Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लघु भागवत अध्याय ४ था

Updated: बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (12:02 IST)
पूर्वजन्मीं घडली ईशभक्ती । तेणे आठवे मागील स्थिती । कीं मृगजन्माची यातायाती । प्रेमास्तव जाहली ॥१३॥
पुढें आला ब्राम्हण जन्म । हाही वासनेचा परिणाम । ऐसें उमजूनि सांडिले प्रेम । वस्तुमात्रीं तयानें ॥१४॥
कधीं न बोले कोणासंगें । भ्रमिष्टापरी नित्य वागे । जें जें मिळेल प्रसंगे । निर्वाह करी त्यावरी ॥१५॥
मंदबुद्धि दिसे जड । ह्नणूनि त्यातें जन अखंड । जडभरत नामें उघड । संबोधिती विनोदें ॥१६॥
एकदां रायें केला नवस । पुत्रप्राप्तीची पुरेल आस । तरी देईन बळी मानुष । देवीपुढें निर्धारें ॥१७॥
तेव्हा येऊनि राजदूत । ओढूनि नेला जडभरत । तथापि तेणें मौनव्रत । नाही तेथेंहि सोडिलें ॥१८॥
शिर छेदूनि त्यासी बळी । देणार तंव तेचि काळीं । देवी प्रगटूनि त्यासी सांभाळी । प्राण त्याचे रक्षिले ॥१९॥
ऐसेंचि एकवार आणिक । धरुनि नेती राजसेवक । न्य़ून होता एक वाहक । उचलावया पालखी ॥२०॥
परी नाही पूर्व अभ्यास । ह्मणूनि इतरांसंगे त्यास । चालतां झाले बहुत क्लेश । परी न बोले शब्दही ॥२१॥
हें देखूनि राजा सक्रोध । बोलला त्यासी कटुशब्द । परी त्याचा कांहीच खेद । जडभरतासी असेना ॥२२॥
उलट विनोदें प्रत्युत्तर । देऊं न शके पंडित चतुर । ऐसें दिधलें तैं राजेश्वर । जाणे त्याची योग्यता ॥२३॥
कृतकर्माचे होऊनि क्लेश । खिन्न झालें रायाचें मानस । रायें घेतला मग उपदेश । जडभरतापासुनि ॥२४॥
सदाचरण नामस्मरण । कृष्ण गोविंद हरि नारायण । ऐसें अखंड ईश्वरभजन । राजा करुं लागला ॥२५॥
ईश्वराचे नामस्मरण । कैसेंही घडतां होय कल्याण । येविषयी करा श्रवण । आख्यान अजामिळाचें ॥२६॥
अजामिळ नामें द्विज एक । कपटी भोंदू स्वार्थसाधक । ऐसी त्याची वर्तणूक । दुराचारी सर्वदा ॥२७॥
नवल नव्हे की तयापाशीं । बहुकाळ होती एक दासी । तिजपासूनि तयासी । पुत्र दहा जाहले ॥२८॥
त्यामाजीं कनिष्ठ नारायण । अजामिळाचा जीव कीं प्राण । ह्नणूनि त्याचे मुखी रात्रंदिन । नांव नारायणाचें ॥२९॥
पुढें अजामिळ झाला वृद्ध । तरी देवभक्तीचा नाहीं गंध । कैशांतही नसे आनंद । नारायणावांचुनी ॥३०॥
नारायणाचें बालवय । दृष्टी चुकवूनि दूर जाय । तेव्हां पिता घाबरा होय । हांका मारी सहस्त्रदां ॥३१॥
नारायणा बैस जवळ । नारायणा बोल प्रेमळ । नारायणा किती वेळ । दूर गेलासी बालका ॥३२॥
नारायना माझे प्राण । व्याकुळ होती तुजवीण । नारायणा माझें मरण । पातलें जवळ बैस ये ॥३३॥
किती सांगूं नारायणा । मजसीं बोल मधुर वचना । नारायणा ऐसा क्षणाक्षणां । मुखी उच्चार जाहला ॥३४॥
पुत्राच्या निमित्तें हो कां । नारायणासी मारिता हांका । देवाचें नांव आले मुखा । अंतकाळी अखंड ॥३५॥
याकारणें अजामिळासी । न्यावया अंती वैकुंठासी । विष्णुदूत आले तयांसी । निवारूनि यमदूतीं ॥३६॥
विष्णुदूतांसी बोलले स्पष्ट । अजामिळ महाभ्रष्ट । पाप केले अचाट । कैसा नेतसाम वैकुंठा ॥३७॥
ऐसें उभय दूतांचें भाषण । अजामिळें केलें श्रवण । ऐकूनि झालें हृदय विदीर्ण । पश्चात्तापें पोळला ॥३८॥
पश्चात्तापें झालें शुद्ध मन । अंती घडलें वरी नामस्मरण । ह्मणूनि त्यातें वैकुंठस्थान सहज प्राप्त जाहलें ॥३९॥
न कळता पद अग्नीवरी । पडे तरीही दाह करी । तैसे देवाचे नाव सहज उच्चारी । तरी पुण्य घडे तया ॥४०॥
आतां कोणासी ह्मणावे सद्गुरु । येचविषयीं थोडा विचार करू । सद्गुरु केवळ असे तारुं । भवसागर तरावया ॥४१॥
सद्गुरुवाचूनि तरणोपाय । नाहीं ह्मणूनि त्याचे पाय । धरिल्यावीण नसे सोय नि:संशय हे जाणा ॥४२॥
सद्गुरु ह्नणजे कल्पवृक्ष । सदा असावा निरपेक्ष । शिष्य हिताविषयीं दक्ष । निरंतर असावा ॥४३॥
घरोघरीं गुरु सांप्रत । कैसें हरावें शिष्य वित्त । एतदर्थ त्यांचे सर्व चित्त । नेणती संकट शिष्याचें ॥४४॥
ज्यासी धनादि वस्तूंची चाड । सुखादि विषयांची आवड । तो गुरुसंज्ञेसी अपात्र उघड । त्याची भीड धरुं नका ॥४५॥
जैसा देवगुरु बृहस्पती । तैसेचि गुरु सद्गती । शिष्यासी देऊं शकती । इतर भोंदू जाणावे ॥४६॥
जो लोहाचें करी कनक । तोचि सत्य परीस एक । इतर ते दगड नि:शंक । तोचि न्याय गुरुविषयीं ॥४७॥
जयां आत्मज्ञानाचा स्पर्श । नसूनि इतरां उपदेश । करिती त्यांचा उपहास । होतो, नवल हें नव्हे ॥४८॥
असो सद्गुरुचा थोर महिमा । वर्णूं जातां नाहीं सीमा । गुरु ह्मणजे देवांचा आत्मा । ऐका कथा येविषयीं ॥४९॥
एकदां देवसभेसी बृहस्पती । आले देखूनि सर्व उठती । परी ऐश्वर्यमदें शचीपती । स्वस्थ बैसूनि राहिला ॥५०॥
इंद्रे न दिलें उत्थापन । गुरुसी तो अपमान । झाला नाहीं मुळीं सहन । ह्नणूनि गुप्त गुरु झाले ॥५१॥
बृहस्पती गेलियावरी । इंद्र उमजूनि अंतरीं । झाल्या अपराधाची करी । खंती चित्तीं अपार ॥५२॥
कोणाचाही अपमान । करितां होय अकल्याण । ह्नणूनि दुसर्‍याचें मन । दुखवूं नये कदाही ॥५३॥
गुरुचा केला अपराध । वाटे तयाचा परम खेद । ह्नणूनि करी शक्र शोध । परी वार्ता कळेना ॥५४॥
दैत्यांसी हा समाचार । कळतां झाले हर्षनिर्भर । ह्नणती आतां सकल सुर । दुर्बळ झालें गुरुविणें ॥५५॥
देखूनि ही योग्य संधी । देवांसंगे दैत्य युद्धीं । प्रवर्तले; कीं पुन: कधीं । ऐसी वेळ येईना ॥५६॥
पुढें दैत्य आणि देव । झुंजले त्यांत पराभव । देव पावूनि त्यांचा गर्व । गळाला सर्व क्षणार्धे ॥५७॥
मग विधीसी वृत्त सकळ । जाणवितां ह्नणे हें केवळ । गुरुच्या अवज्ञेचे फळ । तुह्मां आलें भोगणें ॥५८॥
मग विधि ह्नणे त्वष्टाकुमर । जो विश्वरुप, त्याची निरंतर । आज्ञा पाळितां जयजयकार । तुमचा होईल सर्वथा ॥५९॥
मग देव वागतां तदनुसार । संकटें त्यांची झाली दूर । परी कृतापराधाचा विसर । पुरंदरासी होइना ॥६०॥
पुढें गुरुदर्शनासमयीं इंद्र । क्षमा मागतां गुरु दयार्द्र । होऊनि, कृपेचा समुद्र । इंद्रावरे ओतिला ॥६१॥
मुख्य पाहिजे भक्ती । मग संकटीं श्रीपती । धावूनि रक्षी भक्तांप्रती । ऐका कथा येविषयी ॥६२॥
पूर्वी त्रिकूट पर्वतीं । ऋतुमत्‍ नामें वाटिका होती । तियेचा वरुण अधिपती । होता संपन्न वैभवें ॥६३॥
त्या वाटिकेत वृक्ष अपार । पुष्पफलयुक्त मनोहर । तैसेंचि होतें एक सुंदर । सरोवर त्या ठायीं ॥६४॥
त्या उपवनी सकल वृक्षीं । नाना परीचे होते पक्षी । किलकिल शब्दीं प्रातर्निशी । गजरें भरे उपवन तें ॥६५॥
तेथेंचि होतें एक निकट । अरण्य विस्तीर्ण बिकट । तेथें एक गज बळकट । गजेंद्र नामें संचरे ॥६६॥
कदा काळीं वाटिकेमाझारीं । तो स्नानासि येई सरोवरीं । कांतेसह विहार करी । यथेष्ठ जळी स्वछंदे ॥६७॥
एकदां शुंडेने जलसेक । करितां वर्तले अद्भुत एक । येऊनि नक्र भयानक । धरी पाय हत्तीचा ॥६८॥
कठिण फार मगरमिठी । हत्ती पडे महा संकटी । अपार झुंजला मुक्तीसाठीं । प्राण कंठी पातले ॥६९॥
गजेंद्राची शक्ति अचाट । शरीर भव्य बळकट । परी नक्रें धरिला पाय घट्ट । कांही केल्या सुटेना ॥७०॥
गजेंद्र अत्यंत बळी । परी नक्रापुढें झाली शेळी । नक्रें ओढूनि नेला तळीं । दाढेंत धरिला खेंचूनि ॥७१॥
शक्य तितुके सकळ । यत्न केले परी निष्फळ । हत्तीचे झाले प्राण व्याकुळ । संकट घोर टळेना ॥७२॥
मग केलें देवाचें स्मरण । देवा आतां तुजवीण । कोण करीन संरक्षण । प्राण माझे दयाळा ॥७३॥
धांव धांव दीन बांधवा । काय माझा तुजपुढें कणवा । मी पशू ह्नणूनि देवा । स्तवन नेणें करु तुझें ॥७४॥
करुणासिंधो तुवां संकटीं । प्राणी तारिले कोट्यानुकोटी । मग मजवरी निष्ठुर दृष्टी । देवा ऐसी कां केली ॥७५॥
गजेंद्राचा ऐकूनि स्तव । श्रीविष्णुने घेतली धांव । नक्राचा करुनि पराभव । गजेंद्र काढीला बाहेरी ॥७६॥
भक्तसहाय्यार्थ सदा दक्ष । तो लक्ष्मीनाथ राजीवाक्ष । गजेंद्रासी देई मोक्ष । भक्ति त्याची पाहुनी ॥७७॥
भागवत ग्रंथ प्रसिद्ध । तेथील कथा सुबोध । गातसे भक्त गोविंद । बालहिताकारणें ॥७८॥
याचें करिता श्रवण पठण । आयुरायोग्य विद्याधन । प्राप्त होईल ऐश्वर्य पूर्ण । ऐसें वरदान व्यासाचें ॥७९॥
इति श्रीलघुभागवते चतुर्थोऽध्याय: ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

सर्व पहा

Shravan special vegetables श्रावणात कांदा लसूण न वापरता या भाज्यांचा आस्वाद घ्या!

श्रावणात दररोज अशी करा महादेवांची आराधना; भाग्य उजळेल

श्रावणात उपवास करताय? जाणून घ्या महत्त्वाचे धार्मिक नियम, आहार आणि योग्य पद्धत

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments