गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

रुक्मिणी स्वयंवर प्रसंग बारावा

श्रीगणेशाय नम: ॥ निजमंडपीं शिशुपाळ । करीत होता गदारोळ । भीमकी घेऊनि गेला गोपाळ । ऎकोन विकळ पडियेला ॥ १ ॥
पांडुरवर्ण झाले डोळे । मुखींहूनि लाळ गळे । सेवक धरिती आंगबळें । गात्रें विकळें पडियेली ॥ २ ॥
भीमकी अप्राप्तीचे बण । ह्रदयीं लागले दारुण । घायेंवीण घेतला प्राण । अकालमरण वोढवलें ॥ ३ ॥
वोखेटवाणें दिसे मुख । नाडी तुटल्या नि:शेष । कृष्णधाकाची धुकधुक । ह्रदयामाजी उरली असे ॥ ४ ॥
महाशब्द मंडपद्वारीं । मिळालिया नगर-नारी । माता येऊनि रुदन करी । कपाळ करीं पिटीत ॥ ५॥
सिद्धीं नपवेचि गे शोभन । वायां गेले वरमायपण । अंबिका क्षोभली गे जाण । वराचे प्राण वांचोत कां ॥ ६ ॥
थोर वोडवलें दु:ख । न देखेंचि सुनमुख । बुडालें सोहळ्याचें सुख । हरिखीं विख कालविलें ॥ ७ ॥
अगे हा रुक्मिया दुर्बुद्धी । न पाहेचि लग्नशुद्धी । मृत्युपंचकाचे संधी । लग्नसिद्धि मांडिली ॥ ८ ॥
कृष्ण ज्योतिषी गे निका । वश नोहे पांचां पंचकां । काळ साधिला नेटका । सम्यो देखा तो जाणे ॥ ९ ॥
तेणेंचि साधिली गे वेळ । साधोनि नेली भीमकबाळ । आमुचें करंटें कपाळ । आतां शिशुपाळ वांचवा ॥ १० ॥
विलाप करूनि अनेक । शिंपिलें शिशुपाळचें मुख । वारा घालिती एक । झाला नावेक सावध ॥ ११ ॥
उठूनि बैसला एकसरें । श्वास घालता पैं थोरें । दु:ख ह्रदयींचें नावरे । नेत्रद्वारें जळ चाले ॥ १२ ॥
शिशुपाळा आलें रुदन । न धरत चालिलें स्फुंदन । धीरें आवरूनियां जाण । शहाणपणा मांडिले ॥ १३ ॥
नोवरी नेली रे सुंदर । पडिले समर्थासीं वैर । कृष्ण नेटका झूंजार । आणी बळिभद्र महाबळी ॥ १४ ॥
हेच दोघे नावरती । येर यादव ते किती । ऎसें विचारूनि चित्तीं । काय वीराप्रती बोलिला ॥ १५ ॥
सौन्य पालाणा पालाणा । घाव घाला रे निशाणा । रथ संजोगोनि आणा । रणांगणां जाऊं वेगीं ॥ १६ ॥
सन्नद्ध अक्रूनियां दळ । रथीं चढला शिशुपाळ । नगरद्वारा आले सकळ । पुढें घायाळ भेटले ॥ १७ ॥
घायीं तुटले सबळ । अशुद्धें झाले बंबाळ । बणीं भेदलें कपाळ । वीर विकळ पडताती ॥ १८ ॥
वीरी घेतलें घायवारें । म्हणती पळा रे पळा रे । मारिले जाल रे बळीभद्रें । साह्य दुसरें कोणी न ये ॥ १९ ॥
एकीं घेतला भेदरा । एक कांपती थरथरां । करूं नको गा बलिभद्रा । दास डिंगर आम्ही तुझे ॥ २० ॥
एकचे तुटले पैं हात । एकीं विचकले दांत । एक कण्हत कुंथत । तवा देत पैं आले ॥ २१ ॥
एक घायीं जर्जर बहुत । एक हंबत हुंबत । एकांची लोंबती आतें । घायीं कोते अडकलीं ॥ २२ ॥
एक रडत रडत । एक अत्यंत चरफडित । एक पाणी जी मागत । खुणा हात दाउनी ॥ २३ ॥
मस्तक फुटोनि वाहे रुधिर । एकाचें अर्ध तुटले शिर । ऎसाचे घायीं बुडाले तीर । तेणें वीर तळमळतीं ॥ २४ ॥
भले गौरविले वर्‍हाडी । थितीं गेलीं लेणीं लुगडीं । एक नागवी उघडीं । मेलीं मढीं वोढिती ॥ २५ ॥
घायाळा घालोनि वोडणी । धनुष्यदंडाच्या अडणीं । उचलोनि दोघीं चौघीं जणीं । वीरश्रेणी आणिल्या ॥ २६ ॥
एक मार्गी झालें पुरें । एकाचें आणिले खटारें । वीर आपटिले जी वीरें । बळिभद्रे मारिले ॥ २७ ॥
राये खोचले मुगुटाचे । अत्यंत प्राण विकळ त्यांचे । सेवक उचलिती पायांचे । डोळे मोरकुंचे वारिती ॥ २८ ॥
देखोनि दचकला शिशुपाळ । धांकिन्नलें त्याचें दळ । राजे मारिले सबळ । प्रबळ बळ यादवांचे ॥ २९ ॥
युद्धीं झाले पराङ्‌मुख । राजे भंगले अनेक । आले जरासंधादिक । मोडले कटक घेउनी ॥ ३० ॥
भेटला शिशुपाळ सन्मुख । अत्यंत कोमाइलें त्याचे मुख । बुडलें सोहळ्याचें सुख । ह्रदयीं दु:ख भीमकीचें ॥ ३१ ॥
दु:खे मुख काळवंडलें । दोन्ही ओंठ वाळले । लाजा न बोलवे बोलें । तें देखिलें जरासंधें ॥ ३२ ॥
मग म्हणे पुरुषपंचानना । व्यर्थ खेद कां करिसी मना । प्राप्ताप्राप्ताची गणना । आधीन कोणा पैं नाहीं ॥ ३३ ॥
संसार म्हणजे खांबसूत्र । चौर्‍यायंशीं लक्ष पुतळ्या विचित्र। त्यांचा सूत्रधारी ईश्‍वर । त्याचिया इच्छें वर्तिजे ॥ ३४ ॥
आपण राहोनियां दूरी । हालवी प्राचीनाची दोरी । भूतें तदनुसार सारी । निजव्यापारी वर्तती ॥ ३५ ॥
तेथें सुखदु:ख निजतंत्र । मांडूनि ठेविलें स्वतंत्र । ते ते तिये गती पात्र । अहोरात्र होताती ॥ ३६ ॥
येथें यश आलियाचे सुख । अथवा अपेशचें दु:ख । अहंपणें मानिती मूर्ख । कर्ता देख तो नव्हे ॥ ३७ ॥
येथें कर्ता जो मी म्हणे । तो पडे सुखदु:खांचे नागवणे । जन्ममरणांसी अवतणें । दिधलें तेणें सर्वथा ॥ ३८ ॥
अहंकर्तेपणाचा भावो । तोचि सुखदु:खांसी ठावो । जन्ममरणाच निर्वाहो । तेणेंचि पाहाहो होतसे ॥ ३९ ॥
यालागीं अहंकर्तव्यता । मनीं न धरावी सर्वथा । भीमकीप्राप्तीची व्यथा । दुर्गमता येवों नेदी ॥ ४० ॥
म्यांचि पाहें पां केवळ । तेवीस अक्षौहिणी दळ । युद्ध केलें सत्रा वेळ । एक वेळ जयो आला ॥ ४१ ॥
भंग झालियाचे दु:ख । अथवा यश आलियाचे सुख । हें न मानूनियां देख । यथासुखें वर्तावे ॥ ४२ ॥
एवं सुखदु:ख जेम आहे । तें तवं काळाधीन पाहें । तो काळ ज्यासी साह्य होये । तोची लाहे यशातें ॥ ४३ ॥
आजि तुज युद्धासी जातां । यश न ये गा सर्वथा । काळ साह्य श्रीकृष्णनाथा । झाला तत्त्वतां निजबळें ॥ ४४ ॥
