद्य व स्तोत्र इत्यादि उपचारांनीं शालग्रामाची पूजा करितो, तो सहस्रकोटिकल्पपर्यंत विष्णूच्या वैकुंठलोकांत आनंदानें राहतो ॥१२॥१३॥
मनुष्य अभक्तीनें जरी शालग्रामाला नमस्कार करील, तरी तो पृथ्वीवर मनुष्यजन्माला येणार नाहीं ॥१४॥
हे स्कंदा ! जे माझे भक्त माझ्या भक्तीनें गर्विष्ठ होऊन पापानें मोह पावलेले असे, माझा प्रभु जो वासुदेव त्याला नमस्कार करणार नाहींत ते खास माझे भक्त नव्हेत असें समजावें ॥१५॥
जो माझा भक्त होऊन एकादशीला भोजन करील, तो माझा द्वेषी होऊन अंधतामिस्र नरकाला जाईल ॥१६॥
त्यानें माझे लिंगाला स्पर्श करावा; ह्याखेरीज त्याला शुद्धि नाहीं. जी तिथि विष्णूला प्रिय, ती एकादशी तिथि मला प्रिय आहे ॥१७॥
त्या एकादशी तिथीला उपवास करणार नाहीं, तो चांडाळापेक्षांही अधिक पापी समजवावा, हे पुत्रा ! मी सर्वदा शालिग्रामशिलेमध्यें वास करितों; विष्णूनें संतुष्ट होऊन माझ्या भक्तीकरितां मला आपलें स्थान दिलें ॥१८॥
हजार कोटी कमळांनीं माझी पूजा केली असतां जें फळ मिळतें, त्याच्या कोटीपट फळ शालग्रामाची पूजा केल्यानें प्राप्त होतें ॥१९॥
ज्या मनुष्यांनी या मृत्युलोकांत शालिग्रामाची पूजा केली नाहीं त्यांचे नमस्कार व पूजा मी घेत नाहीं ॥२०॥
शालिग्रामशिलेचे पुढें जे माझी पूजा करितात, त्यांना एकवीस युगें माझी पूजा केल्याचें फळ मिळतें ॥२१॥
हे स्कंदा ! शालिग्रामाची पूजा न करितां त्यांनीं विष्णूचे भक्तीखेरीज शेंकडों लिंगांची पूजा केली तरी त्याचें फळ काय मिळणार ॥२२॥
माझी नैवेद्य, पुत्र, पुष्प, फल, उदक हीं स्वतंत्र ग्राह्य नाहींत. शालिग्रामशिलेचे पुढें मला अर्पण केलीं तर सर्व पवित्र होतात ॥२३॥
ब्राह्मणांनीं इतर देवांचा नैवेद्य भक्षण केला तर चांद्रायण प्रायश्चित्त करावे. विष्णूचा नैवेद्य भक्षण केला तर कोटीयज्ञांचें फल मिळतें ॥२४॥
विष्णूचें पादोदकतीर्थ घेतल्यानें कोटिहत्या घडल्या असल्या तरी ते शुद्ध होतात. तसेच शंखोदकानेंही शुद्ध होतात ॥२५॥
जो शंकरभक्त होऊन विष्णूची पूजा करीत नाहीं, तो दुष्ट चौदा इंद्र होत तोंपर्यंत नरकांत जातो ॥२६॥
ज्याच्या घरीं संन्यासी एक मुहूर्त राहील, त्याचे पितर आठयुग अमृत भक्षण करणारे असे होतील ॥२७॥
कृष्णाची आराधना न करणारे नराधम या दुःखमय अरण्यांत हजार कोटी वर्षे गोंधळून जातील ॥२८॥
एकदांच शालग्राम शिलेच्या लिंगाची पूजा केली, तर त्या मनुष्यांना सांख्ययोगाचे मेहनतीखेरीज मुक्ति प्राप्त होते ॥२९॥
माझ्या कोटिलिंगांचे दर्शन व पूजा केल्यानें जें फळ मिळतें, तें एक शालग्रामाची पूजा व दर्शन यांनीं प्राप्त होतें ॥३०॥
जो विष्णुभक्त नित्य बारा शालग्रामांची पूजा करील, त्याचें पुण्य फल ऐका ॥३१॥
हजार कोटिलिंगे भागीरथीच्या तीरीं पूजिल्याचें व आठ युगें काशीवास केल्याचें जें फळ तें त्याला एका दिवसांत मिळतें ॥३२॥
मग जो वैष्णव पुष्कळ दिवस शालग्रामाची पूजा करील, त्या वैष्णवाचे पुण्याची संख्या करण्याला मी व ब्रह्मादिक देव समर्थ नाहींत ॥३३॥
यासाठीं हे पुत्रा ! माझ्या भक्तांनीं माझ्या प्रीतीकरितां शालग्रामाची भक्तीनें पूजा करुन माझी पूजा करावी ॥३४॥
शालग्रामशिलेच्या रुपानें विष्णु जेथें आहेत तेथें सर्व देव असुर यक्ष व चौदा भुवनें राहतात ॥३५॥
दुसर्‍या कोटिदेवांची कीर्तनें केल्यानें, जें फळ मिळतं तें कलीमध्यें एका विष्णूचे कीर्तनानें मिळतें ॥३६॥
जे मनुष्य शालग्रामशिलेपुढें एकवेळ पिंड अर्पण करितील, त्यांचे पितर असंख्य वर्षे स्वर्गांत तृप्त राहतील ॥३७॥
जे मनुष्य भक्तीनें शालग्रामतीर्थ प्राशन करितील, त्यांना हजारों पंचगव्यें पिण्याचें काय कारण आहे ॥३८॥
प्रायश्चित्त घेण्याचा प्रसंग आल्यास शालिग्रामाचें यथायुक्त तीर्थ घेतले असतां दान उपोषणें व चांद्रायण हीं करण्याचें कारण उरत नाही ॥३९॥
जो सरोवरामध्यें मंदिर बांधून जलशायी विष्णूची स्थापना करितो, त्याला माझे ब्राह्य सौर इत्यादि प्रासाद बांधण्याची गरज नाहीं ॥४०॥
सरोवरामध्यें जलशायी प्रतिमेचें पूजन केलें तर दुसर्‍या कोटी देवतांचें पूजन करण्याचें कर्तव्य काय ? ॥४१॥
षडानना ! विष्णुमुख सर्व देव म्हणतात कीं, सर्व पुण्याला परिमिति आहे ॥४२॥
परंतु शालग्रामाच्या पूजेच्या पुण्याला गणती नाहीं. जो शालग्रामशिला विष्णुभक्त ब्राह्मणाला दान देतो, त्याला शेंकडों यज्ञ केल्याचें फळ मिळतें व घरांत राहूनही दररोज गंगास्नानाचें फळ मिळतें ॥४३॥४४॥
जो मनुष्य शालग्रामाच्या तीर्थानें मार्जन करितो त्यानें सर्व तीर्थात स्नान केले व सर्व यज्ञांत दीक्षा घेतली असें समजावें ॥४५॥
स्वर्ग, मृत्यु व पाताळ यांमध्यें असंख्य पाषाण आहेत परंतु शालग्रामशिलेची बरोबरी करणारा असा कोणताही नाहीं ॥४६॥
या दुर्लभ मनुष्यलोकीं रोज रोज शंभर प्रस्थ तीळ भक्तीनें दान करितो त्याचें जीवित सफळ आहे. ते नित्य शंभर शेर तीळ दान केल्याचें फळ केवळ शालिग्रामाच्या पूजेपासून मिळतें ॥४७॥
पत्र, पुष्प, फळ, उदक,मूळ, दूर्वा हीं शालग्रामाला समर्पण केलीं असतां, तीं मेरुप्रमाणें दिल्याचें फळ मिळतें ॥४८॥
विधिवांचून क्रिया व मंत्राखेरीजही जो पूजा करितो तो चक्र धारण करणारा असल्यास त्याला शास्त्रोक्त पूजेचें फल मिळून विष्णूची प्राप्ति होते ॥४९॥
मीं पूर्वी क्लेशहरण करणार्‍या विष्णूला विचारिलें होतें, तें तुझ्या प्रेमास्तव तुला सांगतों ॥५०॥ हे विष्णो ! तुम्ही कोणते ठिकाणीं राहताम, तुमचा आधार व आश्रय कोणता, तुम्ही कशानें संतुष्ट होतां तें सर्व मला सांगा ॥५१॥
श्रीकृष्ण म्हणालेः-- हे शंभो ! मी नेहमीं शालग्रामशिलेचे ठिकाणी राहतों. शालग्रामावर चक्रें असतात त्यांवरुन व आकारावरुन त्यांचीं नामें आहेत तीं ऐक ॥५२॥
ज्या शालग्रामाचे मुखाशीं सारखीं दोन चक्रें जवळ जवळ दिसतात ती शिला वासुदेवमूर्ति जाणावी व ती श्वेत वर्णावर असेल तर जास्त शुभ समजावी ॥५३॥
द्वादश चक्रांची, निळसर तेजाची, दीर्घ आकाराची, पुष्कळ छिद्रांनी व्याप्त असें जिचें मुख, ती प्रद्युम्न मूर्ति समजावी ॥५४॥
अनिरुद्धशिला पिंवळ्या तेजाची वाटोळी उत्तम समजावी. जिचे मुखावर तीन रेषा व पद्माचें चिन्ह असतें ॥५५॥
जिची नाभिचक्रें वर असतात, ज्या चक्राच्या रेषा लांब लांब असतात व उजवे बाजूस बारीक छिद्रें असतात व श्यामवर्ण असते तिला नारायणमूर्ति समजावें ॥५६॥
ज्या शिलेला मुख ऊर्ध्व असतें तिला हरिमूर्ति समजावें. ती हरिमूर्ति सर्व इच्छा पूर्ण करणारी, द्रव्य देणारी व मोक्ष देणारी अशी आहे ॥५७॥
तोंडल्याच्या आकाराची, पृष्ठावर मोठें छिद्र असून पद्म व चक्र यांनीं युक्त, शुक्लवर्ण ती परमेष्ठीमूर्ति समजावी ॥५८॥
जिचे मुखाचेवर मध्यरेषेपासून रेषा असते, रेषेचे मुळाशीं दोन चक्रें असतात व शिला कृष्णवर्ण असते तिला विष्णूमूर्ति म्हणतात ॥५९॥
नरसिंह मोठाल्या चक्रांचा व कपिल वर्ण असतो. त्याची ब्रह्मचर्यानें पूजा करावी; नाहीं तर विघ्नें उत्पन्न करितो ॥६०॥
पाठीवर एक व मुखांत दोन अशा विषम चक्रांची इंद्रनील मण्याप्रमाणें तेजस्वी, नाभीपासून तीन रेषांनीं युक्त व स्थूल अशी वराहमूर्ति समजावी ॥६१॥
लांबट, सुवर्णवर्णाची, तीन बिंदूनीं शोभायमान अशी जी शिला तिला मत्स्यमूर्ति म्हणतात. ती भोग व मुक्ति देणारी आहे ॥६२॥
कूर्म मूर्तीची पाठ उंच असून तीवर वर्तुलचक्र असते. तिचा रंग हिरवा असून तीवर कौस्तुभाचें चिन्ह असतें ॥६३॥
हयग्रीवशालग्राम घोड्याच्या मुखाचे आकाराचा असून त्यावर सुशोभित पांच रेखा असतात. निळसर रंगाचा असून त्यावर पुष्कळ बिंदु असतात ॥६४॥
वैकुंठमूर्तीवर तरवार, एक चक्र व ध्वज हीं चिन्हें असतात. द्वारावर गुंजाकार एक रेखा असते ॥६५॥
श्रीधर शालग्रामावर वनमालेचें चिन्ह असतें. त्याचा आकार कदंबाचे फुलासारखा असून तो पांच रेखांनीं भूषित असतो ॥६६॥
जवसाच्या फूलाप्रमाणें कांति असून ज्याच्या बिंदु असतात व जो वर्तुल असुन लहान असतो तो वामनमूर्ति शालग्राम समजावा ॥६७॥
श्यामवर्ण महातेजस्वी असा तो सुदर्शन मूर्ति, ज्याचे डावे बाजूवर गदा व चक्र असतें, उजवे बाजूवर रेखा असते ॥६८॥
दामोदर मूर्ति मोठी असून मध्यावर एक चक्र असतें; दूर्वांसारखा रंग असून मुखावर पिंवळ्या रेघा असतात ॥६९॥
अनंतमूर्ति शालग्राम नाना भोग, नाना प्रकारच्या चिन्हांनीं अनेक मूर्तीच्या लक्षणानीं युक्त असा असतो. हा सर्व काम पूर्ण करणारा आहे ॥७०॥
ज्याचे अर्घ्यावर सभोंवार ऊर्ध्व सर्व बाजूकडे मुखें असतात त्याला पुरुषोत्तम म्हणावें. तो भोग व मुक्ति देणारा आहे ॥७१॥
ज्या शालग्रामाचे शिखरावर लिंगासारखें चिन्ह असतें त्याला योगेश्वर म्हणावें; त्याचे पूजनानें ब्रह्महत्या जाते ॥७२॥
पद्मनाभ आरक्तवर्ण असून त्याजवर चक्रयुक्त कमळ असतें; त्याचे पूजनानें दरिद्री धनसंपन्न होतो ॥७३॥
शालग्राम चक्रांनीं युक्त, सोन्यासारखा झगझगीत, पुष्कळ सुवर्णाच्या रेघा असलेला, स्फटिकाप्रमाणें तेजस्वी असा असावा ॥७४॥
शिला पांढरी अति स्निग्ध असेल तर ती सिद्धि देणारी, काळी असेल तर कीर्ति देणारी होते ॥७५॥
शिला पांढरी असेल तर पाप नाहींसे करणारी, पिंवळी पुत्रफळ देणारी होते. नीलवर्ण असेल तर लक्ष्मी देणारी व तांबडी रोग उत्पन्न करणारी जाणावी ॥७६॥
रुक्षवर्ण दुःख उत्पन्न करणारी, वक्र दरिद्र देणारी होते. एकच चक्र असेल तर तो सुदर्शन, दोन चक्रें असल्यास लक्ष्मी नारायण ॥७७॥
तीन चक्रांचा असल्यास अच्युत, चार चक्रांचा असल्यास जनार्दन, पांच चक्रें असल्यास वासुदेव, सहा चक्रें असल्यास प्रद्युम्न समजावा ॥७८॥
सात चक्रांचा संकर्षण व आठ चक्रें असल्यास पुरुषोत्तम, नऊ चक्रें असल्यास नवव्यूह, दहा चक्रें असल्यास दशात्मक ॥७९॥
अकरा चक्रें असल्यास अनिरुद्ध, बारा चक्रें असल्यास द्वादशात्मक. यांहून जास्त चक्रें अनंतमूर्ति शालग्रामांत दिसतात. शालग्राम तुटलेला फूटलेला असल तरी त्याला दोष नाहीं. ज्याला ज्या मूर्तीची आवड असेल, त्यानें त्या मूर्तीची यत्नानें पूजा करावी ॥८०॥
जो शालग्राम खांद्यावर घेऊन मार्ग चालेल, त्याला सर्व जग वश होईल ॥८१॥
जेथें शालग्रामशिला आहे तेथें हरीचें सान्निध्य आहे. तेथें स्नान, दान, जप इत्यादि कृत्यें केली असतां तीं काशीहून शतपट अधिक फलप्रद होतात ॥८२॥
कुरुक्षेत्र, प्रयाग, पुष्कर, नैमिषारण्य या ठिकाणीं केलेलें पुण्य कोटिगुण असतें. काशींत केलेलें त्याहून जास्त होतें ॥८३॥
ब्रह्महत्यादिक कांहीं पाप मनुष्यानें केले असतां ॥८४॥
तें पाप शालग्रामाची पूजा केल्यानें भस्म होतें. जेथें शालग्राममूर्ति व द्वारकेंतील चक्रांकित या दोहोंचा संगम आहे तेथें मोक्ष मिळतो यांत संशय नाहीं ॥८५॥
ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यासी या सर्वांनीं विष्णूचा नैवेद्य भक्षण करावा; त्यांचा विचार करुं नये ॥८६॥
शालग्रामाच्या पूजेला मंत्र नको, जप नको, भावना नको, स्तुति नको, आचार नको ॥८७॥ शालग्रामापुढें विशेषेंकरुन कार्तिकांत भक्तीनें स्वस्तिक काढलें तर सात कुळांचा उद्धार होतो ॥८८॥
मृत्तिका व रंग यांनी अगदीं लहान जरी स्वस्तिक काढिलें, तरी तो कोटि कल्पपर्यंत स्वर्गांत राहील ॥८९॥
कार्तिकांत देवापुढें स्वस्तिक काढिलें असतां त्याच्या पासून मिळणारें फल व एक वर्ष अग्निहोत्रोपासना करणारास मिळणारें फल हीं दोन्हीं सारखीच आहेत ॥९०॥
अगभ्यागमन केलें असतां किंवा खाऊं नये तें खाल्लें असतां जें पाप लागतें, तें पाप हरीच्या मंदिरांत रांगोळ्या घालून मंदिर सुशोभित केलें असतां नाहीसे होते ॥९१॥
जी स्त्री केशवापुढें नित्य रांगोळ्यांनीं मंडळें काढील, तिला सात जन्म सौभाग्य प्राप्त होईल ॥९२॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये त्रयस्रिंशोऽध्यायः ॥३३॥