गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

रुक्मिणी स्वयंवर प्रसंग पंधरावा

श्रीगणेशाय नम: । शुद्धमतीने सगळे । न फोडितां रांधिले कोहळे । चवी आले सोहंमेळें । स्वाद गोपाळें जाणिजे ॥ १ ॥
धालेपणाचे ढेंकर । स्वानंदे देती जेवणार । गोडी नीत नवी अपार । कृष्णदातार जे पंक्ती ॥ २ ॥
स्वाद घेतला जेवणारें । जेवितां कोणी न म्हणे पुरे । गोडी घेतली शार्ङ्गधरें । भाग्यें उदार शुद्धमती ॥ ३ ॥
सावध शुद्धमती वाढी । यादवां तृप्ति झाली गाढी । ब्राह्मणांची शेंडी तडतडी । धोत्रें बुडीं ढिलविती ॥ ४ ॥
भीमक करताहे विनंती । अवघ्यां झाली परम तृप्ती । उष्टावणलागी श्रीपती । ठायीं ठेविती निजमुद्रा ॥ ५ ॥
देखोनि आनंदली शुद्धमती । भीमकीभाग्य वानूं किती । कृष्णमुद्रा चढली हातीं । शेषप्राप्ती निजभावें ॥ ६ ॥
कृष्णपंक्ती जे जेविले । ते सवेंचि संसारा आंचवले । कृष्णरंगें सुरंग जाले । विडे घेतले सकळिकी ॥ ७ ॥
कृष्ण देखोनिया डोळां । भीमकीच्या सख्या सकळा । विस्मित राहिल्या वेल्हाळा । आणिक डोळां नावडे ॥ ८ ॥
कृष्णउच्छिट घेऊनि हातीं । वेगें निघे शुद्धमती । संतोषोनिया श्रीपती । प्रसाद देती निजमाळा ॥ ९ ॥
कृष्णप्रसाद सुमनमाळा । शुद्धमती घाली गळां । लाज विसरोनि वेल्हाळा । चरणकमळा लागली ॥ १० ॥
कृष्णास रुखवत शेवती । देतां न कळे दिवसराती । ज्योतिषी रायातें म्हणती । उदयप्राप्ति हो आली ॥ ११ ॥
वेगी मंडपासी चला । घडवटें आधीं घाला । उशिर न लावा जी फळा । यादवां सकळां सांगिजे ॥ १२ ॥
नमस्कारूनियां श्रीपती । मंडपा आली शुद्धमती । उष्टावण भीमकी हातीं । परम प्रीती दीधलें ॥ १३ ॥
कृष्णप्रसाद धरिला माथां । भीमकी झाली रोमांचिता । चित्त विसरलें सावधानता । कृष्णशेषें ॥ १४ ॥
जंव जंव कृष्णशेष सेवी । तंव तंव समाधिसुखा वांकुल्या दावी । बाप भाग्याची पदवी । स्वर्गी देवीं वानिजे ॥ १५ ॥
कृष्णमुद्रा ह्रदयीं धरी । अभिवंदूनियां शिरीं । मग घातली कराग्रीं । लोण उतरी शुद्धमती ॥ १६ ॥
चढोनि परिचियें उपरी । सद्‌गुरु सावधान करी । घटिका प्रतिष्ठिली अंतरीं । जीवनावरी सखेच्या ॥ १७ ॥
घडी जेंगटातें हाणत । जेंगट तेणें नादे गर्जत । काळ गेला रे गेला म्हणत । वेळ व्यर्थ जाऊं नेदी ॥ १८ ॥
अक्षर निमिष पळेंपळ । घटिका भरतां न लगे वेळ । लोक व्यापारें बरळ । गेला काळ नेणती ॥ १९ ॥
सद्‍गुरु सांगे भरली घडी । उगेंचि पाहाती वर्‍हाडी । ज्यासी निजकार्याची तातडी । ते घडिया घडी साधिती ॥ २० ॥
आळसी लोक निद्रापार । निजमंडपी कृष्ण सादर । विस्तारवी फलसंभार । नानाप्रकार मेचूचे ॥ २१ ॥
शून्य सांडूनि विरजांबर । चिद्रत्‍नाचे अलंकार । पदकी नीळ मनोहर । जो शृंगार ह्रदयीचा ॥ २२ ॥
अहंकाराचें बीज भरडी । मोहममतेचा कोंडा काढी । सोलींव डाळींचीं परवडी । भरली दुरडी श्रद्धेची ॥ २३ ॥
विवेकचाळणियां चाळिली । कणीक आणिली तेजाळी । निवडूनि स्वानंदाची नव्हाळी । ठेविली गुळी निजगोडी ॥ २४ ॥
देठीहूनि सुटलीं फळें । अत्यंत परिपाकें निर्मळें । मधमधीत सुपरिमळें । सूफळ फळें रुक्मिणी ॥ २५ ॥
अत्यंत पढिये भीमकबाळा । गुणेंवीण सुमनमाळा । अंगें गुंफी घनसांवळा । हार गळा आणि जाळी ॥ २६ ॥
सौभाग्यद्रव्यें ठेविली आधीं । धनींपणें धणे हळदी । जिरें मेळविलें त्यामधीं । जेवीं सद्‌बुद्धि विवेक ॥ २७ ॥
गांठी सांडिल्या सोडोनि । घेतला सूक्ष्म तंतू काढोनी । श्रीकृष्ण वोवी कृष्णमणी । ते रुक्मिणी गळसरी ॥ २८ ॥
सांडोनि कठिणत्वाचें बंड । केवळ रसाचे प्रचंड । कृष्णें कृष्णवर्ण इक्षुदंड । अति उदंड आणिले ॥ २९ ॥
बीजेंवीण वाढलीं फळें । एक त्वचेवीण रसाळें । चमत्काराचीं निर्मळें । कृष्ण फळें विस्तारी ॥ ३० ॥
फळ विस्तारले प्रबळ । यादव शृंगारले सकळ । भेरी त्राहाटिल्या मांदळ । निशाणें ढोल लागले ॥ ३१ ॥
अनर्घ्य लुगडीं आणि लेणीं । लेऊनि निघाल्या वर्‍हाडिणी । चारी बारा सोळाजणी । चौघीजणी तयांपुढें ॥ ३२ ॥
जीवशिवां वडिल मान । तैसे वसुदेव उग्रसेन । संतोषोनि संकर्षण । करी परिपूर्ण याचकां ॥ ३३ ॥
एका दिधलें कांहीं एक । एका दिधलें अनंत सुख । चिद्रत्‍नें अलोलिक । देऊनि याचक सुखी केले ॥ ३४ ॥
फळ चालिलें गजरें । ढळती रत्‍नदंड चवरें । झळकती पालवछत्रें । दशविध तुरें वाजती ॥ ३५ ॥
जैसी श्रद्धा आणि शांती । तैसी सुभद्रा आणि रेवती । मुख्यपणें माजी मिरविती । घेतल्या बुंथी पाचूच्या ॥ ३६ ॥
नानापरींच्या घेतल्या बुंथी । तरी अंतरशोभा बाह्य फांकती । अलंकारल्या निजवृत्ती । त्या न झांकती झाकिल्या ॥ ३७ ॥
फळ समीप आलें देखा । ऎसें जाणवलें भिमका । तो सावधान अतीनेटका । भावें बैसका घातली ॥ ३८ ॥
साउमा येऊनि आपण । वसुदेवादि उग्रसेन । नमस्कारूनि संकर्षण । भीतरीं जाण आणिलें ॥ ३९ ॥
विचित्र घातलीं आसनें । सुकुमार मृदुपणें । गाद्या पडगाद्या टेंकणें । वोठंगणें मृदोळिया ॥ ४० ॥