काळ साह्य झालेपणीं । प्राप्त झाली बा रुक्मिणी । मजसकट राजे राणी । तृणप्राय जिंकिले ॥ ४५ ॥
तो जंव काळ साह्य नाहीं । तंववरी युद्ध करिशील कायी । वीर झोडिजेतील घायीं । योद्धे ठायी पडतील ॥ ४६ ॥
जंव अनुकूळ नाहीं काळ । तोंवरी काय करिशील बळ । सिद्धी न पवे गा सकळ । श्रम केवळ पावशील ॥ ४७॥
यालागीं धीर धरीं शहाणपणीं । जंव होय काळसाह्याची मांडणी । मग यादव जिंकोन अर्धक्षणीं । केवीं रणीं राहातील ॥ ४८ ॥
यापरी राजमित्र जरासंध । करीत शिशुपाळासी बोध । मग सोडोनि युद्धक्रोध । निजनगरासी निघाला ॥ ४९ ॥
शिशुपाळासी युद्धाआंत । जीवेंचि घेता कृष्णनाथ । आजिचा चुकविला जी अनर्थ । हित मानित मदघोष ॥ ५० ॥
तो म्हणे जरासंधासी । उत्तीर्ण नव्हे उपकारासी । तुवां वाचविले शिशुपाळासी । पुत्रदानासी तूं दाता ॥ ५१ ॥
ऎसें मानुमियां सुख । परतला जी दमघोष । घेऊनि सोयरे सेवक । एकेंएक परतले ॥ ५२ ॥
युद्धीं यादवीं मारितां । राजे उरले जे झुंजतां । तिहीं मानूनियां हिता । मग सर्वथा निघाले ॥ ५३ ॥
घयीं जर्जर नेंओं किती । नागविली सैन्यसंपत्ती । आपुलालिया नगराप्रती । वेगें भूपती निघाले ॥ ५४ ॥
मग परतला शिशुपाळ । राजे चालिले सकळ । रुक्मिया कोपला प्रबळ । सन्नद्ध दळ तेणें केले ॥ ५५ ॥
धुर रणीं होय विन्मुख । तेव्हांचि त्याचें काळें मुख । कवण वांचल्याचें सुख । घेऊनि विख मरावें ॥ ५६ ॥
जरासम्ध शिशुपाळ देखतां । सकल राजेही ऎकतां । उभा करोनि भीमकपिता । थोर गर्जता तो झाला ॥ ५७ ॥
तुम्ही सांडिले पुरुषार्था । मी तंव नेऊ नेदी राजदुहिता । रणी जिणोनि कृष्णनाथा । भीमकी आता आणीन ॥ ५८ ॥
कृष्ण विभांडोनि बाणी । हिरोनि नाणींच रुक्मिणी । तरी स्वधर्म सांडिजे ब्राह्मणीं । मजलागोनी तो दोष ॥ ५९ ॥
जे करिती सांधुनिंदा । त्या पापाची मज आपदा । र्णीं न जिंकितां गोविंदा । जरी मी नुसधा परतेन ॥ ६० ॥
विद्या होऊन गर्वा येती । विकल्पूनि गुरुसी निंदिती । तीं तीं पापें मज होती । जरी मी श्रीपती न जिंके ॥ ६१ ॥
केवळ पूज्य मातापिता । त्यांतें पुत्र हाणे लाता । तीं तीं पापें मजचि आतां । जरी श्रीकृष्णनाथा न जिंके ॥ ६२ ॥
देखोनि सधुजन्नंसी । दोष आरोपिती त्यासी । तीं तीं पापें सजसी । जरी मी कृष्णासी न जिंकें ॥ ६३ ॥
कृष्ण न जिंकितां रणीं । घेऊनि न येतां रुक्मिणि । पुरीं न प्रवेशें कौंडणीं । मुख परतोनी न दाखवी ॥ ६४ ॥
ऎसी वाहूनियां आण । कवचेम लेइला । वेगें घेऊनि धनुष्यबाण । म्हणे आंगवण पहा माझी ॥ ६५ ॥
क्रुष्ण अज्ञानाची आदी । त्यासी ह्रदयीं नाहीं बुद्धी । पर्ण पाहे राक्षसविधीं । तें मी सिद्धी जाऊं नेदीं ॥ ६६ ॥
