गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (11:52 IST)

लघुभागवत - अध्याय ३ रा

एकदां मिळाली सभा एक । तेथें शिव आणि चतुर्मुख । वसिष्ठादि ऋषि अनेक । येऊनियां बैसले ॥१॥
मग तेथें सर्वांमागें । द्क्षप्रजापती येतां, वेगे । सकळ उठले परि दोघे । विधि शिव तटस्थ बैसती ॥२॥
ब्रम्हा ज्येष्ठ ह्मणूनि कांही । दक्षासी खेद त्याचा नाही । परी शंकरे केला तो देहीं । अपमान विंचू झोंबला ॥३॥
दक्ष श्वशुर शिव जामात । जामातें नमावा जायातात । ही जगन्मान्यरीति उचित । उल्लंघिली शंकरें ॥४॥
ह्मणूनि शिवाची निंदा प्रचुर । दक्षें केली तरी श्रीशंकर । नेदी कांही प्रत्युत्तर । तै दक्ष कोपे अधिकचि ॥५॥
मग संतापें शिव शापिला । यज्ञामाजी अमंगला । हविर्भाग देतां तुजला । यज्ञसिद्धी घडेना ॥६॥
देखूनि स्वामीचा अपमान । नंदी झाला कोपायमान । दक्षासी बोलिला शापवचन । तूंही अपयश पावसी ॥७॥
कांही काळें पुढती । स्वयें दक्षप्रजापती । यज्ञाकारणें सर्वांप्रती । पाचारिलें आदरे ॥८॥
परी निजकन्या सती । तैसाचि शिव तिचा पती पूर्ववैर आणूनि चित्तीं । नाही पाचारिलें तयां ॥९॥
सतीचे यज्ञाचे वृत्त । विदित होतां होय विस्मित । अनुमानिलें कीं तात । पावला असेल विस्मृति ॥१०॥
मागील कलहाची मात । सतीस नव्हती विदित । ह्मणूनि तिनें धरिला हेत । अनाहूत जावया ॥११॥
कीं पाचारण नसे तरी । कन्या जातां माहेरीं । माता पिता संतुष्ट अंतरी । होतील हें निश्चित ॥१२॥
तेव्हां शिव ह्मणे तियेलागीं । तू न जावें या प्रसंगी । करुनि घेशील वाउगी । विटंबना आपुली ॥१३॥
या वचनें असंतोष । सती पावली विशेष । नाहीं अनुभवाचा लेश । देईं दोष पतीतें ॥१४॥
मग पतिआज्ञेवीण । सवें घेऊनि सेवकगण । माहेरीं पावली, पूर्ण । पतिवचन अनुभविलें ॥१५॥
तीस देखूनि तेथें कोणी । आनंदले नाहीं मनीं । ये अथवा बैस ह्मणूनी । नाही पुसिलें गौरवें ॥१६॥
या अवमानें स्वाभाविक । सतीस झालें परम दु:ख । पित्यासी वदली सशोक । दुष्ट देह असे तुझा ॥१७॥
तेथूनि जन्मला माझा देह । त्याचा नसे मज आतां स्नेह । ऐसें बोलूनि नि:संदेह । अग्नींत उडी घेतली ॥१८॥
नारदें हें वृत्त सकळ । शिवासी कथिलें तत्काळ । तेव्हां पेटला क्रोधानळ । भयंकर रुद्राचा ॥१९॥
त्या आवेशें चंद्रमौळी । जटा आपटी महीतळीं । वीरभद्र नामें महाबळी । निर्मिला थोर तेथुनी ॥२०॥
मग आज्ञापिले त्यासी । जाऊनि वधावें दक्षासी । शिवाची आज्ञा होतां ऐसी । वीरभद्र धांवला ॥२१॥
करुनि यज्ञाचा विध्वंस । दक्षाचाही केला नाश । सकळ देव पावले क्लेश । येऊनि प्रार्थिती शिवातें ॥२२॥
दक्षें केला अपराध दारुण । तदर्थ झालें शासन पूर्ण । त्यासी आतां जीवदान । तुह्मी दिलें पाहिजे ॥२३॥
मग अजाचें लावूनि शिर । सजीव केलें दक्षशरीर । आणि पुनश्च यज्ञ समग्र । त्याचे हातीं करविला ॥२४॥
त्याचिपरी अग्निकुंडीं । सतीनें घेतली होती उडी । तीही पुन: अतिआवडीं । पर्वदोदरीं जन्मली ॥२५॥
ह्मणूनि तीस जगतीं । जन बोलती पार्वती । वरिता झाला कैलासपती । पूर्वजन्मसंबंधें ॥२६॥
यावरुनि घ्यावा बोध । थोरथोरासी चकवी क्रोध । नसावा कोठें कलह विरोध । अनर्थाचें कारण जें ॥२७॥
आतां ध्रुवचरित्र बोधप्रद । ऐकतां होय चित्त शुद्ध । ध्रुवाचे चातुर्य अगाध । पाहूनि आनंद वाटतो ॥२८॥
उत्तानपाद नामें नृपती । त्यासी सुरुची आणि सुनीती । दोन भार्यांपासूनि होती । दोन पुत्र पराक्रमी ॥२९॥
सुरुचीसुताचें नाम । ठेविले होते उत्तम । सुनीतीचा ध्रुव परम । निश्चियी भक्त देवाचा ॥३०॥
उत्तमावरी राजाची प्रीती । ध्रुवाहुनि अ़धिक होती । ऐसी एकदां आली प्रतीती । ध्रुवालागीं प्रसंगे ॥३१॥
उत्तमासी नृपांकावरी । देखूनि ध्रुवासी अंतरीं । इच्छा उदेली तेथ शेजारीं । बैसूं आपण जाउनी ॥३२॥
ह्मणूनि पित्याअंकी बैसूं जाय । तंव उभी तेथें सापत्न माय । तिनें मागें ओढिला पाय । धरुनि त्याचा मत्सरें ॥३३॥
तेव्हां रडत घरीं आला वेगें । झालें वृत्त मातेसि सांगे । येरी ह्मणे पुण्ययोगें । ऐश्वर्य सर्व मिळतसे ॥३४॥
पूर्वजन्मी स्वधर्माचरण । परोपकार सत्यभाषण । केलें ज्यानें त्यावरी पूर्ण । कृपा देव करीतसे ॥३५॥
ह्मणूनि करावी भगवत्सेवा । नसावा कोणाचा हेवा । तरीच मिळे बाळा ध्रुवा । ऐश्वर्य भोगावयासी ॥३६॥
भलेपणें वागती जन । तेचि पावती सन्मान । ह्मणूनि बाळा उत्तमगुण । संपादन करावे  ॥३७॥
कोणासी देऊं नये त्रास । करुं नये उपहास । परासी देतां क्लेश । होतो नाश आपुला ॥३८॥
अंध पंगु दीन दुर्बळ निराश्रित याचक सकळ । यांचा करिती सांभाळ । तेचि ऐश्वर्य भोगिती ॥३९॥
असावें सदा सदय हृदय । देऊं नये वर्मी घाय । संकटीं कीजे सर्वां सहाय । तरीच ऐश्वर्य लाभतें ॥४०॥
परद्रव्याचा अपहार । गुरुजनांचा अनादर । साधुसंतांचा तिरस्कार । केलिया हानि होतसे ॥४१॥
सापत्न मातेनें केला मत्सर । तरी मन ठेवीं तूं सुस्थिर । फल भोगणें कर्मानुसार । सकळांसी आहे ॥४२॥
करावें ज्ञानसंपादन । तेणें जोडे समाधान । जें सुखशांतीचें निधान । वृथा जीवित त्याविणें ॥४३॥
ऐश्वर्यापासूनि चढे मद । ह्मणूनि तुज नसो तैसा छंद । मागणें तरी परम पद । प्रभूपाशी मागावें ॥४४॥
ऐसें बहुत ध्रुवाप्रती । उपदेशी माता सुनीती । परी त्यायोगें त्याचे चित्तीं । समाधान घडेना ॥४५॥
हेतु ऐसा त्याचे मनीं । आतां बैसेन ऐशा स्थानीं । कीं ऊठ ऐसें न ह्मणे कोणी । मज तेथूनि चिरकाळ ॥४६॥
जननीस ह्नणे ईश्वरीकृपा । साधावया मार्ग सोपा । आचरीन उग्र तपा । पुरवीन हेतु मनींचे ॥४७॥
मग तत्क्षणीं गेला वनीं । तेथें भेटले नारद मुनी । उपदेश केला त्यांनीं । ईश्वरभजन करावया ॥४८॥
त्यापरी तो ईशस्तवन । करूं लागे रात्रंदिन । होईल देवदर्शन । तेव्हां जाईन येथुनी ॥४९॥
ऐसा करुनि दृढनिश्चय । अनुष्ठानीं बैसे राजतनय । संकटें आली मरणप्राय । तरी न ढळे तेथुनी ॥५०॥
देवावरी दृढ भाव । असतां, देऊं न शके देव । ऐसें काय आहे वैभव । भक्ति सबळ पाहिजे ॥५१॥
असो ध्रुवाची भजनलीला । पाहूनि दयेनें देव द्रवला । दर्शन देऊनि ह्नणे बाळा । काय तुला पाहिजे ॥५२॥
तेव्हां मिठी मारुनि ध्रुव रडे । अश्रुधारांचा पाऊस पडे । देव ह्नणती फेडीन सांकडें । तोंड वाकडें कां करिसी ॥५३॥
ध्रुव ह्नणे भगवंता । अढळ पद देईं आतां । नसावी त्यावरी सत्ता । माझ्याविण इतरांची ॥५४॥
मग प्रसन्न होऊनि देव । जें जें कांही बोलिला ध्रुव । तें तें त्यासी अर्पिलें सर्व । निश्चय अपूर्व पाहुनी ॥५५॥
हें उत्तानपाद पित्यासी । ऐकूनि वाटे धन्य मानसीं । तेव्हां राज्य देऊनि तयासी । गेला आपण तपातें ॥५६॥
सुरुचीने सापत्नभाव । दाखविला तें सुज्ञ ध्रुव । विसरुनि गेला सर्व । तोषवी उलट उपकारें ॥५७॥
उत्तम नामें तियेचा सुत । यक्षें वधिला ह्नणूनि संतप्त । होऊनि केला यक्षाचा घात । हिमालयीं जाउनी ॥५८॥
मग बहुतकाळपर्यंत । राज्य भोगूनि  आतृप्त । सिंहासनीं स्थापूनि सुत । अढळपदीं बैसला ॥५९॥
देवें दिधल्या अढळस्थानीं । ध्रुव अद्यापि दिसे गगनीं । नित्य ध्रुवनक्षत्रदर्शनीं । आयुरारोग्य वाढतें ॥६०॥
निश्चयाचें असता बळ । प्राप्त होय इच्छिलें फळ । हें जाणूनि सुज्ञ बाळ । करोत उद्योग निश्चयें ॥६१॥
आतां याच्या विपरीत । ऐका सांगतो चरित । पोटीं येतां दुष्ट सुते । कष्ट होती पितरासी ॥६२॥
अंग नामे होत नृपती  आधिं नव्हती त्यासी संतती । शेवटीं झाली पुत्रप्राप्ती । देवद्विजप्रसादें ॥६३॥
वेन ऐसें त्या पुत्राचे नांव । अति दुष्ट होता त्याचा स्वभाव । ह्नणूनि त्रासले जन सर्व । भयें थरथर कांपती ॥६४॥
त्याचे जे कां खेळगडी । त्यांची करुनि आपण खोडी । उलट त्यांसी घडिघडी । ताडूनि, अपशब्द बोलावे ॥६५॥
प्रत्यक्ष राजाचे बालक । लाडकें एकुलते एक । ह्मणूनि सकळ प्रजालोक । मौन धरुनि बैसती ॥६६॥
बृद्धपणीं जाहला पुत्र । तोही दुर्गुणी विचित्र । यास्तव राजासी अहोरात्र । होती चिंता जाळीत ॥६७॥
मागें पुढें हा पुत्र रंक । नांवासी लावील कलंक । जाईल आपुला लौकिक । ह्नणूनि राजा त्रासला ॥६८॥
त्या आवेशे एका रजनीं । दूर गेला नृप निघोनी । कोठें गेला नेणे कोणी । प्रजा सचिंत जाहली ॥६९॥
बहु दिन गेले, समाचार । कळेना आतां राज्याधिकार । कोणासी द्यावा ऐसा विचार । पडे तेव्हां सकळांसी ॥७०॥
नियमानुसार स्वाभाविक । वेनराजासी राज्याभिषेक । सचिवें केला तेव्हां लोक । चिंताक्रांत जाहले ॥७१॥
त्यांची चिंता नव्हती व्यर्थ । वैनरायें अन्यायपंथ । स्वीकारुनि केला अनर्थ । छळिले सर्वथा प्रजेसी ॥७२॥
तेव्हा प्रजा पाहूनि संताप । ह्नणे व्हावा हा किमर्थ नृप । समूळ झाला धर्मलोप । अनाचार वाढला ॥७३॥
शेवटीं होऊनि निरुपाय । प्रजेनें करुनि निश्चय । आणि पाहूनि योग्य समय । वधिलें वेनराजासी ॥७४॥
पुढें पुत्र त्याचा सिंहासनीं । स्थापिला अभिषेकुनी । राजांतेही दुष्कर्म निदानीं । भोगणें पडे अवश्य ॥७५॥
वेनराजाचा कुमर । पृथुराज होता चतुर । त्यासी राज्याचा अधिकार । प्राप्त झाला तेधवां ॥७६॥
तेणें देखिली विपन्नस्थिती । लया गेली धर्म-नीती । प्रजा उदास सर्व रीतीं । देश क्लेशीं बुडाला ॥७७॥
नसे पर्जन्य आटलें उदक । तळीं विहिरी झाल्या शुष्क । धान्यादिकां नाहीं पीक । मरती लोक उपवासी ॥७८॥
सर्वत्र दिसे हाहा:कार । सकळां पडली चिंता घोर । आतां पुढतीं होणार । गती कैसी कळेना ॥७९॥
तेव्हा रायें क्रोधपूर्ण । पृथ्वीवरी नेमिला बाण । तंव गोरुपें आली शरण । पृथ्वी पृथ्वीनृपातें ॥८०॥
तीस नृप ह्नणे देऊनि धान्य । दूर करी देशाचे दैन्य । इतुकें माझें वचन मान्य । केलें तुवां पाहिजे ॥८१॥
तेव्हां पृथ्वी वदे राजा । हा अपराध नसे माझा । अधर्मे वर्तला तात तुझा । परिणाम त्याचा हो होय ॥८२॥
पाप वाढतां अपार । मज भूमीसि होतो भार । तेणें जगीं अनिवार । प्राप्त होती संकटें ॥८३॥
अवर्षन दुष्काळ । अग्निभय व्याधि वादळ । भूकंपादि प्रलय सकळ । उत्पात वाढती ॥८४॥
आतां ठेवूनि सद्वर्तन । प्रजेचें योग्य पालन । करिशील तरी देश संपन्न । होईल जाण निश्चयें ॥८५॥
पर्जन्य पडेल पुष्कळ । गाई देतील दुग्ध विपुल । फुलें फळें धान्यादि सकल । होईल वस्तुसमृद्धी ॥८६॥
ऐकूनि पृथ्वीची वाणी । संतोषला राजा मनीं । तदनुसार सद्वर्तनीं । वागूनि राज्य सुधारिलें ॥८७॥
मग पृथुरायें इंद्रपद । प्राप्त व्हावया अश्वमेध । यज्ञ करितां केला विरोध । अनेक वार शचिवरें ॥८८॥
तेव्हां ऋशि वदले राया ऐक । तूं इंद्राहूनि अससे अधिक । तरी भजावें भक्तिपूर्वक । यज्ञ सोडूनि श्रीहरीतें ॥८९॥
त्यांतचि तुझें थोर कल्याण । वात्सल्यें करावें प्रजापालन । करितां स्वधर्माचरण । शतयज्ञपुण्य पावसी ॥९०॥
ऋषिआज्ञेचा सादर । करुनिया स्वीकार । नृप वागे तदनुसार । सुखी केलें प्रजेसी ॥९१॥
त्यासी होऊनि देव प्रसन्न । केली तयाची इच्छा पूर्ण । पुत्रासी देऊनि सिंहासन । आपण गेला तपातें ॥९२॥
भागवत ग्रंथ प्रसिद्ध । तेथील सार सुबोध । गातसे गोविंद सानंद । बालहिताकारणें ॥९३॥
याचें करिता श्रवण पठण । आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण । प्राप्त होय विद्या धन । ऐसें वरदान व्यासाचें ॥९४॥
इति श्रीलघुभागवते तृतीयो‍ऽध्याय: ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