गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

रुक्मिणी स्वयंवर प्रसंग दुसरा

श्रीगणेशाय नम: । कृष्णासी शरीरसंबंध । हा तंव बोलचि अबद्ध । वडीलपणें घेतला छंद । बुद्धिमंद म्हातारा ॥ १ ।
कृष्णासी सोयरिक न ये कामा । हें काय कळलें नाहीं तुम्हां । सखा मारिला अहंमामा । तो काय आम्हां धड होईल ॥ २ ॥
एक म्हणती नंदाचा । एक म्हणती वसुदेवाचा । ठाव नाहीं बापाचा । अकुळी साचा श्रीकृष्ण ॥ ३ ॥
मुळींचा नाहीं जन्मपत्र ॥ कवण जाणे कुळ गोत्र । कृष्ण नव्हे जी स्वतंत्र । भक्तपरतंत्र सदाचा ॥ ४ ॥
कर्म पहातां परद्वारीं । गोरसाची करी चोरी । धरितां न धरावें निर्धारीं । चोरटा हरी चित्ताचा ॥ ५ ॥
गाईपाठीं धांवता । पळूं शिकला तो तत्त्वतां । काळयवनापुढें पळतां । झाला रक्षिता मुचुकंद ॥ ६ ॥
कृष्ण वीर नव्हे गाढा । पळाला जरासंधापुढां । भेणें समुद्राचिया आगडा-माजी दुर्ग बसविले ॥ ७ ॥
केशिया मारिला तटू । बैल मारिला अरिष्टू । इतकियासाठीं वीर बाठू । केवीं सुभटू म्हणावा ॥ ८ ॥
मारिले वत्सासुर वासरूं । बकासुर तें पांखरूं । किरडूं मारिलें अघासुरू । इतुकेनि वीर केंविं होय ॥ ९ ॥
कृष्णासी उघड नाहीं वर्तणें । सदा संसारीं लपणें । त्याचीं मी जाणें विंदाणें । लपतीं स्थानें तीं ऎका ॥ १० ॥
चढे वैकुंठींचे पाहाडीं । क्षीरसागरीं देतसे बुडी । शेषाचिये फणें दडी । मिषें निद्रेचेनि राहे ॥ ११ ॥
विघ्न देखोनिया थोर । होय मत्स्य कीं सूकर । नातरी पाठी करोनि निबर । रूप धरी कमठाचें ॥ १२ ॥
दैत्य देखोनिया भारी । खांबामाजी गुरगुरी । बळें काढिलिया बाहेरी । नरसिंह होऊनि ठेला ॥ १३ ॥
दैत्य देखोनिया सबळ । जाहला भिकारी केवळ । बळीनें केला द्वारपाल । गळां बांधोनि द्वारासी ॥ १४ ॥
सवेचि खुजटपण सांडिले । रूप अणिकचि मांडिलें । दैत्यफळकट काढिले । मजुर जाहले मायेचे ॥ १५ ॥
राखितां इंद्राची गाय । दैत्यें मारिली माय । रडे ये माय माय । सांगूं काय तयाचें ॥ १६ ॥
थोर मांडिलें सांकडें ॥ तैसें मेळविली माकडें । आतांचि पाहा रोकडें । गोवळियांपुढें नाचतसे ॥ १७ ॥
कृष्णाची आणिक कहाणी । तो स्त्री जाहला मोहिनी । सुरां-असुरां ठकवूनी । महादेव मोहिला ॥ १८ ॥
शेखीं जाहला म्हाळसा । वास केला त्या निवासा । त्याचेनि धर्में राहूं कैसा । रविचंद्रासी लागला ॥ १९ ॥
कृष्णांसी नाहीं रूप गुण । न देखॊं एकदेशी स्थान । तयासी कैंचें सिंहासन । वृत्तिशून्य वर्ततसे ॥ २० ॥
कृष्णासी नाही देहाभिमान । कदा नेणे मानापमान । तयाचे गांठी कैंचे धन । भाजीचे पान खातसे ॥ २१ ॥
कृष्णाचा भाव एक । नव्हे स्त्री पुरुष ना नपुंसक । पाहतां निश्चयो एक । नव्हे निष्टंक निर्धारें ॥ २२ ॥
जयासी माया दोन पाहीं । दोघीं वर्तती दोन ठायी । एक देही एक विदेही । देवकीही यशोदा ॥ २३ ॥
एकीं स्वबोध उपजविती । दुजी वाढवी विषयप्रीती । दोघी सांडुनि तळमळती । धर्माप्रती धांविन्निला ॥ २४ ॥
उच्छिष्ट काढी धर्माघरी । ब्राह्मणाची भीड थोरी । लाथ हाणीतली उरावरी । तें पद मिरवी निलाजरा ॥ २५ ॥
तया कृष्णासीं सोयरीक करणें । तेंचि आम्हां विटंबवाणे । सदा संसारी लपणें । लाजिरवाणे लोकांत ॥ २६ ॥
