बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (16:07 IST)

कार्तिक माहात्म्य - अध्याय ३५

कार्तिकस्वामी म्हणतातः-- हे शंकरा, दिवाळीचें माहात्म्य विस्तारेंकरुन सांगा. दिवाळी कशाकरितां करावी व तिची देवता कोण आहे तें सांगा ॥१॥
दिवाळीमध्यें काय दान द्यावें, काय देऊं नये, कोणत्या प्रकारचा आनंद करावा व कोणते खेळ खेळण्याला योग्य आहेत ॥२॥
सूत म्हणाले, कामशत्रु शंकर याप्रमाणें स्कंदाचें भाषण ऐकून हर्ष पावून बरें म्हणून बोलूं लागले ॥३॥
शिव म्हणालेः-- ( आश्विन ) कार्तिकवद्य त्रयोदशीला दरवाज्या बाहेर यमदीप लावावा म्हणजे अपमृत्यु नाहींसा होतो ॥४॥
' दीपमंत्र ' '' या त्रयोदशीच्या दीपदानापासून पाशहस्त मृत्यु, काल व श्यामा यांसह यम संतुष्ट होवो '' असें म्हणावें ॥५॥
कार्तिक वद्य चतुर्दशीला पहाटे चंद्रोदयाचे वेळीं अवश्य स्नान करावें म्हणजे नरकाची भीति राहत नाहीं ॥६॥
पर्व म्हणजे अमावास्यासह चतुर्दशीला पहांटेस अवश्य आळस टाकून स्नान करावें ॥७॥
दिवाळीच्या नरकचतुर्दशीला तेलामध्यें लक्ष्मी व जलामध्यें गंगा असते. या दिवशीं जो प्रातःस्नान करतो, तो यमलोक पहाणार नाहीं ॥८॥
स्नान करितांना मध्यें आघाडा, कडूभोपळा, टाकळा, कडूशेंदनीचें फळ हीं नरकाचे क्षयाकरितां अंगावरुन ओंवाळून टाकावी ॥९॥
अंगावरुन फिरवितांना '' पांढर्‍या माचीचे ढेंकळासह कांटे व पानांसह आघाडा अंगावरुन ओंवाळीत असतां आमचें पाप नाहींसें कर '' असें म्हणावें ॥१०॥
स्नान करितांना अपामार्ग ( आघाडा ) व प्रपुन्नाट ( टाकळा ) हे मस्तका वरुन फिरवावे. नंतर यमधर्माचें नांवांनीं तर्पण करावें ॥११॥
यमं, धर्मराजं, मृत्युं, अंतकं, वैवस्वतं, कालं, सर्वभूतक्षयकरं, औदुंबरं, दघ्नं, नीलं, परमेष्ठिनं, वृकोदरं, चित्रं, चित्रगुप्तं, या नांवांनीं प्रत्येक नांवापुढें ' तर्पयामि ' असे म्हणून तर्पण करावें ॥१२॥१३॥
देवतांची पूजा करुन नरकाला दीप द्यावा. नंतर संध्याकाळीं पुष्कळ सुंदर दिवे लावावे ॥१४॥
विशेषानें ब्रह्मा, विष्णु व शंकर यांच्या देवालयांत, तळघरांत चवाठ्यावर, सभेंत, नदीकांठाला पुष्कळ दिवे लावावे ॥१५॥
बागेंत, गांवकुसवावर, विहिरींत, सज्ज्यावर, दरवाज्यापुढें, पागेंत, हत्तीखान्यांत, दिवे लावावे ॥१६॥
त्याच प्रमाणें अमावास्येला पहांटे दिवे लावावे. स्नान करुन देव व पितर यांची भक्तीनें पूजा करुन त्यांना नमस्कार करावा ॥१७॥
पार्वणश्राद्ध करुन दूध, दहीं, तूप व नानाप्रकारचे अन्नांनीं ब्राह्मणांना भोजन घालावें. त्यांची प्रार्थना करावी ॥१८॥
नंतर राजानें दुपारुन गांवांतील लोकांचा आदरसत्कार करुन गोष्टी व गोड भाषण बोलून संतोष करावा ॥१९॥
या योगानें पितर एक वर्ष तृप्त राहतात. विष्णु जागृत होण्यापूर्वी स्त्रियांनीं लक्ष्मीला जागृत करावी ॥२०॥
