शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री परशुराम माहत्म्य अध्याय ५

श्रीगणेशाय नमः ॥ श्री कौसल्या नंदनाय नमः ॥
जय जया फरशुधरा श्रीहरेषष्ठमावतारा पूर्णानंदाभक्तसुखकरा मंगलरुपा नमोस्तुते ॥१॥
ऋषी सूतासी विचारिती रामानीं धरिला हातीं तो फरशु कैसा काळगती अह्मासीं परीसावें ॥२॥
प्रश्न ऐकोनि तो सूत सावचित्तें ऐका ह्मणत कैसा फरशु काळगत सविस्तर सांगेन ॥३॥
पूर्वी भ्रुगु पत्‍नी ख्याती दैत्यांचें कल्याण चिंती तेणें असुर बळावती तें इंद्रासी कळलें ॥४॥
इंद्रें जाऊनि विष्णूपासी सांगे भयभीत मानसीं भ्रुगु पत्‍नि निश्चयासी दैत्य कल्याण करीतसे ॥५॥
तें ऐकून अप्रियवचन क्रोधें खवळला श्रीरमण ह्मणे अभय तुह्मां जाण वधी नमीती येसीं ॥६॥
तात्काळ चक्र घेवोनी दुष्ट ख्याती ह्मणोनी टाकिलें शिर तोडोनी आश्चर्य जालें तेधवां ॥७॥
कृत्य ऐकतां भ्रुगू येत दुःख शोकें जाहला संतप्त बोले विष्णूसी अत्यंत काय केलें पौरुषतूं ॥८॥
स्त्री हत्येचें पापभारी वेदमुखें सांगे हा हरी आणि आपण स्वेच्छे विहारी सर्व करुनि अकर्ता ॥९॥
बोले कोपोनि तो मुनी माझ्या पत्‍नीची केली हानी तरी त्वां शाप घेवोनी वर्तावें सर्वदां ॥१०॥
शाप ऐका माझ्या पासुनी हा सर्वाती नारायणी ॥ परी जाईल नाना योनी करील स्त्रीशोक एकदा ॥११॥
आणि शापीतो चक्रासी जन्म एकदा आयसी शाप ऐसा भरवसी सत्य होईल ॥१२॥
एवं शाप घेवोनी लीला करणें जाणूनी पूर्वी व्हावया वेदपुराणी हितावह चिंतिलें ॥१३॥
पुढें लोहमय फरशु होऊनी केला दैत्यनाशु दुर्गा गणेशानें तोचि आंशु घेवोनि दुष्ट मारिले ॥१४॥
त्यानंतरें गणेशानें जाणोनि पुढती करणे ऋषींपासी ईशवचनें पूर्वी ठेविला ॥१५॥
वारंवार प्रगट जाण सर्वव्यापी संकर्षण जेथें होतो दृश्यपण तया अवतार ह्मणती ॥१६॥
तोचि जाला मछ कूर्म वराह नृसिंह उग्रवर्म वामनें छेदोनी बळी वर्म राज्य दिधलें देवांसी ॥१७॥
धरोनि बहु अवतार भक्तांसी रक्षी वारंवार तो द्वीज देव लक्ष्मीवर फरशुधर जाहला ॥१८॥
मग माता बहु लाडेंसीं प्रतिवर्षीं वाढवी सायासीं वायनें देई प्रेमेंसीं ब्रह्म खेळवी सर्वदां ॥१९॥
नाना क्रीडापुत्र मीसां करुनी संतोषी तो दासां पिता ह्मणे श्रीनिवासा सौंदर्य सीमातूंचि एक ॥२०॥
श्रीहरी पंचवरुषाचे होता मौंजी करावी ह्मणे आतां ब्रह्मवर्चसी करावें त्वरिता ॥ ह्मणोनी उत्साह मांडिला ॥२१॥
तेव्हां सर्व सुरवर आनंदें करीती जयजयकार हा विष्णु परात्पर यासी काय उपनयन ॥२२॥
सप्तऋषी आले निमंत्रित जमदग्नि संतोषित हवनादिक कर्मे बहुत करोनि उपनीत केलें पैं ॥२३॥
सूर्यें गायत्री उपदेश बृहस्पती ब्रह्म सूत्रास सप्तऋषी मेखलेस कृष्णाजिन पृथ्वीनें ॥२४॥
माता कौपीन आछादन वरुणें सुछत्र अर्पण कमंडलु ब्रह्मा आपण पद्माक्ष माळा सरस्वती ॥२५॥
दिव्य मुद्रा भ्रुगुमुनी नारदें मूलमंत्र सांगोनी दर्भ मुष्टी सर्व ऋषींनीं आशीर्वाद गर्जती ॥२६॥
शंकरानीं युग्मपादुका कुबेर पंचपात्रिका भीक्षा भगवती अंबिका ब्रह्म वर्चसी ह्मणती ॥२७॥
प्रणव ह्मणोनी मग चारी वेद बोलोनि सवेग भिक्षा घेतली विराग लक्ष्मीपतीनी ॥२८॥
भीक्षा अग्नि मीळे ह्मणोनी दुसरा यजु बोलोनी तिसरा साम गावोनी अथर्वेंगुरुसि दीधली ॥२९॥
प्रातः सायं समिध होम ॥ परिसमूहनादि नेम उपस्छान सर्वकाम मानस्तोकें विभूती ॥३०॥
हाचि होय महद्भूती यासी हो काय विभूती लोकशिक्षा येवोनि भूती करी क्रीडा विचित्र ॥३१॥
शौचस्नान तिलकविधी तत्वन्यास भूतशुद्धी संध्यावंदन ध्यानबुद्धी भगवद्धर्म शोधीतसे ॥३२॥
मातापिता गुरुवंदन नित्यकरी मित भोजन सर्वांतरी ईशपूजन काय कृत्य चिंतितसे ॥३३॥
न्याय मीमांस व्याकरण वेदवेदांत पुराण स्मृती तर्क अभ्यास गहन धनुर्वेद शिकूं ह्मणे ॥३४॥
कैलासी शंभू वेदवादी सांगेलतो धनुर्वेदी चिंतोनी ऐसें पित्यासी वंदी आणि ह्मणे जाणें पैं ॥३५॥
शिकूनि येऊ लवकरी धनुर्वेद अभ्यासे भारी कारण होय अंह्मासी परी काळजी न करणें ॥३६॥
ऐशा आज्ञेतें घेवोनी सकल कृत्य चिंतोनीं धनुष्य शर फरशुपाणी ऐसे निघाले ॥३७॥
जटा मुगुट बंधनी तुलसी माला गुंफूनी गेले हिमाचल वनीं तेथें इंद्र पातला ॥३८॥
चरणीं ठेवोनी मस्तक ह्मणे तूंची आमुचा तारक भ्रुगुकुळाचा तिलक रेणुकात्मजा तुज नमो ॥३९॥
गोब्राह्मणाचा पालक अखिल विश्‍वाचा नायक सकळ दुष्टांसी घातक अवतरलासी श्रीहरी ॥४०॥
स्तवोनी करीतसे प्रार्थन तुह्मीं अवतार जगत्राण येथें दैत्य मातला पूर्ण त्याचा वध करावा ॥४१॥
गजासुर नामें बळी अति हिंसक सर्व काळीं ज्याचें भय मानी चंद्रमौळी स्वर्ण वर्णतो विचित्र ॥४२॥
ऐसें इंद्रें विनवोनी गेला आपुले भुवनीं तेव्हां राम धनुष्याणी पुढती चालिले ॥४३॥
पुढें आली सायं निशा अंधःकार करती दिशा ह्मणोनि केला भयनाशा धनुष्याचाटणत्कार ॥४४॥
शब्द भरला वनांत दैत्य जाला भयचकित ह्मणे येथें कोण येत भक्षी न त्यासी निश्चयें ॥४५॥
वोळखिली मनुष्य चाल गर्जना करोनि बहुल पसरोनी आ कराल जवळी पातला ॥४६॥
पृथ्वी करी थरथरा उंचबळले अब्धिवरा शुंडा धरोनि रामवरा गर्दभ स्वरें बोले पैं ॥४७॥
कोठोनि आला काय लक्ष दिसतो हा कमलाक्ष वाटतें आमुचेंचि भक्ष्य क्षुधा बहुत लागली ॥४८॥
महादैत्य शूर्पकर्ण शुंडेनें फुत्कार दणदण कीं **** कवळितो पूर्ण एकदंत कीं दावी ॥४९॥
राम बोलती हांसोनी बाण धनुष्या लावोनी मुखपसरी गाक्षुधेनी भक्षणासी देईन ॥५०॥
इतुकीया अवसरीं बाण सोडिले मेघापरी आछादीला तो देवारी क्षण न लागतां ॥५१॥
दैत्य करी युद्ध रोमहर्षण घेवोनि वृक्षपाषाण रामें लावोनि महाबाण शिर तात्काळ छेदिलें ॥५२॥
भार्गवानी शिर जावोन ॥ पाहिलें तें विचित्र वर्ण कीं दिसे तप्त सुवर्ण ह्मणोनि घेतलें ॥५३॥
तें धनुष्कोटीनें धरोनी ॥ चालिले अपूर्व हांसोनी घेई बाण सांवरोनी कैलासिं मग ते ॥५४॥
हिमाचळीं जालें भय नष्ट तेथें योगीनेम निष्ट तपस्वी संन्यासी श्रेष्ठ कृतकृत्य ते होती ॥५५॥
सर्व देव ऋषी स्तुती स्तविती बहु पुष्प वृष्टी करिती गंधर्व गाती स्त्रिया नाचती भार्गव चरित्र वर्णितीते ॥५६॥
ईश कथा अनुपम ऐकतां ही नित्यनेम तरीच होय तृप्तकाम चतुर्विध पुरुषार्थें ॥५७॥
पुढें कथा होय सुरस ऐंकावी स्वस्थ मानस नमन मी भार्गवास करोनी सांगतों ॥५८॥
स्वस्ति श्रीपरशुरामविजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु पंचमोध्याय गोड हा ॥५॥
श्रीभार्गवार्पणमस्तु॥