भीतरें आलिया वर्‍हाडिणी । शोभती जैशा दिव्य योगिनी । फळ मांडिलें विस्तारोनी । भावे रुक्मिणी हरिखेली ॥ ४१ ॥
पीठ स्थापिलें कुसरीं । शृंगारोनियां नोवरी । वेगें आणिली बाहेरी । मंत्रोच्चारीं द्विजवरीं ॥ ४२ ॥
पाहतां भीमकीचें रुपडें । अरूपरूपें तेज गाढें । मंडपामाजी उजियेड पडे । आणिकेकडे पाहों नेदी ॥ ४३ ॥
नानारूपाचेनि प्रकाशें । अवघी भीमकीच भासे । देखोनि जीव भुलले कैसे । डोळियां पिसें लाविलें ॥ ४४ ॥
उभवूनि स्वरुपठसा । भुलविलें आदिपुरुषा । एकाएकीं धांविन्नला कैसा । कृष्ण पिसा इणें केला ॥ ४५ ॥
कृष्ण शहाणपणें अतिगाढा । तोही भीमकिया केला वेडा । वोढूनि नेला आपुलेकडा । दुजें पडिपाडा इसी नाहीं ॥ ४६ ॥
भीमकी लावण्याची राशी । कृष्णरूपा भाळली कैसी । सांडूनि जातिकुळासी । कृष्णरूपासी निवटली ॥ ४७ ॥
भीमकी कृष्णायोग्य सहजें । कृष्णवर इसींच साजे । यासारिखें न देखों दुजें । बोलों लाजिजें बोलतां ॥ ४८ ॥
पाहतां भीमकीची रूपरेखा । टक पडिलें सकळिकां । कृष्ण पारखी गे निका । जोडा नेटका मेळविला ॥ ४९ ॥
गोरेपणें अतिसुंदर । विशाळ नयन भाळ थोर । अंगें सर्वांग सुकुमार । मनोहर उभारा ॥ ५० ॥
कृष्ण साधावया निधान । नेत्रीं सूदलें अंजन । पाहतां भीमकीचें वदन । विकल्प मन करूं नेणे ॥ ५१ ॥
भुंवया सुरेख सरळ नासिक । गंडस्थळीं तेज अधिक । नाकींचें मोति जडितमाणिक । तेणें श्रीमुख शोभतसे ॥ ५२ ॥
सरळ बाहू सुपोष । कोंपर मनगटें कळास । पांचां आंगोळियां विन्यास । कळन्यास मुद्रिका ॥ ५३ ॥
सुरंग तळवे आणि तळहात । अधरबिंब अति आरक्त । बोलीं मधुरता तळपत । तेणें झळकत दंतपंक्ती ॥ ५४ ॥
कटिप्रदेशें शोभत जघन । माज अतिशयेंसीं सान । घोंटी कळाविया सुलक्षण । बरवेपण पाउलां ॥ ५५ ॥
माथां मोतिलग जाळी । इळके फरातळीं हांसळी । मिरवे भांग टिळा कपाळीं । तेज झळाळी तानवडां ॥ ५६ ॥
नेसली क्षीरोदक पाटोळा । त्यावरी रत्‍नांची मेखळा । सुनीळ कांचोळी वेल्हाळा । लेइली माळा मोतिलग ॥ ५७ ॥
गंगातीरीं चक्रवाकें । तेवीं कुचद्वय सुरेखें । ह्रदयीं घननीळ झळके । शोभां पदकें दाविजे ॥ ५८ ॥
नाकींचें झळकत सुपाणी । तेणें शोभली रुक्मिणी । शोभा आली बाहुभूषणीं । रत्‍नकंकणी कळाविया ॥ ५९ ॥
चरणीं गर्जती नुपुरा । भुलोनि मदन आला उदरा । तेही भुलली शार्ङ्गधरा । कृष्णवर वरावया ॥ ६० ॥
नाहीं लग्नास व्यवधान । वेगीं करा फळार्पण । उठोनि वसुदेव आपण । करी पूजन भिमकीचें ॥ ६१ ॥
पहिलें करावें गणेशपूजन । तंव गणेश वंदी कृष्णचरण । कृष्णचरणीं समाधान । गजवदन तुष्टला ॥ ६२ ॥
कृष्णपुरोहित निष्काम । न करिती कलशपूजेचें काम । नवरीचे उपाध्ये सकाम । पुरुषार्थ परम त्यां दिधला ॥ ६३ ॥
वस्त्रें अर्पूनि सुंदरी । वेगीं नेली अभ्यंतरीं । मायावसन त्याग करी । अंगीकारीं श्रीकृष्णनिवास ॥ ६४ ॥
फेडूनि मायेचीं परिधानें । लेइली कृष्णमय लेणें। भीमकी अत्यंत शोभली तेणें । निंबलोण जिवेंभावें ॥ ६५ ॥
सवेंचि आणिली बाहेरी । डोळां न पाहवे सुंदरी । दृष्टी जातसे चाचरी । आधार धरी धैर्याचा ॥ ६६ ॥
कृष्णीं विनटली वाडेंकोडें । ती कवणाचे दृष्टी न पडे । भाग्य वसुदेवाचें गाढें । तयापुढें बैसविली ॥ ६७ ॥
कृष्णें पाठविलें फळ । नि:शेष अर्पिले सकळ । मस्तकीं घरी भीमकबाळ । जन्म सफळ येणें फळें ॥ ६८ ॥
फळें वाढिले प्रबळ । झाले वर्‍हाडी सफळ । हातां आलें कृष्णफळ । खूण प्रेमळ जाणती ॥ ६९ ॥
भीमकीसी म्हणे पुरोहित । वरासी मूळ निघा त्वरित । यादव परतले समस्त । गुण वर्णीत भीमकीचे ॥ ७० ॥
वर्‍हाडिणी सांगती गोष्टी । सगुणगुणाची गोमटी । भीमकी ऎसी नाहीं सृष्टीं । कृष्ण जगजेठी पारखी ॥ ७१ ॥
यासी माया म्हणे वेडा । परी हा देखणा चोखडा । कैसा मिळविला जोडा । निजपडिपाडा समत्वें ॥ ७२ ॥
आदिकुमारी घेऊनि जाण । कृष्णासी तेल लावी आपण । बांधोनि दृश्याचें कंकण । जीवें जीव म्हणतसे ॥ ७३ ॥
तिची करावया बोळवण । कृष्णाआंगी आंगवण । येरा न कळे महिमान । जुनाट जाण वृत्ती तिची ॥ ७४ ॥
लग्न साधावया चक्रपाणी । भीमक हांकी वर्‍हाडिणी । शुद्धमतीसहित सुवासिनी । चालती निशाणी गर्जत ॥ ७५ ॥
नाना वाजंत्रीचिया ध्वनी ध्वनी । नाद न समाये गगनी । मधुर शब्दांचिया किंकिणी । गोडपणें गर्जती ॥ ७६ ॥
घेऊनि पूजेचे संभर । ठाकिले विवाहमंडपद्वार । भीमकें केला अति आदर । वेगें वर आणावा ॥ ७७ ॥
सहजेंचि नेटुगा दातुगा । फेडावेडी नाहीं श्रीरंगा । सभे बैसविला समचौरंगा । नयनभृंगा आल्हादू ॥ ७८ ॥
दृष्टी जडली कृष्णरूपासी । परतोन न ये दृश्यापाशीं । पारणें होतसे डोळ्यासी । कृष्णसुखासीं भोगिती ॥ ७९ ॥
कृष्ण देखोनि धाले नेत्र । देताति तृप्तीचे ढेंकर । तरी भुकेले अपार । वारंवार हरि पाहती ॥ ८० ॥
शुद्धमतीने आपण । कृष्णासी आणिलें तेलवण । सुखसेवयांचे लाडू जाण । तें गोडपण हरि जाणे ॥ ८१ ॥
सोलींव विवेकांचे तिळवें । स्थूळ ना सूक्ष्म अति बरवें । बांधा बांधिले अतिस्वभावें । निजभावें विस्तारी ॥ ८२ ॥
फोडोनि चार्वाकचारें । निजबीज काढिलें बाहिरें । चारोळियांचे लाडू साजिरे । श्रद्धासाखरे आळिले ॥ ८३ ॥
आणोनि सडियेली खसखस । धुवोनि सांडिली घसघस । लाडू वळिले सावकाश । अतिसुरस श्रीरंगा ॥ ८४ ॥
अष्टदळ कमळाचें बीज । फोडूनि सोलोनि काढिलें निज । लाडू वळिले सहज । दाखवी वोज शुद्धमती ॥ ८५ ॥
वरिवरि वैराग्याचे कांटे । भीतरी अमृताचे साटे । फणस फॊडूनि चोखटे । काढी गोमटें निजबीज ॥ ८६ ॥
त्याची अवीटतेची गोडी । लाडू वळिले आवडी । शुद्धमती दावी परवडी । प्रीती गाढी हरिचरणीं ॥ ८७ ॥
वरिवरीं दिसती साजिरे । आंत पाहतां आंबट बोरें । त्यांच्या आठोळिया फोडूनि निर्धारे । काढिलें साजिरें निजबीज ॥ ८८ ॥
घालूनि समतेचा गूळ गोडू । त्या बीजाचे वळले लाडू । कृष्ण करूं जाणे निवाडू । पडिपाडू स्वादाचा ॥ ८९ ॥
कृष्णालागीं तेलवणें । आणिलीं कडकडीत कडकणें । फुटलें तुटलें द्वंद्वपणें । रजोगुजें तळियेलें ॥ ९० ॥
वांकुढे कानवले तेलवणें । कृष्णासी आणिलें कवणें गुणें । मुरडी मुरडिले अनुसंधानें । गोडपणें अंतरीं ॥ ९१ ॥
शुद्धमतीनें आपण । कृष्णासी वाहिलें तेलवण । वस्त्रें अलंकार संपूर्ण । परिपूर्ण स्वानंदे ॥ ९२ ॥
तेलवणाचा विस्तार । किती वाढवावा उपचार । होईल लग्नासी उशीर । वर सत्वर चालों द्या ॥ ९३ ॥
शुद्धसत्त्वाचा श्वेत वारू । त्यावरी चढिन्नला कृष्णवरू । झाला वाद्यांचा गजरू । मंत्रोच्चारू द्विजांचा ॥ ९४ ॥
आठही भाव होऊनि गाढे । वारू धरिला दोहींकडे । छंदे चालती कृष्णापुढें । आणिकेकडे न चालती ॥ ९५ ॥
निजबोधाचें आतपत्र । शिरीं तन्मयचें छत्र । पहावया कृष्णवक्त्र । येति सत्वर नरनारी ॥ ९६ ॥
मदें गर्जती अतिगंभिर । अनुभव स्वानंदाचे थोर । दोहीं बाहीं जी कुंजर । सालंकार पतकी ॥ ९७ ॥
चंद्रकिरण अतिसाजिरे । तैशीं अतिशुभ्र चामरें । रत्‍नदंडी सहजाकरें । मनोहरे ढळताती ॥ ९८ ॥
कृष्णे सोडिल्या त्याग देउनी । अष्टमहासिद्धी नाचणी । नाचताती चपळपणीं । देखोनि जनीं भुलीजे ॥ ९९ ॥
सिद्धी नाचतां देखती जेथे । जन मीनले त्याभोंवते । पाहोनि विसरले कृष्णातें । नाचणीतें भुलले ॥ १०० ॥
चैतन्यबुका घाली वनमाळी । ज्यासी लागे तोचि परिमळी । देत खुणेच्या अंजली । पसेदान याचकां ॥१॥
कृष्णरंगें सुरंग विडे । वांटिताती वाडेंकोडें । जो राहिला मागिलकडें । त्यासी न चढे तो रंग ॥ २ ॥