कृष्ण गर्वित एकलेपणीं । दुजियातें दृष्टीं नाणीं । हिरोनि नेली माझी बहिणी । तो मी बणीं दंडीन ॥ ६७ ॥
रागें कांपत थरथरां । दांत खातसे करकरां । धूम्र निघत नेत्रद्वारा । रहंवरा चढिन्नला ॥ ६८ ॥
रथीं बैसला मदगर्वित । वेगे सारथ्याते म्हणत । चपळ चौताळो दें रथ । कृष्णनाथ जेथें असे ॥ ६९ ॥
आजि कृष्णासी सन्नद्ध । करणें असे द्वंद्वयुद्ध । अगर्वी धरितो गर्वम्द । बुद्धिमंद श्रीकृष्ण ॥ ७० ॥
अजि माझ्या तिखट बाणीं । कृष्ण खिळीन रणांगणीं ।चोरूनि नेतो माझी बहिणी । कैसेनि रुक्मिणी जिरेल ॥ ७१ ॥
सैन्य अवलोकिले दृष्टीं । वीर चालिले जगजेठी । अश्वगजरथांचिया थातीं । शस्त्रें मुष्टीं झळकती ॥ ७२ ॥
चतुरंग सैन्य सकळ । एक अक्षौहिणी दळ । सन्नद्ध करूनियां सबळ । संख्या केवळ परियेसा ॥ ७३ ॥
दोन लक्ष अठरा सहस्र । सातशें अधिक वीर । संख्या अक्षौहिणीप्रकार । केला निर्धार श्रीव्यासें ॥ ७४ ॥
किती गज किती रथ । अश्व पदाती समस्त । विभाग संख्या सुनिश्चित । पुराणोक्त सांगेन ॥ ७५ ॥
एकवीस सहस्र आठ शत । सत्तरी संख्या जी रथ । तितुकेचि गजभार उन्नत । सैन्य आंत चालती ॥ ७६ ॥
एक लक्ष सहस्र नव । तीन शतें पन्नास अश्व । पायांचे वीर अभिनव । सांगेन सर्व परियेसा ॥ ७७ ॥
पासष्ट सहस्र सा शतें । एक दशक अधिक तेथें । वीर पायांचे भिडते । युद्धीं पुरते निजगडे ॥ ७८ ॥
इतुकी सैन्याची मिळणी । तया नांव एक अक्षौहिणी । संख्या बोलिली पुराणीं । महामुनी श्रीव्यासें ॥ ७९ ॥
ऎसें निजसैन्य अद्‌भुत । त्यामाजी रुक्मिया विराजीत । साह्य आले राजे दक्षिणाद्वत । वीर गर्जत महाबळी ॥ ८० ॥
रणीं जिणोनि जरासंध । मीनले गद हलायुध । अवघे करिती विनोद । थोर आल्हाद जेत्यांचा ॥ ८१ ॥
यादव मिळोनि थोर थोर । करिती परतावयाचा विचार । येतां देखोनि पारखे भार । मग सामोरे लोटले ॥ ८२ ॥
दोन्ही सैन्यां झाला मेळू । घायीं उठला हलकल्लोळू । वाजंत्र्यांचा ध्वनी प्रबळू । रणवेताळू खवळला ॥ ८३ ॥
कोपें चालिला रुक्मिया वीरू । ठाकोनि आला यादवभारू । तेथें न देखे शारंगधरू । रथ सत्वरू पेलिला ॥ ८४ ॥
एकाएकीं एकला चक्रपाणी । दुरोनि देखिला नयनी । एके रथीं कृष्णरुक्मिणी । देखोनि मनीं प्रज्वळला ॥ ८५ ॥
सांडोनि गोत्रकुटुंबासी । जेवी वैरागी निघे योगासी । तेवीं सैन्य सांडोनि यादवांपाशीं । एके रथेंसीं धांविन्नला ॥ ८६ ॥
धनुष्य मांडूनि मांडणीं । गुण वाइला तत्क्षणीं । बाण लावूनियां गुणी । वोढी काढोनि चालिला ॥ ८७ ॥
श्रीकृष्ण देवांचा आदिदेवो । ईश्वर नियंता नेणे प्रभावो । कुमती धरोनिया मदगर्वो । काय पाहा वो बोलत ॥ ८८ ॥
कृष्णासी म्हणे राहें साहें । माझा यावा आला पाहें । चोरी करुन पळसी काये । कोण माय राखेल ॥ ८९ ॥
जगामाजी तूं चोर होसी । चोरूनि दिसों नेदिसी मागासी । आजि मी पावलों लागासी । केउता जासी निजचोरा ॥ ९० ॥
उद्देशें देवा इंद्रादिकीं । होम कीजे अग्निमुखीं । ते अवघे तूं खाशी शेखीं । अग्निमुखीं कांहीं नुरे ॥ ९१ ॥
देव म्हणती आम्हांसी पावले । त्यांसी ठकवूनि हव्य त्वां नेलें । तें काउळें मत येथें च चाले । सांडीं वहिलें भीमकीसी ॥ ९२ ॥
जन्मोनियां यादववंशी । कुळगोत्रा नाश करिसी । बुडविलें नांवरूपासी । जाती तुजपाशीं तवं नाहीं ॥ ९३ ॥
भोग अवघेचि भोगांसी । आणि योगिया म्हणविसी । मूळमाया ते तुजपाशीं । वेष धरिसी कपटाचा ॥ ९४ ॥
तुझिया कपटाची झाडणी । करावया आलों मी गुणी । झाडणी करीन रणांगणीं । झणीं पळोन जाशील ॥ ९५ ॥
सांडीं सांडीं माझी बहिणी । नाहीं तरी खोंचीन तिखट बाणीं । तीन बाण लावूनि गुणीं । चक्रपाणीं विंधिला ॥ ९६ ॥
शार्ङ्ग टणत्कारूनि हरी । सा बाण घेतले करीं । तीन सोडूनि माझारीं । धनुष्य करीं छेदिलें ॥ ९७ ॥
सवेंचि सोडिलें आठ बाणांसी । चारी चहूं वारूंसी । सारथी पाडूनि धरणीसी । ध्वजस्तंभ छेदिला ॥ ९८ ॥
रुक्मिया कोपा चढिन्नला भारी । पंच बाण घेतले करीं । रागें सोडिले कृष्णावरी । बळें निर्धारीं विंधित ॥ ९९ ॥
कृष्ण धनुर्वाडा निजगडी । अचुक संधानपरवडी । पांचही बाण वाणें तोडी । धनुष्य पाडी छेदुनी ॥ १०० ॥
आणीक धनुष्य घेतलें वेगें । सन्मुख विंधों आला रागें । तेंही तोडिलें श्रीरंगे । आणीक वेगें घेतलें ॥१ ॥
बाण लावोनियां वोढी । तेंही कृष्ण सवेंचि तोडी । जें जें धनुष्य रुक्मिया काढी । तें तें तोडी श्रीकृष्ण ॥ २ ॥
धनुष्य घेतलें घाव टाळुनी । अग्निअस्त्र लाविलें गुणीं । धूम्र कोंदला दिशा व्यापुनी । ज्वाळा गगनीं न समाती ॥ ३ ॥
पर्जन्यास्त्र सोडिलें हरी । मेघ वर्षती मुसळधारी । अग्नि शांत क्षणामाझारीं । वेगे श्रीहरी पैं केला व ४ ॥
येरें वायव्यास्त्र लाविलें गुणीं । झझामारुत सुटला रणीं । वार्‍यानें जाऊं पाहे अवनी । टाळीं कानी बैसलीं ॥ ५ ॥
पर्वतास्त्र सोडी श्रीकृष्ण । वारा सांडिला बुझोन । येरें वज्रस्त्र सोडून । गिरी ताडून सांडिले ॥ ६ ॥
रुक्मिया कोपला महाथोर । कृष्णासी म्हणे स्थिर स्थिर । गुणीं लाविलें उद्रास्त्र । महारुद्र प्रगटला ॥ ७ ॥
दाढा विक्राळा तिखटा । माथां मोकळीया जटा । काळिमा चालिलीसे कंठा । मिशा पिंगटा आरक्त ॥ ८ ॥
कृष्ण अस्त्रविद्याचतुर । बाणीं योजिया भस्मासुर । बाण देखोनि पळे रुद्र । धाके थोर कांपत ॥ ९ ॥
रुक्मिया आणिक शस्त्र विचारी । तंव कृष्णें धनुष्य छेदिलें करीं । सरली कोदंडसमग्री । रथावरी कांही नाहीं ॥ ११० ॥
सरली धनुष्याची वोढी । परिघ घेऊन घातली उडी । कृष्ण विंधोनि परिघ तोडी । अपरवदी घायांची ॥ ११ ॥
परिघ तुटलियापाठीं । रागें पट्टिश घेऊनि उठी । न धरत पातला उठाउठी । कृष्णदृष्टी सूदली ॥ १२ ॥
कृष्णें विंधिलें कठीण बाणां । पट्टिश उडविला गगना । सवेचि शूळ घेऊनि ताणी । हाणी कृष्णा पै आला ॥ १३ ॥
दांत खातसे कराकरा । शूळ भोवंडी गरगरां । साहें म्हणे शार्ङ्गधरा । घायें पुरा करीन ॥ १४ ॥
कृष्णें बाण सोडिला पाहीं । शूळ तोडिला तीं ठायीं । सवेचि पाडिला भोई । तीं ठायीं त्रिखंड ॥ १५ ॥
शूळ वाया गेलां थोरा । रुक्मिया चुरी दोनी कर । सवेचि घेवोनि तोमर । कृष्णासमोर धांविन्नला ॥ १६ ॥
साहें म्हणे कृष्णनाथा । तोमर हाणों आलों माथां । माझारीं विंधिला येतायेता । घायें मागुता सारिला ॥ १७ ॥
बाण आदळला थोर । छेदून पाडिला तोमर । रुक्मिया म्हणे मर मर । शक्ति थोर काढिली ॥ १८ ॥
शक्ति घेऊनियां हातीं । म्हणे कृष्ण तुझा पाड किती । रणीं लावीन रे ख्याती । भद्रजाती लोटला ॥ १९ ॥
कृष्ण जे जे बाण सोडी । शक्तिहस्तें रुक्मिया तोड । रथ धरी मकरतोंडीं । शक्ति भोवंडां हाणावया ॥ १२० ॥
कृष्णें बाण सोडिला तिधारा । रुक्मियासी लागला पिसारा । मागें सारिला अउड बाण । शक्ति अंबरा उडविली ॥ २१ ॥
रुक्मियाची क्षीण शक्ति । साह्य आले दक्षिणापती । तिहीं हांकिला श्रीपती । सैन्यसंपत्ति अनिवार ॥ २२ ॥
कृष्ण नेटका झुंजार । बाणीं त्रासिले महावीर । आठ बाणीं खोंचली धुर । हाहाकार ऊठीला ॥ २३ ॥
बाण सोडिले निर्व्यंग । घायीं निवटिलें चातुरंग । त्याच्या सैन्या झाला भंग । रणीं श्रीरंग खवळला ॥ २४ ॥
बाण वरुषे शार्ङ्गधर । सैन्या झाला थोर मार । कोपें खवळला रुक्मिया वीर । साटोप दुर्धर मांडिला ॥ २५ ॥
कृष्ण मारीन हें निर्धारीं । वोडण खांडें घेतलें करीं । पतंग जैसा दीपावरी । तैशापरी धाविन्नला ॥ २६ ॥
रुक्मिया महावीर नेटक । वोडण स्वर्गाचा साधक । थरक सरक दावी चवक । अति नि:शंक निजगडा ॥ २७ ॥
वोडण धडकोनि आदळीत । खर्ग तोलोनि तळपत । उल्लाळ देऊनि उसळत । हात मिरवत खर्गाचा ॥ २८ ॥
कृष्ण जे जे बाण सोडी । खर्गधारीं तितुके तोडी । चारी मारावया घोडीं । रथाबुडी रिघो आला ॥ २९ ॥
दारुक सारथी निजगडा । रथें करूं पाहा रगडा । कृष्णें विंधिला कुर्‍हाडा । रथाबुडीं येऊ नेदी ॥ १३० ॥
बाण आदळला सत्राणें । आडवें वोडण धरिलें तेणें । वाडण भेदूनियां बाणें । शिरींच मुगुट पाडिला ॥ ३१ ॥
कोण आला रुक्मियासी । वेगें धाविन्नला मोकळे कैशीं । हात घांसूनि भूमीसी । हातवशी खर्गातें ॥ ३२ ॥
कृष्णासी म्हणे देख देख । घायी छेदीन रे मस्तक । विकट देऊनियां हांक । वेगीं सन्मुख लोटला ॥ ३३ ॥
कृष्णें विंधिला तिखट बाण । तिळप्राय केलें वोडण । खर्ग छेदूनियां जाण । अणुप्रमाण तें केलें ॥ ३४ ॥
बाण वर्षला घनदाट । रुक्मिया भुलविला आली वाट । रथ लोटूनिया घडघडाट । मौर्व्या कंठ बांधिला ॥ ३५ ॥
धनुष्य घालूनियां गळां । वोढोनि आणिला घायातळा । कांपिन्नला भीमकबाळा । घनसांवळा देखतसे ॥ ३६ ॥
दाटोनि आणिलें जी क्रोधआ । झळफळित काढिली गदा । म्हणे याच्या करीन शिरच्छेदा । येरी गदागदां कांपतसे ॥ ३७ ॥
काहीं न बोलवे सर्वथा । म्हणोनि चरणीं ठेविला माथा । कृपाळुवा जगन्नाथा । यासी सर्वथा न मारावें ॥ ३८ ॥
कृष्ण म्हणे परतीं सर । येणें निंदा केली थोर । याचेम छेदीन मी शिर । म्हणोनि शस्त्र उचलिलें ॥ ३९ ॥
तिखट देखोनि शस्त्रधारा । चरण न सोडीच सुंदरा । बोलोनि मृदु मंजुळ उत्तरा । गदाधरा विनविलें ॥ १४० ॥
सुरां असुरां तूं दुर्धर । योगिमाजी योगेश्वर । विश्वनियंता इश्वर । वेदां पार न कळेचि ॥ ४१ ॥
ऎशियासी तुज युद्धीं । आवळूं पाहे हा अहंबुद्धी । पिता अवगणूनि तूंतें निंदी । होय अपराधी सर्वथा ॥ ४२ ॥
हा अभिमानिया मारिशी रणीं । माय प्राण सोडील तत्क्षणीं । होईल लौकिक टेहणी । माहेर येथूनि तुटेल पूर्ण ॥ ४३ ॥
जेथूनि उठे निंदा क्रोधू । त्या लिंगादेहाचा करीं छेदू । मारूं नको ज्येष्ठ बंधू । लोकाविरुद्ध न करावें पूर्ण । ४४ ॥
धरिलिया कृष्णाकांस । द्यावा दों पक्षीं उल्हास । नादवावें सावकाश । येथें तेथें समत्वें ॥ ४५ ॥
न धरत चाललें स्फुंदन । नेत्रीं लोटले जीवन । झालें कृष्णचरणक्षालन । जगज्जीवन हांसिन्नला ॥ ४६ ॥
देखोनि बोलाची चातुरी । मग उचलली दोहीं करीं । आलिंगिली प्रीतीं थोरी । बंधू न मारीं सर्वथा स्तकवपना आणा पाणी । नाही आड ना विहीरवणी । घाला वाटेचें वाटावणी । विनोद मेहुणीं मांडिला ॥ ४८ ॥
अर्धखांड अर्धमिशी । पांच पाट काढिले शिसीं । विरूप केलें रुक्मियासी । गळां रथेसीं बांधिला ॥ ४९ ॥
रुक्मिणीसी म्हणे श्रीकृष्ण । पाहें बंधूचें वदन । वेगें करीं लिंबलोण । सकळ जन हांसती ॥ १५० ॥
रुक्मियाचें विरूपकरण । यापरी करी श्रीकृष्ण । बळिराम येऊनि आपण । बंधमोचन करील त्यासी ॥ ५१ ॥
परिहारमिषें प्रबोध । भीमकीसी करील हलायुध । एका जनार्दनीं विनोद । परमानंद प्रगटेल ॥ १५२ ॥
 
इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे रुक्मिपराभवो नाम द्वादश: प्रसंग ॥१२ ॥
 
॥श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