बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री भक्तविजय अध्याय ३२

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीद्वारकानाथाय नमः ॥
मथुरेची मूर्ति पुरातन ॥ हरिद्वारासी गेली जाण ॥ तें चरित्र अतिपावन ॥ श्रोतीं सादर ऐकावें ॥१॥
शिवरात्रिपर्वकाळीं ॥ रामेश्वरीं यात्रा भरली ॥ दोघे ब्राह्मण तये वेळीं ॥ उत्तरदेशाहूनि पातले ॥२॥
तीर्थवासी दोघे जण ॥ उदास विरक्त पवित्र ब्राह्मण ॥ हरिभजन प्रेमेंकरून ॥ रात्रंदिन करिताती ॥३॥
एकासी एक वर्तमान ॥ पुसतां एक म्हणे ब्राह्मण ॥ हरिद्वारीं कुटुंब जाण ॥ माझें असे सर्वही ॥४॥
एक म्हणे गौडदेश देखा ॥ तेथें माझी असे जन्मभूमिका ॥ माय बाप बंधु सखा ॥ हरिविण देखा मज नाहीं ॥५॥
तीर्थें करून सप्तपुरी ॥ आतां आलों रामेश्वरीं ॥ निराधार ब्रह्मचारी ॥ नाम माझें जाणिजे ॥६॥
ऐसें ऐकूनियां वचन ॥ संतोषला कल्याण ब्राह्मण ॥ दोघे एका संगतीकरून ॥ तीर्थक्षेत्र पाहती ॥७॥
श्रीहरीचे गुणानुवाद ॥ रात्रंदिवस गाती करून विशद ॥ आत्मानात्मचर्चा प्रसिद्ध ॥ परस्परें बोलती ॥८॥
ऐसें करितां तीर्थाटन ॥ मथुरेसी आले दोघे जण ॥ यमुनातीरीं करूनि स्नान ॥ माधवराव पूजिला ॥९॥
त्रिरात्र तेथें राहिले ॥ तों कल्याणासी हींव लागलें ॥ न जाय उपाय करितां भले ॥ कृश जाहलें शरीर ॥१०॥
कोणासी न सोडी शरीरभोग ॥ चंद्रासी लागला क्षयरोग ॥ इंद्राअंगीं सहस्रभग ॥ पूर्वकर्में तयाच्या ॥११॥
ब्रह्मकपाट लागलें पाठीं ॥ तेणें सदाशिव केला हिंपुटी ॥ हालाहल घेतलें पोटीं ॥ नील कंठीं जाहला ॥१२॥
असो आतां ते कथनपरी ॥ दोघे राहिले मथुरापुरीं ॥ परोपकारें ब्रह्मचारी ॥ सेवा करीत कल्याणाची ॥१३॥
भूतदया नसतां चित्तीं ॥ जगीं संत जे म्हणविती ॥ त्यांसी श्रीहरीची प्राप्ती ॥ कल्पांतीही न होय ॥१४॥
तैसा नव्हे ब्रह्मचारी ॥ सत्यवादी परोपकारी ॥ भूतदया जयाचें अंतरीं ॥ मूर्तिमंत वसतसे ॥१५॥
औषध पथ्य करूनि त्यासी ॥ जवळी बसे अहर्निशीं ॥ षण्मासपर्यंत कल्याणासी ॥ शरीरभोगें पीडियेलें ॥१६॥
तोपर्यंत राहिला जवळी ॥ रात्रंदिवस तयातें सांभाळी ॥ म्हणे कृपावंत वनमाळी ॥ आरोग्य करीं याजला ॥१७॥
पुरला शरीराचा भोग ॥ कल्याण जाहला अरोग ॥ म्हणे अप्तसखा ॥ सोयरा जिवलग ॥ निराधार तूं माझा ॥१८॥