तयासी द्यावें जी भावंड । तैं आमुचें काळें तोंड । या बोलासी म्हणाल पाखंड । तरी ज्ञातें उदंड तुम्हांपाशी ॥ २७ ॥
कृष्ण अतीत चहूं वाचा । तेथें वाग्निश्चयो घडे कैंचा । शब्दनिश्चयो नव्हे साचा । सत्य वाचा हे माझी ॥ २८ ॥
बोला भाके जो सांपडे । तयासी वाग्निश्चयो घडे । हें तंव अवघेचि कुडें । जाणत वेड का होतां ॥ २९ ॥
कुळकर्माचा अंतू । आपणांसकट सकळांचा घातू । करणे असेल जीवा अंतू । तरी कृष्णनाथू वरावा ॥ ३० ॥
जैसे निजतत्त्व निर्मळ । तैसा राया राहें निश्चळ । कुळाभिमानी सबळ । देहसंबंध मी जाणे ॥ ३१ ॥
जन्म कर्म कुळ गोत्र । उंच नीच वर्ण विचित्र । कर्माचें जें कर्मतंत्र । जाणता स्वतंत्र मी एकूं ॥ ३२ ॥
शरीरसंबंधाचें कारण । घटित आहे मजआधीन । प्रकृतिपुरुषां पाणिग्रहण । माझेनि जाण होतसे ॥ ३३ ॥
वचन ऎका प्रबळ । चैद्यदेशीं भूपाळ । महा अभिमानी शिशुपाळ । सोयरा केवळ तो आम्हां ॥ ३४ ॥
शरीरसंबंधाचे घटित । तयाशींचे आहे निश्चित । तुम्ही बैसलेति पंडित । उचितानुचित विचारा ॥ ३५॥
कर्मकांडीचे वेदपाठक । बोलावूनि ज्योतिषी गणक । वाग्निश्चयाचे वाग्जाळिक । शास्त्रें शाब्दिक सोडिलीं ॥ ३६ ॥
मेळा पांचां पंचकांचा । शब्दनिश्चयो तेणें साचा । साभिमान गर्जे वाचा । सोयरा आमुचा शिशुपाळ ॥ ३७ ॥
रुक्मिणी काया मनें वाचा । निश्चय केला श्रीकृष्णाचा । बाहेर वाग्निश्चय शब्दाचा । शिशुपाळासी रुक्मिया ॥ ३८ ॥
लग्नपत्रिका पाहतां डोळां । एक नाडी जी शिशुपाळा । कृष्ण नेईल भीमकबाळा । यासी अवकळा वरील ॥ ३९ ॥
वर शिशुपाळा ऎकतां । दचकली ते राजदुहिता । जैसा सिद्धासी सिद्धिलाभ होता । उठे अवचिता अंतराय ॥ ४० ॥
कवण उपासूं गे देवता । कवणकवणा जावे तीर्था । कवण नवस नवसूं आतां । कृष्णनाथप्राप्तीसी ॥ ४१ ॥
जैसा सद्‍बुद्धीआड कामक्रोधू । कां विवेकाआड गर्वमदू । स्वधर्माआड आळससिंधू । तैसा बंधु रुक्मिया ॥ ४२ ॥
जैसा सविवेक वैरागी । विघ्ने जिणोनी जाय वेगीं । तैसा प्रयत्‍न कृष्णालागीं । करीन स्वांगीं मी देखा ॥ ४३ ॥
कृष्णप्राप्तीचा विचारू । तेथे करूं नये दुजियाचा संचारू । वृत्ति करावी तदाकारू । धैर्यबळें आपुलेनी ॥ ४४ ॥
गुज सांगूं मायेपाशीं । परी साध्य नव्हे तियेसी । रडूं निघेल मोहेंसीं । मिठी लोभेंसीं घालूनी ॥ ४५ ॥
माझिया आशेचिया साजणी । दीन तृष्णेच्या ब्राह्मणी । मिळतील सद्वासना सुवासिनी । मज वेढूनि घेतील ॥ ४६ ॥
तेणें होईल थोर शब्दू । ऎकेल अभिमानिया बंधू । कृष्णप्राप्तीसी अवरोधू । सबळ क्रोधू उपजेल ॥ ४७ ॥
ऎसें विचारूनि जाण । निजभावाचा ब्राह्मण । आप्त पाचारिला सज्ञान । अतिगहन विवेकी ॥ ४८ ॥
कृष्णप्राप्तीचा सद्भावो । यालागीं तो सुदेवो । कृष्ण प्राप्तीसी धाडिला पहा हो । निजपत्रिका देवोनी ॥ ४९ ॥
सातां श्लोकांची व्युत्पत्ती । उपाव भाव आर्तकीर्ती । विवेक निश्चयो निजभक्ती । कृष्णासी विनंती पाठविली ॥ ५० ॥
एका जनार्दनीं मन । श्रोतीं व्हावें सावधान । प्रेमपत्रिकेचें लेखन । अनुसंधान भीमकीचें ॥ ५१ ॥
 
इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे द्वितीय: प्रसंग: ॥ २ ॥
 
॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