लक्ष्मीला जागृत करुन तिच्या जागृतीच्या वेळीं जी स्त्री अथवा पुरुष भोजन करितात, त्या मनुष्यांचें घरी लक्ष्मीं एक वर्ष स्थिर राहते ॥२१॥
विष्णूपासून भय पावलेले दैत्य ब्राह्मणांपासून अभय पावले. भगवान् क्षीरसमुद्रांत निजलेले पाहून लक्ष्मी कमलामध्यें निजली ॥२२॥
हे लक्ष्मी, तूं ज्योति, श्री, रवि, चंद्र, वीज, सुवर्ण, तारका यांचें तेज आहेस. सर्व तेजस्वी पदार्थाचें तेजांत व दीपांचे तेजांत रहणारे हे लक्ष्मी, तुला नमस्कार असो ॥२३॥
जी लक्ष्मी, कार्तिकमासीं पुण्य दिवसांत दिवाळींत पृथ्वीवर व गाईच्या गोठ्यांत असते, ती लक्ष्मी मला वर देणारी होवो ॥२४॥
शंकर व पार्वती हे द्यूत खेळण्यास बसले असतां, पार्वतीनें प्रार्थना केल्यावरुन लक्ष्मी गाईच्या रुपानें तेथें राहिली ॥२५॥
पार्वतीनें द्यूतांत शंकराला जिंकून नग्न करुन सोडला, म्हणून शंकर दुःखी व पार्वती सुखांत राहिली ॥२६॥
करितां खेळांत प्रथम ज्याला जय येतो तो वर्षभर सुखी असतो. याप्रमाणें खेळत असतां मध्यरात्र झाल्यावर लोक झोपेंत असतांना स्त्रियांनीं तुतार्‍या, डमरु वगैरे वाद्यें वाजवून मोठ्या आनंदानें आपल्या घराच्या अंगणांतून अलक्ष्मी घालवून द्यावी ॥२७॥२८॥
प्रतिपदेला सूर्योदयानंतर द्यूत खेळावें. खेळांत पराजय झाला तर अपशय येतें. सकाळी गोवर्धनाची पूजा करावी व रात्रींही द्यूत खेळावें ॥२९॥
गाईवर वस्त्रें अलंकार घालूत सुशोभित कराव्या. त्यांचें दूध काढूं नये. बैलांवर ओझें घालूं नये. गोवर्धनाची प्रार्थना करावी. हे गोवर्धना ! तूं पृथ्वीला आधार असून गोकुळाचें रक्षण करणारा आहेस ॥३०॥
कृष्णांनी तुला हातांनीं उचलून धरिलें असा तूं आम्हांला कोटी गाई देणारा हो. इंद्रादिलोकपालांची जी लक्ष्मी गाईच्या रुपानें राहून यज्ञाकरितां तूप देते, ती माझें पाप नाहीसें करो ॥३१॥
माझे पुढें व मागें गाई असोत. हदयांत गाई वास करोत. असा मी गाईमध्यें वास करीन. याप्रमाणें गोवर्धनाची पूजा करावी ॥३२॥
देवांना, सत्पुरुषांना व इतरांना भक्तीनें संतुष्ट करावें. इतरांना अन्नानें व पंडितांना उत्तम भाषणानें, घरांतील स्त्रियादिकांना वस्त्रें, विडे, फुलें, धूप, कापूर, केशर, उत्तम प्रकारचे भक्ष्यादि पदार्थ यांनीं संतुष्ट करावें ॥३३॥३४॥
शेतीवाल्यांना बैल वगैरे देऊन, राजाला व अधिकारी लोकांना धन द्यावें. राजानें कंठ्या, कडीं वगैरे आपल्या नांवाचा छाप मारलेलीं देऊन, पदाति जनांचा व सज्जनांचा संतोष करावा ॥३५॥३६॥
याप्रमाणें सर्वांस संतुष्ट करुन राजांनीं मंचकावर बसून मल्ल, बैल, रेडे, यांच्या झुंजी पहाव्या ॥३७॥
मांडलिक राजे, योद्धे, पायदळ, नट, नाचणारे व स्तुतिपाठक भाट यांच्या भेटी घ्याव्या ॥३८॥
बैल रेड्यांना युद्धानंतर सोडावें. गाई व वासरें यांना मोकळे सोडून द्यावें ॥३९॥
नंतर तिसरे प्रहरीं दर्भाची व मोळाची मार्गपाली ( मांगोली ) करुन पूर्वेच्या वेशीला अगर झाडाला बांधावी. तिच्या खालून हत्ती, घोडे, गाई, बैल म्हशी, रेडे वगैरे न्यावे. ब्राह्मणांनीं होम करुन ती मार्गपाली बांधावी ॥४०॥४१॥४२॥
नंतर या मंत्रानें नमस्कार करावा. '' हे मार्गपाली, तूं सर्व लोकांना सुख देणारी अशा तुला नमस्कार असो.'' हे स्कंदा मार्गपाली खालून गाई बैल यांना न्यावें. राजा, राजपुत्र, ब्राह्मण हे पाली उल्लंघून गेले असतां त्यांना रोग होणार नाही व ते सुखी होतील ॥४३॥४४॥
दिवसा याप्रमाणें केल्यानंतर रात्रीं भूमीवर मंडल काढून त्यावर दैत्यपति जो बळी त्याची पूजा करावी ॥४५॥
पांचप्रकारे रंग घेऊन त्यांनीं सर्व अलंकार व विंध्यावली स्त्रीयुक्त बळीचें चित्र काढावें. मधु नांवाचा दैत्य जवळ आहे असा बळी, हस्त, मुख, किरीट, कुडलें घातलेला, दोन हातांचा असा काढावा. तो आपल्या घरामध्यें मोठ्या दिवाणखान्यांत काढावा. आपली आई भाऊ व सर्व आप्तइष्ट यांसहवर्तमान नानाप्रकारचीं कमळें, गंध, फुलें, दूध, गूळ, खीर, पक्कान्नें यांनीं समाधानानें पूजा करावी ॥४६॥४७॥४८॥४९॥
मद्यमांस, लेह्य ( चाटण्याचे ) चोष्य, ( चोखण्याचे ) पदार्थ, फराळाचे जिन्नस अर्पण करावे. राजानें प्रधान उपाध्याय यांसह बसून पुढील मंत्रानें पूजा करावी म्हणजे एक वर्ष सुखदायक जातें. हे विरोचनाच्या पुत्रा, पुढें इंद्र होणार्‍या प्रभु बलिराजा, ही मीं केलेली पूजा ग्रहण कर. याप्रमाणें पूजाविधी व प्रार्थना करुन रात्रीं जागरण करावें ॥५०॥५१॥५२॥
त्या रात्रीं गाणें, नाच, कथा वगैरे करुन करमणूक करावी. इतर लोकांनी आपल्या घरीं शुभ्र तांदुळांचा बळी काढून फूलें, फळें इत्यादिकांनीं पूजा करावी. बळीकरीतां सर्व मंगलादि करावें ॥५३॥५४॥
सूज्ञ ऋषि जें जें अक्षय म्हणून सांगतात, त्यामध्यें या कार्तिकांत बलिप्रतिपदेला जें थोडें फार दान द्यावें, तें अक्षय होऊन विष्णूला प्रीतिकर व शुभ होतें ॥५५॥
हे बले ! जे रात्रीं तुझी पूजा करणार नाहींत, त्यांचीं सर्व धर्म, पुण्यें तुला मिळोत ॥५६॥
विष्णूंनी पुन्हां संतुष्ट होऊन बळीला उपकारक दैत्यांना हा आनंदोत्सव दिला. तेव्हां पासून हे स्कंदा ! ही कौमुदी ( दिवाळी ) नांवाचा उत्सव सुरु झाला ॥५७॥५८॥
ही कौमुदी सर्व उपद्रव नाहींसे करणारी व सर्व विघ्नें घालविणारी आहे. तसेंच लोकांचा शोक घालविणारी व इच्छा पूर्ण करणारी, धन पुष्टि, सुख देणारी आहे ॥५९॥
कु म्हणजे पृथ्वी व मुद म्हणजे हर्ष या युक्त शब्दाला व्याकरण व शास्त्रजाणणारांनीं कौमुदी असें म्हटलें आहे ॥६०॥
या दिवशीं पृथ्वीवर नानाप्रकारच्या गोष्टींनी लोक एकमेकांत आनंद करितात, आनंदित होतात, संतुष्ट होतात, सुख पावतात, म्हणून ही कौमुदी समजावी ॥६१॥
हे षण्मुखा ! राजे आपल्या कल्याणाकरितां बळीला कुमुद ( कमळें ) अर्पण करितात. म्हणून हिला कौमुदी म्हणतात ॥६२॥
ही एक बलिप्रतिपदेची रात्र व दिवस प्रत्येक वर्षी कार्तिकांत बलिराजाला या पृथ्वीवर आरशाप्रमाणें दिली आहे ॥६३॥
जो राजा याप्रमाणें दिवाळी करितो त्याच्या राज्यांत व्याधीचें भय कोठून राहील ? त्याचे राज्यांत सुभिक्ष, क्षेम, आरोग्य, उत्तम संपत्ति हीं राहतात ॥६४॥
सर्वजण निरोगी व उपद्रवरहित होतात. अशा दिवाळीचा उत्सव केल्यानें त्या राज्यांत सुख होतें ॥६५॥
या कौमुदीला ( बळिप्रतिपदेला ) जो जशा भावानें राहील, तशा भावानें तो वर्षभर हर्षांत किंवा दुःखांत राहील ॥६६॥
त्या दिवशीं रडला, तर वर्षभर रडेल. आनंदांत राहिला तर वर्षभर आनंदी राहील. सुखाचा उपभोग घेतला तर वर्षभ सुखोपभोग मिळेल. स्वस्थ असला तर स्वस्थ राहील ॥६७॥
म्हणून सर्वांनीं आनंदानें दिवाळी करावी. कार्तिकांतही दिवाळी पाडवा वैष्णवांची व दैत्यांची ही एक तिथी आहे ॥६८॥
जे लोक सर्व जनांना आनंद देणारा दीपोत्सव करुन मोठ्या आनंदानें बळीची पूजा करितात, त्यांच्या कुळाला तें वर्ष मोठ्या आनंदाचें व सुखोपभॊगाचें जातं ॥६९॥
हे स्कंदा ! पर्जन्यकाळीं चार महिन्यांतील चार द्वितीयातिथी सुखकारक आहेत ॥७०॥
पहिली श्रावण महिन्यांतील द्वितीया, दुसरी भाद्रपद महिन्यांतील, तिसरी अश्विनांतील, चौथी कार्तिकांतील ॥७१॥
श्रावणमासांतील द्वितीया कलुपा नांवाची, भाद्रपदांतील अमला नांवाची, आश्विनांतील प्रेतसंचारा नांवाची व कार्तिकांतील याम्यका नांवाची द्वितीया होय ॥७२॥
स्कंद म्हणतातः-- शंकरा ! कलुपा, अमला, प्रेतसंचारा, याभ्यका, अशीं त्या द्वितीयांना नावें कां प्राप्त झालीं तें सांगा ॥७३॥
सूत म्हणालेः-- या प्रमाणें स्कंदाचें भाषण ऐकून भगवान् शंकर हंसून बोलले ॥७४॥
शंकर म्हणालेः-- पूर्वी इंद्र वृत्रासुराचा वध करुन राज्यावर बसला त्याला ब्रह्महत्या लागली. तीचे शमनार्थ अश्वमेध केला ॥७५॥
तेव्हां इंद्रानें क्रोधानें त्या ब्रह्महत्येचे वज्रानें सहा भाग करुन पृथ्वीवर टाकिले ॥७६॥
ते सहा विभाग वृक्षावर, जलावर, भूमीवर, भ्रणघ्नावर, अग्नीवर, पडले ॥७७॥
श्रावणांतील द्वितीयेला स्त्री, वृक्ष, नदी, भूमि, अग्नि, भ्रूणघ्न हीं अशुद्ध झालीं म्हणून या द्वितीयेला कलुषा द्वितीया म्हणतात ॥७८॥
पूर्वी मधुकैटभ दैत्यांच्या रक्तानें पृथ्वी आठ अंगुळें भरल्यामुळें अपवित्र झाली. स्त्रियांचें रज हा मल आहे ॥७९॥
नद्या पर्जन्यकाळीं मलिन होतात. अग्नीचा वरचा धूर मल आहे. वृक्षांचा डिंक मल आहे. भ्रूणहत्त्या करणारांची संगती हा मल आहे ॥८०॥
या श्रावण द्वितीयेला हीं मलिन झालीं म्हणून हिला कलुषा म्हणतात. देव, ऋषि, पितर यांची व धर्माची निंदा करणारे नास्तिक शठ यांच्या वाणीच्या मलापासून भाद्रपद द्वितीयेला ती निर्मल झाली ॥८१॥
अनध्यायाचे दिवशीं जे पठण करितात दुसर्‍याला पढवितात असे सांख्यशास्त्री, तर्कशास्त्री व वैदिक यांच्या शब्दापशब्दांच्या मलापासून ती भाद्रपद द्वितीयेला निर्मल झाली ॥८२॥८३॥
तसेंच भाद्रपदमासीं कृष्ण जन्म झाल्यामुळें सर्व त्रैलोक्य पवित्र झालें म्हणून या भाद्रपदांतील द्वितीयेला निर्मला म्हणतात ॥८४॥
आश्विनमासींचे द्वितीयेला आग्निष्वात्त, बर्हिषद, आज्यप, सोमप व पितर प्रेतरुपानें या द्वितीयेला संचार करितात म्हणून इला प्रेतसंचरा म्हणतात ॥८५॥
या तिथिला पुत्र, नातु, कन्येचे पुत्र हे स्वधा मंत्रांनी त्या पितरांचीं पूजा करितात ॥८६॥
श्राद्ध, दान यज्ञ करुन तृप्त करितात. म्हणून ही प्रेतसंचरा होय. महालयामध्यें पृथ्वीवर प्रेतांचा ( पितरांचा ) संचार दिसतो म्हणून आश्विनांतील द्वितीयेला प्रेतसंचरा म्हणतात ॥८७॥
कार्तिकांतील द्वितीयेचे दिवशीं यमाची पूजा करितात म्हणून तिला याम्यका म्हणतात असें मी खरें सांगतो ॥८८॥
कार्तिकशुद्ध द्वितीयेला दोन प्रहरच्या आंत यमाची पूजा करावी. त्या दिवशीं यमुनेमध्यें स्नान केलें असतां मनुष्य यमलोक पाहणार नाहीं ॥८९॥
पूर्वी यमुनेनें कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमाला आपले घरी बोलावून त्याची पूजा करुन भोजनास घातलें ॥९०॥
नरकांतील सर्व पापी प्राणी मुक्त करुन सर्वांना भोजन देऊन तृप्त केलें. ते पापापासून व सर्व बंधांपासून मुक्त होऊन आपले मर्जीप्रमाणे जेवून संतुष्ट होऊन मोकळेपणें राहिले ॥९१॥९२॥
त्यांचा यमाच्या राज्यांत त्या दिवशीं सुखावह असा मोठा उत्सव झाला म्हणून ही यमद्वितीया नांवानें त्रैलोक्यांत प्रसिद्ध झाली ॥९३॥
या द्वितीयेला आपल्या घरांत जेवूं नये. प्रेमानें बहिणीच्या हातचें जेवावें. म्हणजे तें पुष्टिवर्धक होतें ॥९४॥
त्या दिवशीं बहिणींना अलंकार वस्त्रेम वगैरे देऊन त्यांची सत्कारपूर्वक पूजा करावी ॥९५॥
आपल्या सख्या बहिणीच्या हातचे भोजन करावें. इतर सर्व बहिणीचें हातचेंही जेवावें म्हणजे त्यापासून बलवृद्धि होते ॥९६॥
कार्तिक शुद्ध द्वितीयेला, पूजित व तृप्त असून रेड्यावर बसलेला, दंड मुद्गल घेतलेला, ज्याचे बरोबर आनंदित दूत आहेत अशाप्रकारच्या यमा, तुला नमस्कार असो ॥९७॥
ज्यांनीं आपल्या सुवासिनी भगिनीला, वस्त्र अलंकार देऊन संतुष्ट केलें, त्यांना वर्षभर कलह व शत्रु यांचे पासून भय नाहीं ॥९८॥
ही यमद्वितीयेची श्रेष्ठ, यश व आयुष्य देणारी, धर्म, काम, अर्थ साधणारी अशी गुप्त सुंदर कथा कार्तिकेया, तुला मीं सांगितली ॥९९॥
ज्या या द्वितीया तिथीला यमुनेनें यमराज देवाला प्रेमानें भोजन दिलें, त्या यमद्वितीयेला दरवर्षी आपल्या बहिणीच्या घरी जो भोजन करील, त्याला सर्व प्रकारचें शुभ, संपत्ति व द्रव्य होतात ॥१००॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये पंचत्रिंशोऽध्यायः ॥३५॥