बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

।। श्री गजानन महाराज नमस्काराष्टक ||

योगी दिगंबर विरक्तविदेही संत ।
उद्यान भक्तितरुचे फुलवी वसंत ।।
शेगांव क्षेत्र बनले गुरुच्या प्रभावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।१।।
ओहोळ घाण जल वाहत विषयांचे ।
भावार्थ तोय स्फटिकासम तेथ साचे ।।
तुंबी तुडुंब भरले किती स्तोत्र गावें ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।। २ ।।
संत्रस्त पंक्तिस करी बहु काकपंक्ती ।
गेली क्षणात उठुनी परसोत उक्ती ।।
आत्मैक्य हे गुरूवरा, प्रचितीस यावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।३।।
पेटूनी मंचक धडाडत अग्निज्वाला ।
मध्ये सुशांत गुरुमूर्ति न स्पर्श झाला ।।
ते योग वैभव पुन्हा नयना दिसावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।४।।
तारीयली सहजची तरि नर्मदेत ।
देवी सदिव्य प्रकटे नवलाव होत ।।
ज्याच्या कृपे भवजली तरुनीच जावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।५।।
जे ब्रह्म ब्रह्मगिरीला कळले न साच ।
पांडित्य मात्र नुसते उरला तसाच ।।
त्या सांगती नित मुखे हरीनाम घ्यावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।६।।
बाधे तृषा गुरुवरा जल ना मिळाले ।
खाचाड रूक्ष असतां झणि तोय आले ।।
प्रार्थू पदीं हृदय भक्ति जले वहावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।७।।
स्वामी समर्थ जगती अवतार घेती ।
कष्टोनि धेनु व्दिज धर्मचि रक्षिताती ।।
घ्या धेनुदास पदरी जरी पापि ठावें ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।। ८ ।।