गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 23 एप्रिल 2022 (08:49 IST)

मारुती स्तोत्र आणि हनुमान चालिसा यांच्यातील फरक जाणून घेऊ या

hanuman bahuk path
आपण या दोन्ही रचना काय आहेत आणि या दोन्ही रचनांमधील फरकही जाणून घेऊ या .हनुमान चालिसा आणि मारुती स्तोत्रातील सर्वांत महत्वाचा फरक म्हणजे भाषा.
 
हनुमान चालिसा अवधी भाषेत लिहिली गेलीय, तर मारुती स्तोत्र मराठीत. काही दशकांच्या अवधींच्या फरकात वावरलेल्या दोन संतांनी या दोन्ही रचना लिहिल्यात.संत तुलसीदासांनी हनुमान चालिसा, तर संत रामदास स्वामींनी मारुती स्तोत्र लिहिलंय.
 
मारुती स्तोत्र
मारुती स्तोत्र हे 17 व्या शतकात लिहिलं गेलंय. महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत समर्थ रामदास स्वामींनी मारुती स्तोत्राचं लेखन केलंय.
 
मारुती म्हणजे हनुमान. त्यामुळे मारुती किंवा हनुमानाच्या गुणांची स्तुतीपर रचनाच मारुती स्तोत्रात दिसून येते.
 
'भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती...' या पंक्तीनं मारुती स्तोत्राची सुरुवात होते.
 
खरंतर मारुती किंवा हनुमानाच्या स्तोत्रांचीही अनेक रूपं आहेत. मात्र, त्यातील रामदास स्वामींनी लिहिलेलं स्तोत्र विशेष करून प्रसिद्ध आहे.

 "समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात 11 ठिकाणी मारुती मंदिरं स्थापन केली. त्या काळात मोठ्या भूभागावर मुघलांची सत्ता होती आणि अशावेळी लोकांना शक्तीची उपासना शिकवण्याची गरज निर्माण झाली होती. याकरता समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाचं स्तोत्र लिहिलं. असा सरळ सरळ उद्देश मारुती स्तोत्रामागे दिसून येतो."

"मारुती किती विशाल आहे, भारदस्त आहेत, शूर, रक्षणकर्ते आहे याची प्रचिती ते स्तोत्रातून देतात. तो असताना आपल्याला भीती नाही अशी जाणीव ते करुन देतात. शक्तीशाली असला तरी रामाचं दास्यत्व त्यानी पत्करलंय, तो विनम्र असल्याचंही ते सांगतात. मारुती स्तोत्र आणि मारुतीच्या आरतीमधून सर्व चित्र डोळ्यासमोर उभं राहातं अशी शब्दयोजना रामदासांनी केली आहे. त्या शब्दांचं सौष्ठव स्तोत्र म्हणतानाच जाणवतं."
 
हे स्तोत्र गेय आणि मराठीत असल्यामुळे म्हणायला, पाठ व्हायला अत्यंत सोपं आहे.
 
हनुमान चालिसा
हनुमान चालिसा संत तुलसीदासांनी लिहिलीय. हिंदीची बोलीभाषा असलेल्या अवधी भाषेत हनुमान चालिसाचं मूळ लेखन करण्यात आलंय.
 
तुलसीदास जन्मस्थान हे आताच्या उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात आहे. तुलसीदासांनी भारतभर भ्रमंती केल्याचे सांगितले जाते.
 
श्रीरामरचितमानस ही त्यांच्या नावावरील प्रसिद्ध रचना आहे. त्यामुळे ओघानेच हनुमानावरही त्यांनी लिहिलं.
"संत तुलसीदासांनी रामचरितमानस लिहिलं. ती पूर्णपणे रामकथा लिहिलीय. रामकथा म्हटल्यावर ओघानं हनुमान येणारच होता. पण तुलसीदासांनी लिहिलेली हनुमान चालिसा ही केवळ भक्तिभावाकडे जाणारी आहे.
 
"कुठलीही भीती वाटल्यास हनुमान चालिसा म्हणण्याचा प्रघात आपल्या भारतीय समाजात दिसून येतो. हनुमान चालिसा म्हटल्यास मनातली भीती निघून जाते, असं मानलं जातं."
 
हनुमान चालिसाची सुरुवात दोह्यांनी होते आणि नंतर चौपाई आहेत. हे एकूण 40 चौपाई किंवा श्लोक आहेत. म्हणूनच हनुमान चालिसा म्हणटलं जातं, असंही अनेकांचं म्हणणं आहे.
 
जय हनुमान ज्ञान गुन सागर
जय कपीस तिहुँ लोक उजागर॥१॥
अशी हनुमान चालिसाची सुरुवात आहे. या सुरुवातीआधी दोन दोहे आहेत.
 
एकूणच मारुती स्तोत्र 17 व्या शतकात, तर हनुमान चालिसा 16 व्या शतकात लिहिली गेलीय.आयुष्यात जीवन-मरणाचा प्रश्न उभा राहतो, त्यावेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी हनुमान चालिसा वाचली जाते. "तुम्ही अत्यंत समर्पण वृत्तीनं हनुमान चालिसा म्हटलीत, तर तुमच्यावरील संकट दूर होतं."मारुती स्तोत्र हे समर्थ रामदासांनी लिहिलंय. त्यांनी मारुतीची 'बलोपासना' केली. त्याचबरोबर त्यांनी भक्तीला कमी लेखलं नाही. कारण रामदासांचं सर्व लेखन हे भक्ती, शक्ती आणि युक्ती या तिन्हींनी युक्त आहे. मात्र, मारुती स्तोत्र हे बलोपासनेसाठी लिहिलंय."