निराधारियास आधार ॥ हें नाम तुझें साचार ॥ मजला तुझा उपकार ॥ न फिटेचि जन्मोजन्मीं ॥१९॥
कांता पुत्र कन्या ऐसीं ॥ अवघीं राहिलीं घरासी ॥ कामा आलासी परदेशीं ॥ विष्णुभक्ता मजलागीं ॥२०॥
माझी कन्या कुंवार घरीं ॥ आठां वरुषांची नोवरी ॥ घरासी जाऊनि निर्धारीं ॥ तुजकारणें देईन ॥२१॥
ऐकोनि म्हणे ब्रह्मचारी ॥ मी गृहस्थाश्रम कदा न करीं ॥ दुःखरूप या संसारीं ॥ मज कासया घालितां ॥२२॥
कल्याण म्हणे तयासी ॥ संसारबाधा तुज कायसी ॥ त्याचा भार हृषीकेशी ॥ अंगें आपण चालवी ॥२३॥
मथुराक्षेत्र पुण्यपावन ॥ संकल्प घालितों तुजकारण ॥ अंगीकारीं कन्यादान ॥ हरिभक्ता उदासिया ॥२४॥
ब्रह्मचारी म्हणे त्यासी ॥ तुम्ही वृद्ध तीर्थवासी ॥ घरीं जातां स्त्रियेसी ॥ तुमची गोष्ट मानेना ॥२५॥
संकल्प जरी म्यां घेतला ॥ आणि पुढें विवाह जरी न जाहला ॥ तरी जन्म वृथा गेला ॥ ऐसें मजला वाटतसे ॥२६॥
ब्रह्मचर्य ना गृहस्थाश्रम ॥ ऐसें होईल मज जाण ॥ कल्याण म्हणे श्रीकृष्ण ॥ साक्ष आतां ठेवितों ॥२७॥
महाद्वारीं जाऊनि दोघे जण ॥ वंदिले श्रीकृष्णचरण ॥ ब्रह्मचारियासी बैसवून ॥ उदक हाती घातलें ॥२८॥
कीं कन्या दिल्ही तुजकारण ॥ घरासी जाऊनि करीन लग्न ॥ यासी साक्ष जगज्जीवन ॥ माधवराव मथुरेचा ॥२९॥
वंदोनियां श्रीकृष्णचरण ॥ दोघे निघाले सत्वर तेथून ॥ तीन वार वाट चालून ॥ हरिद्वारासी पातले ॥३०॥
कल्याण गेला घरासी ॥ कोणी न बोलती तयासीं ॥ वृद्धकाय तीर्थवासी ॥ कोणी तया पुसेना ॥३१॥
सर्व सुखाचे सांगाती ॥ अंतीं अव्हेरूनियां देती ॥ यालागीं सावधान चित्तीं ॥ सर्वकाळ असावें ॥३२॥
पुत्र म्हणती बहु हिंडला ॥ परी शेवट नाहीं जाहला ॥ ब्रह्मचारी कोण आणिला ॥ हें आम्हांसी कळेना ॥३३॥
कल्याण निजला घरांत ॥ कांतेप्रती काय बोलत ॥ तीर्थें हिंडतां मथुरेंत ॥ दुखणें मज जाहलें ॥३४॥
ते म्हणें तीर्थीं मरावयासी ॥ सुकृत नाहीं तुम्हांपासीं ॥ मागुती आलेती गृहासी ॥ तोंड येथें घेऊनियां ॥३५॥
कल्याण म्हणे ऐकें वचन ॥ आयुष्य असतां न येचि मरण ॥ ब्रह्मचार्‍याचे संगतीन ॥ बहुत सुख पावलों ॥३६॥
पथ्य औषध परदेशीं ॥ येणें केलें वो मजसी ॥ ते म्हणे भ्रतारासी ॥ नवल काय जाहलें ॥३७॥
संगतीसी असतां देख ॥ सांभाळीती एकासी एक ॥ आतां आला असे टणक ॥ निद्रा करा उगाचि ॥३८॥
ऐसा संवाद ब्रह्मचारी ॥ ऐकतसे निजोनि द्वारीं ॥ कल्याण तये अवसरीं ॥ काय स्त्रियेसी बोलिला ॥३९॥
मथुराक्षेत्र पुण्यवंत ॥ महाद्वारीं जाऊनि तेथ ॥ आपुली कन्या निश्चित ॥ ब्रह्मचार्‍यासी अर्पिली म्यां ॥४०॥
कांता बोले ते अवसरा ॥ दुसरें लग्न आपुलें करा ॥ कन्या होईल तिचें उदरा ॥ तेचि द्या हो त्याजला ॥४१॥
कल्याण म्हणे हरिभक्तासी ॥ कन्या जरी तूं अर्पिसी ॥ तरी पार नाहीं पुण्यासी ॥ वचन न मोडीं आमुचें ॥४२॥
ते म्हणे विहिरींत लोटून ॥ कन्या आतांचि मी देईन ॥ अथवा रांडकीच ठेवीन ॥ आपुलें घरीं तैसीच ॥४३॥
परी हरिभक्ताचें घरीं ॥ कदा न देईं मी कुमारी ॥ कल्याण पुत्रासी विचारी ॥ नये चित्तासी तयाचे ॥४४॥
दुसरे दिवसीं दोघे जण ॥ राजद्वारीं गेले जाण ॥ मथुरेचें वर्तमान ॥ जाहलें तैसेंचि सांगितलें ॥४५॥
ब्राह्मण म्हणे नृपनाथा ॥ माझा संकल्प गेला वृथा ॥ यमपुरीचिया पंथा ॥ जावें लागेल मज वाटे ॥४६॥
म्यां संकल्प घातला प्रीतीं ॥ घरीं कांता पुत्र नायकती ॥ तुवां सांगूनि तयांप्रती ॥ कन्या देववीं नृपनाथा ॥४७॥
राजा म्हणे ब्राह्मणासी ॥ सत्य न वाटे वचनासी ॥ संकल्प सोडितां मथुरेसी ॥ साक्ष कोणासी ठेविले ॥४८॥
निराश्रय ब्रह्मचारी ॥ राजयासी म्हणे ते अवसरीं ॥ वैकुंठपति मुरारी ॥ मथुरावासी श्रीकृष्ण ॥४९॥
अनंत ब्रह्मांडांच्या गती ॥ ज्याचे इच्छामात्रें होती जाती ॥ तो पुराणपुरुष रुक्मिणीपती ॥ साक्ष तयासी ठेविले ॥५०॥
ऐकूनि म्हणे नृपवर ॥ साक्ष ठेविला रुक्मिणीवर ॥ तो येथें येऊनि सत्वर ॥ आम्हांसी जरी सांगेल ॥५१॥
तरी कन्या देववीन जाण ॥ ऐसें ऐकोनिंयां वचन ॥ ब्रह्मचारी म्हणे जगज्जीवन ॥ साक्ष द्यावयासी आणितों ॥५२॥
तेथोनि निघाला सत्वर ॥ पंथ क्रमिला तीनवार ॥ मथुरेचा श्यामसुंदर ॥ दर्शन त्याचें घेतलें ॥५३॥
म्हणे देवाधिदेवा अनंता ॥ साक्ष द्यावयासी चलावें आतां ॥ नाहीं तरी जातें वृथा ॥ ब्रह्मचर्यव्रत माझें ॥५४॥
देव म्हणे तयाप्रती ॥ कैसी चालेल पाषाणमूर्ती ॥ येरू म्हणे जैसी बोलती ॥ तैसीच आतां चालेल ॥५५॥
मी तरी असें निराधारी ॥ तुझाचि आश्रय आहे हरी ॥ आतां चलावें तेथवरी ॥ कृपावंता जगदीशा ॥५६॥
ऐसें ऐकूनी श्रीरंग ॥ भक्तकार्यासी निघाला सवेग ॥ ब्रह्मचार्‍यासी म्हणे मागें ॥ परतोनि नको पाहूं तूं ॥५७॥
मागें पाहासील परतोन ॥ तरी तेथेंच मी राहीन ॥ ऐसें बोलोनि जगज्जीवन ॥ तयामागें चालिले ॥५८॥
दैदीप्यमान सतेज मूर्ती ॥ दिव्यालंकार प्रभा फांकती ॥ पायीं नेपुरें वाळे वाजती ॥ रातोरातीं पातला ॥५९॥
समीप आले जगन्निवास ॥ तेथून नगर राहिलें अर्थकोस ॥ मागिले मागें हृषीकेश ॥ उभा तेथेंच राहिला ॥६०॥
ब्राह्मण पाहे परतोनी ॥ तों उभा राहिला चक्रपाणी ॥ तेज न समाये गगनीं ॥ काय बोले विप्रासी ॥६१॥
तुज म्यां पूर्वींच सांगितलें ॥ मागें परतोनि त्वां पाहिलें ॥ आतां राजयासी वहिलें ॥ घेऊनि येईं मजपासी ॥६२॥
निराश्रय ब्रह्मचारीं ॥ तेथोनि निघाला झडकरी ॥ राजसभेमाझारी ॥ जाऊनि काय बोलिला ॥६३॥
अंबरीषाच्या कैवारेंकरूनी ॥ जेणें अपमानिला दुर्वास मुनी ॥ तो क्षीराब्धिवासी मोक्षदानी ॥ साक्ष द्यावयासी आणिला ॥६४॥
रावण कुंभकर्ण इंद्रजित सर्व ॥ मारूनि सोडविले बंदींचे देव ॥ तो अयोध्यावासी राघव ॥ साक्ष द्यावया आणिला ॥६५॥
गोकुळीं घरोघरीं करी चोरी ॥ मातेनें उखळीं बांधिला हरे ॥ तो वैकुंठपति मुरारी ॥ साक्ष द्यावया आणिला ॥६६॥
कंस चाणूर मर्दून ॥ राज्यीं स्थापिला उग्रसेन ॥ तो मथुरावासी जगज्जीवन ॥ साक्ष द्यावया आणिला ॥६७॥
दुःशासनें छळितां द्रौपदी सती ॥ वस्त्रें नेसविलीं अनंतहस्तीं ॥ तो भक्तकैवारी रुक्मिणीपती ॥ साक्ष द्यावया आणिला ॥६८॥
ऐसें ऐकूनियां वचन ॥ आश्चर्य करिती सकळ जन ॥ राजा धांवोनि वंदी चरण ॥ ब्राह्मणाचे तेधवां ॥६९॥
गरुडटके निशाण भेरी ॥ वाद्यें वाजती अति गजरीं ॥ राजा चालिला सामोरीं ॥ वैष्णव नामें गर्जती ॥७०॥
जाहला एकचि जयजयकार ॥ देव वर्षती पुष्पसंभार ॥ मथुरेहूनि यदुवीर ॥ साक्ष द्यावयासी पैं आले ॥७१॥
कीर्तन करिती संतजन ॥ राजा घाली लोटांगण ॥ मूर्ति देखिली देदीप्यमान ॥ चतुर्भुज साजिरीं ॥७२॥
मुकुट विराजित अलंकार ॥ कांसे कसिला पीतांबर ॥ ऐसा देखोन यदुवीर ॥ सकळां संतोष जाहला ॥७३॥
बैरागी संत भक्तजनांसी ॥ राजा आपण पुसे तयांसी ॥ तुम्ही जातसां मथुरेसी ॥ मूर्ति तेथील हेचि कीं ॥७४॥
राजासी सांगती संतजन ॥ मथुरावासी श्रीकृष्ण ॥ तोचि हा पैं जगज्जीवन ॥ भक्तकार्यासी धांवला ॥७५॥
नगरवासी लोक सावकार ॥ तयांसी सांगे नृपवर ॥ वधूचें साहित्य अति सत्वर ॥ तुम्हीं सिद्ध करावें ॥७६॥
वराकडील आम्ही जाण ॥ ऐसें ऐकोनि धरिलें लग्न ॥ पांच कोस मंडप जाण ॥ चौफेर घातला ते समयीं ॥७७॥
लग्नासी आले नारायण ॥ ऐसें ऐकोनि वर्तमान ॥ अमित मिळाले विद्वज्जन ॥ भक्तमहिमान पाहावया ॥७८॥
लक्ष्मीकांत आला जेथ ॥ उणा पदार्थ न दिसे तेथ ॥ वाद्यें वाजती अपरिमित ॥ सुरवर आले पाहावया ॥७९॥
अंतःपट धरूनि जाण ॥ काय बोलती ब्राह्मण ॥ वैकुंठवासी श्रीभगवान ॥ या वधूवरांसी रक्षिता ॥८०॥
जेणें मीनरूप धरूनी ॥ शंखासुर मारिला आपटोनी ॥ तो क्षीराब्धिवासी चक्रपाणी ॥ वधूवरांसी रक्षिता ॥८१॥
प्रल्हाद गांजतां जाण ॥ निघाला स्तंभ फोडून ॥ तो नरहरिरूप भगवान ॥ वधूवरांसी रक्षिता ॥८२॥
माती खातां नंदाघरीं ॥ ब्रह्मांडें दाखविलीं उदरीं ॥ तो यशोदानंदन मुरारी ॥ वधूवरांसी रक्षिता ॥८३॥
उच्छिष्ट काढितां धर्माघरीं ॥ पांडवांसी रक्षी नानापरी ॥ तो भक्तवत्सल श्रीहरी ॥ वधूवरांसी रक्षिता ॥८४॥
कलियुगीं मथुरेहून ॥ चालत आला जगज्जीवन ॥ तो मथुरावासी श्रीकृष्ण ॥ वधूवरांसी रक्षिता ॥८५॥
ऐसीं अष्टकें म्हणोनी ॥ लग्न लाविलें ब्राह्मणीं ॥ चार दिवस सोहळा करूनी ॥ जन वर्‍हाडी बोळविले ॥८६॥
मूर्ति राहिली हरिद्वारीं ॥ नूतन मूर्ति मथुरापुरीं ॥ भक्ताभिमानी श्रीहरी ॥ नाना चरित्रें दाखवी ॥८७॥
नाना क्षेत्रीं बैसोन ॥ उद्धरीत निजभक्तजन ॥ जैसा जयाचा भाव पूर्ण ॥ त्याकारणें होय तैसा ॥८८॥
दक्षिणदेश्सीं श्रीपंढरीं ॥ पश्चिमदेशीं द्वारकानगरीं ॥ उत्तरदेशीं हरिद्वारीं ॥ पाहातो वाट भक्तांची ॥८९॥
पूर्वदिशेसी जगन्नाथ ॥ चतुर्भुज मूर्ति विराजित ॥ श्रोतीं स्वस्थ करूनि चित्त ॥ भक्तचरित्रें परिसावीं ॥९०॥
पुढिले अध्यायीं कथासार ॥ सुरदास अक्रूरअवतार ॥ त्याचें चरित्र अति प्रियकर ॥ श्रोतीं सादर परिसावें ॥९१॥
श्रीपांडुरंग आनंदसरोवर ॥ भक्तकथा ह्या कमळिणी थोर ॥ महीपति तेथें होऊनि भ्रमर ॥ त्यांतील आमोद सेवीतसे ॥९२॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ द्वात्रिंशाध्याय रसाळ हा ॥९३॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
श्रीभक्तविजय द्वात्रिंशाध्याय समाप्त