ऋग्वेदादि सामगायन । गर्जती वेद बंदीजन । त्या शब्दाची निजखूण । सत्य श्रीकृष्ण जाणता ॥ ३ ॥
सत्त्वें सात्त्वीक जगजेठी । घेऊनि विवेकाचि वेताटी । दृश्य गलबला मागें लोटी । कृष्ण दृष्टी पहावया ॥ ४ ॥
कृष्णासी आवडती अतिप्रीती । ते वैष्णव रंगीं नाचती । सांडूनि अहंसोहवृत्ती । नृत्य करिती निजबोधें ॥ ५ ॥
कृष्णासवें सुवासिनी । शांति क्षमा दया उन्मनी । आल्या सुखासनीं बैसोनि । वरासनीं सुभद्रा ॥ ६ ॥
निर्धारूनियां तत्त्वतां । निजबोधाच्या अक्षता । घालिती कृष्णाचिया माथां । लक्ष सर्वथा न चुकती ॥ ७ ॥
उग्रसेन वसुदेव । वहनीं चढले यादव । अवघ्यांपुढें बळीदेव । महोत्साव करीतसे ॥ ८ ॥
सोयरे कृष्णाचे निजभावी । भक्त योगी ज्ञानी अनुभवी । तयांसी वाहनें बरवी । कृष्णदेवें दिधलीं ॥ ९ ॥
एका सलोकतेचा वारू । एकासी समीपतारहंवरू । एकासी स्वरूपताकुंजरू । महा थोर भद्रजती ॥ ११० ॥।
एका दिधलें अमोल । सायुज्यता चवरडोल । त्याचा अनुभव सखोल । निजात्मबोल हरी जाणे ॥ ११ ॥
तयासी सर्वथा श्रीहरी । आपणावेगळें क्षणभरी । कोठें जाऊं नेदी दूरी । सरोभरि निजभावें ॥ १२ ॥
वर्‍हाड राखावया निगुती । गुणावतार गुणमूर्ती । करणें मारणें धरणें स्थिती । तिघां हाती भरभारू ॥ १३ ॥
तयां तिघांमागिलेकडां । कृष्ण पुरुष अतिगाढा । दोहीं पक्षी देखणा फुडा । भार वर्‍हाडा त्या माथां ॥ १४ ॥
वर्‍हाडाची घडामोडी । कृष्णाआंगीं नलगे वोढी । अवघे पर बाहिरे दवडी । ऎसी परवडी रचियेली ॥ १५ ॥
विचारितां निजनिवाडीं । कृष्णावीण अर्धवडी । इकडील तिकडे नव्हे काडी । वृथा वेडीं बलगती ॥ १६ ॥
भरूनि रजतमाचें औषध । करूनि अग्नियंत्र सन्नद्ध । कृष्णापुढें अतिविनोद । एक प्रबुद्ध दाविती ॥ १७ ॥
अग्नि लावूनि ठायीं ठायीं । ममता जाळिती हवायी । गगना उसळली पाही । धुपोनि ठायीं निमाली ॥ १८ ॥
मोहयंत्रीं सुमनमाळा । अग्निपुष्पे भासती डोळां । फुलें म्हणती अबला । पाहतां डोळां ते राख ॥ १९ ॥
अतिलोभाच्या चिचुंदरी । अग्नि लावूनि टाकिती दूरी । पेटल्या पडती जनांवरी । उरीं शिरीं जाळिती ॥ १२० ॥
देऊनि उपशम-अनळा । जाळिती क्रोधाचा भुईनळा । भडभडां निघती ज्वाळा । तोही निमाला तात्काळ ॥ २१ ॥
हातीं धरूनि कृष्णलीला । जाळिती कामाचा हातनळा । धरूं नेणती त्या अबळा । जीवीं जिव्हाळा पोळत ॥ २२ ॥
पाहतां अत्यंत कठीण । चिन्मात्र अग्नि देऊनि जाण । सांडिती अहंकाराचे बाण । पळे जीवपण दचकोनी ॥ २३ ॥
मदमत्सरधूम्रमेळें । एकाचें झांकले जी डोळे । देहबुद्धीचीं भेडें सकळें । विषयबळें पळालीं ॥ २४ ॥
स्वानुभवाचे महाथोर । उठावले जी कुंजर । रगडूनि अहंकाराचा दूर । निरंतर डुल्लती ॥ २५ ॥
सवेंचि निजतेजचंद्रज्योति । उजळली जी अवचित्तीं । प्रकटली परम दीप्ती । तेही स्थिती परियेसा ॥ २६ ॥
नि:शेष अंधार नाहीं जेथ । उष्णचांदणीयाहूनि अतीत । तेज प्रकटलें अद्‌भुत । संतोषत श्रीकृष्ण ॥ २७ ॥
पदोपदीं नाना त्याग । करीत चाले श्रीरंग । वोंवळण्या जी अनेग । दोहीं भागीं पडताती ॥ २८ ॥
कौतुक दावावया श्रीपती । कपटमहामोहाचा हस्ती । आणूनि पुढा उभा करिती । भद्राजाती मातला ॥ २९ ॥
नेणती त्याची लटकी कळा । देखोनि भय उपजे सकळां । कोण पुरे त्याच्या बळा । चळचळां कापती ॥ १३० ॥
महामदे झाला मस्त । अहंकारें अतिगर्जत । अव्हासव्हा जी धांवत । लोकांआंत निजबळे ॥ ३१ ॥
भेडांपाठीं अधिक लागे । तंव ते सरती मागें । अंधकूपीं पडतीं वेगें । मागते निघों नेदी तों ॥ ३२ ॥
भेडें लटकींच रगडी । तेणें चरफडती बापुडीं । एकीं त्या भेणें झोंपडी । जीवेंभावें धरियेली ॥ ३३ ॥
ऎसा जनांसी लाविला धाक । तंव कृष्णे खुणाविला सेवक । लाता हाणोनिया देख । कपटवेष मोडिला ॥ ३४ ॥
धारणाधायें कपट झोडी । भवगज हे गोष्टी कुडी । ऎसी देखणी दृष्टी ज्या चोखडी । भवभयवोढी त्या नाहीं ॥ ३५ ॥
चतुर्विधा प्रसिद्ध दासी । शकुनालागीं ह्र्षीकेशी । उभ्या परिपूर्णकलशेंसीं । महाद्वारासी तिष्ठत ॥ ३६ ॥
कृष्णभांडार तें अनंत । अखंड श्रीकृष्णासवें चालत । पाहोनियां शुद्ध भावार्थ । उचित पदार्थ हरि देत ॥ ३७ ॥
श्रद्ध कीर्ती धृति विरक्ती । त्याही दासी अति तिष्ठती । श्रीकृष्णवासातें वांछिती । जाणे श्रीपती मनोगत ॥ ३८ ॥
जें जें काहीं त्या मागत । तें तें कृष्णनाथ देत । त्याहूनि अधिक दे समर्थ । महाद्वारांत प्रवेशला ॥ ३९ ॥
अंतरीं प्रवेशला कृष्णवरू । सकळां स्वानंद झाला थोरू । अवघे करिती जयजयकारू । बैसकारू झाले तदा ॥ १४० ॥
सिद्धसामग्री मधुपर्कासी । विष्टर दिधला ह्रषिकेशी । साम्यतेचिया चौरंगासी । श्रीकृष्णासी बैसविलें ॥ ४१ ॥
सांडूनि फळाशा समस्त । अर्घ्य अर्पिलें सफळित । सुर नर कौतुक पाहात । सिद्ध समस्त तेथें आले ॥ ४२ ॥
पाद्यालागीं आणिलें तीर्थ । त्रिगुणत्रिवेणी अतीत । चैतन्यप्रवाहें शोभत । यथोचित मनकर्णिका ॥ ४३ ॥
उदक घाली शुद्धमती । चरण प्रक्षाळी नृपती । जेथोनि तीर्थाचि उत्पत्ती । ते पूजिती श्रीचरण ॥ ४४ ॥
चरणप्रक्षाळणा ठेविलें अंबू । तंव पातला तीर्थकदंबू । आम्हांसी लाभों द्या एक थेंबू । चरणांबू श्रीहरीचा ॥ ४५ ॥
मूळमाधवीं जाऊनि पाहें । कदंबतीर्थ अद्यापि आहे । भाग्यवंत तो तेथें नोहे । कृष्णपाये तें तीर्थ ॥ ४६ ॥
शुद्धमतीनें आपण । कृष्णासी दिधलें आचमन । तीन वेळां न करी जाण । सर्वापोशन एक वेळां ॥ ४७ ॥
ब्रह्मपदींचा अधिष्ठाता । त्यासि देती ब्रह्मसूत्रा । मान दे तो वेदविचारा । श्रुतिव्यवहार संरक्षी ॥ ४८ ॥
चंदन पुष्पें टिळे माळा । भावें पूजिला घनसांवळा । आनंद भीमकभूपाळा । परब्रह्म डोळां देखत ॥ ४९ ॥
हस्तमात्रा कर्णमात्रा । कृष्णासी वोपिल्या विचित्रा । बाहुभूषणें जडित मुद्रा । पीतांबर अर्पिलें ॥ १५० ॥
दधि मधु एकत्रता । करीं घातलें अच्युता । मेहुणे म्हणती कृष्णनाथा । लाज सर्वथा न धरावी ॥ ५१ ॥
गोकुळीं चोरूनि दधि खातां । तुम्हांसी लाज नाहीं सर्वथा । आम्हीं निजभावें अर्पितां । कां लाजता निजचोरा ॥ ५२ ॥
सलज्ज हांसे शुद्धमती । वर्‍हाडी वर्‍हाडिणी हांसती । निष्कर्मासी कर्मप्राप्ती । जन वदती विपरीत ॥ ५३ ॥
भीमक म्हणे ‘प्रतिगृह्यत’ । प्रतिगृण्हामि म्हणा अच्युता । टक पडिलें कृष्णनाथा । मग तत्त्वतां विचारी ॥ ५४ ॥
खूण बोलिला कृष्णस्वामी । ‘दान देतों एक आम्हीं’ । हाही भाव सांडूनि तुम्ही । मग प्रतिगृण्हामि सर्वचि ॥ ५५ ॥
संकल्प सोडितां तात्काळ । दधि मधु सेवी गोपाळ । भीमकाचें जन्म सकळ । सफळ कुळ उद्धरिलें ॥ ५६ ॥
देऊनि कृष्णासी आचमन । सवेंचि केलें करक्षालन । गुरु म्हणती सावधान । नाहीं व्यवधान लग्नासीं ॥ ५७ ॥
कृष्णचरण शून्य न पडे । घातले परिपूर्ण पायघडे । श्रीकृष्ण चालविला पुढें । वाडेकोडें लग्नासी ॥ ५८ ॥
भीमकी भावार्थे आइती । पर्णावया निजपती । गौरीहर सहज स्थिती । उपचारप्रीतीं पूजितसे ॥ ५९ ॥
कृष्णासी अंत्रपाट पुढें । बोलतां बोलणें हें कुडे । श्रोते म्हणती न सुचीं झाडे । लग्न निवाडें लागों द्या ॥ १६० ॥
आधींच कृष्णकथा सखोल । त्याहीवरी तुझे रसाळ बोल । जाणसी प्रेमाची बोल । येताती डोल सुखाचे ॥ ६१ ॥
ऎकोनि श्रोतियांचे वचन । आनंदला एक जनार्दन । मनें करूनि लोटांगण । वंदिले चरण निजभावें ॥ ६२ ॥
 
इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणी स्वयंवरे लग्नअतिकालसमयोनाम पंचदश: प्रसंग ॥ १५ ॥
 
॥श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु॥