सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

रुक्मिणी स्वयंवर प्रसंग पाचवा

श्रीगणेशाय नम: ॥ सन्नद्ध करितां दळभार । येथें लागेल उशीर । मी एकला एकांगवीर । भीमकी घेऊनि येईन ॥ १ ॥
जो दुजियाची वास पाहे । त्यांचे कार्य कंहींच नोहे । यश कैसेनि तो लाहे । साह्य पाहे सांगातीं ॥ २ ॥
विकल्परुक्मिया मज द्वेषी । तेणें निवारिलें विवाहासी । विटंबूनि त्याचिया मुखासी ॥ रुक्मिणीसी आणीन ॥ ३ ॥
चैद्यादिक पक्षपाती । त्यांसीं रणीं लावीन ख्याती । मी तंव कोपलिया श्रीपती । त्रिजगतीं कोण राहे ॥ ४ ॥
जैशा दो काष्ठांच्या भरणी । मथूनि काढिजे जेवीं अग्नी । तेवीं अरिवीरांतें त्रिभांडोनी । पवित्र रुक्मिणी आणीन ॥ ५ ॥
माझिया कोपाची भृकुटी । रणा आणीन सकळ सृष्टी । त्यामज युद्धाची आटाटी । लग्नासाठीं केवढी ॥ ६ ॥
रुक्मिणीचिया लग्नासी । कवण दिवस कवणें मासीं । कवण नक्षत्र तें द्विजासी । मधुसूदनें पूसिलें ॥ ७ ॥
सारथी बोलावूनि दारुकासि । वेगीं संयोजीं रथासी । जाणें असे कौंडिणपुरासी । दुजियासी कळों नेदीं ॥ ८ ॥
जैसे चारी पुरुषार्थ । तैसिया वारुवीं जुंपिला रथ । ऎका नांवें सुनिश्चित । जेथे श्रीकृष्णनाथ आरूढे ॥ ९ ॥
शैब्य सुग्रीव बलाहक । चौथा मेघपुष्प देख । चारी वारू अति नेटक । सारथी दारुक धुरेसी ॥ १० ॥
अनर्घ्यरत्‍नीं रत्‍नखचित । गरुडध्वज लखलखित । लोल पताका डोलत । रथ शोभत अतिशोभा ॥ ११ ॥
शस्त्रास्त्रांचे संभार । रथीं घालूनि अपार । दारुकें केला नमस्कार । जोडोनि कर राहिला ॥ १२ ॥
रथीं चढला नारायण । तुरुंगी बैसविला ब्राह्मण । एक दिवसें जनार्दन । कौंडिण्यपुरा पातला ॥ १३ ॥
नगर देखिलें श्रीपतीं । जैसी मुमुक्षूची संपत्ती । तेथें राजा कौंडिण्यपती । विधानस्थिती करीतसें ॥ १४ ॥
भीमक वश्य जाहला पुत्रासी । जैसा विवेक महामोहासी । कन्या नेमिली शिशुपाळासी । जीवीं कृष्णासी हे द्यावी ॥ १५ ॥
जरी असेल आमुचे भाग्य । भीमकी भाग्याची सभाग्य । भावें पावेल श्रीरंग । येणें उल्हास करीतसे ॥ १६ ॥
नगर श्रृंगारिलें वाडेंकोडें । घातले कुंकुमाचे सडे । तोरणें पताका चहूंकडे । महोत्साहो मांडिला ॥ १७ ॥
गंधाक्षता कुसुममाळा । नगरनारीलोकां सकळा । वस्त्रें भूषणें पाहतां डोळां । जनलीला शोभतसे ॥ १८ ॥
घाव घातला निशाणीं । मंगळतुरें वेदध्वनी । हळदी लाविली रुक्मिणी । मंगळस्नान करविलें ॥ १९ ॥
पीतांबर परिधान । लेइली अलंकार भूषण । नोअरीचे दुश्चित मन। कृष्ण आगमन पाहतसे ॥ २० ॥
नांदीश्राद्ध देवकविधान । केलें ब्राह्मणांचें पूजन । यथाविधी ब्राह्मणसंतर्पण । स्वस्तिवाचन विधीचें ॥ २१ ॥
चहूं वेदींचे ब्राह्मण । येऊनि पुरोहित आपण । अथर्वणवेदें केले हवन । ग्रहशांति दान यथोचित ॥ २२ ॥
सोनें रुपें नानावस्त्रें । घृतेंसहित तिळपात्रें । गोभूदानें विचित्रें । द्विजां नृपवरें दीधलीं ॥ २३ ॥
दमघोष याचिपरी । महोत्सावो आपुले नगरीं । पुत्रविवाहाचा करी । द्विजवरी यथोचित ॥ २४ ॥
वर्‍हाड निघालें बाहेरी । मदगज परिवारिले भारी । सुवर्णरथांचिया हारी । वीर अश्वांवरी आरूढले ॥ २५ ॥
चालती पायांचे मोगर । पातलें कौंडिण्यपुर नगर । आणीक वर्‍हाडी महावीर । चैद्यभार तेही आले ॥ २६ ॥
रुक्मिणी कृष्णासीं होती दीधली । ते शिशुपाळा देऊं केली । ते संधी पाहिजे साधिली । म्हणोनि आले पक्षपाती ॥ २७ ॥
शाल्व आणि जरासंध । विक्रदंत विदूरथ । पौंड्रक वीर अद्‍भुत । सैन्यभारेंशीं पातले ॥ २८ ॥
वर्‍हाडी मीनले ते कैसे । महामोहाचे मेहुडे जैसे । खद्योतसमुदाय निशी वसे । वीर तैसे वाटीव ॥ २९ ॥
कृष्णतरणीचिया किरणीं । मावळती रणांगणीं । भीमकी उल्हासे कमळिणी । कृष्णदिनमणी देखलिया ॥ ३० ॥
जैसे गंधर्वनगरींचे हुडे । तैसे शिशुपाळाचे वीर गाढे । वर्‍हाड आलें वाडेंकोडें । भीमकापुढें सांगितलें ॥ ३१ ॥
राव सामोरा गेला त्यासी । केलें सीमांतपूजनासी । सन्मानूनी समस्तांसी । जानवशासी आणिलें ॥ ३२ ॥
रुक्मिणीहरणासी उद्यत । एकला गेला कृष्णनाथ । यादवसभेसी आली मात । जाहला विस्मित बळिभद्र ॥ ३३ ॥
काल आला होता ब्राह्मण । भीमकीचें पत्र घेऊन । प्रगट न करीच कृष्ण । निवारूं कोण म्हणवूनी ॥ ३४ ॥
यालागीं गुप्त केली मात । एकला गेला कृष्णनाथ । अतुर्बळी हा अनंत । नाहीं भीत कळीकाळा ॥ ३५ ॥
तो ब्राह्मण नव्हेची निश्‍चित । मूर्तिमंत भीमकीचा भावार्थ । भावें नेला कृष्णनाथ । एकाएकीं एकला ॥ ३६ ॥
वक्रदंत जरासंध । शाल्व पौंड्रक उन्नद्ध। चैद्य मीनले सन्नद्ध । होईल युद्ध दारुण ॥ ३७ ॥
कृष्ण करील कार्यसिद्धी । हें तंव न चुके त्रिशुद्धी । टाकूनि जावें युद्धसंधी । हेचि बुद्धी सर्वथा ॥ ३८ ॥
रथ कुंज पालाणा । सन्नद्ध करा चतुरंगसेना । घाव घातला निशाणा । केली गर्जना बळिभद्रें ॥ ३९ ॥
सेनापती तो सात्त्विक । भारी बळराम नेटक । यादववीरांसी हरिख । अतिसुटंक दरभाळ ॥ ४० ॥
सुख, संतोष आणि स्वानंद । कैवल्यापाशीं निजबोध । तैसा पावला हलायुध । यादववीरीं हरिपाशीं ॥ ४१ ॥
नातरी शमदमादि संपत्ती । बोधावेगळी नव्हे निश्चिती । तैसे कौंडिण्यपुरा येती । जेथे श्रीपती उभा असे ॥ ४२ ॥
येरीकडे राजकुमरी । अवस्था लागलीसे भारी । कां पां न येचि श्रीहरि । विचार करी लिखिताचा ॥ ४३ ॥
कृष्णासी नाहीं विषयगोडी । म्या पत्रिका लिहिली कुडी । जे भार्या होईन आवडी । जाहली अनावडी तेणें कृष्णा ॥ ४४ ॥
आढाल ढालाची पै थोर । अभाव भावें अतिसुंदर । दाटोनि रिघों पाहे घर । वशीकरण मज करील ॥ ४५ ॥
मग मी होईन तिज आधीन । जिवें जिता करील दीन । अमना आणूनियां मन । नाचवील निजछंदें ॥ ४६ ॥
कार्याकारण समस्त । तेचि करील निश्चित । सुचित्त आणि दुश्चित्त । आंदण्या दासी आणील ॥ ४७ ॥
तिच विकल्पिया बंधु । आंदणा येईल कामक्रोधु । तिचा बोळवा गर्वमदु । घरभेदू वाटेल ॥ ४८ ॥
माझेनि आंगें थोरावेल । मज ते नांवरूप करील । विषयगोडी वाढवील । मुद्दल वेंचील निजज्ञान ॥ ४९ ॥
होईल निर्लज्जा नि:शंक । मज देखों न शकती लोक । ऎसें जाणोनि निष्टंक । न योचि देख श्रीकृष्ण ॥ ५० ॥
लिखितीं चुकी पडली मोठी । पावेन शतजन्मांपाठीं । हें देखोनि जगजेठी । उठाउठी न पवेची ॥ ५१ ॥
मज नाहीं वैराग्य कडाडी । भेटी न मागेचि रोकडी । माझिया मुखरसाची गोडी । प्रतिबंधक मज झाली ॥ ५२ ॥
शिवादि चरणरज वांछित । त्या मज पाठविल लिखित । आंगे उडी न घालीच येथ । आळसयुक्त भीमकी ॥ ५३ ॥
लिखितासाठीं जरी मी सांपडे । तरी कां साधक शिणती गाढे । भीमकीं आहे केवळ वेडें । येणें न घडे मज तेथें ॥ ५४ ॥
कृष्ण न यावया एक भावो । द्विजें देखिला देवाधिदेवो । विस्मय दाटला पाहाहो । कार्य आठवो विसरला ॥ ५५ ॥
कृष्ण देखतां त्रिशुद्धी । ब्राह्मणासी लागली समाधी । हरपली मनोबुद्धी । लग्नशुद्धी कोण सांगे ॥ ५६ ॥
जे कृष्णासी मीनले । ते परतोनि नाहीं आले । मज आहे वेड लागलें । वाट पाहें द्विजाची ॥ ५७ ॥
मायबापांसी नेणतां । वधूने पाठविलें लिखिता । हेंच जाणोनि निंदिता । येता येतां परतला ॥ ५८ ॥
लग्नाआड येक राती । कां पां न येची श्रीपती । परात्पर उपरियेवरती । वाट पाहात उभी असे ॥ ५९ ॥
डोळा नलगेचि शेजेशी । निद्रेमाजी देखे कृष्णासी । तेणे स्वप्न -सुषुप्तीसी । जागृतीसी नाठवे ॥ ६० ॥
अन्न न खाय तत्त्वतां । जीविता देखे कृष्णनाथा । गोडी लागली अनंता । न लगे आतां धड गोड ॥ ६१ ॥
करूं जातां उदकपान । घोटासवें आठवे कृष्ण । विसरली भूक तहान । लागलें ध्यान हरीचें ॥ ६२ ॥
तोंडी घालितां फोडी । घेऊं विसरली ते विडी । कृष्णी लागलीसे गोडी । अनावडी विषयांची ॥ ६३ ॥
आळविल्या कानीं नायके । थापटिलीया न चक्के । देह व्यापिले यदुनायकें । शरीरसुखे विसरली ॥ ६४ ॥
पाय ठेवितां धरणीं । कृष्णा आठवी रुक्मिणी । सर्वांगी थरथरोनी । रोमांचित होऊनि ठाके ॥ ६५ ॥
लीला कमल घेतां हातीं । कृष्णचरण आठवतीं । नयनीं अश्रु लोटती । कृष्णप्राप्तीलागीं पिशी ॥ ६६ ॥
गोविंदें हरिलें मानस । जाहली विषयभोगीं उदास । पाहे द्वारकेची वास । मनीं आस कृष्णाचीं ॥ ६७ ॥
कां पां न येचि गोविंद । तरी माझेंचि भाग्य मंद । नाहीं पूर्वपुण्य शुद्ध । म्हणौनि खेद करीतसे ॥ ६८ ॥
मग म्हणे गा कटकता । किती करूं गे आहाकटा । मरमर विधातया दुष्टा । काय अदृष्टा लिहिलें असे ॥ ६९ ॥
आजिचेनि हें कपाळ । कृष्णप्राप्तीविण निष्फळ । म्हणूनियां भीमकबाळ । उकसाबुकसीं स्फुंदत ॥ ७० ॥
मज नलगे विंजणवारा । तेणे अधिक होतसे उबारा । प्राण रिघो पाहे पुरा । शार्ङ्गधरावांचोनि ॥ ७१ ॥
आंगी न लावा गे चंदन । तेणें अधिकचि होय दीपन । माझे निघों पाहती प्राण । कृष्णचरण न देखतां ॥ ७२ ॥
साह्य नव्हेचि गे अंबा । विन्मुख जाहली जगदंबा । आतां कायसी लग्नशोभा । प्राण उभा सांडीन ॥ ७३ ॥
शिवा भवानी रुद्राणी । कां पां न पवतीच कोणा । कां विसरली कुळस्वामिणी । चक्रपाणी न पवेचि ॥ ७४ ॥
नेत्रीं अश्रूंचिया धारा । दु:खें कांपतसे थरथरां । धरितां न धरवेचि धीरा । विकळ सुंदरा जातसे ॥ ७५ ॥
तंव लविन्नला डावा डोळा । बाहू स्फुरती वेळोवेळां । हीं तंव चिन्हे गे गोपाळा । प्राप्तिकर पैं होती ॥ ७६ ॥
कृष्णें सांगितलें द्विजासी । वेगीं जावें भीमकीपासी । थोर चिंता होतसे तिसी । उद्वेगेसीं अपार ॥ ७७ ॥
तिसी द्यावें आश्वासन । उदईक आहे तुझे लग्न । तुवां असावें समाधान । पाणिग्रहण मी करीन ॥ ७८ ॥
आठां भावांची परवडी । उभवूनि स्वानंदाची गुढी । द्विज धांविन्नला लवडसवडी । घालती उडी त्वरित ॥ ७९ ॥
भीमकी करीत असतां चिंता । द्विज देखिला अवचितां । हरिखें वोसंडली चित्ता । प्रसन्नता देखोनि ॥ ८० ॥
पहिला ब्राह्मण अतिदीन । याचें पालटलेंसे चिन्ह । दिसत आहे प्रसन्नवदन । घेऊनि कृष्ण पै आला ॥ ८१ ॥
कृष्णदर्शनासी प्राप्ती । द्विज पालटला देहस्थिती । आनंदमय जाहली वृत्ती । लिखितासाठीं द्विजाची ॥ ८२ ॥
जीवप्रयाणाची सुमुहूर्तता ॥ भक्तिनवरत्‍नांचें तारूं बुडतां । धैर्याचा स्तंभ पडतां । जाहला रक्षिता सुदेवो ॥ ८३ ॥
मरतया अमृतपान । किंवा अवर्षणीं वर्षे घन । दुष्काळलिया जेवीं मिष्टान्न । तेवीं आगमन दिजाचें ॥ ८४ ॥
मोहअंधारीं मणी पडला । तों युक्तीच्या हातीं चांचपडिला । न सांपडतां दीप लाविला । कृष्णागमनसुखाचा ॥ ८५ ॥
यापरी आला तो ब्राह्मण । कृष्णागमन भीमकीप्राण । घेऊनि आला जी संपूर्ण । जीवदानी सुदेवो ॥ ८६ ॥
ब्राह्मण म्हणे ना मीं आतां । घेऊनि आलों वो अनंता । देखिला गरुडध्वज झळकता । आनंद चित्ता न समाये ॥ ८७ ॥
आंगींची उतटली कांचोळी । मदिका दाटली आंगोळी । सर्वांगे हरिखली वेल्हाळी । जीवें वोंवाळी द्विजातें ॥ ८८ ॥
याचिया उपकारा उत्तीर्णता । पाहतां ने देखों सर्वथा । जेणें आणिले श्रीकृष्णनाथा । त्यासी म्यां आतां काय द्यावें ॥ ८९ ॥
यालागीं हो सद्‍गुरूसी । उत्तीर्णता नाहीं शिष्यांसी । कवण द्यावें पदार्थासी । हें वेदांसी न बोलवे ॥ ९० ॥
चिंतामणी दे चिंतिल्या अर्था । कल्पतरू तो कल्पिलें देता । सद्‍गुरु दे निर्विकल्पता । त्यासी उत्तीर्णता कैसेनि ॥ ९१ ॥
जो चुकवी जन्ममरण । त्यासी नव्हेचि उत्तीर्ण । कोटिजन्मांचे जन्ममरण । चुकविलें येणे गुरुनाथें ॥ ९२ ॥
देहें उतराई होऊं गुरुसी । तंव नश्वरता या देहासी । नश्वरें अनश्वरासी । उत्तीर्णता कैसी घडे ॥ ९३ ॥
जीवें व्हवे उतराई । तंव तो समूळ मिथ्या पाहीं। जीवासि जीवपण नाहीं । होईल कई उतराई ॥ ९४ ॥
गुरूसी उतराई होतां । न देखों कवणिया पदार्था । यालागीं चरणीं ठेविला माथा । मौनेंकरूनि रुक्मिणी ॥ ९५ ॥
मनीं देओनि साचार भावो । अति संतोषला सुदेवो । तुझेनि धर्मे आम्हां पाहा हो । कृष्णप्राप्ती साचार ॥ ९६ ॥
श्रीकृष्ण आला परिसोन । भीमकी पावली समाधान । उल्हासयुक्त जाहलें मन । हर्षे त्रिभुवन कोंदले ॥ ९७ ॥
करितां अंबिकापूजन । कृष्ण करिल भीमकीहरण । एका विनवी जनार्दन । श्रोतीं ध्यान मज द्यावें ॥ ९८ ॥
 
इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे पंचम: प्रसंग: ॥५॥
 
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