शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 27 नोव्हेंबर 2019 (16:49 IST)

मार्गशीर्ष गुरुवार व्रत, या प्रकारे पूजा केल्याने महालक्ष्मी होईल प्रसन्न

मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार विशेष असतो. स्त्रिया कुटुंबासाठी सुख-समृद्धी, शांती, ऐश्वर्य प्राप्तीची कामना करत या दिवशी महालक्ष्मीचं व्रत करतात. 
 
मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी शास्त्रोक्त पूजा केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं. उद्यापनाच्या दिवशी सवाष्ण स्त्रियांना बोलावून हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात. तर जाणून घ्या कशा प्रकारे करावी पूजा. 
 
पूजा विधी
 
पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी.
रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग ठेवावा. चारीबाजूला रांगोळी काढावी.
चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाची रास घालून त्यावर तांब्याचा कळश ठेवावा.
कळशाला बाहेरून हळद-कुंकवाचे बोटं लावावे.
कळशात दूर्वा, पैसा आणि सुपारी घालावी. 
विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा. 
चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे.
त्यापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा.
लक्ष्मीसमोर दिवा लावावा.
लक्ष्मीची षोडशोपचार पूजा करावी.
देवीला कमळाचे फूल अर्पित करावे.
लक्ष्मी पूजनानंतर सर्व कुटुंबासमवेत श्री महालक्ष्मी व्रत कथा वाचावी आणि आरती करावी. 
श्री लक्ष्मी नमनाष्टक वाचावे.
यादिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा. 
मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी.
संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करुन नैवेद्य दाखवावे.
गायीसाठी एक पान वेगळं काढावे.
नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे.
 
दुसर्‍या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे, किंवा तुळशीच्य झाडाला घालावे. पाने घरातील चोर बाजूला ठेवून द्यावे नंतर निर्माल्यात टाकावे.
शेवटल्या गुरुवारी पाच कुमारिका किंवा पाच सवाष्णींना बोलावून हळद-कुंकू, फळं, दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा.