Festival Posters

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय २७

Updated: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (14:07 IST)
 
भर्तरीच्या लग्नाच्या दिवशी सीमंतपुजनाच्या वेळी राजाचा पिता सुरोचन गंधर्व स्वर्गाहून खाली आला. तो सत्यवतीस व विक्रमात भेटला. त्या वेळी विक्रमराजा पित्याच्या पायां पडला. मग राजानें सुमंतीक प्रधानास बोलावून आणलें व सुरोचनास भेटविलें त्यां गंधर्वानें प्रधानास म्हटलें, तुझें थोर भाग्य म्हणून धृमीननारायणाचा अवतार जो भर्तरी तो तुझा जांवई झाला. हा प्रत्यक्ष मित्रावरूणीचा ( सूर्याचा ) पुत्र होय. अशी त्याची समग्र मूळकथा सांगितल्यानंतर प्रधान पुन्हां सुरोचनाच्या पायां पडला व त्यास आग्रह करून सन्मानानें सीमंतपूजनासाठीं मंडपांत घेऊन गेला. तेव्हां त्या गंधर्वानें मनुष्याचा वेष घेतला होता. सीमंतपूजन झाल्यावर वधुवरांस आशीर्वाद देतेस मयीं स्वर्गीतून देवांनी पुष्पवृष्टि केली व लग्नमंडपांत असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून जयघोष केला.नंतर पांच दिवसपर्यंत लग्नसमांरभ मोठ्या थाटानें करून सर्वांस उत्तम वस्त्रें, भूषण दिलीं व वर्‍हाडी मंडळी मोठ्या गौरवानें रवाना केली. त्या लग्नासमयीं गोरगरिबांस राजानें पुष्कळ द्रव्य देऊन संतुष्ट केलें.सुरोचन गंधर्व आणि सत्यवती मुलाच्या लग्नसमारंभांत व्याही व विहीण म्हणून मिरवत होती. सुरोचन तेथें एक महिनाभर राहिला होता. नंतर सर्वांस भेटून व त्यांची परवानगी घेऊन तो आपल्या स्थानी गेला.
 
भर्तरीचें पिंगलेशीं मोठ्या थाटाने विवाह लागल्यानंतर पुढें कांहीं दिवसांनीं त्यानें दुसर्‍याहि स्त्रिया केल्या. त्यास एकंदर बाराशें स्त्रिया होत्या. त्यांत मुख्य पट्टराणी पिंगलाच होती, ही उमयतां अत्यंत प्रीतीनें वागत. त्यांना एकमेकांचा वियोग घटकाभर सुद्धां सहन होत नसे. तो मोठा विषयी होता. यास्तव त्यास रात्रदिवस स्त्रियांचे ध्यान असे. अश रीतीनें भर्तरीराजा सर्व सुखांचा यथेच्छ उपभोग घेत असतां बरीच वर्षे लोटली.
 
एके दिवशीं भर्तरी अरण्यांत शिकारीकरितां जात असतां, मित्रावरूणीनें ( सूर्यानें ) त्यास पाहिलें व मनांत विचार केला कीं, माझे पुत्र दोन; एक अगस्ती व दुसरा भर्तरीनाथ, त्यापैकीं पहिल्यानें तर ईश्वरप्राप्ति करून घेऊन आपलें हित साधून घेतलें, पण दुसरा भर्तरीनाथ मात्र विषयविलासांत निमग्र होऊन आपले कर्तव्यकर्म विसरला. यास्तव हा आपलें स्वहित साधून घेईल, असा कांही तरी उपाय योजिला पाहिजे.
 
मग भर्तृहरी ( भर्तरी ) चा भ्रम उडावा आणि त्यानें आपल्या हिताचा मार्ग पाहावा म्हणून मित्रावरूणीनें पृथ्वीवर येऊन दत्तात्रयाची भेट घेतली व समग्र वर्तमान निवेदन करून आपला हेतु कळविला. तेव्हा दत्तात्रेयानें सूर्यास सांगितल्यें कीं, भर्तरीविषयी तूं कांहीं काळजी न करितां आपल्या स्थानास जा; मी त्यास नाथपंथी म्हणुन मिरवून त्रैलोक्यांत नांवाजण्याजोगा करीन, तुझा पुत्र भर्तरी हा माझ्या आशीर्वादानें चिरंजीव होईल. ह्यापूर्वीच जें भविष्य करून ठेविलिलें आहे तदनुसार घडून आल्यावांचून राहावयाचें नाहीं, परंतु तूं मला आठवण केलीस हें फार चांगलें झालें आतां तूं पुत्राविषयीं कांही एक काळजी न वाहतां खुशाल जा: मला जसें योग्य दिसेल तसें मी करीन. इतकें सांगुन सूर्यास रवाना केलें व दत्तात्रेय भर्तृहरीसमगमें गुप्तपणें जाऊं लागला.
 
भर्तृहरी अरण्यांत शिकारीला गेला, त्या वेळी त्यानें अपार सेना समागमें घेतली होती. चौत्राचा महिना असल्यानें प्रखर उन्हाचे दिवस होते त्या दिवशी तिसरा प्रहर होऊन गेला. तरी त्यास कोठें पाणी मिळेना. तहानेनें ते लोक कासावीस होऊं लागले. त्यानीं बराच शोध केला, पण उदकाचा पत्ता लागेना, सर्वजण व्याकुल होऊन चौफेर पडून राहिले. राजाहि पाणी पाणी करीत होता व त्याच्या घशास कोरड पडली. बोलण्याचें अवसानहि राहिलें नाही. अशी सर्वांची अवस्था होऊन गेलीं. तें पाहूण दत्तात्रेयानें एक मायावी सरोवर निर्माण केलें. त्याच्या आजूबाजूस मोठेमोठे वृक्ष असून ते फलपुष्पांनी लादलेले व थंडगार वारा सुटलेला व तेथें पक्ष्यांचा किलकिलाट चालला होता. अशा सुंदर व रमणीय स्थानीं दत्तात्रेय आश्रम बांधून राहिलेले दिसत होते.
 
भर्तहरी स्वतः अरण्यामध्यें पाण्याचा शोध करीत फिरत होताच त्याच्या दृष्टीस हें सरोवर पडलें. तेव्हां तो एकटाच उदक पिण्यासाठी त्या सरोवराच्या कांठीं गेला व आतां पाणी पिणार इतक्यांत पलीकडे दत्तात्रेयानें ओरडून म्हटलें, थांब थांब ! उदकास स्पर्श करूं नकोस. तूं कोण आहेस ? तुझें नांव काय ? तें मला प्रथम सांग. दत्तात्रेयस्वामीस पाहतांच राजा चकित झाला आणि त्यास भीतीहि उत्पन्न झाली. तो तोंडांतून ब्रहि न काढितां, टकमक पाहूं लागला. तेव्हां दत्तात्रेयानें त्यास म्हटलें कीं तूं बोलत कां नाहींस ? तूं कोण आहेस ? तुझे आईबाप कोण ? गुरु कोण ? हें मला सांग व मग पाणी पी. तें भाषण ऐकून भर्तहूरी दत्तात्रेयाच्या पायां पडला. नंतर त्यानें आपली सविस्तर हकीगत त्यास सांगितलीं व अजूनपर्यंत गुरु केला नाहीं असें सांगितलें. तेव्हां दत्तात्रेयानें त्यास सांगितलें की, ज्याअर्थीं अद्यापपावेतों तूं गुरु केला नाहींस, त्या अर्थी तूं अपवित्र आहेस म्हणुनच तुला अजून कोणी गुरु मिळाला नाहीं, याकरितां तूं उदकास शिवूं नको. शिवशील तर तें सर्व पाणी आटून तळें कोरडें पडेल व मग मला राग येईल. तेणेंकरून तूं नाहक भस्म होऊन जाशील.
 
अशा प्रकरें दत्तात्रेयानें भर्तृहरीचा धिक्कार केल्यानंतर तो स्वामीच्या पायां पडून प्रार्थना करूं लागला की, महाराज ! माझा प्राण तृषेनें जाऊं पाहात आहे; आपन अनुग्रह करून मला उदक पाजावें. त्यावर दत्तात्रेयानें सांगितलें कीं, माझ्या अनुग्रहास तूं योग्य नाहींस, शंकर, ब्रह्मदेव माझ्या अनुग्रहासाठीं खेपा घालितात; असें असतां, तूं मला अनुग्रह करावयास सांगतोस ही गोष्ट घडेल तरी कशी ? हें ऐकून भर्तृहरी म्हणाला, तें कसेंहि असो, तुम्हीं कृपाळू आहां; दया क्षमा तुमच्या अंगीं आहे, तर कृपा करून मला उदक पाजावें व माझे प्राण वांचवावें. तेव्हां दत्तात्रेयानें त्यांस सांगितलें कीं, तुं म्हणतोस तर मी तुला अनुग्रह देतों; पण तूं बारा वर्षेपर्यंत तपश्चर्या करून अनुग्रह घेण्यास योग्य हो. त्यावर राजा म्हणाला, सध्यांच माझा प्राण जात आहे; मग बारा वर्षे कोणीं पाहिलीं आहेत ? दत्तात्रेयानें त्यास समजावून सांगितलें कीं, तूं मनाचा निग्रह करून संकल्प सोड, म्हणजे मी तुला उदक पाजतों, पण पुनः संसाराची आशा धरतां कामा नये व अगदीं विरक्त होऊन राहिलें पाहिजे. ह्या सर्व गोष्टी तुला पत्करत असल्या तर पाहा. तें भाषण ऐकून राजा कुंठित होऊन विचार करीत बसला. त्यानें शेवटीं पोक्त विचार करून दत्तात्रेयास सांगितलें कीं मी अजून प्रपंचांतून मुक्त झालों नाहीं गयावर्जन करून पितुऋणांतून मुक्त होईन. तसेंच कांतेस पुत्र झाल्यावर तिच्या ऋणांतून मुक्त होईन. पुत्राचें लग्न झाल्यावर त्याच्या ऋणांतून मुक्त होईन. हीं सर्व ऋणें अद्यापर्यंत जशीच्या तशींच कायम आहेस: यास्तव आणखीं बारा वर्षें मला संसार करण्याची मोकळीक द्यावी.
 
मग दत्तात्रेयानें भर्तृहरीचें म्हणणें कबूल केलें व त्यास पिण्यास पाणी देऊन अनुग्रह दिला. त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून कानांत मंत्र सांगितला आणि आपण दत्तात्रेय आहों असें सांगून त्यांस ओळख दिली. नंतर तें मायिक सरोवर अदृश्‍य करून आपणहि गुप्त झाला. पाण्यावांचून सर्व तळमळत असल्यामुळें इतकी खटपट करून व्यर्थ असें भर्तृहरीस वाटून त्यानें श्रीदत्तात्रेयाची प्रार्थना केली. मग दत्तात्रेयानें भोगावतीचें उदक आणून सर्वांस पाजिलें. कामधेनूपासून अन्न निर्माण करविलें; शेवटीं राजा सैन्यासह भोजन करून व पाणी पिऊन तृप्त झाल्यावर दर्शन घेऊन आपल्या नगरास गेला. इतक्यांत दत्तात्रेय भोगावतीस व कामधेनूस रवाना करून आपणहि निघून गेले.

सर्व पहा

Chaturmas 2026: चातुर्मास कधी सुरू होतो? जाणून घ्या धार्मिक महत्त्व, नियम आणि या काळात काय करावे

Nagpanchami 2026 Date नागपंचमीची पूजा कधी? तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Guru Purnima Wishes Images गुरूपौर्णिमा शुभेच्छा इमेजेस

गुरुपौर्णिमेला श्री गजानन विजय ग्रंथाचे परायण करण्याचे महत्त्व आणि त्यामागील भाव

गुरु पौर्णिमेला घरीच शेगावच्या गजानन महाराजांचे पूजन कसे करावे? वाचा संपूर्ण शास्त्रोक्त पूजा विधी

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments