गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

रुक्मिणी स्वयंवर प्रसंग आठवा

श्रीकृष्णाय नम: ॥ रिघोनि जंबुकांमाझारीं । आपुला भाग ने केसरी । तैसी वेढिली महावीरीं । नेली नोवरी श्रीकृष्णें ॥ १ ॥
सांगातिणी जिवेंभावें । जड्ल्या होत्या भीमकीसवें । त्या त्यजूनि कृष्णदेवें । नेली निजभावें भीमकी ॥ २ ॥
आंदण्या अविद्येच्या दासी । मोहममतेच्या सखियांसी । सांडूनि नेले भीमकीसी । उकसाबुकसीं स्फुंदती त्या ॥ ३ ॥
सुडावीत नेली वधू । लाजिन्नला अभिमानिया बंधू । अपूर्णकामें उपजे क्रोधू । तैसा मागधू धांविन्नला ॥ ४ ॥
कोणीं नेलें गे नोवरीसी । येरी म्हणती लाज नाहीं तुम्हांसी । राखों आलेति भीमकीसी । शेखीं आम्हांसी पूसतां ॥ ५ ॥
जळो तुमचें दादुलेपण । नपुंसकाहूनि हीन । वृथा गेली आंगवण । काय वदन दावितां ॥ ६ ॥
 
स्यंदने गरुडकेतुमंडिते कुंडिनेशतनयाधिरोपिता । केनचिन्नवतमालकांतिवच्छ्‌यामलेन पुरुषेण नीयते ॥ १ ॥
 
गरुडध्वज झळके ज्यासी । तोडर गर्जे चरणांसी । विजू खिळिली मेखळेली । तैसा कांसेसी पीतांबर ॥ ७ ॥
टिळक रेखिला पिवळा । मुकुट कुंडलें वनमाळा । डोळस सुंदर सांवळा । भीमकबाळा तेणें नेली ॥ ८ ॥
मागध म्हणे गेली वाटीव । धैर्य गांभीर्य वैभव । यश कीर्तीची राणीव । नेली सर्व यादवीं ॥ ९ ॥
धिग्‌धिग् ज्यालेपण जीवाचें । आतां येथोनि परतणें कैंचें । गोवळीं यश नेलें आमुचें । म्हणॊनि कवचें बांधिलीं ॥ १० ॥
पाठाची हिरोन नेली भाज । याहून थोर कवण लाज । करणें निर्वाणींचें झुंज । म्हणॊनि पैज घेतली ॥ ११ ॥
वीर वळंवळे अश्वांवरी । नाचती तिहीं पायांवरी । ‘होहो’ ‘मामा’ ‘जीजी’ कारी । यावा स्वारीं दाविला ॥ १२ ॥
पुढें पायांचें मोगर । आढाउ चालती गंभीर । सेले साबळे कोतेकर । धनुर्धर पायांचे ॥ १३ ॥
रथ जोडिले एकवट । वरी चढले वीर उद्भट । घडघडले चक्रवाट । रजें अंबुट कोंदलें ॥ १४ ॥
घोडिया बाणली मोहाळी । कंगण टोप रागावळी । पांखरा झळकती तेजाळी । आरसे तळीं लाविले ॥ १५ ॥
दोंही बाहीं कुंजरथाट । गदगलित गजघट । दांतीं लोहबंध तिखट । वीर सुभट वळंघले ॥ १६ ॥
एक चढले उंटांवरी । एक चढले अश्वांवरी । एक चढले खेचरीं । वीर भारी गर्जती ॥ १७ ॥
शस्त्रें झळकताती कैसीं । प्रळयकाळींची बिजू जैसी । मेघ गर्जती आकाशीं । तैसा गजांसी गडगर्ज ॥ १८ ॥
आम्ही प्रचंड धनुर्वाडे । रणकर्कश रणगाढे । नोवरी घेऊन आम्हांपुढें । कोणीकडे पळतील ॥ १९ ॥
निशाण त्राहाटिल्या भेरी । खाखाइल्या रणमोहरी । सिंहनाद केला वीरीं । उपराउपरी धांविन्नले ॥ २० ॥
शस्त्रास्त्रीं सन्नद्ध सबळ । मीनले महावीर सकळ । धांविन्नले उतावेळ । यादवदळ ठाकले ॥ २१ ॥
अवघे मिळोनि दिधली हांक । कृष्णा दाखवीं पां मुख । ‘भीमकी पावली’ हें सुख । झणीं देख मानिसी ॥ २२ ॥
सांडीं सांडी भीमकीचा संग । अबद्ध बांधिजसी निलाग । आला कोपिष्टांचा लाग । पडेल पांग दुजयाचा ॥ २३ ॥
एकला एकट होतासी । तै तूं कोणा नाटोपसी । स्त्रीलोभें अडकलासी । सांपडलासी वैरियां ॥ २४ ॥
तूं ह्रदयशून्य अविवेकी । दुजियातें न मानिसी शेखीं । तुज मीनले जे विवेकी । ते त्वां वृत्तिशून्य पैं केलें ॥ २५ ॥
अविचारितां एकाएकीं । चोरली परात्पर भीमकी । ते तंव न जिरे इहलोकीं । वीरीं कार्मुकें वाहिलीं ॥ २६ ॥
अविद्या चोरिली चंद्रावळी । विद्या पेंधी ते गोवळी । तैसी नेऊं पाहसी भीमकबाळी । असुरीं फळी मांडिली ॥ २७ ॥
न करितां रे उवेढा । केवीं जाऊं पाहसी पुढां । पळों नको परत भेडा । होई गाढा वीरवृत्ती ॥ २८ ॥
गौगोरस मंथन करितां । चोरिसी सारांश नवनीता । तैसिच नेऊं पाहसी राजदुहिता । बहुतां झुंजतां तें नये ॥ २९ ॥
यापरी तूं गोवळा जाण । आतां करीं शहाणपण । भीमकी सांडून वांचवीं प्राण । जीवदान तुज दिधलें ॥ ३० ॥
जैसे अहंकाराचे दुर्ग । तैसें आलें चातुरंग । भीतरीं वीर अनेग । कामक्रोधादि खवळले ॥ ३१ ॥
महामोहांचे मेहुडे । तैसें सैन्य आलें पुढें । कृष्णबोधाचे निजगडे । यादव गाढे परतले ॥ ३२ ॥
भीमकीऎशी नेणों किती । कृष्णें वरिल्या अनंत शक्ती । तुम्हां मशकांचा पाड किती । वेगीं दळपती परतला ॥ ३३ ॥
पळतां जन्म गेलें तुमचें । बोल बोलतां नाकें उंचें । आतांचि जाणवेल साचें । बहु बोलाचें फळ काय ॥ ३४ ॥
सत्रा वेळ पळालेती । निर्लज्ज मागुती आलेती । रणीं तुम्हां लावीन ख्याती । धनुष्यें हातीं वाइलीं ॥ ३५ ॥
दोहीं सैन्यां झाली भेटी । वोढिल्या धनुष्यांच्या मुष्टी । होत बाणांची पै वृष्टी । कूर्मपृष्ठी कांपतसे ॥ ३६ ॥
तडक फुटलें एकसरें । भिंडिमाळांचे पागोरे । वीर गर्जती हुकारें । रणतुरे लागलीं ॥ ३७ ॥
पायींचे लोटले पायांवरी । असिवार असिवारांवरी । वीर पडखळले वीरीं । परस्परें हाणिती ॥ ३८ ॥
गज आदळले गजांसी । महावंत महावंतांसी । शस्त्रें वोडविती शस्त्रांसी । घायीं घायांसी निवारण ॥ ३९ ॥
वोडणें आदळती वोडणा । बाण सुटती सणसणा । खड्‌गे वाजती खणाखणा । काळनंदना मांडली ॥ ४० ॥
धीर वीर राहे साहे । मागें न ठेविती पाये । माथां वाजती धाये । रुधिर वाहे भडभडा ॥ ४१ ॥
शस्त्रें सुटती हातींचीं । कटारा काढिती माजीचीं । उदरे फोडिती गजांची । वीर पायांचे चवताळती ॥ ४२ ॥
वोडण उचलोनियां ठायीं । वारु तोडिले पायीं । वीर पाडोनियां भुई । आढाऊ पायीं भीडती ॥ ४३ ॥
भातडीचे सरले शर । धनुष्यदंडे महावीर । झोडून पाडिती अपार । घोरांदर मांडिलें ॥ ४४ ॥
लाथा हाणोनियां गजांतें । झोंटी धरोनि महावंतांतें । तळीं आणोनियां त्यांतें । घायीं आंतें काडिती ॥ ४५ ॥
घायें पाडिती गजांतें । उपडोनि घेती गजदंतांतें । धांवोनि हाणिती रथांतें । एकेचि घाते शतचूर्ण ॥ ४६ ॥
घायीं मातले महावीर । वोढिती अंत्रमाळांचे भार । तरी धांवती समोर । थोर थोर पाडिती ॥ ४७ ॥
कृष्णबळें यादव गाढे । रणीं लोटलिया पुढें । देखोनि मागद धनुर्वाडे । कोपें वेगाढे उठावले ॥ ४८ ॥
हांक दिधली महावीरीं । बाण सुटले एकसरीं । यादवसैन्याचा महागिरी । शरधारीं झांकोळला ॥ ४९ ॥
आमच्या बाणांचें लाघव । आजि फावले यादव । धंवा पावा चला सर्व । आले गौरव आम्हांसी ॥ ५० ॥
देखोनि वैरियांच वरवळा । कांपिन्नली भीमकबाळा । नाश होईल दोंही कुळां । बोल कपाळा लागेल ॥ ५१ ॥
दीर भावे पडतील रणीं । सासुरां होईल टेहणी । कैंची आणिली हे वैरिणी । धड कोणी न बोलती ॥ ५२ ॥
सखे बंधू पडतील रणीं । दु:खें फुटेल जननी । माहेर तुटेल येथुनी । मुख कैसेनी दाखवावें ॥ ५३ ॥
कृष्ण पावलिया पुढें । कैसें मांडलें सांकडें । कठिण वोढवलें दोहींकडे । कपाळ कुडें माझेंचि ॥ ५४ ॥
थोर वोडवलें दुस्तर । तुटलें सासुरें माहेर । कृष्णावेगळा न दिसे थोर । पाहिलें वक्र हरीचें ॥ ५५ ॥
देखोनि हासिन्नला वनमाळी । भिऊं नको वो वेल्हाळी । यादव उठावले महाबळी । रणकंदळी करितील ॥ ५६ ॥
तुझे दीरभावे रणीं । शत्रु भेदतील बाणीं । धडमुंडांकित धरणी । अर्धक्षणीं करितील ॥ ५७ ॥
यादववळीं थोर थोर । परतले जी महावीर । परिसा नांवें सादर । सविस्तर सांगेन ॥ ५८ ॥
वीरां मुख्य हलायुध । अक्रूर कृतवर्मा आणि गद । सारण सात्त्विक सन्नद्ध । चक्रदेव महावीर ॥ ५९ ॥
सात्यकि अतिदांत श्वफल्क । महाबाहू वीर कंक । इतुके मुख्य करूनि देख । वीर अनेक यदुभारीं ॥ ६० ॥
हरिवंशीं यादववीर । सांगितले जी अपार । तितुका न धरवे विस्तार । कथा अपार वाढेल ॥ ६१ ॥
दोन्ही पंचक आणि एक । इतुके येथें वीरनायक । येरयेरांसी साह्य देख । मुख्य चालक बळीभद्र ॥ ६२ ॥
परदळीं अतिदारुण । वीर आले कोण कोण । ज्यांची गाढी आंगवण । ते राजे जाण सांगिजेती ॥ ६४ ॥
जरेंपासून जन्मला मोहो । तैसा जरासंध पहाहो । वेगें उठावला महाबाहो । सैन्यसमुदावो लोटला ॥ ६५ ॥
जरासंधासवें प्रबळ । राजे चालिले सबळ । कोण कोण आले भूपाळ । नांवें सकळ परियेसा ॥ ६६ ॥
शाल्व पौंड्रक विदूरथ । बळे प्रबळ वक्रदंत । या वीरांचा अद्‍भुत्‌ । वेग न धरत पातले ॥ ६७ ॥
गवेषण अंग वंग । केशिक कारूष कलिंग । हेही राजे जी अनेग । बळें चांग उठावले ॥ ६८ ॥
सकळां मुख्य जरासंध । सबळ बळेंसीं मागध । अवघे जाले सन्नद्ध । दारुण युद्ध मांडिलें ॥ ६९ ॥
चढिला बळिभद्रासी रणमद । देखोनि बोलिला वीर गद । वीर्य शौर्य अतिविनोद । गोत्रसंबंध युद्धाचा ॥ ७० ॥
दैवें जोडिलें युद्धसंपत्तीसी । एकलाचि तूं नेऊं पाहासी । स्वार्थी ऎसा कैसा होसी । वांटा आम्हांसी पाहिजे ॥ ७१ ॥
वीरविभाग तव प्रसिद्धू । माझा वांटा जरासंधू । सात्त्विक आमुचा धाकुटा बंधू । वक्रदंत त्यासी दीधला ॥ ७२ ॥
पौंड्रक दिधला कृतवर्म्यासी । विदूरथ दिधला अक्रूरासी । येर अवघे दिधले तुम्हांसी । गोत्रजांसी समजावे ॥ ७३ ॥
कोणी विकल्प धरील चित्तीं । संबंध याहीं अर्थाअर्थी । वांटा केला अतिनिगुती । वीरवृत्तीं नांदावें ॥ ७४ ॥
दायाद एकादे आपुले । रणीं देखाल खंगले भंगले । त्यांसी पाहिजे सांभाळिले । धन जोडिलें त्या नांव ॥ ७५ ॥
हांसें आलें बळीभद्रासी । टाळी पिटिली टाळीसी । रणचतुर तूं योद्धा होसी । म्हणोनि पोटासी धरियेला ॥ ७६ ॥
एका जनार्दनीं सन्नद्ध । मीनले गद हलायुध कोपें खवळला जरासंध । दारुण युद्ध मांडिलें ॥ ७७ ॥
 
इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितांसंमते रुक्मिणीस्वयंवरे युद्धप्रारंभो नाम अष्टम: प्रसंग: ॥८॥