गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

अश्वत्थ मारुती पूजन विधी व कथा Shravan Shanivar

Shravan Shanivar श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. अश्वत्थ म्हणजे पिंपळ आणि हनुमानजी मारुती म्हणून ओळखले जातात. पिंपळाच्या झाडाच्या पूजेलाही या दिवशी विशेष महत्त्व आहे.
 
दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे, असे मानले जाते. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो असा समज आहे.
 
मान्यतेनुसार या दिवशी पूजा केल्याने व्यक्ती रोगांपासून मुक्त होते आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहते. मंगळ मुहूर्तावर दररोज तीन वेळा पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करून जल अर्पण केल्याने दारिद्र्य, दुःख आणि दुर्भाग्य नष्ट होते, असेही शास्त्रात सांगितले आहे. त्याचबरोबर पिंपळाचे दर्शन आणि पूजा केल्याने दीर्घायुष्य आणि समृद्धी मिळते. याशिवाय अखंड सौभाग्याच्या इच्छेने मुली अश्वत्थ व्रत ठेवतात.
 
शनिवारी अशा प्रकारे करा पूजा
 
उपासक या दिवशी बजरंगबलीची पूजा नियमानुसार करतात.
 याशिवाय पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
 पिंपळाच्या झाडाला तीन वेळा प्रदक्षिणा घालाव्यात. पिंपळाची काही पाने तोडून गंगाजलाने स्वच्छ करुन घरातील पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि उदबत्ती इत्यादींनी पूजा करा. 
आपल्या प्रमुख देवतेचे ध्यान करताना, आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा.
 या दिवशी पूजा केल्याने देवाची विशेष कृपा भक्तांवर राहते असे म्हणतात.
 
यामागील एक कथा देखील आहे-
एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णूभक्त ब्राह्मणाची सत्त्वपरीक्षा घेण्याचे ठरविले. त्यानुसार त्याने धनंजयाला दरिद्री केले. परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकाकी पाडले. ते थंडीचे दिवस होते. थंडीपासून स्वत:चे रक्षण व्हावे ह्या हेतूने धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवीत असे. एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली. तत्क्षणी तिथे विष्णू प्रकटले. त्यांनी धनंजयाला ‘तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे, मलाच जखमा झाल्या आहेत’ असे सांगितले. ते ऐकून दुःखी होऊन धनंजयाने त्याच कुऱ्हाडीने स्वत:ची मान तोडून प्रायश्चित्त घेण्याचे ठरविले. त्याची ही भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी धनंजयांला रोज अश्र्वत्थाची पूजा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तिपूर्वक अश्र्वत्थाची पूजा करू लागला. पुढे कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले. प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये ‘अश्र्वत्थ सर्ववृक्षाणामू‘ (वृक्षांमध्ये जो अश्र्वत्थ तो मी होय.) असे म्हटले आहे.
 
श्रावणातीलच नव्हे, तर इतर शनिवारीही सूर्योदयापूर्वी अश्र्वत्थाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे.