बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 19 जून 2024 (11:12 IST)

श्री कोकिळा माहात्म्य अध्याय आठवा

॥ श्रीगणेशाय नम: ॥
श्रीकृष्ण म्हणी धर्मराया ॥ कथा ऐकिजे गुणालया ॥ ऐकतांचि पाप ताप लया ॥ जाती क्षण न लागातांची ॥१॥
द्रौपदीचे पूर्वजन्म ॥ सांगेन आतां येथून ॥ धर्मा तूं भाविक पूर्ण ॥ म्हणवून सांगतों तुजलागीं ॥२॥
द्रौपदीस पांचजण ॥ भोगावया काय कारण ॥ ऐकी कथा अनुसंधान ॥ एकचित्ते करुनियां ॥३॥
धर्मा ऐक सावधान ॥ तूं शिवाचा अवतार पूर्ण ॥ द्रौपदी हे पार्वती पूर्ण ॥ उमामहेश्वर अवतरले ॥४॥
धर्म म्हणे श्रीअनंता ॥ सांगावी आतां समूळ कथा ॥ कैलासाहून येणें तत्वतां ॥ झालें आह्मां कीं निमित्य ॥५॥
काय कारण अवतार ॥ कीं निमित्य कैलासपूर ॥ स्वामि कृपेचा सागर ॥ संशय फेडी आमुचा ॥ ६॥
श्रीकृष्णा कृपा उपजली ॥ कथा सांगू आरंभिली ॥ कैलास शिखरी जे उद्भवली ॥ तेच कथा ऐकिजे ॥७॥
ऐका कथेची नवलगती ॥ कैसासी असतां शिवपार्वती ॥ समीप बैसला गणपती ॥ स्वामी कार्तिका समवेत ॥८॥
वीरभद्र शिवाचा कुमर ॥ तोही बैसला समोर ॥ पुढें उभा नंदिकेश्वर ॥ शिवासी अवलोकित ॥९॥
बैसलेती सुरनर ॥ गंधर्व आणि किन्नर ॥ अठयासी सहस्त्र ऋषीकेश्वर ॥ शिष्यासमवेत बैसले ॥१०॥
ब्रह्मा आणि इंद्र ॥ तेथें बैसला रमावर ॥ आनंदे बैसला नारद तुंबर ॥ अप्सरा आणि देवांगना ॥११॥
ऐसी उभा दाटली सकळ ॥ सभा होऊनी निश्वळ ॥ तों नवल वर्तलें तेवेळे ॥ कौतुक तेव्हा विलोकित ॥१२॥
तंव ते धेनु तेथें आली वेगें ॥ दोन वृषभ लागले मागें ॥ ऐसें पार्वती देखोन वेगें ॥ हास्य करिती पै झाली ॥१३॥
ह्मणे हे धेनु निर्लज्य कैसी ॥ दोन वृषभ लागले इचे पाठीसी ॥ कांही लज्जा न धरी मानसीं ॥
निर्लज्ज सर्वथा धेनू हे ॥१४॥
ऐसें ऐकतांच धेनुसी ॥ परम क्रोध आला मानसीं ॥ कांगे पार्वती माजलिसी ॥ माझा महिमा न कळे तुज ॥१५॥
मज वंदिती सकळ सुरवर ॥ माझी मळमुत्रें शुध्द होती सर्वत्र ॥ सुधारसातुल्य दुग्ध पवित्र ॥ मजपासुनी उद्भवलें ॥१६॥
ऋषी करिती माझें स्तवन ॥ न गमे ऋषीसी मजविण ॥ दधी दुग्ध धृत माझें त्रिभुवन ॥ प्रितीनें भक्षी आनंदे ॥१७॥
माझें प्रात:काळीं करितां दर्शन ॥ सप्तजन्मीचीं पातके जळती जाण ॥ हरिहरादि रक्षिती माझा मान ॥
तू का देखुनी हसलिसी ॥१८॥
सर्वा देखत अपमान ॥ माझा केला जाणोन ॥ आतां तुजलागी श्रापीन ॥ क्रोध आला मजलागी ॥१९॥
धेनु क्रोधें बोले पार्वतीसी ॥ मज देखोन हांसलीसी ॥ तरी तूं पंचपुरुष भोगिसी ॥ सत्यश्राप हा घे माझा ॥२०॥
ऐसें वचन ऐकोनि ॥२१॥
पार्वती भयाभीत मनीं ॥ रुदन करी आक्रंदोनी ॥ परममनी विभळ ॥ स्फुंदनस्फुंद करी रुदन ॥ ह्मणे मी आपराधी
चांडाळीण ॥ हास्य केलें धेनु देखून ॥ तरीच ऐसें जाहिलें ॥२२॥
देखोनियां प्रत्यक्ष विष ॥ त्याचा केला बळेंच ग्रास ॥ धेनु देखोनी विशेष ॥ हास्य केलें बळेंची ॥२३॥
ऐसा शोक करुनी पार्वती ॥ मूर्छित पडली तेव्हां क्षिती ॥ अश्रुधारा नेत्री वाहती ॥ श्वासोश्वास टाकीतसे ॥२४॥
ऐसें देखोनी सदाशिवें ॥ पार्वतीस ह्मणे भय न धरावें ॥ धेनुचा श्राप स्वभावें ॥ सत्य होईल निर्धारें ॥२५॥
आतां शोक न करावा कांहींतरी ॥ तुवां अवतरावें पृथ्वीवरी ॥ द्रुपदरायाचे उदरीं ॥ अवतार तुवा घेईजे ॥२६॥
मग मीही अवतरेन कुरुवंशीं ॥ वेगळीं रुपें मी पांच निश्चयेसी ॥ पांडव ऐसें ह्मणती आह्मांसी ॥
बहुत शूरत्व सुलक्षणीं ॥२७॥
होईल तुझें स्वयंवर ॥ तेथे येऊं आह्मी महावीर ॥ यंत्र भेदूनि साचार ॥ वरुं तुजलागीं निश्चयसीं ॥२८॥
तरी आतां शोक सांडिजे ॥ मी बोलिलों हें मनी धरिजे ॥ द्वापारीं अवतार घेईं सहजें ॥ श्रापास्तव धेनूच्या ॥२९॥
सभाभितरी सकळ सुरवर ॥ पहाते झाले अतें कवतुक थोर ॥ ह्मणती शिवहरिहर ॥ काय विचित्र केलें तुवां ॥३०॥
ऐसी कथा वर्तली कैसी ॥ तोचि शिव धर्म निश्चयेसी ॥ भीमार्जुन नकुल सहदेवता पती ॥ पंच अवतार शिवाचे ॥३१॥
मग पार्वती अवतरली द्रुपद घरीं ॥ तेच द्रौपदी हे निर्धारीं ॥ म्हणोनिया धर्मा निर्धारीं ॥ कथा हे तुज सांगितली ॥३२॥
मग धर्मे जोडोनी कर ॥ उभा राहिला कृष्णासमोर ॥ ह्मणती स्वामी परम पवित्र ॥ व्रत सांगितलें पाहिजे ॥३३॥
हरी म्हणे धर्मालागुन ॥ व्रत हें कोकिळेचें पुण्यपावन ॥ आचरती स्त्रिया एक चित्तें करुन ॥ वैधव्य न पावती जन्मोजन्मीं ॥३४॥
व्रत हे निर्माण करावया कार्ण ॥ काय झाले ते सांगा मजलागुन ॥ हरी म्हणे धर्मालागुन ॥ सावधान परिसिजे ॥३५॥
वैधव्य होत स्त्रियांस प्राप्त ॥ म्हणुन ब्रह्मा निर्माण करीत ॥ जे करिती स्त्रिया हें व्रत ॥ वैधव्य तयासी नसेचि ॥३६॥
तरी धर्मा अवधारीं ॥ नसे स्त्रियासी निर्धारी ॥ वैधव्यदशा जन्मावरीं ॥ नसे स्त्रियांसी निर्धारें ॥३७॥
व्रत कोकिळाचें उत्तम ॥ करा सहस्त्र कामें टाकून ॥ ब्रह्मचर्य आचरावे जाण ॥ हविष्यान भक्षिजे ॥३८॥
शयन करावें भूमीवरी ॥ हर्षयुक्त असावें अंतरीं ॥ पूजा सामुग्री उत्तम बरवी ॥ एकनिष्ठेसी पुजीजे ॥३९॥
मग किजे कथा श्रवण ॥ यथाशक्ति ठेवावे हिरण्य ॥ मग करावें ब्राह्मणाचे पूजन ॥ यथाविधी करोनी ॥४०॥
पूजन कोकिळेचे पुण्यपावन ॥ करितां प्राप्त होय पुत्र आणि धन ॥ पौत्र आणि वंशवर्धन ॥ होतसे व्रतें करोनी ॥४१॥
पूजेचा महिमा अतिवरिष्ठ ॥ करिता न बाधे रोग कष्ट ॥ सर्व व्रतात हे श्रेष्ठ ॥ व्रत तुज हे सांगितले ॥४२॥
नारद सुंदरीप्रती ॥ षडाननास पशुपती ॥ पांडवाप्रती श्रीपती ॥ व्रत ऐसें निरोपिलें ॥४३॥
श्रोते व्हावें सावधान ॥ पुढें कथा पुण्यपावन ॥ श्रवणमात्रें किल्मिष दहन ॥ दोष हारिती जन्माचे ॥४४॥
इति श्रीभविष्योत्तर पुराणे ॥ ब्रह्मोत्तर खंडे कोकिला महात्म्ये ॥ अष्टमोऽध्याय गोडहा ॥४५॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥८॥ ओंवी ॥४५॥
शुभंभवतु
॥ अध्याय ८ वा समाप्त ॥